स्वाती घोसाळकर
मुंबई : दादरचे शिवाजीपार्क अनेक एतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. भारतातील सर्वपक्षीय अनेक दिग्गज नेत्यांनी या मैदानावर सभा गाजवल्या आहेत. याच एतिहासिक सभांच्या मालिकेत भर टाकणारी सभा उद्या शुक्रवारी दादरच्या शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणूकीतील मास्टरस्ट्रोक म्हणूनही या सभेकडे पाहिले जात आहे. पंतप्रधान आणि भाजपाचे सर्व्वोच्च नेते नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या सभेत एका व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष या सभेकडे लागले आहे. महाराष्ट्रातील पाच टप्प्यातील शेवटच्या १३ जागांसाठी येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे. त्या दृष्टीने या सभेवर महायुतीची भिस्त असणार आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत लाव रे तो व्हिडीयोन मोदींवर जहरी टिका करणाऱ्या राज ठाकरे यांनी यंदा मोदींसाठी महायुतीला जाहिर पाठींबा दिला आहे. त्यामुळे मोदींसमोर राज नेमके कोणते मुद्दे मांडतात याककडे त्यांच्या विरोधकांचेही तितकेच लक्ष असणार आहे. याच मैदनावर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एतिहासिक सभा रंगली होती. त्यावेळी प्रोटोकॉल बाजूला सारून वाजपेयी यांनी सन्मानाने बाळासाहेब ठाकरेंना शेवटी भाषण करण्याची विनंती करत समस्त शिवसैनिकांची मन जिंकली होती. उद्या मोदी मनसैनिकांची मने कशी जिंकतात याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
शिवाजीपार्कवर १७ मे रोजी सभा घेण्यासाठी खरंतर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने पालिकेकडे अर्ज केला होता. पण यंदाच्या लोकसभेत एकही उमेदवार उभा न करणाऱ्या मनसेला ठाकरे सेनेला डावलून यादिवशी परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे उद्या शिवाजीपार्कवर मनसे कमल फुलणार अशी जोरदार चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे.
येत्या २० मे रोजी नाशिक, धुळे, दिंडोरी, ठाणे, पालघर, भिवंडी,कल्याण, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व,मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अश्या या १३ मतदारसंघात अंतिम टप्प्यात मतदान पार पडणार आहे. मुंबईतील ६ जागांसाठी आघाडी आणि युतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मनसे भाजपाच्या या सभेनंतर महाविकास आघाडीकडून १८ तारखेला महासभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
महायुतीसाठी राज ठाकरेंनी भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी कोकणात पहिल्यांदा जाहीर सभा घेतली होती. तर राज ठाकेरंच्या उपस्थितीत १० मे रोजी पुण्यात आणि १२ मे रोजी कळवा येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महाविकास आघाडीवर राज ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधत हल्लाबोल केला होता.
महाराष्ट्रात अजित तर बिहारमध्ये नितीश गायब !

मुंबई : लोकसभा निवडणूक जवळपास अंतिम टप्यात आली असताना महाराष्ट्रात अजित पवार तर बिहारमध्ये नितीश कुमार गायब असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नामांकनावेळी मंगळवारी वाराणसीत दिग्गजांनी एकच गर्दी केली होती. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री अजित पवार तेथे गेले नाहीतय. इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाला कलाटणी देणाऱ्या मोदींच्या मुंबईतील रोड शोलाही अजित पवारांनी दांडी मारली आहे. विशेष म्हणजे दोघेही आजारी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, अजित पवार आजारी पडल्यानंतर महाराष्ट्राने आजवर राजकीय भुकंपच अनुभवले आहेत. त्यामुळे या दोघांच्या टायमिंगवरून चर्चा रंगली आहे
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचा बिहारमधिल चेहरा असणाऱ्या सुशील कुमार मोदी यांच्या निधनानंतर, मंगळवारी त्यांच्यावर पाटण्यात राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु नितीश कुमार स्वतः पाटण्यात असूनही दिघा घाटावर गेले नाहीत. अजित पवार आणि नितीश कुमारांचे गायब होण्याच्या टायमिंगवर राजकीय वर्तुळात मात्र खमंग राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
