मराठीचे ज्ञान अनिवार्य
नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई होणार-  प्रताप सरनाईक
अनिल.ठाणेकर
ठाणे-१ मे पासून सुरू झालेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा’ समारोप १७ ऑगस्टला ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार असून, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मराठी भाषा मंत्री  उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. व्यवहारिक मराठी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना यावेळी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषदचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यभर राबविण्यात आलेल्या या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत १ लाखांहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित चालकांनीही १५ ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले. यावेळी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर मराठीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो.”
ते पुढे म्हणाले, मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा आत्मा आहे. महाराष्ट्रात उपजीविका करणाऱ्या प्रत्येकाने मराठीचा सन्मान करावा. आम्ही कोणाच्याही विरोधात भूमिका घेतलेली नाही. महाराष्ट्रावर, मराठी मातीवर आणि मराठी भाषेवर प्रेम करणारा प्रत्येकजण आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र महाराष्ट्रात काम करताना मराठी भाषेचा सन्मान राखणे गरजेचे आहे. मराठी शिकवणी अभियानाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, शासनाने मानवतावादी दृष्टिकोनातून पुढाकार घेत अमराठी चालकांना मराठी शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली. या अभियानाच्या माध्यमातून हजारो चालकांनी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला असून त्याला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चालकांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांबाबत बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून दिले जाणारे प्रमाणपत्र हे अभियानात सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र आहे. मात्र केवळ प्रमाणपत्र दाखविल्यामुळे कारवाई टळणार नाही. आरटीओ अधिकारी चालकांशी मराठीत संवाद साधतील. त्या संवादामध्ये चालकाला मराठीत उत्तर देता आले, तरच त्याने नियमांचे पालन केल्याचे मानले जाईल. नियमांचे पालन न करणाऱ्यांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कायद्यामध्ये जे नमूद आहे त्यानुसारच कारवाई होईल. आरटीओ अधिकारी तपासणी करतील आणि आवश्यक ती कार्यवाही करतील. कायद्याच्या कक्षेत राहूनच पुढील निर्णय घेतले जातील.
यावेळी त्यांनी मराठी प्रवाशांनाही आवाहन केले. समोरचा चालक हिंदी भाषिक आहे असे गृहीत धरून मराठी प्रवाशांनी हिंदीत संवाद साधू नये. मराठी भाषिकांनी मराठीतच संवाद साधल्यास मराठीचा वापर अधिक वाढेल. मराठीचा सन्मान राखण्याची जबाबदारी केवळ चालकांचीच नाही, तर प्रत्येक मराठी नागरिकाची आहे, असे ते म्हणाले.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर तिच्या गौरवासाठी राबविण्यात आलेल्या या अभियानाला लाखो अमराठी बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात आलेल्या या अभियानाने राज्यभर लोकचळवळीचे स्वरूप धारण केले आहे. उर्वरित अमराठी चालकांनी १५ ऑगस्टपूर्वी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण करून मराठी आत्मसात करावी, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *