विद्यार्थ्यांनी तयार केल्या तिरंगा राख्या
विविध शाळांमध्ये स्थानिक नगरसेवकांची उपस्थिती
ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका शाळांमध्ये विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी ‘तिरंगा राखी बनविणे’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ठाणे महानगरपालिका शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आकर्षक तिरंगा राख्या तयार केल्या.
राखी निर्मितीच्या प्रत्यक्ष कृती कार्यक्रमात ठामपाच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तिरंग्याचे महत्त्व समजावून सांगत राखी तयार करण्याच्या विविध टप्प्यांमध्ये मार्गदर्शन केले. केशरी, पांढरा आणि हिरवा या तिरंग्याच्या रंगांचा कल्पक वापर करून विद्यार्थ्यांनी सुंदर आणि आकर्षक राख्या तयार केल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ठाणे महानगरपालिका शाळा क्र. १८, २५ आणि ५४ येथे ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत तिरंगा राखी तयार करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमात इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना राखी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी विविध रंगसंगती आणि कलात्मक कल्पनांचा वापर करून आकर्षक तिरंगा राख्या तयार केल्या.
बाळकूम येथील शाळा क्र. ६० येथेही विद्यार्थ्यांसाठी तिरंगा राखी तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध आकर्षक राख्या तयार केल्या. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी स्थानिक नगरसेवक संजय भोईर, उषा भोईर तसेच गटअधिकारी संगीता बामणे उपस्थित होत्या.
शाळा क्र. १२७ येथेही ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत राखी बनविण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून स्थानिक नगरसेविका कमल चौधरी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचे कौतुक करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले.
‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश विद्यार्थ्यांमार्फत घराघरांत पोहोचावा, या उद्देशाने ठामपाच्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तिरंगा राखी निर्मितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचे महत्त्व, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या तिरंगा राख्यांमधून देशभक्तीची भावना व्यक्त केली.
ठाणे महानगरपालिका शाळांमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राखी निर्मितीसह विविध देशभक्तीपर आणि सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कळवा प्रभाग समिती येथेही शालेय विद्यार्थ्यांना तिरंग्याचे महत्त्व आणि स्वातंत्र्यदिनाबाबत माहिती देण्यात येणार आहे. यावेळी कळवा प्रभाग समिती अध्यक्षा विजया लासे, माजी उपमहापौर मनोज लासे, सहायक आयुक्त ललिता जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
००००
