मुंबई : यंदाची लोकसभा निवडणूक अतिशय खास आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय बदल आपण पाहू शकत आहोत. दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना अशा प्रकारचं राजकारण पहिल्यांदाच महाराष्ट्र अनुभवत आहे. यातच यंदा इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील कोणीतरी जाहीरपणे काँग्रेसला मतदान केल्या असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्रामध्ये आज पाचव्या टप्प्यातील लोकसभेचे मतदान होत असून मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई ईशान्य आणि मुंबई उत्तर पश्चिम या मतदार संघाचा समावेश आहे.
मातोश्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. हे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघांमध्ये येते. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट या दोघांचाही उमेदवार नाही.
या ठिकाणी काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली असून भारतीय जनता पक्षाने उज्जवल निकम यांना संधी दिली आहे. अशावेळी जनता कोणाला साथ देते हे पाहणं अतिशय उत्सुकतेच असणार आहे.
तर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असून ते यंदा काँग्रेसला मतदान करतील असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. यामुळे इतिहासात पहिल्यांदा काँग्रेसच्या हाताला ठाकरेंच मत मिळाल अस चित्र आहे.
असं जरी असलं तरी दुसरीकडे दक्षिण मध्य मतदारसंघांमध्ये राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने राज ठाकरेंनी धनुष्यबाणाला म्हणजेच राहुल शेवाळेंना मतं दिले असल्याची चर्चा आहे. अशावेळी एका ठाकरेंनी धनुष्यबाणाला तर दुसऱ्या ठाकरेंनी हाताला मत दिलं असल्याचं म्हटले जात आहे. या गोष्टीची चर्चा दिवसभर मुंबई सह राज्यामध्ये पाहिला मिळाली.
