धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांचा ठामपा आयुक्तांना इशारा !

 

ठाणे, मासुंदा तलावाभोवती कायमस्वरुपी सुरक्षा-रक्षक नेमण्यासंदर्भातील, ठाणे सत्र न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी न झाल्यास, ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात ‘आव्हान याचिका’ दाखल करावी लागेल, असा इशारा धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना दिला आहे.
ठाणे शहरातील काही जागृत नागरिकांनी, वर्ष-१९९७ मध्ये मासुंदा तलावाला पडलेल्या समाजकंटकांच्या विळख्याबाबत, ठाणे सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. सदर खटला ठाण्यातील सुप्रसिद्ध वकील प्रशांत पंचाक्षरी यांनी लढला होता. त्यावर, १९ डिसेंबर १९९८ रोजी, न्या. व्ही.डी. देशमुख यांनी, मासुंदा तलावाभोवती सहा महिन्यांच्या आत, कायमस्वरुपी सुरक्षा-रक्षक नेमण्यात यावेत, याबाबतचा आदेश, ठाणे महानगरपालिका प्रशासनाला दिला होता. तसा ठरावदेखील ठाणे महापालिकेच्या तत्कालीन महासभेत संमत करण्यात आला होता. मात्र न्यायालयीन आदेशाकडे २६ वर्षानंतरही महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. गेल्या काही वर्षांत ठाणे शहराचे नागरिकीकरण प्रचंड वाढल्यामुळे, ठाणे शहर मोठ्याप्रमाणात फोफावले. परिणामी, ठाण्यात झपाट्याने विकासकामे सुरु झाली, जी अद्यापही सुरुच आहेत. यामुळे आपसूकच सोयी-सुविधांच्या बाबतीत प्रशासनावर ताण पडून, मूळ ठाणे शहरातील महत्त्वाच्या बाबींकडे ठाणे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले. शेजारच्या तरण तलावातील पाणी, मासुंदा तलावात सोडले जात असल्याने ते दुषित तर होतेच, त्याचबरोबर जेल तलावाच्या शेजारील पाण्याच्या टाकीतील पाणीदेखील, त्याच तलावात सोडले जाते. शिवाय घोसाळे तलावाच्या काठावर काही अर्धनग्न अवस्थेतील नागरिक झोपलेले असतात. अस्वच्छतेसोबतच आता, तलाव परिसरात गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्यामुळे, फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. फक्त मासुंदा तलावच नव्हे तर ठाणे शहरातील इतरही तलाव धोकादायक अवस्थेत आहेत. मासुंदा तलावाची गर्दुल्ल्यांपासून सुटका होणे हे गरजेचे आहेच; पण, त्याचसोबत तलावाची जैवविविधता जपण्यासाठी देखील, ठाणे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत. मासुंदा तलावाचा परिसर हा, स्वच्छ रहावा यासाठी, आतापर्यंत अनेकदा तलावाचे सुशोभिकरण करण्यात येऊन, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. यामुळे मासुंदा तलावाभोवती कायमस्वरुपी सुरक्षा-रक्षक नेमण्यासंदर्भातील, ठाणे सत्र न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास, नाईलाजास्तव ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात ‘आव्हान याचिका’ दाखल करावी लागेल, असा इशारा नितीन देशपांडे यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना लिहिलेल्या पत्रातून दिला आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *