कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक व वीरसैनिकांच्या वीरपत्नींच्या कृतज्ञता सन्मान सोहळा पार…
मुंबई : राज्यसरकार वीरसैनिक कल्याण मंडळाच्या माध्यमातून वीरपत्नी, वीरमाता आणि वीरसैनिकांच्या परिवारासोबत सदैव ठामपणे उभे आहे अशा भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि पराक्रमाचा महान वारसा लाभलेला आहे. देशसेवा आणि कर्तव्यपालनासाठी महाराष्ट्र नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. कारगिल युद्धातही राज्यातील अनेक जवानांनी शौर्य, त्याग आणि बलिदानाचे अमूल्य योगदान दिले आहे असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या. महाराष्ट्र शासन आणि स्वरनिनाद फाऊंडेशन यांच्या समन्वयाने आयोजित कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक व वीरसैनिकांच्या वीरपत्नींच्या कृतज्ञता सन्मान सोहळा लोकभवन, मुंबई येथे पार पडला.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या प्रसंगी कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच वीरसैनिकांच्या वीरपत्नींचा आणि वीरमातांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, व्हाइस अॅडमिरल संजय वात्सम, लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांच्यासह वीर सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, भारतीय सैनिक आदी प्रमुख उपस्थित होते.
