नगरसेवक शैलेश पाटील यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता
आरती परब
दिवा : दिवा शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा तसेच त्यासंदर्भातील ठराव ठाणे महापालिकेच्या महासभेत तातडीने मांडून मंजूर करावा, या मागणीसाठी समाजसेविका सुवर्णा कांबळे आणि समाजसेवक सौरव अढांगळे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाची अखेर दुसऱ्या दिवशी सांगता झाली. शिवसेना उपशहर प्रमुख तथा नगरसेवक शैलेश पाटील यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा विषय ठाणे महापालिकेच्या महासभेत मांडण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल तसेच पुतळा उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे लेखी आश्वासन शैलेश पाटील यांनी दिले.
लेखी आश्वासनानंतर नगरसेवक शैलेश पाटील यांनी सुवर्णा कांबळे आणि सौरव अडागळे यांना नारळपाणी देऊन उपोषणाची सांगता केली. त्यामुळे पुतळा उभारणीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सकारात्मक दिशा मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. आता या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे दिवा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. यावेळी आंबेडकरी चळवळीतील दिवंगत ज्येष्ठ नेते एकनाथ भगत (बाबा) यांच्या सामाजिक आणि चळवळीतील योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या नावाने दिव्यातील एका रस्त्याचे नामकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी तेव्हा ग्वाही देण्यात आली.
या प्रसंगी अजित भगत, भालचंद्र भगत, विश्वास भालेराव, बालाजी कदम, गंगाधर गायकवाड, रवी कदम, सुनील कांबळे, भरत मोहिते, प्रवीण उतेकर, सरला गायकर, शिला बहिरूने यांच्यासह शिवसैनिक, आंबेडकरी चळवळीचे अनुयायी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपोषण मागे घेतल्यानंतर समाजसेवक सौरव अडागळे आणि सुवर्णा कांबळे यांनी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, आंबेडकरी संघटना, महिला मंडळे, शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि दिवा शहरातील नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *