कल्याण : पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालय, मराठी शाळा आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत गफूर शेठ डोन उर्दू शाळेच्या संयुक्त विद्यमाने ‘सद्भावना संगम – ईद-ए-मिलाद व रक्षाबंधन सोहळा’ साजरा करण्यात आला.
गफूर शेठ डोन उर्दू या शाळेत आयोजित कार्यक्रमात दोन्ही शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उर्दू शाळेच्या शिक्षिका डिबा दफेदार यांनी ईद-ए-मिलादचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले, तर सम्राट अशोक विद्यालयाच्या शिक्षिका माधुरी काळे यांनी रक्षाबंधनचे महत्त्व व त्यामागील भावनिक नाते याबाबत माहिती दिली. उर्दू शाळेचा विद्यार्थी सूर्यफातिया चे पठण केले.
यानंतर दोन्ही शाळांतील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून ‘एकतेचा धागा, सद्भावनेचा संदेश’ दिला. विद्यार्थ्यांनीही मुलींना भेटवस्तू देत या बंधुभावाच्या सोहळ्यात सहभाग नोंदवला. दोन्ही शाळांतील महिला व पुरुष शिक्षकांनीही एकमेकांना राख्या बांदत कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाला विशेष भावनिक स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाला गफूर शेठ डोन उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका रुबीना शेख तसेच सम्राट अशोक विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांच्यासह दोन्ही शाळांतील शिक्षक उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले, “भारत देश हा सुसंस्कृत देश आहे. जाती-धर्माचे राजकारण करत बसण्यापेक्षा एकमेकांच्या रूढी-परंपरा आणि सणांचा आदर करत आपण सर्व भारतीय एक आहोत, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे गरजेचे आहे. ईद-ए-मिलाद आणि रक्षाबंधनाचा सोहळा एकत्र साजरा करून विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव आणि सद्भावनेच्या भावना निर्माण करण्याचा हा उपक्रम आहे.”असे ही म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमप्रकाश धनविजय यांनी केले, तर आभार फिरदोस मणियार यांनी मानले.
0000
