काहीतरी नवीन…

श्याम तारे

बरेचदा “आज चांगले वाटत नाही” असे मनात येऊन जाते पण त्याचे नेमके कारण आपल्या लक्षात येत नाही. आता विज्ञानाने त्यासाठी काही सोप्या आणि सहज करण्यासारख्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यावर विचार करून त्या अमलात आणल्या तर आपला सकाळपासूनचा संपूर्ण दिवस आरोग्यदायी असेल असे प्रगत देशातील एका मनोविकार संघटनेने म्हटले आहे.
कोणत्याही गोष्टीची काळजी वाटणे हा माणसाचा स्वभावधर्म आहे परंतु असे होत असताना नेमके काय होते हे आपल्या कधी लक्षात आले नसेल. प्रत्यक्षात यावेळी आपल्या श्वासातील सहजता आणि प्रवाह यांना अडथळा होत असतो. आपल्या लक्षात न येण्याचे कारण असे असते की आपले शरीर यावर आपोआप उपचार करीत असते. अशा वेळी आपला सामान्य श्वासोच्छ्वास पुन्हा सुरु केला गेला तर आपली ऊर्जा आणि एकाग्रता परत येते आणि आलेला ताण कमी होतो.
तुम्ही कोणता आहार घेता हे महत्वाचे असते तसेच तो तुम्ही कसा घेता हेही महत्वाचे असते. आपल्याकडे असे मानले जाते की निरोगी राहण्यासाठी प्रत्येक घास बत्तीस वेळा चावला गेला पाहिजे. यात काय होते हे लक्षात घ्या. भोजन सावकाश करावे असेही म्हणतात. याचा अर्थ असा की जेवताना हळू हळू जेवा यामुळे तोंडात लाळ तयार होते आणि ती अन्न पचवण्यासाठी महत्वाची असते. अन्न अधिक चावले गेल्यामुळे आपले दात अधिक सशक्त राहू शकतात. एकामागून एक घास थोडासा चावून गिळण्यापेक्षा प्रत्येक घासानंतर क्षणभर थांबा. पचन सुधारेल आणि साहजिकच चांगले वाटू लागेल. शक्य असेल तर सकाळी उठल्याबरोबर एक पेला कोमट पाण्यात लिंबू पिळून ते प्या. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राहते आणि आवश्यक असलेले ‘क’ जीवनसत्व शरीराला मिळते.
चांगले वाटण्यासाठी शरीर निरोगी रहायला हवे आणि त्यासाठी आपण नियमित रीतीने काही ना काही तरी व्यायाम करतोच. त्याशिवाय शरीरातील रक्ताभिसरण उत्तम राहावे यासाठी दिवसभर हात आणि पाय यांचे चलनवलन सुरु ठेवा. एकाच ठिकाणी बसून रहात असाल तर दर ३० मिनिटांनी किमान दोन मिनिटे उभे रहात चला. याचे अनेक फायदे आहेत.
आपल्या शरीराची ठेवण सहज आणि व्यवस्थित ठेवली तर शरीराची लवचिकता वाढते आणि ताण तणाव कमी होऊ शकतात कारण यामुळे शरीरातील स्नायू आणि पेशी यांना योग्य प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा होतो. खुर्चीवर बसत असाल तर आपली पावले जमिनीला टेकली आहेत आणि पाठीला आधार आहे असे बघा.
सार्वजनिक आरोग्याच्या नियतकालिकात असे मांडले आहे की आरोग्याचे सर्वात महत्वाचे साधन आपल्या पायाखाली असते. त्यातील विज्ञान असे सांगते की अनवाणी चालल्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील इलेक्ट्रॉ्न्स आपल्या शरीराला विद्युतभारित करतात. यामुळे निश्चित असे फायदे होतात.
स्नानाच्या वेळी आपण साबणाने त्वचा स्वच्छ करीत असतोच परंतु तज्ञ असे सांगतात की शक्य असेल तर कोरड्या ब्रशने शरीराची त्वचा हळुवारपणे घासली असता त्वचेच्या मृत पेशी दूर होतात आणि त्वचेची बारीक छिद्रे मोकळी होऊन शरीरातील रक्ताभिसरण अधिक चांगले होते.
सहज करण्यासारख्या यापैकी काही गोष्टी जरी आपण अमलात आणल्या तरी जीवन अधिक निरोगी होऊ शकेल…
प्रसन्न फीचर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *