Author: bittambatami.com

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 527 धोकादायक इमारतींची यादी जाहीर

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन 2024 – 2025 या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले असून सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण 527 इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 264 अन्वये…

अनेक वीज कनेक्शन ? आता बिल भरा एकाच क्लिकवर

 नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन मुंबई : राज्यात ठिकठिकाणी अनेक वीज कनेक्शन आणि त्यांच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या तारखा अशी समस्या असलेल्या विविध सरकारी खात्यांसाठी आणि खासगी कंपन्यांसाठी महावितरणने सर्व कनेक्शनची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली असून वेळेत बिल भरल्यास एक टक्का सूटही संबंधितांना मिळणार आहे. महावितरणने उपलब्ध केलेल्या या अभिनव सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात बिलिंग आणि माहिती तंत्रज्ञान या विभागांनी संयुक्तपणे प्रयत्न करून अनेक कनेक्शन असलेल्या वीज ग्राहकांना अभिनव सुविधा उपलब्ध केली आहे. राज्यामध्ये पोलीस, ग्रामविकास, पाणीपुरवठा अशा विविध सरकारी खात्यांना तसेच मोठ्या कंपन्यांना एका समस्येला तोंड द्यावे लागते. राज्यामध्ये त्यांच्या विविध कार्यालयांची विविध वीज कनेक्शन आणि त्यांची बिले भरण्याची वेगवेगळी अंतिम मुदत असल्याने आर्थिक तरतूद असूनही वेळेत बिले भरली नाहीत अशी समस्या येते. त्यामुळे दंड आणि व्याज द्यावे लागते. तसेच कधी कधी बिल भरले नसल्याने कनेक्शन तोडले जाते. महावितरणने उपलब्ध केलेल्या सुविधेमुळे एकदा ऑनलाईन नोंदणी केली की संबंधित सरकारी खात्याला किंवा कंपनीला त्यांच्या मुख्यालयात बसून राज्यातील विविध ठिकाणच्या वीज कनेक्शनसाठी आलेली बिले आणि त्यांची अंतिम मुदत याची माहिती मिळेल. तसेच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक बिल वेळेत भरल्यास एक टक्का सवलतही मिळेल. याखेरीज कागदी बिलाच्या ऐवजी इलेक्ट्रॉनिक बिल स्वीकारल्यामुळे प्रत्येक बिलामागे दहा रुपये सवलत आणि डिजिटल पेमेंट केल्यामुळे कमाल पाचशे रुपये सवलतही मिळेल. या सुविधेसाठी महावितरणच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करता येईल किंवा नजिकच्या महावितरण कार्यालयात माहिती मिळेल. महावितरणने सरकारी विभाग आणि खासगी कंपन्यांना उपलब्ध केलेल्या या सुविधेमुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस या संकल्पनेला बळ मिळणार आहे. किमान दहा वीज कनेक्शन असलेला कोणताही सरकारी विभाग किंवा खासगी कंपनी याचा लाभ घेऊ शकतात. यामुळे त्यांना आर्थिक व्यवस्थापन करणे सोपे होईल, त्यांच्या अंतर्गत विविध कार्यालयात होणारा विजेचा वापर आणि त्यावर होणारा खर्च याची माहिती सहजपणे एकत्रित मिळेल तसेच बिलाबाबत काही तक्रार असल्यास तीही सहजपणे ऑनलाईन करता येईल.

मागील १२ वर्षात पदवीधरांसाठी ठोस कामच नाही!

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघात मागील १२ वर्षांत गटार, पायवाटांशिवाय पदवीधर मतदारांसाठी ठोस काम झाले नाही, असा आरोप मनसेचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अभिजित पानसे यांनी केला आहे. भाजपचे निरंजन डावखरे यांचे नाव न घेता अभिजित पानसे यांनी टीका केली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अभिजित पानसे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी सोमवारी (ता. २७) मनसेच्या ठाणे कार्यालयात पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली. लोकसभा निवडणुकीनंतर बिनशर्त पाठिंबा दिल्यावर मनसेने कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपला धक्का दिला. आमचा जाहीरनामा किंवा वचननामा नसेल, तर आमचा या मतदारसंघासाठी रोजगारनामा असेल, असेही त्यांनी सांगितले. या निवडणुकीत भाजपचा पाठिंबा घेणार का, असा सवाल केला असता आमचा पक्ष आदेशावर चालतो, मी मनसेकडून लढत आहे; मात्र युतीबाबतचा निर्णय राज ठाकरे हेच घेतील, असेही त्यांनी सांगितले. आमची त्यांच्याकडे चर्चा झाली नसल्याची माहिती या वेळी मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.

भजन पंडित निवृतीबुवा चौधरी यांच्या भजनाने श्रोते मंत्रमुग्ध

गेली ५० वर्षांहून अधिक काळ अखंड भजनसेवा पनवेल : गेली ५० वर्षांहून अधिक काळ भजन सेवेची परंपरा अखंडपणे जपणारे आणि आपल्या शिकवणीतून हजारो शिष्य घडविणारे खारघर मधील रांजणपाडा गावातील रायगड भूषण भजन पंडित ह.भ. प.निवृतीबुवा चौधरी यांनी सादर केलेल्या भजन व अभंगांमुळे पुणे जिल्ह्यातील पिंपळे सौदागर येथील साईबाबा मंदिर उत्सव सोहळ्यात श्रोते मंत्रमुग्ध झाले. ‘श्री तारा माँ मिशन’च्या दहाव्या वर्धापनदिन निमित्त पिंपले सौदागर येथील साईबाबा मंदिरात भजन, कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंडित निवृतीबुवा चौधरी यांनी ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’, ‘जोहार मायबाप’, ‘विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी’,’ हरे कृष्णा हरे’ आदी निवडक भजने, अभंग सादर करुन श्रोत्यांचे मन जिंकले. निवृत्तीबुवा चौधरी यांनी नेहमीच भजन आणि त्या अनुषंगाने सांस्कृतिक परंपरा टिकविण्याचे काम केले आहे. आपल्या वयाची ७५ वर्ष पूर्ण होऊनही ते कधीही या क्षेत्रात थकलेले नाहीत. स्वतःला झोकून देत हरिनामाची ते सेवा करत असतात, त्यामुळे या उत्सवात त्यांच्या गायनाने चैतन्य निर्माण झाले होते.

‘तंबाखू मुक्तीचा घेऊया वसा’

ठाणे : या वर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने ” तंबाखू उ‌द्योगाच्या हस्ताक्षेपापासून मुलांचे संरक्षण ” या थीम‌द्वारे राबवला जात आहे. तरुणांना हानिकारक तंबाखू उत्पादने आणि फसव्या जाहिरात पद्धतीपासून संरक्षण देणारे मजबूत नियम लागू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना एकत्रित करण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. १३ ते १५ वयोगटातील ३८ दशलक्षाहून अधिक तरुण तंबाखूचे विविध प्रकारचे सेवन करीत आहेत. डब्ल्यू.एच.ओ.नुसार १३ ते १५ वयोगटातील मुलांमध्ये तंबाखूचा वापर ११.५% आणि १०.१% मुलींमध्ये आहे, जे तरुणांच्या तंबाखूच्या सेवनाला आळा घालण्यात एक मोठे आव्हान ठरत आहे. तंबाखू सेवनामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयविकार, पक्षाघात आणि श्वासोच्छवासाचे आजार यासह अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. तंबाखूचे सेवन सोडल्याने ह्या आरोग्य समस्या विकसित होण्याचा धोका कमी होतो आणि एकूण आरोग्यात सुधारणा होते. तंबाखू सेवन सोडल्याने आपल्या सामाजिक जीवनावरही सकारात्मक परिणाम होतो. तंबाखू सेवन ही एक सामाजिकरित्या अलिप्त ठेवणारी सवय ठरु शकते, कारण बरेच लोक आता तंबाखू सेवन करण्याची परवानगी असलेली ठिकाणे टाळण्याचे निवडत आहेत. तंबाखू सेवन सोडल्याने, आपण आपले सामाजिक जीवन सुधारू शकतो आणि आपल्या मित्र आणि कुटुंबासह अधिक क्रियाकलापांचा आनंद घेऊ शकतो. शेवटी, तंबाखू सेवन सोडणे ही एक जबाबदार निवड आहे, जी आपल्या सभोवतालच्या लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यात मदत करू शकते. निष्क्रिय तंबाखू सेवनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात, विशेषतः लहान मुले आणि धूमपान न करणाऱ्यांसाठी तंबाखू सेवन सोडल्याने आपण आपल्या सभोवतालच्या लोकांना निष्क्रिय तंबाखू सेवनाच्या हानिकारक प्रभावामुळे होणारा धोका कमी करू शकतो. अशयात ठाणे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलाश पवार यांच्या अथक परिश्रमाने व सातत्यपूर्ण रुग्णसेवा आणि माणुसकीपोटी कळवळा असल्याने आज ठाणे जिल्ह्यात ९३६ शाळा तंबाखू‌मुक्त झालेल्या आहेत आणि एकूण ५३,१४६ रुग्ण तंबाखू मुक्ति केंद्रातील लाभार्थी झालेले आहेत. एवढेच नव्हे, तर कोटपा कायदा २००३ अंतर्गत आतापर्यंत एकूण रु १,२६,८४९० रुपये एवढी रक्कम दंड म्हणून जमा करण्यात आलेली आहे. हा दिवस पाळताना आपण स्वतःला आठवण करून देऊया की तंबाखूचे सेवन ही एक गंभीर समस्या आहे, ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या आरोग्याची जबाबदारी घेण्याची आणि तंबाखूपासून दूर राहण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची हीच वेळ आहे. चला तर मग तंबाखू विरोधाची शपथ घेऊया आणि केवळ ठाणे जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र तसेच आपला भारत देश लवकरात लवकर तंबाखू मुक्त करण्याचा वसा घेऊया आणि आपले कुटुंब, आपला परिसर, आपले गाव, आपला जिल्हा, आपले राज्य आणि आपला भारत तंबाखू मुक्त करूयात.

मैन्युअल स्कैवेंजिंग विरोधी कायद्याचे ठामपाकडून खुलेआम उल्लंघन – जगदीश खैरालिया

कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुणे समाज कल्याण आयुक्तांची नोडल ऑफिसर नेमणुकीची शासनाची न्यायालयात माहिती अनिल ठाणेकर ठाणे महानगरपालिका हद्दीत भूमिगत गटारे सफाई करतांना कंत्राटी कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा सुविधा पुरविल्या जात नाही, याबाबतची तक्रार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. मैन्युअल स्कैवेंजिंग विरोधी कायद्याच्या तरतुदींचे ही खुलेआम उल्लंघन महापालिका प्रशासन आणि ठेकेदार करत असल्याने या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आता महाराष्ट्र शासनाने २ मे २०२४ पासून समाज कल्याण आयुक्त, पुणे यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केली असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला सुनावणी दरम्यान दिली आहे. यामुळे मृतक सफाई कामगारांच्या कुटुंबातील वारसांना आता नोडल ऑफिसर यांच्याकडेही दाद मागता येईल, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत भूमिगत गटारे सफाई करतांना कंत्राटी कामगारांना कोणत्याही सुरक्षा सुविधा पुरविल्या जात नाही. या बाबतीत श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी सफाई कामगार गटारात काम करतांनाचे विडिओ आणि फोटो सहित महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे तक्रारही केली आहे. किमान वेतन अधिनियम १९४८ आणि मैन्युअल स्कैवेंजिंग विरोधी कायद्याच्या तरतुदींचे ही खुलेआम उल्लंघन महापालिका प्रशासन आणि ठेकेदार करत असल्याचे आरोप ही जगदीश खैरालिया यांनी केले आहे. या अगोदर मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेत १६ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना मानवी मैला सफाई प्रतिबंध कायद्याच्या तंतोतंत अंमलबजावणीचे अंतरिम आदेश दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला मॉनिटरिंग कमिटीची किमान सहा महिन्यांत एकदा मीटिंग घेऊन राज्यातील मैन्युअल स्कैवेंजिंग/ सीवर डेथ प्रकरणी पुनर्वसन बाबत आढावा घेण्यासाठी  आदेश श्रमिक जनता संघाने दाखल करण्यात रिट याचिका क्र.१५७०/ २०२३ मध्ये १० मे २०२४ रोजी दिले आहे. तसेच मैन्युअल स्कैवेंजिंग विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केलेले समाज कल्याण आयुक्त, पुणे यांना रिट याचिका क्र.१५७०/ २०२३ मध्ये  प्रतिवादी म्हणून सामिल करण्यासाठी श्रमिक जनता संघ युनियनच्या मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाने २ मे २०२४ पासून समाज कल्याण आयुक्त, पुणे यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केली असल्याची माहिती  मुंबई उच्च न्यायालयाला सुनावणी दरम्यान दिली आहे.

दहावीच्या परीक्षेत एकलव्य विद्यार्थ्यांना घवघवीत यश

समता विचार प्रसारक संस्थेकडून गौरव होणार- हर्षलता कदम ठाणे: एकलव्य विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत मिळालेले यश, राबोडीच्या अल्फिया शेखला ९३% मिळाले आणि ती शाळेत प्रथम आली आहे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत ठाणे शहरातील एकलव्य विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत चमकदार कामगिरी करुन हे दाखवून दिले आहे की जिद्दीला सीमा नसते. दहावीच्या परीक्षेत एकलव्य विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळविले आहे या विद्यार्थ्यांचा समता विचार प्रसारक संस्थेकडून गौरव करण्यात येणार आहे, असे संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी सांगितले. श्रुती खवळे या किसन नगर मधल्या मुलीने ८९.४० % मार्क्स मिळवून किसन नगर महानगर पालिकेच्या शाळेत पाहिला नंबर मिळवला आहे. धर्मवीर नगरच्या जया इंगळे हिने ८२ % मार्क्स मिळवून ती महानगर पालिका शाळा क्रं. १८ मधे पहिली आली आहे. सावरकर नगर आदित्यकुमार ठाकूरला ८३% मार्क्स मिळाले आहेत आणि सावरकर नगर महानगर पालिकेच्या शाळेत तो प्रथम आला आहे.  राबोडीच्या हबीबा अन्सारी ला ८२%, अयान अकील शेखला ८०.२% मिळाले आहेत. किसन नगरच्या सृष्टी दळवीला ७९.४%, वारली पाड्याच्या पूर्वा रहाटवळला ७८.६ %, मानपाड्याच्या प्रतीक्षा लोखंडेला ७७.६%, किसन नगरच्या मिनाक्षी कुऱ्हाडेला ७३.८०%, मानपाड्याच्या संदीप वाडू ला ७३.८ % आणि अनिकेत लोखंडेला ७२ %, कळव्याच्या आकाश कनोजियाला ७२.२%, सावरकर नगरच्या रक्षा कादळगावकरला ७३% आणि तब्बसूम नसीर खान पठाणला ७२% मार्क्स मिळाले आहेत.  राबोडीच्या आलिया शेख ला ७९.८%, आशिया पठाणला ७८% मिळाले आहेत. ढोकाळीच्या नीता बिरादरला ७५% आणि भूमिका जाधवला ७६% मिळाले आहेत. या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यात आले होते. त्याचा मुलांना फायदा झाल्याचे शाळेतील शिक्षक, पालक आणि मुलांनी आवर्जून सांगितले.  एकलव्यांमधील ३ मुली आणि १ मुलगा त्यांच्या शाळेत प्रथम आले आहेत. वडील मजुरी, आई घरकाम, पत्राचे छोटेसे घर, दाटीवाटीची वस्ती, बाजुला नाला वाहतोय, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट, कधी आई वडील गावाला व विद्यार्थी इथे दुसऱ्यांकडे राहून शाळेत जातो, घरचे काम करून शाळेत जाऊन अभ्यास करून असे घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या एकलव्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांच्या साठी नुसते पास होणे सुद्धा बोर्डात येण्यासारखे कौतुकास्पद आहे. तरीही कितीतरी मुलांना फर्स्ट क्लास मिळाला आहे. आणि वरील विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळवले आहेत. या सर्व एकलव्यांचं समता विचार प्रसारक संस्थेतर्फे जाहीर गौरव करण्यात येणार आहे. ठाणे शहरातील विविध वस्त्यांमधून राहणारे, अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीशी दोन हात करत जे विद्यार्थी दहावी पास होतात त्यांचा जाहीर गौरव करून त्यांना पुढच्या शिक्षणासाठी संस्थेकडून मदत केली जाते. अधिक माहितीसाठी संस्थेचे सचिव अजय भोसले, ८१०८९४९१०२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन हर्षलता कदम यांनी केले आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रशिक्षण संपन्न

निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदान प्रक्रियेची मतमोजणी दि. 04 जून 2024 रोजी डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे.…

कोपरीत तारा माऊली संस्थेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांना वंदन

माजी नगरसेवक भरत चव्हाण, ओमकार चव्हाण यांच्यातर्फे कार्यक्रम ठाणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्ताने तारा माऊली संस्थेतर्फे कोपरी येथे आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांना वंदन करण्यात आले. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश चिटणीस ओमकार चव्हाण यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात लेखिका-निवेदिका साधना जोशी यांचे `यशोदा ते माई सावरकर’ या विषयावरील व्याख्यानही पार पडले. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती मंगळवारी उत्साहात पार पडली. कोपरीत सावरकरप्रेमींची संख्या लक्षणीय आहे. त्यानिमित्ताने कोपरीतील तारामाऊली सामाजिक सेवा संस्था, आद्यक्रांतिवीर परिवार, स्वराज महिला मंडळ, भारतीय स्त्री जीवन विकास परिषद यांच्या वतीने विविध कार्यक्रम पार पडले. स्वातंत्र्यवीर सावरकर कट्टा व स्वा. सावरकर तरण तलाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात लेखिका साधना योगेश जोशी यांनी ‘यशोदा ते माई सावरकर’ यांचे व्याख्यान झाले. त्यात माई सावरकरांच्या जीवनातील विविध पैलू, त्यांची मते उलगडून स्पष्ट करण्यात आली. त्याला सावरकरप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक भरत चव्हाण, ओमकार चव्हाण, उद्योजिका आशाताई कुलकर्णी, प्राचार्य मकरंद घुले, मुख्याध्यापक प्रकाश पांचाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. स्वराज्य महिला मंडळाचे संस्थापक मनोहर चव्हाण, मंडळाच्या अध्यक्षा सविता चव्हाण, उपाध्यक्षा मिरा सिनकर, आद्यक्रांतिवीर परिवाराचे हेमंत आळवे, समाजकेवक उदय लेले, भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेच्या पद्यजा काळे, समाजसेवक विलास कोपरकर आदी उपस्थित होते.

बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना अटक करा – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : महाड येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून बाबासाहेबांचा अवमान करणार्‍या जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करा, अशी जाहीर मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली. जितेंद्र आव्हाड हे डाॅक्टर जितेंद्र आव्हाड नसून ते नकलाकार, नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आव्हाड आहेत. आज परमपूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले पोस्टर त्यांनी फाडून टाकले. त्यामुळे त्यांच्या मनात परमपूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आले. मतुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते. कुठल्याही परिस्थितीत मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यपुस्तकात येणार नाहीत ही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे. पण ज्यांना नाटक करायची सवय आहे. ते आंदोलन करायला महाडला गेले आणि आंदोलन करायच्या भरामध्ये परमपूज्य,  महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे. बाबासाहेब यांच्या अवमानप्रकरणी महाड येथील पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड  त्यांच्याबरोबर फोटोत दिसणाऱ्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन जितेंद्र आव्हाड व त्यांच्या सहकार्‍यांना अटक करायला हवी अशाप्रकारची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. जितेंद्र आव्हाड हे नाटककार आहेत. त्यांचे खाली डोके वरती पाय अशी स्थिती झालेली आहे. मनुस्मृती जाळायला गेले आणि फाडून आले डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो. स्वतःला पुरोगामी म्हणायचे आणि असे कृत्य करायचे हे शोभनीय नाही. आज त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. यामुळे बाबासाहेबांच्या अवमानप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी यावेळी व्यक्त केली. तत्पूर्वी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयासमोर, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा निषेध असो, मुर्दाबाद, मुर्दाबाद जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद,  जितेंद्र आव्हाड यांचे करायचे काय, खाली डोक वरती पाय अशाप्रकारच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच जितेंद्र आव्हाड यांचे फोटो पायदळी तुडविण्यात आले, फोटो फाडण्यात आले व फोटो जाळण्यात येऊन जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ सरचिटणीस प्रभाकर सावंत, सरचिटणीस रविंद्र पालव, महिला अध्यक्षा वनिताताई गोतपागर, युवक अध्यक्ष विरु वाघमारे, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मंगेश सुर्यवंशी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिनेश मेहरोल, विजय देशमुख, मिलिंद डिचवलकर, विधानसभा अध्यक्ष अजय सकपाळ, प्रभाग अध्यक्ष समीर शेख, दिनेश सोनकांबळे, सुपुन मेहरा, उमर शेख, शेहबाज चेऊलकर, विजय धुमाळ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.