ठाणे : सध्या बाजारपेठेत उन्हाळी हंगामातील कोकणचा रानमेवा बाजारात येऊ लागला आहे. सध्या ठाण्यात वर्दळीच्या परिसरात आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून आलेल्या रानमेव्याला चांगलाच भाव मिळत आहे. ठाणे शहरातील बाजारपेठेत अनेक आदिवासी महिला करवंदाची टोपली घेऊन विक्रीसाठी आल्या आहेत. एक टोपली १००० ते १२०० रुपये पर्यंत विकली जाते; तर साधारणतः १० ते २० रुपयांना एक वाटा विकला जातो.उन्हाळ्याचा हंगाम सुरू असून या दिवसांत रानमेवा खाण्याची मजा काही औरच असते. या दिवसात आंबे, करवंदे, गावठी जांभळे आदी फळे पिकू लागतात. काही बहरण्याच्या स्थितीत असतात; मात्र हाच रानमेवा अनेकांच्या रोजगाराचे साधनही होत असतो. मुळात ही सगळी फळे रानावनात बहरतात. त्यामुळे ग्रामीण भागातच ही फळे जवळून चाखायला मिळतात; मात्र ग्रामीण भागातील मंडळी याच रानमेव्यातून उदरनिर्वाहाचे साधन तयार करतात. हाच रानमेवा तालुक्याच्या ठिकाणी मोठमोठ्या शहरात विक्रीसाठी आणला जातो. मुंबईसह ठाण्यातदेखील सध्या या रानमेव्यांला मागणी चांगलीच वाढली आहे.
आदिवासी बांधवाच्या उत्पन्नाचे साधन
नाशिकसह मुंबई शहराच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या अदिवासीं बांधवांचे उत्पन्नाचे साधन म्हणून डोंगरातील रानमेवा आजही आधार वाटतो. उन्हाळ्याच्या दिवसात पटकन तोंडात टाकता येणारा तसेच शरीराला आणि मनाला गारवा देणाऱ्या या रानमेव्याला अधिक मागणी असते. सध्या करवंदे, आळव, तोरणे पिकू लागली आहेत. कच्च्या करवंदांचा ठेचा तसेच लोणचे केले जाते. सकाळी लवकर आदिवासी बांधव करवंदे जमा करण्यासाठी जंगलात जातात; तर संध्याकाळी घरी परतात. कुटुंबीयांतील सदस्य एकत्र जाऊन करवंदे गोळा करून विक्रीसाठी जमा करतात. साधारण कर्जत, नाशिक येथून १०० हून अधिक महिला करवंद विक्रीसाठी ठाण्यात आल्या आहेत.
