माथेरान : भारतमातेला पारतंत्र्याच्या श्रुंखलेतुन मुक्ती मिळविण्यासाठी जवळपास एकशेतीस शुरवीरानी आपल्या प्राणांची आहुती दिल्यामुळेच आज सर्वच भारतवासीय मुक्तपणे वावरताना दिसत आहेत्.परंतु ज्या ज्या वीरांनी या भुमीला दास्यमुक्त करण्यासाठी आपल्या संसारावर ऐन तारुण्यात तुळशीपत्र ठेऊन आपला देह भारत मातेच्या कामी आणला.या अमर हुतात्म्याचा ,त्यांच्या कुटुंबाचा शासनाला आज विसर पडलेला स्पष्टपणे दिसत आहे.याचे उदाहरण   म्हणजे माथेरानच्या तांबड्या मातीत जन्म घेऊन वीरमरण पत्करणारे हुतात्मा विठ्ठलराव लक्ष्मण उर्फ (अण्णासाहेब )भाई कोतवाल.माथेरान या दुर्गम पर्यटनस्थळ म्हणुन जगप्रसिद्ध असलेल्या गावात एका गरीब नाभिक कुटुंबात जन्मलेले भाई कोतवाल यांना लहानपणापासूनच देशभक्तीची नितांत आवड असल्याने आणि देशसेवा खऱ्या अर्थाने रक्तातच भिनल्याने त्यांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध दंड थोपटले होते.ब्रिटिश सरकारला सळाे की पळाे करून सोडले होते.यासाठी त्यांनी कर्जत तालुक्यातील अनेक निष्ठावंत शिलेदार सोबतीला घेऊन “आझाद दस्ता “स्थापन केला  होता .यामध्ये हिराजी पाटील ,गोमाजी पाटील ,भगत मास्तर,मुरबाड मधील तरुण कार्यकर्ते यांच्या साथीने ब्रिटिश सरकारला अक्षरशः नामोहरम केले होते.करो या मरो या ब्रीदवाक्याने प्रेरीत होऊनच आपला अनमोल देह ब्रिटिश राजवट संपुष्टात आणण्यासाठी त्यांना नेस्तोनाभूत करण्याचा या आझाद दस्त्याने जणु विडाच उचलला होता .परंतु नियतीला भाई कोतवाल यांचा लढा बहु्धा योग्य वाटला नसावा म्हणुनच की काय त्याही काळी ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या काळात देखील फितुर मंडळी होती त्याचप्रमाणे भाई कोतवाल यांना  देखील फितुरीमुळे  हा महान क्रांतिकारी योद्धा मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर आपले निष्ठावंत शिलेदार हिराजी पाटील यांच्यासह हुतात्मा झाला.ती काळरात्र २ जानेवारी १९४३ .आजही भाई कोतवाल रहात असलेले त्यांचे जुने घर बाजारपेठेजवळ आहे.त्यांचे बंधु स्वातंत्र्यसैनिक  पेन्टन्ना कोतवाल यांचे काही वर्षापुर्वी निधन झाले.त्यांचे वारसदार त्याच जुन्याच घरात आपले हलाखीचे जीवन कंठीत आहेत.सध्या स्वातंत्र्यसैनिकांना शासन पाच एकर जागा देत आहे.परंतु भाई कोतवाल यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ,भावी पिढीला त्यांचा एक उत्तम आदर्श डोळ्यासमोर रहाण्यासाठी निदान भव्य स्मारक शासनाने या चिरंतर वास्तूला स्मारक घोषीत करावे अशी मागणी स्थानिक भूमीपुत्रांमधून होत आहे.२ जानेवारी या दिवशी आणि १५ ऑगस्ट ,२६ जानेवारी या दिवशी भाई कोतवाल यांच्या नावाचा जयजयकार होतो ,नौरौजी उद्यानातील भाईच्या अर्धपुतळ्यास मान्यवर पुष्पहार अर्पण करतात.२ जानेवारीला देखील गावातील मोजकीच मंडळी ,शालेय विद्यार्थी ,विद्यार्थिनी ,शिक्षक ,आणि नगरपरिषद सभागृहात कार्यरत असणारे आजी लोकप्रतिनिधी असेच उपस्थित असतात.आणि बाकीची गावातील मंडळी नेहमीप्रमाणे आपापल्या व्यवसायात मग्न दिसतात . भाई कोतवाल यांच्या जीवनावरील पोवाडे गायले जातात.नंतर वर्षभर पुन्हा त्यांचा विसर पडतो.यासाठी भाई कोतवाल यांची यशोगाथा अजरामर  रहाण्यासाठी त्यांचे भव्य स्मारक लवकरात लवकर शासनाने उभारावे याकामी विद्यमान ,कार्यक्षम लोकप्रतिनिधीनी पाठपुरावा करणे नितांत गरजेचे आहे असे तरुण वर्गांमध्ये सुर उमटत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *