सर्वेक्षण रद्द करून नव्याने करण्याची दिवा मनसेची मागणी
आरती परब
दिवा : दिवा शहरात ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या फेरीवाला सर्वेक्षणाची प्रक्रिया चुकीच्या व पक्षपाती पद्धतीने सुरू असल्याचा आरोप दिवा मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. या सर्वेक्षणातील अनियमितता यापूर्वीच व्हिडिओच्या माध्यमातून जनतेसमोर आणल्यानंतर आज दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत जाब विचारला.
फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेली नसतानाही काही फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. दुसरीकडे, मराठी फेरीवाल्यांनी सुमारे २० दिवसांपूर्वी अर्ज व फॉर्म भरूनही त्यांचे सर्वेक्षण अद्याप करण्यात आलेले नाही. मात्र, इतर राज्यांमधून आलेल्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण प्राधान्याने केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वेक्षण प्रक्रियेत मराठी फेरीवाल्यांना डावलून परप्रांतीय फेरीवाल्यांना झुकते माप दिले जात असल्याचा गंभीर संशय निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील अधिवासाचा दाखला आवश्यक असताना आतापर्यंत सर्वेक्षण करण्यात आलेल्या फेरीवाल्यांकडून अशा प्रकारचे दाखले घेतले गेले आहेत का, याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. चक्क उत्तर प्रदेशचे रेशनकार्ड जोडलेल्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेची पारदर्शकता आणि वैधता संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, फेरीवाल्यांकडून वसुली करणाऱ्या दलालांना महापालिकेचे कर्मचारी सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत फिरण्यास सांगत असतील, तर प्रत्यक्ष सर्वेक्षण प्रक्रिया किती पारदर्शकपणे होत असेल, याची कल्पना करणे कठीण आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची किंवा संगनमताची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप दिवा मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणाची ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी तातडीने सखोल चौकशी करावी, तसेच सर्वेक्षणादरम्यान सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी करावी, अशी मागणी दिवा मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच, आतापर्यंत झालेली संपूर्ण फेरीवाला सर्वेक्षण प्रक्रिया रद्द करून, स्वतंत्र व पारदर्शक यंत्रणेच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रांची काटेकोर तपासणी करत नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे, अशी ठाम मागणी दिवा मनसेने केली आहे. प्रशांत गावडे, अध्यक्ष, दिवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना- मराठी फेरीवाल्यांवर अन्याय होऊ देणार नाही आणि फेरीवाला सर्वेक्षणाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ देणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईपर्यंत दिवा मनसेचा लढा सुरूच राहील.
0000
