गेल्या वर्षभरात महागाई सातत्याने वाढत आहे. अन्नधान्याच्या महागाईत कोणतीही घट झालेली नाही. गेल्या वर्षभरात बटाटे, कांदे आणि टोमॅटोच्या दरात 81 टक्क्यांची वाढ झाली आहे.
गेल्या 15 दिवसांमध्ये कांद्याच्या घाऊक भावात 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवरील आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्या वर्षभरात बटाटे, कांदा आणि टोमॅटोच्या किमतीत 81 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, असे दिसते. देशभरात या तिन्ही भाज्यांच्या सरासरी दरात कमालीची वाढ झाली आहे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, 30 एप्रिल 2023 रोजी बटाट्याची सरासरी किंमत 18.88 रुपये प्रति किलो होती. ती दहा जून 2024 पर्यंत 30.57 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. म्हणजेच बटाट्याच्या दरात किलोमागे 11.69 रुपयांची वाढ झाली आहे. याचाच अर्थ गेल्या वर्षभरात बटाट्याचे भाव 62 टक्क्यांनी वाढले आहेत.
गेल्या वर्षभरात कांद्याच्या भावात 13.50 रुपयांची वाढ झाली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार 30 एप्रिल 2023 रोजी कांद्याची सरासरी किंमत 20.41 रुपये प्रति किलो होती. ती 10 जून रोजी 33.98 रुपये झाली आहे. याचाच अर्थ गेल्या एका वर्षात कांद्याच्या भावात 66 टक्के म्हणजेच प्रति किलो 13.57 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किमतीत वर्षभरात 60 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बटाटे आणि कांद्याच्या तुलनेत टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ झाली. 30 एप्रिल 2023 रोजी टोमॅटोची किरकोळ किंमत 20.55 रुपये प्रति किलो होती. 10 जून 2024 रोजी ती 37.11 रुपयांपर्यंत गेली. याचा अर्थ टोमॅटोच्या किमतीत गेल्या वर्षभरात 81 टक्के वाढ झाली आहे.
दरम्यान, दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना फटक बसत आहे. काही दिवसांपूर्वी सातत्याने घसरत असलेल्या कांद्याच्या दराला आता ब्रेक लागला आहे. सध्या कांद्याच्या दरात चांगलीच वाढ होत आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 15 दिवसांमध्ये घाऊक बाजारात कांद्याच्या भावात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीमध्ये कांद्याच्या दरात बारा रुपयांची वाढ झाली आहे. सध्या कांद्याचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे दरात वाढ होत आहे. मागणी आणि पुरवठा यातील तफावत हे अलीकडच्या काळात किमती वाढण्याचे मुख्य कारण आहे. जूनपासून बाजारात येणारा कांदा हा शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या साठ्यातून येतो. 2023-24 च्या रब्बी पिकाच्या संभाव्य घसरणीमुळे भाव वाढण्याची अपेक्षा असल्याने शेतकरी त्यांचा साठा उतरवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *