उल्हासनगर : उल्हासनगर मनपा क्षेत्रातील धोकादायक इमारतींविरुध्द पावसाळ्यापूर्वी पाहणी करुन नियमानुसार कारवाई करण्यात येत असते. शहरात पावसाळ्यात इमारत कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी शहरातील ज्या इमारती सकृतदर्शनी धोकादायक दिसून येत आहेत अशा इमारतींची पाहणी करण्याचे आदेश प्रशासक तथा आयुक्त अजिज शेख यांनी शहर अभियंता व सर्व सहायक आयुक्त, प्रभाग समिती यांना दिलेले आहेत.
सदर आदेशाच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सर्व सहायक आयुक्त व मुकादम यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्व सहायक आयुक्तांना त्यांचे कार्यक्षेत्रात ज्या इमारती सकृतदर्शनी धोकादायक आहेत तथापी महापालिकेने घोषित केलेल्या यादीमध्ये नांव नाही अशा इमारतींची पाहणी करुन यादी तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने सर्व सहायक आयुक्त, प्रभाग समिती यांनी त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांचेमार्फत शहरातील इमारतींचे सर्वेक्षणास सुरुवात केलेली आहे. सदरची कारवाई जून २०२४ पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.
याबरोबरच शहरातील पदपथावरील अतिक्रमणे, बेवारस वाहन उचलणे व अनधिकृत फेरीवाल्यांच्या वर कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले. चारही प्रभागात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई तीव्र करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, अनिल खतुरानी आणि मनीष हिवरे, दत्तात्रय जाधव व सर्व प्रभागातील मुकादम उपस्थित होते.
