भरत गोगावले यांचा गौरवोद्गार; किशन जावळे यांनीही रेस्क्यू पथकांच्या धैर्याचे केले कौतुक
अशोक गायकवाड
अलिबाग – अपघात, पूर, दरड कोसळणे, अतिवृष्टी अशा संकटांत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीला धावून जाणाऱ्या ‘जीवनदूतां’चे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या धैर्याचा आणि सेवाभावाचा सन्मान करणे ही अभिमानाची बाब असल्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी सांगितले. रायगड पोलिसांच्या ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत कुरुळ येथील आर.सी.एफ. सभागृहात ‘जीवनदूत सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे आणि रिलायन्स ग्रुपचे शशांक गोयल उपस्थित होते. गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक वाढणार असल्याने पोलीस, प्रशासन व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. अपघातांच्या वेळी तातडीने बचावकार्य करता यावे, यासाठी रेस्क्यू पथकांना आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही गोगावले यांनी दिली. ‘वेगापेक्षा सुरक्षा आणि घाईपेक्षा जीवन महत्त्वाचे,’ असा संदेशही त्यांनी दिला. रायगडमध्ये विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी रेस्क्यू पथकांनी धैर्याने काम केले असून, प्रशासनाला त्यांची मोठी साथ मिळते, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले. यावेळी विविध रेस्क्यू पथकांचा सन्मान करण्यात आला. रिलायन्स फाउंडेशन, नागोठणे यांच्या सीएसआर निधीतून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला बचाव नौका व साहित्य किट सुपूर्द करण्यात आले.
0000
