वयाच्या साठीत उभा केला मधनिर्मितीचा उद्योग
वयाच्या साठीत उभा केला मधनिर्मितीचा उद्योग कसोटी, जिद्द आणि विश्वासाच्या जोरावर उभा राहिला एक ब्रँड पर्यावरणाशी नाते जोडून गुणवत्तेच्या जोरावर यशस्वी झाला उद्योग योगेश चांदेकर पालघरः वय, शिक्षण अनुभव याचा उद्योग उभारणीत कोणताही अडथळा येत नाही. नवे काही करण्याची तयारी आणि ग्राहकाला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि पर्यावरणाशी नाते जोडणारे देण्याची तयारी या त्रिसूत्रीवर उद्योगाचे यश अवलंबून असते. डहाणू तालुक्यातील घोलवड येथील साठ वर्षीय विश्वास नेरुरकर यांनी नवीन उद्योग सुरू करून एक प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवले आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील घोलवड हे महाराष्ट्र शासनाने,घोषित केलेले महाराष्ट्रातील तिसरे मधाचे गाव असुन, याचा वसा घेऊन उद्योगात यशस्वी झेप घेऊन संकल्प हनी चा मुख्य उद्देश घेऊन स्थानिकांना, थोड्याफार रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा नेरूरकर यांचा प्रयत्न आहे. निसर्गातूनच घेऊन माणसाला नैसर्गिक देण्याची जिद्द यातून ‘संकल्प हनी’चा उद्योगाचा जन्म झाला. आज या उद्योगांना शंभर नव्हे, तर १०१ टक्के गुणवत्तेची हमी दिली आहे. गुणवत्ता, दर्जा आणि नैसर्गिक हेच त्यांच्या यशाचे गणित आहे. नोकरीऐवजी उद्योगात रमले मन विश्वास नेरूरकर यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. नोकरीत त्यांना रस नव्हता. विद्युत संबंधी व्यवसाय काही काळ केला; परंतु लोकांच्या आरोग्याची काळजी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. भेसळ त्यांना पाहवत नव्हती. त्यामुळे स्वतःच शंभर टक्के पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी कोणतीही तडजोड न करता त्यांनी मधमाशी पालनाचे प्रशिक्षण डहाणू तालुक्यातील कोसबाड येथे घेऊन मधाची निर्मिती करण्याचे त्यांनी ठरवले. केवळ स्वतः पुरती मध निर्मिती न करता इतरांना सहभागी करून घेतले व संकल्प घेऊन संकल्प हनीची निर्मिती केली. संकल्पातून ‘संकल्प हनी’…
