भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे आवाहन
अनिल ठाणेकर
ठाणे : महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना अडीच वर्षांत मुंबई मेट्रो , जलयुक्त शिवार , मराठवाडा वॉटर ग्रीड असे महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प बंद करून महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा , असे आवाहन भारतीय जनता पार्टी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले. महाराष्ट्राचा ६४ वा स्थापना दिन साजरा होताना महाराष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्याला प्रगतीपथावर नेणारे प्रकल्प कसे बंद पाडले गेले याची मतदारांना आठवण करून देणे आवश्यक आहे , असेही उपाध्ये यांनी सांगितले.
उपाध्ये यांनी सांगितले की , २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत दिले ( १६१ जागा ) होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेला खतपाणी घालून शरद पवार यांनी राज्यात अस्थिरता निर्माण केली . उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी घेतलेले अनेक प्रकल्प बंद करून , स्थगित करून महाराष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण केले. मुंबईकरांचे दैनंदिन जीवन सुखकर व्हावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पासाठी पर्यावरणाच्या सर्व अटींचे पालन केले होते. आरेच्या कारशेडसाठी उच्च न्यायालय, हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निर्वाळा दिला होता. उपनगरी रेल्वेच्या दररोजच्या प्रवासातील त्रासातून मुंबईकरांची मुक्तता करण्यासाठी मेट्रो प्रकल्प अत्यंत आवश्यक होता . मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात या प्रकल्पाला स्थगिती दिली . एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर हा प्रकल्प पुन्हा सुरु झाला. मात्र दिरंगाई झाल्यामुळे मुंबई मेट्रो प्रकल्पाचा खर्च १० हजार कोटींनी वाढला. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आकसापोटी उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना वेठीस धरले.
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड योजना सुरु केली. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी तब्बल 25 हजार कोटी रुपये खर्चाची योजना फडणवीस सरकारने आखली . या माध्यमातून मराठवाड्यातील 11 मोठी धरणे एकमेकांना पाईपलाईनद्वारे जोडण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी इस्राईलमधील कंपनीने वर्षभर पाहणी केली.फडणवीस सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचा निधीही या प्रकल्पासाठी मंजूर केला होता .या योजनेअंतर्गत जायकवाडी (औरंगाबाद),येलदरी (परभणी),सिद्धेश्वर (हिंगोली),माजलगाव (बीड),मांजरा (बीड), ऊर्ध्व पैनगंगा (यवतमाळ), निम्न तेरणा (उस्मानाबाद), निम्न मण्यार (नांदेड),विष्णूपुरी (नांदेड),निम्न दुधना (परभणी),सिना कोळेगाव (उस्मानाबाद) ही ११ धरणे एकमेकांशी जोडली जाणार आहेत . मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणाऱ्या या योजनेकडे आघाडी सरकारने दुर्लक्ष केले.
मराठवाडा , विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वैधानिक विकास मंडळांची मुदत संपल्यानंतर त्यांची पुन्हा स्थापना करण्याकडेही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना दुर्लक्ष केले . भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात तसेच बाहेरही हा प्रश्न उपस्थित करूनही उद्धव ठाकरे सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, असेही श्री. उपाध्ये यांनी नमूद केले. वेदान्त फॉक्सकॉन , टाटा एअर, सॅफ्रन सारखे मोठे गुंतवणुकीचे प्रकल्प महाराष्ट्रात सुरु व्हावेत यासाठी उद्धव ठाकरे यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारला या प्रकल्पांचा पाठपुरावा करण्याची विनंती केली होती . मात्र उद्धव ठाकरे यांनी हे प्रकल्प राज्यात यावेत यासाठी इच्छाशक्ती दाखवली नाही . हे प्रकल्प महाराष्ट्रात आले असते तर राज्याच्या औद्योगिक विकासाला मोठा वेग मिळाला असता. तसे न करून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र द्रोह केला आहे , असेही श्री. उपाध्ये यांनी सांगितले.
