Author: bittambatami.com

हळदी समारंभातील जेवण केल्याने ३० ते ४० लोकांना विषबाधा        

हळदी समारंभातील जेवण केल्याने ३० ते ४० लोकांना विषबाधा कल्याण : कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल मोहन प्राईड इमारतीतील बाविस्कर कुटुंबात शनिवारी रात्री हळदी समारंभा निमित्ताने जेवण जेवल्यानंतर ३०ते ४० जणांना उलट्या व जुलाब होऊ लागल्याने उपचारार्थ रूग्णालयात नेण्याचा बाका प्रसंग ओढावला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल मोहन प्राईड इमारतीमधील बाविस्कर कुटुंबात मुलीचा हळदी समारंभ शनिवारी होता. या समारंभा निमित्ताने रात्री आलेल्या पाहुणे आणि कुटुंबायांनी जेवण केल्यानंतर काही तासांनी उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने उपचारार्थ रूग्णालयात नेण्याचा प्रसंग ओढावला. या जेवणातील विषबाधेचा जास्त त्रास जेष्ठांना, बालकांना झाल्याचे समजते. यामध्ये ज्या मुलीची हळद होती ती, तिची आई, बहीण यांना देखील त्रास झाला. या धक्कादायक प्रकारामुळे रविवारी होणारा लग्न समारंभ कार्यक्रम रद्द करावा लागल्याचे कुटुंबियांच्या वतीने प्रसिध्दी माध्यामांना सांगितले. तसेच या घटना प्रकरणी  जेवणाच्या कंत्राटदारावर खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत गुन्हा दाखल करून कारवाई ची मागणी केली असल्याचे समजते.

‘माझे कल्याण शहर’ प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

‘माझे कल्याण शहर’ प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न कल्याण: छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर म्हणजे कल्याण शहर. कल्याण शहराला विशिष्ट असे व्यक्तिमत्व आहे  याच कल्याण शहराविषयी आपल्याला बहुविध माहिती असणं ही एक फार मोठी प्रेरणा ठरते, याच अनुषंगाने मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त  सार्वजनिक वाचनालय कल्याणच्यावतीने “माझे कल्याण शहर प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२६” चे आयोजन करण्यात आले होते. कल्याण शहरातील तब्बल ४३ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. कल्याण सांस्कृतिक इतिहास,सुभे कल्याण, १०० वर्षाचा नगरपालिका अहवाल अशा विविध संदर्भग्रंथातील प्रश्न छत्रपतीशिवाजी महाराज कल्याणमध्ये कधी आले? कल्याणमध्ये इलेक्ट्रिक सप्लाय केव्हा आली? प्रभाकर ओक टॉवर बांधणीचा खर्च किती आला? भारताचार्य चिंतामण वैद्य यांना भारताचार्य पदवी कोणी दिली? स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काव्यमय चरित्र लिहिण्याचा मान कोणाला मिळाला? कल्याणचे पहिले दैनिक कोणते? पोखरण तलाव कोठे आहे? असे विविध प्रश्न स्पर्धकांना विचारण्यात आले होते. वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या संकल्पनेतून ही माहितीपर स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली “कल्याण” या संदर्भग्रंथाचे लेखक श्रीकांत पेटकर, विवेकानंद विचारमंचचे ज्येष्ठ साहित्यिक प्रविण देशमुख, वाचक दिप्ती जोशी, धनंजय गोरे यांनी या स्तुत्य उपक्रमासाठी आभार मानुन शुभेच्छा दिल्या. प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, उपाध्यक्षा आशा जोशी, कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, वाचक वर्ग, श्रोता वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता

कल्याणात उलगडली ‘विणलेली’ परंपरा

कल्याणात उलगडली ‘विणलेली’ परंपरा बिर्ला महाविद्यालयात वस्त्रे, विणकाम आणि हस्तकलांचे प्रदर्शन कल्याण : बांधणीचे, यंत्रमागावरील कापड, रेशीम, ताग, सुती अशा विविध प्रकारचे कापड, त्यावर केली जाणारी छपाई, त्याची कला, त्यापासून बनवली जाणारी वेगवेगळी कापडांचे प्रकार आणि त्यामागचा इतिहास तसेच परंपरा पाहण्याची संधी नुकतीच कल्याणकरांना मिळाली. कल्याणच्या बी. के. बिर्ला महाविद्यालयात इतिहास विभागातर्फे विणलेल्या परंपरा (वूवन लेगसीज) या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी कापडाचा प्रवास उलगडून सांगितला. कल्याणच्या बी. के. बिर्ला महाविद्यालयातील इतिहास विभागाने शनिवारी विणलेल्या परंपरा: भारतातील उत्कृष्ट वस्त्रे, विणकाम आणि हस्तकला हे प्रदर्शन आयोजित केले होते. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या प्रदर्शनात देशाची वस्त्र परंपरा उलगडून सांगितली. प्रदर्शनाची संकल्पना तृतीय वर्षाच्या इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या ‘भारतीय कलेचा इतिहास’, ‘जागतिक कलेचा इतिहास’ आणि ‘वारसा पर्यटनाची ओळख ‘ या विषयांवर आधारित होती. या प्रदर्शनाचा उद्देश सिंधू संस्कृतीपासून ते आजपर्यंतच्या भारतीय वस्त्रोद्योगाच्या इतिहासाबद्दल विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढवणे हा होता. या प्रदर्शनासाठी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचे फॅशन डिझाइन विभागाचे प्रमुख डॉ. नितीन हडप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अविनाश पाटील आणि शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. डॉ. हडप यांनी ‘वस्त्रांपासून फॅशनपर्यंत: भारतावरील एक ऐतिहासिक दृष्टिकोन’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बिर्ला महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. सुवर्णा जाधव, सहाय्यक प्राध्यापिका डॉ. प्रणिता हरड यांनी यात मोलाची भूमिका बजावली. या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी अन्य महाविद्यालये आणि शाळांनाही आमंत्रित करण्यात आले होते. उपस्थितांनी भारतीय वस्त्रपरंपरेच्या समृद्ध वारशाचा अनुभव घेतला. या प्रदर्शनात देशातील साड्यांचे प्रकार, पैठणी, इरकल, कापडांचे प्रकार, बांधणीचे कापड, मॅँचेस्टरवरून आलेला आणि यंत्रमागावर बनलेला मांजरपाट कापड, मेंढराऱ्या केसांपासून तयार होणारी घोंगडी, तागाचे गोणपाट, रेशीम कापड मांडण्यात आले होते. तसेच या विविध प्रकारच्या कापडापासून बनलेल्या इतर वस्तुही होत्या. सुती, बांधणी, साधे कापड, त्यांची माहिती, त्यावर विविध रंगांची हाताने केली जाणारी छपाई, इम्ब्रोडरी, तसेच कापडासोबत केली जाणारी कलाकारी उपस्थितांना पाहता आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आलेल्या प्रेक्षकांची संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

प्रभाग क्र. ४ मध्ये ठाकरे गटाच्या विजयामागे भाजपाचा हात ?

प्रभाग क्र. ४ मध्ये ठाकरे गटाच्या विजयामागे भाजपाचा हात ? नगरसेविका तेजश्री गायकवाड यांच्या अभिनंदनाचे भाजपाने लावले बॅनर कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये शिवसेनेचे ५३, भाजपा ५०, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ११, मनसेचे ५, कॉंग्रेसचे २ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे १ नगरसेवक निवडून आले आहेत. यात प्रभाग क्र. ४ मध्ये शिवसेनेच्या दोन उमेदवारांचा पराभव करत शिवसेना ठाकरे गटाचे दोन नगरसेवक निवडून आले असून या विजयामागे भाजपाचा हात असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. त्याला कारण हि तसे असून ठाकरे गटातून निवडून आलेल्या नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी निवडून येताच भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेतली. तसेच मोहने परिसरात तेजश्री गायकवाड यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावले असून या बॅनरवर माजी आमदार नरेंद्र पवार आणि भाजपा पदाधिकारी संतोष शिंगोळे यांचा फोटो असल्याने तर्क वितर्क लावले जात आहेत. केडीएमसीच्या प्रभाग क्र. ४ मध्ये लागलेल्या निकालाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रभागात शिवसेनेचे दिग्गज मानले जाणारे माजी नगरसेवक मयूर पाटील त्यांच्या पत्नी नमिता पाटील, शिवसेनेचे शाखा प्रमुख रोहन कोट आणि शिवसेना विभाग प्रमुख अंकुश जोगदंड यांच्या पत्नी पूजा जोगदंड यांना उमेदवारी देण्यात आली होती. यापैकी नमिता पाटील या अवघ्या ८ मतांनी तर रोहन कोट हे १७०३ मतांनी निवडून आले. मात्र शिवसेनेच्या मयूर पाटील आणि पूजा जोगदंड यांचा ठाकरे गटाच्या राहुल कोट आणि तेजश्री गायकवाड यांनी पराभव केला आहे. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला असतानाच, मोहने परिसरात लावलेल्या  तेजश्री गायकवाड यांच्या अभिनंदनाच्या बॅनरवर भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि भाजपा पदाधिकारी संतोष शिंगोळे यांचे फोटो आहेत. तर तेजश्री गायकवाड यांनी निवडून येताच माजी आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेतली होती. प्रभाग क्र. ४ मध्ये भाजपाला एकही जागा न दिल्याने भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांचे काम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे शिवसेना भाजपा महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा चारोटी ते पालघर ५०,००० लोकांच्या  मोर्चाची सुरुवात!

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा चारोटी ते पालघर ५०,००० लोकांच्या  मोर्चाची सुरुवात! मागण्या पूर्ण होईपर्यंत अनिश्चित काळासाठी पालघरमध्ये धरणे आंदोलनाचा निर्धार अनिल ठाणेकर ठाणे : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आज पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आलेल्या सुमारे ५०,००० लोकांचा एक अतिभव्य पायी मोर्चा काढला. हा मोर्चा डहाणू तालुक्यातील चारोटी येथून सुरू झाला असून, रात्री मनोर येथे मुक्काम करेल आणि उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करेल. जोपर्यंत सरकारच्या वतीने निश्चित कालमर्यादेसह लेखी स्वरूपात आपल्या ज्वलंत आणि प्रलंबित मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत हा प्रचंड जनसमुदाय पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करणार आहे. अखिल भारतीय किसान सभा (एआयकेएस), सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू), अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (एडवा), डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच (एएआरएम) यांसारख्या संघटनाही मोठ्या संख्येने सामील झाल्या आहेत. या मोर्चाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि एआयकेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, पॉलिट ब्युरो सदस्य आणि एडवाच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, केंद्रीय समिती सदस्य, माकप राज्य सचिव आणि किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले, केंद्रीय समिती सदस्य आणि सीटूचे राज्य सचिव, डहाणूचे दोन वेळा आमदार असलेले विनोद निकोले, राज्य सचिवमंडळ सदस्य आणि एएआरएमचे राज्य निमंत्रक किरण गहला आणि इतर अनेक जण करत आहेत. उद्या सीपीएमचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन हे देखील या मोर्चात सामील होतील. या मोर्चाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत: वनाधिकार कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे; सर्व देवस्थान, इनाम, वरकस आणि सरकारी जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करणे; मोदी सरकारने रद्द केलेली मनरेगा योजना पूर्ववत सुरू करणे; स्मार्ट मीटर योजना रद्द करणे; पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे; चार श्रम संहिता रद्द करणे; वाढवण आणि मुरबे बंदरांचे जनविरोधी प्रकल्प रद्द करणे; पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची सोय करणे; शिक्षण, रोजगार, रेशन, आरोग्य इत्यादी सुविधांमध्ये वाढ करणे.

गोरेगाव फिल्म सिटी हत्याकांड प्रकरणात सर्व आठ आरोपींची निर्दोष मुक्तता

गोरेगाव फिल्म सिटी हत्याकांड प्रकरणात सर्व आठ आरोपींची निर्दोष मुक्तता गोरेगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई :   गोरेगाव बहुचर्चित फिल्म सिटी हत्याकांडातील राजू उर्फ श्रीकांत शिंदे खून प्रकरणात दिंडोशी येथील बोरवली विभागाच्या सत्र न्यायालयाने सर्व आठही आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. ५ जानेवारीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी टी आगलावे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील इम्रान पी शेख यांनी बाजू मांडली. सदर खटला गोरेगाव येथील आरे पोलीस ठाण्याच्या तपासावर आधारित होता. अभियोजन पक्षानुसार फिल्मसिटी परिसरात सुरक्षा सेवा व्यवसाय करणाऱ्या श्रीकांत उर्फ राजू शिंदे यांच्यावर २२ मे २०१५ रोजी गोरेगाव आरे कॉलनीतील फिल्मसिटी परिसरात कालिया मैदानाजवळ बालाजी टेलिफिल्म्सच्या सेट समोर गळी बार करण्यात आला होता. हेल्मेट घातलेले दोन अज्ञान व्यक्ती मोटरसायकल वरून येऊन त्यांनी राजू शिंदे यांच्यावर गोळी झाडल्याचा प्रत्यक्ष दर्शनी पोलिसांना सांगितले होते. या हल्ल्यात राजू शिंदे यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. त्यावेळी त्यांना तत्काळ नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुमारे ४५ दिवस उपचार सुरू असताना २ जुलै २०१५ रोजी गोळीबाराच्या जखमेमुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून पुन्हा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत २१ ऑगस्ट २०२५रोजी आरोप पत्र सादर केले. हे प्रकरण सत्र खटला क्रमांक १८९/२०१५ म्हणून नोंदवण्यात आले. न्यायालयाने सर्व आरोपीं विरुद्ध भारतीय दंड संहिताच्या कलम ३०२, १२०ब तसेच शस्त्र कायद्याच्या कलम २५ व २७ अंतर्गत आरोप निश्चित केले होते. या प्रकरणात सुरेश सुभाष गायकवाड यांना मुख्य सूत्रधार म्हणून दर्शविण्यात आले होते. खटल्याच्या सुनावणी दरम्यान अभियोजन पक्षाने एकूण ३८ साक्षीदार तपासले मात्र उलट तपासणी दरम्यान साक्षीदारांच्या जबाबांमध्ये गंभीर विसंगती आढळून आल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीत फिर्यादी पक्षाने सांगितलेल्या तीन गोळ्यांच्या जखमान ऐवजी क्षविच्छेदन अहवालात चार गोळ्यांच्या प्रवेश जखमा आढळल्याचे समोर आले. विशेष म्हणजे हल्ल्याच्या दिवसापासून मृत्यू होईपर्यंत राजू शिंदे हे वैद्यकीय देखरेखीखाली होते. तसेच बॅलेस्टिक तज्ञांच्या साक्षीनुसार जप्त करण्यात आलेली शस्त्रे ही कथित गुन्ह्यात वापरलेले शस्त्रांशी जुळत नसल्याचे स्पष्ट झाले. तपास अधिकाऱ्यांच्या साक्षीतून हेही निष्पन्न झाले की पीडिताचा मृत्यूपूर्वी जबाब नोंदवण्यात आला असल्याचा दावा असूनही तो जबाब न्यायालय समोर सदर प्रकरणात आलेला नव्हता. या सर्व त्रुटी आणि संशयस्पद बाबी लक्षात घेता अभियोजन पक्ष आरोप कोणत्याही रास्त शंकेपलीकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरण्याचे नमूद करत न्यायालयाने सर्व आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले या प्रकरणात सुरेश सुभाष गायकवाड यांचे मुख्य प्रतिनिधित्व अ‍ॅड श्रीकांत सुरेशराव शिरसाट यांनी तर जुगल उर्फ पप्पू बाबू दोडिया याचे प्रतिनिधित्व अ‍ॅड सपना दिलीप हजारे यांनी केले तसेच सहकारी वकील म्हणून अ‍ॅड रवींद्र सोपान लिहिणार अ‍ॅड नरेश मुरलीधर गायकवाड अ‍ॅड प्रशांत वसंत जाधव आणि सहकारी आयुष्य राम शंकर पांडे यांनी काम पाहिले.

 उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सिंधुदुर्गात एक खिडकी योजना…!

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज! उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सिंधुदुर्गात एक खिडकी योजना…! सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी व मदतीसाठी एक खिडकी योजना लागू करण्यात आली आहे.  ही माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती जोडमिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील आठ तालुक्यांसाठी आठ निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रत्येकी दोन याप्रमाणे १६ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत अशीही माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात १४ हजार १५३ दुबार मतदार आहेत त्यांच्याकडून ज्या ठिकाणी मतदान करणार त्याचे ‘ऑप्शन’  भरून घेण्यात येत आहेत असे धोडमिसे यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ५० सदस्य आणि पंचायत समित्यांचे १०० सदस्य असून या निवडणुकीत ५ लाख ९९ हजार ५६४ मतदार निश्चित झाले आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या जास्त असून ती ३ लाख १९०३ इतकी आहे तर पुरुष मतदार २ लाख ९७ हजार ६६० इतके आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. प्रतिबंधात्मक कारवाई सिंधुदुर्ग जिल्हा हा गोवा राज्याच्या सीमेवर येतो.त्यामुळे निवडणूक काळात अवैध धंद्यांना चाप बसावायासाठीदोडामार्ग,सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यांमध्ये १० ठिकाणी ‘तपासणी नाके ‘ तयार करण्यात आले आहेत.तसेच जिल्हाभर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात एकूण ८७० मतदान केंद्रे असून कुडाळ तालुक्यात सर्वाधिक १५३ तर सावंतवाडी तालुक्यात १४३ मतदान केंद्रे आहेत. निवडणुकीसाठी सुमारे ४,५०० कर्मचारी लागणार आहेत.जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात असलेल्या ६५ मतदान केंद्रांमध्ये नेटवर्कची सुविधा नसल्याने त्या ठिकाणी अतिरिक्त व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी दिली.

जय लहुजी दिनदर्शिकेचे प्रकाशन

जय लहुजी दिनदर्शिकेचे प्रकाशन मुंबई: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर मानखुर्द येथील क्रांतीसम्राट डॉ. बाबासाहेब गोपले भवन येथे ४४ व्या मातंग समाज क्रांतीचक्र परिवर्तन दिनानिमित्त क्रांतीज्योती कुसुमताई बाबासाहेब गोपले यांच्या हस्ते जय लहुजी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. मातंग समाजाचे नेते समाजभूषण सुदाम आवाडे, बी जी गायकवाड, मदन आवाडे, योगेश शिंदे,बंडु चांदणे, तुलसिराम ताटे, नितिन हिवाळे, हरीभाऊ कांबळे, दत्तात्रय आवाडे, रवी थोरात, पार्वती  आवाडे, अश्विनी शिंदे, द्वारकाबाई लोंढे, आदी मान्यवर उपस्थित होते.

सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सानपाडा प्रभाग क्रमांक १९ मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गणपत (भाऊ) दगडु भापकर, सुनिल  रामदास कुरकुटे, सौ. शैला जगदीश पाटील आणि सौ. शिल्पा राजेश ठाकूर हे विजयी झाल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने १८ जानेवारीला सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, शासकीय योजना ज्येष्ठ नागरिकांना मिळण्यासाठी आपण सहकार्य करावे. सानपाड्याचा उत्तम विकास करावा. नगरसेवकांनी सांगितले की, आता तुम्ही आमच्याकडे येऊ नका, आम्ही तुमच्याकडे येऊ आणि आपणास सहकार्य करू. काम करणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव,  सचिव जगदीश एकावडे, खजिनदार महादेव पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे, सीमा बोराडे,  सहसचिव राजेंद्र कदम, सहखजिनदार नाना शिंदे, कार्यकारणी सदस्य जे. पी.  देसाई,  मंगला मानधने, माजी अध्यक्ष मारुती कदम, माजी उपाध्यक्ष बळवंत पाटील, माजी सहखजिनदार सुभाष बारवाल  आदी मान्यवर व सभासद उपस्थित होते.

कल्याणचा राजाचे जल्लोषात आगमन

कल्याणचा राजाचे जल्लोषात आगमन कल्याण : कल्याण पूर्वेतील तिसाई प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने “कल्याणचा राजा” श्री गणरायाची भव्य दिव्य आगमन मिरवणूक भक्तिभावात व जल्लोषात रविवारी संपन्न झाली. ढोल-ताशांच्या निनादात, हरिनामाच्या पवित्र गजरात विघ्नहर्त्याचे मंगलमय आगमन झाले. भक्तांच्या अपार श्रद्धा, आनंद आणि उत्साहाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारून गेला. या सोहळ्याला  आमदार सुलभा गायकवाड, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, नगरसेविका मनिषा गायकवाड, तिसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव गायकवाड यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याणची अस्मिता आणि श्रद्धेचे स्थान असलेल्या “श्री तिसाई प्रतिष्ठाण” आयोजित “कल्याणचा राजा” – माघी गणेशोत्सवांचे यंदाचे वर्ष हे उत्सवाचे आणि अभूतपूर्व चैतन्याचे आहे. या वर्षापासून बाप्पाच्या “पारंपारिक आगमन सोहळ्याचे” आयोजन करण्यात आले आहे.  रविवारी कल्याण पूर्वेतील चक्की नाका, पुनालिंक रोड ते आई तिसाई देवी मंदिर, तिसगाव अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यंदाच्या माघी गणेशोत्सवाचे  विशेष आकर्षण पर्यावरणपूरक मूर्ती असून ठाणे जिल्ह्यातील सर्वात प्रथम अशी माघी गणेशोत्सवातील “टिशू पेपर” पासून (कागदी) बनवलेली भव्य श्री गणेश मूर्ती आहे. तसेच ६१ फूट उंच केदारनाथ मंदिराची नेत्रदीपक प्रतिकृती देखील याठिकाणी साकारण्यात आली आहे.