तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत सरकारची काढली अंत्यसंस्कार यात्रा
कल्याण : कल्याणमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने साखरेच्या दरवाढीविरोधात तहसील कार्यालयावर  ‘अंत्यसंस्कार यात्रा’ काढण्यात आली. साखर आणि साखरपिकाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुगर डॅडी असा उल्लेख असलेला बॅनर हातात घेऊन भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाढती महागाई सरकारने कमी करावी अशी मागणी यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग यांनी केली. यावेळी कॉंग्रेसच्या गटनेत्या तथा महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.
साखर महागली, चहाचा गोडवा पळाला, भाजप सरकारच्या कारभाराने जनतेचा खिसा मात्र जळाला. आता चहात साखर टाकायची की साखरेसाठी कर्ज काढायचं? असा उपरोधिक टोला लगावत साखर आणि साखरपिकाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला. ऊस शेतकऱ्याचा, साखर जनतेची, पण दरवाढीचा फटका जनतेच्या खिशाला. गोड बोलणाऱ्या सरकारने साखर मात्र कडू केली. महागाईच्या या तडाख्याला आता युवक काँग्रेस सडेतोड उत्तर देत जनतेच्या हक्कासाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली असल्याची माहिती युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *