नाशिक : मनोज जरांगे जर उमेदवार उभे करणार असतील तर ओबीसीही जरांगेच्या विरोधात उमेदवार उभा करतील, आमचं बहुमत आहे. ६० टक्के जाती या ओबीसी आहेत. दलित आणि मुस्लिमांना सोबत घेतलं तर आम्ही ८० टक्के होतो. आमचेही १९९ मतदारसंघात सर्व्हे पूर्ण झाले असून आम्हीही तशीच भूमिका घेऊ शकतो असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
मराठा समाजाला सरकारने टिकणारे 10 टक्के आरक्षण दिले आहे. त्या आरक्षणाची अंमलबजावणी केली असून सरकारने ते आरक्षण घेण्यास मराठा समाजाने देखील सुरुवात केली आहे. ओबीसीमधील ज्या काही 375 जाती आहेत, त्या अत्यंत मागासलेल्या आहेत. ते आरक्षण जरांगे यांना काढून घ्यायचं आहे. मराठा समाजाला आम्ही आमचा मोठा भाऊ मानतो. पण गरीब समाजातील आरक्षण काढून घेतलं तर हा समाज गप्प कसा बसेल? मराठा समाजाला गरिबी आली असं म्हटलं जातंय, पण ही गरिबी त्यांच्यावर कोण आणली? त्यांच्याकडेच सर्व सत्ता, बँका आहेत. आरक्षण हा विषय गरिबी हटवण्याचा कार्यक्रमम नाही, तो सामाजिक आहे.
