मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मिरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदरचे संस्थापक-मार्गदर्शक, ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक व समाजसेवक प्रा. वसंतराव यशवंत पाटील यांना “दैनिक लोक युवा वृत्तपत्राच्या” वतीने लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्ताने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार – २०२६” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार रविवार, २ ऑगस्टला शेगाव येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गेली तीन दशकांहून अधिक काळ प्रा. वसंतराव पाटील यांनी कुस्ती, शिक्षण, सामाजिक आणि युवक विकास क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय व निःस्वार्थ कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी धनश्रीताई खाटीकर (अध्यक्ष, मराठी-हिंदी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य) उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते प्रा. वसंतराव पाटील यांना शाल, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय कुलकर्णी (तरुण भारत), अमोल अंधारे, चंद्रकांत घोराळे (भाजप तालुका अध्यक्ष), बाळासाहेब दामोदर (राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष, बुलढाणा) तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मिरा-भाईंदरमध्ये श्री गणेश आखाड्याची स्थापना करून त्यांनी शेकडो राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविले आहेत. गरीब व होतकरू मल्लांना मोफत प्रशिक्षण, निवास, मार्गदर्शन, खुराक आणि संस्कार देत त्यांनी कुस्ती क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करून मिरा-भाईंदरचे नाव उज्ज्वल केले आहे.
प्रा. वसंतराव पाटील यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मिरा-भाईंदर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या सन्मानामुळे श्री गणेश आखाडा, मिरा-भाईंदर कुस्तीगीर संघ आणि संपूर्ण मिरा-भाईंदर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
