शिवसेना नेते अनिल परब यांना विश्वास

उमेदवारी दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे मानले आभार

मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघ गेले तीस वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असून शिवसैनिकांचे काम, पदवीधर मतदारांचा विश्वास याच्या बळावर या मतदारसंघातून आपला विजय निश्चित आहे, असा दावा शिवसेना नेते ऍड अनिल परब यांनी केला.

परब म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघातून यावेळी मला उमेदवारी दिली आहे. समोर कोण उमेदवार आहे, याची शिवसैनिक परवा करत नाही. शिवसेनेने या मतदार संघात मोठ्या संख्येने मतदार नोंदणी केलेली आहे. मतदारसंघावर आमची पकड आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

परब यांनी गद्दार सेनेला भाजपा हा मतदारसंघ देईल असे वाटत नसल्याचे नमूद केले. शिंदे गट आणि भाजप यांच्या मुंबई पदवीधर मतदार संघावरून सुरु असलेल्या वादावर भाजप हि जागा शिंदे गटाला देणार नाही. जरी गद्दार सेनेचे दीपक सावंत यांना येथून उमेदवारी मिळाली तरी भाजपा त्यांच्यासाठी काम करेल असे वाटत नाही, असेही परब यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

पुढे बोलताना परब म्हणाले कि, विधान परिषद निवडणुकीत शंभर टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना विजय मिळवणार असे सांगितले. गद्दारांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. जरी 40 आमदार फुटून गेले असले तरी शिवसैनिक जागेवरून हललेला नाही. त्याची निष्ठा कायम आहेत. त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे परब यांनी सांगितले.

मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघ तसेच मुंबई व नाशिक शिक्षक मतदारसंघ अशा चार विधान परिषदेच्या जागा रिक्त होत आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस हे शिवसेनेचे आमदार होते. त्यांच्या जागी अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. 7 जून रोजी विधान परिषदसाठी उमेदवारी दाखल करण्याचा अखेरचा दिनांक आहे. 26 जून रोजी मतदान असून 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *