मुंबईः आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात दररोज हजारो मेट्रिक टन कचरा निर्माण होत असतो. झोपडपट्टी परिसर असलेल्या भागात कचरा मोठ्या प्रमाणात साठत असल्याने दुर्गंधीचा आरोग्यावर परिणाम होतो. रस्त्यावर टाकण्यात येणारा कचरा भटकी जनावरे आणि कचरा वेचणाऱ्यांकडून इतरत्र पसरत असल्याने परिसरात अस्वच्छता देखील निर्माण होत आहे. त्यामुळे भूमिगत कचरा पेट्या बसवण्यावर पालिकेने भर दिला आहे.
येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल, असे घन कचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक अभियंता सूर्यकांत सातपुते यांनी सांगितले. हा परिसर दुर्गंधीमुक्त आणि कचरा मुक्त होणार असल्याने स्थानिकांकडून पालिकेच्या या धोरणाचे कौतुक होत आहे. स्थानिक आमदार राम कदम यांनी पालिकेकडे याबाबत पाठपुरावा केला होता. जगदुशा नगर येथे महादेव मंदिर, तसेच खेळाचे मैदान असल्याने लोकांची मोठी वर्दळ असते. अशात झोपडपट्टीतून जमा होणारा कचरा मंदिरासमोरील रस्त्यावर टाकला जात असत. त्यामुळे भटकी जनावरे आणि कचरा वेचणाऱ्यांकडून इतरत्र कचरा पसरत होता.
परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने अखेर इथे भूमिगत कचरा पेट्या बसवण्यात येत असल्याने नागरिकांनी पालिका प्रशासनाने आभार मानले.
