मुंबई : श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, दादर (स्थापना १९२०) यांच्या १०६ व्या वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला आषाढी एकादशी दिंडी सोहळा २०२६ मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. “विठू माऊलीच्या गजरात एकत्र येऊया” या भावनेने आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्यात मंडळाचे सर्व सदस्य, वारकरी आणि विठ्ठलभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दिंडीची सुरुवात हनुमान मंदिर, शिवनेरी बिल्डिंग समोर, दादर येथून झाली. टाळ- मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात दिंडी प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिर, वडाळा येथे पोहोचली. संपूर्ण मार्ग भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी तळेवाडी, तुळसुली (ता. कुडाळ) येथील ग्रामस्थ मंडळींनी व्यवस्थापक म्हणून उत्कृष्ट नियोजन व चोख व्यवस्था केली. त्यांच्या नियोजनामुळे दिंडी सोहळा शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात पार पडला. मंडळाच्या १०६ वर्षांच्या अखंड वारकरी परंपरेचा वारसा जपत आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याने भक्ती, एकता आणि सामाजिक सलोखा यांचा सुंदर संदेश दिला.
