टोलयंत्रणेचा दिलासा, अमेरिकेला तडाखा
भारतात टोल व्यवस्था पुर्णपणे कॅशलेस होणार, ही सरत्या आठवड्यातील पहिली रंजक बातमी तर भारताच्या निर्यातशुल्काचा अमेरिकेला तडाखा बसला, ही अशीच एक खास बातमी. भारतीय आर्थिक विकासदर वाढीवर जागतिक नाणेनिधी फिदा…
भारतात टोल व्यवस्था पुर्णपणे कॅशलेस होणार, ही सरत्या आठवड्यातील पहिली रंजक बातमी तर भारताच्या निर्यातशुल्काचा अमेरिकेला तडाखा बसला, ही अशीच एक खास बातमी. भारतीय आर्थिक विकासदर वाढीवर जागतिक नाणेनिधी फिदा…
आरक्षणावर ताजी चर्चा सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस बजावून अनुसूचित जाती-जमातींमध्ये ‘क्रिमी लेयर’ लागू करण्याबाबत मत मागितले आहे. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, इतर मागासवर्गीयांसाठी ‘क्रिमी लेयर’ लागू असताना या…
पनवेल-गव्हाण भागात भाजप महायुती उमेदवारांना जनसमर्थन पनवेल: रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गव्हाण जिल्हा परिषद गट तसेच वहाळ व गव्हाण पंचायत समिती गणामध्ये भाजप महायुतीच्या उमेदवारांना नागरिकांकडून उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारादरम्यान सर्व स्तरातून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या भरघोस विजयाचा आत्मविश्वास अधिक बळकट केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली गव्हाण जिल्हा परिषद गट तसेच वहाळ व गव्हाण पंचायत समिती गणामध्ये भाजप महायुतीचे उमेदवार जोमाने प्रचार करत असून विजयासाठी सज्ज झाले आहेत. अनुभवी आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळे प्रचाराला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत आहे.स्वर्गीय जनार्दन भगत, लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे आणि राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, वाय. टी. देशमुख यांची जन्मभूमी असलेल्या गव्हाण विभागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम या नेतृत्वाने गेल्या अनेक वर्षांत केले आहे. नागरिकांचे प्रश्न सातत्याने सोडविणे, लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि कोणत्याही भेदभावाविना मदतीचा हात देणे ही या नेतृत्वाची ओळख आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कायम लोकाभिमुख कार्यपद्धती अवलंबली आहे. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव राहिला असून यामुळेच त्यांना नेहमीच जनतेचा भरघोस पाठिंबा लाभला आहे. या विश्वासार्ह आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा लाभ भाजप महायुतीच्या उमेदवारांना या निवडणुकीत निश्चितच होणार असून गव्हाण जिल्हा परिषदमध्ये निकिता खारकर, तसेच वहाळ पंचायत समितीमधून वितेश म्हात्रे व गव्हाण पंचायत समितीगणामध्ये जिज्ञासा कोळी या तीनही उमेदवारांचा अर्थात भाजप महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दादागिरी आणि पैशाची भाषा करणाऱ्या उमेदवारांना आता जनता माफ करणार नाही: विलास फडके राज भंडारी पनवेल: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. यातच आदई पंचायत समिती गणातून शेतकरी कामगार पक्षाचे अनुभवी नेते विलास फडके तसेच नेरे जिल्हा परिषद गटातून मारुती बाळू भस्मा हे मैदानात उतरले आहेत. आपल्या आयुष्याची अनेक वर्षे ज्यांनी समाजसेवा करण्यात खर्ची घालविली त्या विलास फडकेंसोबत जनशक्ती आणि विरोधात धनशक्ती अशी निवडणूक रंगत आहे. मागील निवडणुकीत ज्यांनी धनशक्तीच्या जोरावर ही जागा जिंकली ते गेल्या ८ वर्षात मतदार जनतेकडे फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे जनतेने आता ठरवले आहे. धनशक्तीला तालुक्यातील जनता आता जनशक्तीचा अवतार दाखवणार असल्यामुळे आदई पंचायत समिती गणातून जनता विलास नारायण फडके आणि नेरे जिल्हा परिषद गटातून मारुती बाळू भस्मा असे आम्हा दोन्ही उमेदवारांना भरघोस मतदान करून निवडून देणार असल्याचा विश्वास विलास नारायण फडके यांनी प्रचारादरम्यात व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मागील वेळी जनतेने धनशक्तीच्या जोरावर भाजपच्या उमेदवाराला निवडून दिले होते. मात्र पुन्हा निवडणूक लागण्यासाठी ८ वर्षांचा कालावधी लागला. गेल्या ८ वर्षात आम्ही ज्यांना मतदान केलं ते आमच्याकडे फिरकलेच नाहीत, असा सुर मतदार जनतेने लावला आहे. तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या मतदार संघातील जनतेसाठी असणाऱ्या विविध योजना, सवलती या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचे उमेदवार अपयशी ठरले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे भाजपच्या वतीने दादागिरी आणि पैशाची भाषा करून जनतेला गृहीत धरणाऱ्यांना आता जनता माफ करणार नसून महाविकास आघाडीच्या खटारा चिन्हावरील उमेदवारांना जनता मोठ्या संख्येने मतदान करून निवडून देणार असल्याचा विश्वास विलास फडके यांनी व्यक्त केला.
आरोग्य विभागाचे ‘कोकण स्पंदन’ उत्साहात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कलाविष्काराने जिंकली रसिकांची मने अशोक गायकवाड रत्नागिरी: रुग्णांची सेवा करताना दिवसरात्र व्यस्त असणाऱ्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कोकण स्पंदन’ या स्नेहसंमेलनाने रत्नागिरीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. भारतीय प्रजासत्ताक दिन आणि ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ यांचे औचित्य साधून येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा सांस्कृतिक कार्यक्रम २६ जानेवारीला पार पडला.जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, क्षयरोग, कुष्ठरोग व हत्तीरोग विभाग, महिला रुग्णालय आणि प्रादेशिक मनोरुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि मुख्याधिकारी वैभव गारवे आदी उपस्थित होते.स्टेथोस्कोप बाजूला ठेवून जोपासली कला आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले वैद्यकीय कर्तव्य बजावत असतानाच जोपासलेली कला यावेळी सादर केली. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात ६० हून अधिक वैविध्यपूर्ण कलाप्रकार सादर करण्यात आले. शास्त्रीय व सुगम संगीताच्या सुरेल मैफिलीने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. लोकनृत्य आणि बॉलीवूड गाण्यांवरील बहारदार सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. उपस्थितांना खळखळून हसवणारी मिमिक्री (नक्कल) आणि सामाजिक संदेश देणाऱ्या एकांकिका व नाटकांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे, आणि पॅथॉलॉजिस्ट डॉ. अर्जुन सुतार यांच्यासह संपूर्ण टीमने अहोरात्र परिश्रम घेतले.रत्नागिरीच्या सांस्कृतिक इतिहासात आरोग्य विभागाने सेवेसोबतच कलेच्या क्षेत्रातही मारलेली ही भरारी कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. प्रेक्षकांच्या तुडुंब प्रतिसादाने सावरकर नाट्यगृह दुमदुमून गेले होते.
केडीएमसीच्या एच प्रभागात अनाधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार, उपायुक्त समीर भुमकर व बाळासाहेब चव्हाण यांच्या निर्देशानुसार ह प्रभागाचे सहा.आयुक्त राजेश सावंत यांनी डोंबिवली पश्चिम येथील देवीचा पाडा (स्मशानभूमीच्या मागे) तसेच नवीन देवीचापाडा येथील २५ खोल्या आणि १० चाळीचे जोते संपूर्णत: निष्कासित करण्याची कारवाई केली. हि कारवाई फेरीवाला पथकाचे कर्मचारी, ठेकेदाराचे १० कामगार, १ जे.सी.बी. यांच्या सहाय्याने करण्यात आली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार 30 जानेवारीला विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व डॉ. विलास आठवले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. तसेच, याप्रसंगी हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधिमंडळाचे सह सचिव नागनाथ थिटे, सह सचिव (समिती) राजेश तारवी, उप सचिव विजय कोमटवार, स्वाती ताडफळे, अवर सचिव सुरेश मोगल, उप सभापती यांचे खाजगी सचिव अविनाश रणखांब, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी २०० मुलींना मोफत लसीकरण ठाणे: न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ठाणे शतक महोत्सवानिमित्त सखी सावित्री समितीतर्फे, इनर व्हील क्लब्स – झोन ५ यांनी आदित्य बिर्ला ग्रुप आणि रोटरी क्लब ऑफ मुलुंड यांच्या सहकार्याने २०० मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून (Cervical Cancer) संरक्षणासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (Serum Institute of India) सर्वावॅक एचपीव्ही (Cervavac HPV) लस यशस्वीरित्या दिली आहे. या लसीचे दोन डोस मुलींना मोफत देण्यात आले. पहिला डोस २१ ऑगस्ट २०२५ रोजी देण्यात आला, तर दुसरा डोस २८ जानेवारी २०२६ रोजी देण्यात आला. हे संपूर्ण लसीकरण वैद्यकीय देखरेखीखाली आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या सहाव्या मजल्यावरील भोळे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. शाळेचे विश्वस्त, मुख्याध्यापक, शिक्षक, डॉक्टर, इनर व्हील स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी या उपक्रमाला मोठे सहकार्य केले. हा उपक्रम मुलींच्या आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले हे एक मोठे पाऊल आहे. या उपक्रमामुळे अनेक गरीब आणि गरजू मुलींना मोफत लसीचा लाभ मिळाला आहे.
पालिकेच्या जागेच्या बदल्यात फेरीवाल्यांकडून हप्ता वसूली मुलुंड म्हाडा कॉलनीत फेरीवाल्यांमुळे नागरीक त्रस्त पालिका अधिका-यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी मुंबई: निष्पाप लोकांचा जीव गेल्याशिवाय प्रशासकीय यंत्रणेला जाग येत नाही. हे सर्व श्रुत आहे. भांडुपची दुर्घटना असो वा कुर्ल्यातील मारहाण प्रकरणानंतर फेरीवाल्यांवर युध्द स्तरावर कारवाई करण्यात आली. आता दोन्ही प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी ठाण मांडायला सुरवात केली आहे. याचा सर्वाधीक त्रास मुलुंडकरांना होत असून केवळ फुटपाथच नव्हे तर रस्त्यांवरही त्यांनी आपले बस्तान मांडुन ठेवले आहे. दिखाऊ पणाची कारवाई करणारी पालिका प्रशासन वारंवार कायदा मोडणा-या फेरावाल्यांवर कायमस्वरुपी कारवाई का करीत नाही असा प्रश्न नागरीक करीत आहेत. मुलुंड पश्चिम येथील महात्मा गांधी मार्गावरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमनाबाबत नागरीकांनी केलेल्या तक्रारी नंतर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र दुस-याच दिवशी फेरीवाल्यांनी या ठिकाणी अतिक्रमण केले. दिखाऊ पणाची कारवाई करणारे पालिका प्रशासन अशा फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल का करीत नाहीत. असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. एम.जी. मार्गावर दुकानदार व फेरीवाल्यांनी फुटपाथ अडवून ठेवली आहे तर रस्तांवर बेकायदेशीर पार्किग मुळे पादचा-यांना रस्त्यावरुन चालावे लागते. त्यामुळे स्टेशनकडे येणा-या बेस्ट बसेसमुळे भांडुप सारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अत्यंत अरुंद रस्त्यातून बेस्ट बसला मार्गक्रमण करावे लागते. रस्त्याच्या दुतर्फा भागात फेरीवाल्यांनी व बेकायदेशीर पार्किंगवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरीकांना या भागातून चालणे अवघड होऊन गेले आहे. अशीच परिस्थिती मुलुंड पश्चिम येथील रामरतन त्रीवेदी मार्ग, एस.एल.मार्ग या ठिकाणी दिसून येते. मुलुंड पुर्व पश्चिम येथे तर अनेक ठिकाणी ना फेरीवाला क्षेत्र अशी पाटी लावण्यात आली आहे. विनोदाची गोष्ट म्हणजे फेरीवाले याच पाटीखाली आपला ठेला (दुकान) लावतात. त्यांना आता पालिकेच्या कारवाईची भीती राहिली नसून पालिका व फेरीवाल्यांमधील आर्थिक व्यवहारामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे फेरीवाले व नागरीक सांगतात. मुलुंड पुर्व येथील म्हाडा कॉलनी रिध्दी सिद्धी इमारती मधील दुकानदारांनी त्यांचे विक्रीचे सामान शटर बाहेर काढल्याने नागरीकांना या ठिकाणी चालता येत नाही. त्यातच फेरीवाल्यांचे अतिक्रमण व बेकायदेशीर पार्किंगमुळे शाळेत जाणा-या लहान मुलांना व पालकांना जीव धोक्यात घालून रस्तांवरुन चालावे लागते. दुकानदारांमुळे बेकायदेशीर पार्किंग ही येथील नागरीकांची डोकेदुखी ठरली असून अशाच पार्किंगमुळे म्हाडा कॉलनीत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली केली जात असल्याचे नागरीक उघडपणे बोलतात. अनेकांनी तर पालिकेची जागा फेरीवाल्यांना चालविण्यासाठी दिली असून त्याबदल्यात महिना ठराविक रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाते. हा सर्व प्रकार म्हाडा कॉलनीत राजरोसपणे चालतो. पालिका व पोलीस प्रशासनाच्या नाकाखाली चालणा-या या हप्ते वसुलीवर कारवाई मात्र शुन्य असल्याचे नागरीक सांगतात. चाईनीस, पानीपुरी, नारीयळ पाणी व वडापावच्या फेरीवाल्यांकडून ही हप्ते वसूली केली जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पालिका व फेरीवाल्यांच्या आर्थिक उलाढाली पाहता पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांपासून ते सर्व वरिष्ठ अधिका-यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी आता नागरीक करीत आहेत.
स्टोन क्रेशरच्या प्रदुषणातुन शेत जमीनीची आणि नागरिकांची सुटका करण्यासाठी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे. राजीव चंदने मुरबाड : मुरबाड माळशेज मार्गावर असलेल्या सायले गावचे हद्दीत सुरू असलेल्या स्टोन क्रेशरच्या प्रदुषणातुन कष्टकरी शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनी नापिक होणार असून नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊन जीवनमानावर परिणाम होणार असल्याने या क्रेशरला सायले ग्रामस्थांनी प्रखर विरोध केला असुन जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये असा २६ जानेवारी रोजी ग्रामसभेत ठराव घेऊन विरोध दर्शविला असुन जिल्हाधिकारी काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्टोन क्रेशरच्या कर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदुषण होतेच शिवाय शालेय विद्यार्थ्यांचे अभ्यासवर विपरीत परिणाम होऊन गुणवत्ता ढासळली जाते.त्यातुन निघणाऱ्या धुरळ्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊन गंभीर आजारांना सामोरे जावे लागते तर काही जणांचे बळी देखील जातात.दरम्यान तो धुरळा शेत जमिनीवर बसला तर ती जमीन नागंरता येत नाही.तसेच त्या जमीनीत खरिब किंवा रब्बी पिक घेता येत नाही.मुरबाड तालुक्यातील कोलठण,माल्हेड,पवाळे,म्हाडस, बांधीवली शिरगाव,गोऱ्याचा पाडा,या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांचे जमीनीवर व जीवनमानावर त्याचा परिणाम झालेला दिसुन येत आहे.या प्रकारांची आपल्या गावात पुनरावृत्ती होऊ नये म्हणुन सायले ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी झालेल्या. ग्रामसभेत बहुमताने ठराव घेऊन या क्रेशरला तिव्र विरोध केला आहे. कोट या स्टोन क्रेशरमुळे गावचे परिसरात प्रदुषण होणार असुन तेथे येणाऱ्या अवजड वाहनांमुळे गावातील नागरिकांना सुरक्षित रस्ते मिळणार नाहित त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी विरोध करुन तसा ठराव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे -जागृती पानसरे, सरपंच ग्रामपंचायत सायले कोट या धोकादायक क्रेशरला सर्व ग्रामस्थांनी विरोध केला असल्याचा ठराव ग्रामसभेत घेतला असुन तो जिल्हाधिकारी ठाणे यांना सादर केला आहे. -अशोक बांगर, ग्राम पंचायत अधिकारी.सायले.