कल्याण : कल्याणच्या नमस्कार मंडळ सभागृहात रविवारी कालिदास जयंती कार्यक्रम पार पडला.‌ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य भारतीच्या कल्याण-डोंबिवली महानगराचे अध्यक्ष प्रा. नारायण फडके हे होते. महानगर कार्याध्यक्ष अश्विनी मुजुमदार यांनी प्रास्ताविक करताना साहित्य भारतीचा उद्देश, कार्यक्रम, कालिदास जयंती या संदर्भात माहिती सांगितली.
कोकण प्रांत उपाध्यक्ष डॉ.श्यामसुंदर पाण्डेय यांनी कालिदासांच्या साहित्याचा परिचय करुन देतांना पाचव्या शतकात लिहिलेले साहित्य आजच्या काळातही कसे प्रासंगिक आहे हे सांगतांना शाकुंतल, कुमार संभव, रघुवंश,मेघदूत व इतर कलाकृतींमधील उदाहरणे व श्लोकांचा उल्लेख केला. लक्ष्मी यादव यांनी अखिल भारतीय साहित्य परिषदेचे संरक्षक श्रीधर पराडकर यांनी संघ प्रचारकी जीवनावर लिहिलेल्या “तत्वमसी” या कादंबरीचा परिचय करुन दिला.
प्रचारकाच्या रेल्वे प्रवासापासून या कादंबरीला सुरवात होते. सहप्रवाश्यांच्या गप्पांतून संघ समजायला लागतो मग प्रश्नोत्तरातून, सहवासातून तो आधिक उलगडत जातो. संघ तत्वज्ञान कादंबरीच्या माध्यमातून वाचकांपुढे आणण्याचा हा पहिलाच यशस्वी प्रयत्न आहे. डॉ. रत्नाकर फाटक यांनी साप्ताहिक विवेकचे उपसंपादक रविंद्र गोळे यांनी संपादित केलेल्या “ संघमंत्र “ या पुस्तकाचा परिचय श्रोत्यांना करुन दिला. या पुस्तकात ज्यांनी अनेक वर्षे संघाचे काम केले व अजूनही करीत आहेत अशा भय्याजी जोशी, डॉ. अशोक कुकडे, प्रमोद बापट, डॉ. सतिश मोढ, डॉ. मनमोहन वैद्य, डॉ.  गोडबोले, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, अश्विनी मयेकर व इतरांचे संघाच्या वेगवेगळ्या वैशिष्ठ्यांवरील लेख आहेत.
या पुस्तकाच्या वाचनातून संघाची वाटचाल, संघटन, संघाची समग्र माहिती मिळते. हे पुस्तक सर्वांनी वाचावे असे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी रानी यांनी केले तर डॉ. दुर्गेश दुबे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. दिनेश प्रताप सिंग, साहित्य भारती महाराष्ट्रचे प्रवीण देशमुख, प्रांत कार्यालयमंत्री प्रा. दिनानाथ पाटील व कल्याणातील अनेक साहित्यिक उपस्थित होते.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *