मुंबई : गर्दीमुक्त प्रवास केव्हा नशिबी येणार, लोकलमधील प्रवाशी मृत्यू केव्हा थांबणार, लोकल वेळेवर केव्हा धावणार, असे सवाल सर्वसामान्य प्रवाशांतून राजकीय पक्षांना विचारले जात आहेत. तसेच निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांनी अगोदर लोकलच्या गर्दीतून प्रवास करून दाखवावा, त्यानंतर मते मागावीत, अशा प्रतिक्रिया मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशी व्यक्त करत आहेत. ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने सीएसटीएम ते अंबरनाथ प्रवास केला. या प्रवासातून रेल्वे प्रवाशांच्या भावना जाणून घेतल्या.

लोकल सेवा ही मुंबई शहराची जीवनवाहिनी आहे. हीच लोकल दिवसाला सरासरी ८ ते १० जणांचे जीवही घेत आहे. दररोज १० ते १२ प्रवाशी जखमी होतात. गेल्या काही वर्षांत ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. त्या तुलनेत लोकल सेवेत फारशा सुधारणा झाल्या नाहीत. वाढत्या गर्दीमुळे अनेक प्रवाशांना लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करावा लागतो. परिणामी, प्रवासी धावत्या लोकलच्या दरवाजातून पडणे, बाहेरील खांबाचा जोरदार फटका बसण्याच्या घटना घडत आहेत. मुंबईत २०२३ या वर्षात विविध रेल्वे अपघातांत २, ५९० प्रवाशांचा मृत्यू; तर २,४४१ प्रवासी जखमी झाले. याकडे कुणाचेच लक्ष नाही.

सध्या दररोज मध्य रेल्वेवर १,८१० लोकल फेऱ्या आणि पश्चिम रेल्वेवर १,३९४ लोकल फेऱ्या धावतात. दोन्ही मार्गांवर ६० ते ७० लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र, मेल-एक्स्प्रेसला महत्त्व देण्यात येत असल्याने सकाळी बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ, कसारा आणि कर्जतवरून येणाऱ्या लोकल सेवा विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना दररोज लेटमार्क लागतो. लोकलचे वेळापत्रक विस्कळित होणे नित्याचीच बाब झाली असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

मुंबईतील लोकलमधील गर्दी कमी करण्याकडे कुणाचेही लक्ष नाही. प्रवाशाचा मृत्यू होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. निवडणुका संपल्यानंतर एकही खासदार लोकसभेत लोकल प्रवाशांच्या समस्या मांडताना दिसत नाही.

– अन्ना सावंत, प्रवाशी

लोकल विलंबाने धावत असल्यामुळे लोकलमधील गर्दी वाढते. त्यामुळे काही प्रवासी लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करतात. त्यात अनेकांचा खाली पडून मृत्यू होतो. लोकल वक्तशीरपणे चालल्या पाहिजेत.

– रोशन लिखार, प्रवासी

प्रवासी सोयी-सुविधा केव्हा ?

मुंबईतील असंख्य रेल्वेस्थानकांवर पिण्याचे शुद्ध पाणी, सरकते जिने, स्वच्छतागृहे, लिफ्ट यांसारख्या प्रवाशी सोयी-सुविधांची कमतरता आहे. यासोबत लोकलमध्ये गर्दुल्ले, मोबाईल, पर्स चोरांचा सुळसुळाट झाला आहे. रात्री महिला प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यात अजूनही रेल्वेला पाहिजे तेवढे यश मिळताना दिसत नाही. त्यामुळे प्रवासी सुविधायुक्त रेल्वेस्थानके केव्हा आकाराला येणार, असा सवाल मुंबईकरांचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *