ठाणे जिल्ह्यात प्रथमच मिनी लोकअदालतीत १४९ प्रकरणांतील तडजोडीत
अनिल ठाणेकर
ठाणे : मिनी लोकअदालतीमध्ये ठाणे मुख्यालयातील मोटार अपघात दावा नुकसान भरपाई प्रकरणांसाठी २ पॅनल गठीत करण्यात आली होती. पॅनल नं १ वर पॅनलप्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश-१३, ठाणे पी. ए. पत्की यांनी व पॅनल क्र.२२ वर पॅनलप्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश-८, ठाणे डी. बी. माने यांनी काम पाहिले. या दोन्ही पॅनल मिळून एकूण १४९ प्रकरणांत तडजोड होवून पिडीतांना रक्कम रु.१७,८०,९६,०००/- रूपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या परवानगीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे आर. डी. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार अपघात दावा नुकसान भरपाई प्रकरणांसाठी जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे येथे शनिवार, २५ जुलै रोजी “मिनी लोकअदालत” चे आयोजन करण्यात आले होते. मागील राष्ट्रीय लोकअदालत ही ९ मे रोजी झाली होती व पुढील राष्ट्रीय लोकअदालत ही १२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही लोकअदालतींमधील असलेल्या कालावधीचा विचार करून २५ जुलै रोजी “मिनी लोकअदालत” चे आयोजन करण्यात आले होते. न्यायाधीश आर. व्ही. मोहिते, सदस्य, मोटार अपघात दावा न्यायाधीकरण, यांच्या न्यायालयातील एक मोटार अपघात दावा क्र.१७४२/२०२४ मध्ये मोटार अपघातात मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कंपनीकडुन उच्चतम रक्कम नुकसान भरपाई म्हणून १ कोटी ८० लाखांचा धनादेश मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे, आर. डी. सावंत यांच्या हस्ते देण्यात आला. या दाव्यामधील मृत्यु पावलेली व्यक्ती विजयकुमार आदीद्रविदार हे टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे नर्सिंग विभागात कार्यरत होते. सदर व्यक्ती मुंबई-गोवा हायवेवरून मोटारसायकलवरून जात होते. ते आंबेवाडी नाका, कोलाड, रोहा, जि. रायगड या ठिकाणी पोहोचले असता एका भरधाव ट्रेलरने त्यांना मागुन जोरदार धडक दिल्याने सदर व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तेव्हा त्यांचे वय 36 वर्षे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, आई, वडिल व भाऊ असे वारस आहेत. सदर पॅनलवर पॅनलप्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश-८, ठाणे मा. डी. बी. माने यांच्या मार्गदर्शनाखाली सदर दाव्यामध्ये तडजोड करण्यात आली. सदर दाव्यामध्ये इन्शुरन्स कंपनीतर्फे ॲड. अरविंद के. तिवारी यांनी व पक्षकारांतर्फे अॅड सचिन एल. माने यांनी काम पाहिले. मागील व पुढील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये चार महिन्यांचा कालावधी आहे. मोटार अपघात दावा नुकसान भरपाई प्रकरणांतील पिडीतांच्या वारसांना लवकारात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी मोटार अपघात दावा न्यायाधीकरणात कार्यरत असणाऱ्या वकीलांच्या प्रयत्नांनी ही मिनी लोकअदालत आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रविंद्र एस. पाजणकर यांनी दिली.
