ठाणे : समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यातील एकलव्य विद्यार्थ्यांसाठी दहावी नंतर काय? या बद्दल मार्गदर्शन करणारी कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शैलेश मोहिले होते, जे या विषयाचे तज्ज्ञ आहेत आणि गेली अनेक वर्ष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक आणि VJTI या अग्रगणी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी डीन डॉ. संजय मंगला गोपाळ होते. दोघांनीही एकलव्यांना त्यांच्या करिअर निवडण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेसाठी किसन नगर, येऊर, धर्मवीर नगर, मानपाडा, कळवा, ढोकाळी अशा अनेक वस्तींतून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, असे संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी सांगितले.  ठाण्यातील मो.ह. विद्यालयाच्त घेतलेल्या या कार्यशाळेला मो.ह.विद्यालयाचे माजी प्राचार्य रजपूत सर हजर होते आणि त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. दहावी उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षणाचे कोणते मार्ग उपलब्ध आहेत, कुठला अभ्यासक्रम निवडायचा, आपली आवड आणि पुढे असणार्‍या संधी यांचा मेळ कसा घालायचा, त्यासाठी प्रवेश प्रक्रिया कशी असते, ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा, कॉलेज निवडताना काय काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे अशा सर्व बाबींबद्दल सविस्तर माहिती प्रात्यक्षिकासह या कार्यशाळेत देण्यात आली.

समता विचार प्रसारक संस्था गेले ३२ वर्ष ठाणे शहरातील विविध वस्त्यांमधील बिकट आर्थिक परिस्थितीशी समाना देत दहावी पास होणार्‍या विद्यार्थ्यांना एकलव्य संबोधून त्यांचा जाहीर गौरव करते. तसेच त्यांच्यासाठी पुस्तक पेढी चालवते आणि वर्षभर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी समता संस्कार शिबिर, वंचितांचा रंगमंच, सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिका अशा सारखे अनेक उपक्रम घेते. या वेळी ११ वीचे फॉर्म ऑनलाइन भरण्यासाठी फार कमी मुदत आहे. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यात अडचण वाटत असेल, ज्यांना मदतीची आवश्यकता भासत असेल त्यांनी शुक्रवारी ३१ मे ला संध्याकाळी ४ वाजता समता विचार प्रसारक संस्थेच्या दादोजी कोंडदेव येथील गाळा नं. ५६ या ऑफिस मधे जरूर यावे, तिथे मार्गदर्शक उपस्थित असतील. अधिक माहितीसाठी संस्थेचे सचिव अजय भोसले (८१०८९४९१०२) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *