मुंबई:  मुंबईसाठी राज्य सरकारने दिलेला राखीव पाणी साठा शिल्लक असला तरी असलेला जलसाठा पाऊस पडेपर्यंत जपून वापरायला हवा असे आवाहन मुख्यमंत्त्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

मुंबईतील पावसाळापूर्व तयारीसंदर्भात मुंबई महानगरपालिका मुख्यालयात काल बैठक पार पडली, यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांनी तळ गाठल्याने पाणी साठ्यात घट झाली. सध्या तलावांत फक्त ९.६९ टक्के इतकाच पाणी साठा आहे. हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत गुरुवारी ३० मेपासून ५ टक्के तर ५ जून पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हणाले की, राज्य सरकारने राखीव पाणीसाठा दिलेला आहे. तो साठा अद्याप वापरलेला नाही. मुंबईकरांसाठी हा दिलासा आहे. मात्र पाणी आहे म्हणून पाण्याचा गैरवापर करू नये, पाणी जपून वापरावे असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

धरणातील पाण्याची पातळीत घट होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने मुंबईतील पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. सन २०२१ आणि २०२२ या दोन वर्षात १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून सक्रीय होता. मात्र सन २०२३ मध्ये ऑक्टोबर महिन्यात तुलनेने पाऊस झाला नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यातही ५ टक्के आणि १० टक्के कपात लागू राहणार आहे. दरम्यान समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे.

पाण्याचा अपव्यय टाळावा

– दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसरीने वापर करणे, त्याचा अपव्यय टाळणे शक्य आहे. यासाठी पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात.

– आवश्यक तितकेच पाणी पेल्यामध्ये घेवून प्यावे. आंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेवून आंघोळ केल्याने पाण्याची मोठी बचत होते. नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळावे.

घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका. त्याऐवजी भांड्यांमध्ये पाणी घेवून कामे उरकावीत.

– वाहने धुण्यासाठी नळी न लावता भांड्यामध्ये पाणी घेवून ओल्या कापडाने वाहने पुसणे सहज शक्य असते. घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने आदी धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसून घ्या. आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका. वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुतल्यास, मशीनचा पर्यायाने पाण्याचा वापर कमी होवू शकतो.

— उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पेल्यांमध्ये पाणी द्यावे. अथवा पाण्याची बाटली पुरवावी. जेणेकरुन अकारण पाण्याने भरुन ठेवलेल्या पेल्यांचे पाणी वाया जाणार नाही.

— छतावरील पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओसंडून वाहणार (ओव्हरफ्लो) नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

— ज्या-ज्या ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, त्या सर्व व्यावसायिक व वाणिज्यिक आस्थापनांनी देखील पाण्याचा अपव्यय टाळावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *