Author: bittambatami.com

ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी सीएसआर निधी मिळवून देणार!

 उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची ग्वाही ठाणे : मराठीत उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित व्हावीत यासाठी प्रकाशकांना राजाश्रय मिळायला हवा. तसेच पुस्तकांच्या प्रसारासाठी ग्रंथालयांना सक्षम करण्याची गरज आहे. खासगी उद्योग-व्यवसायांकडून देण्यात येणारा सीएसआर निधी ग्रंथालयांच्या संवर्धनासाठी वापरला जायला हवा. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. ज्येष्ठ लेखक व राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या चरित्रकादंबरीचे प्रकाशन रविवारी मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या स्वामी विवेकानंद यांच्यावरील चरित्रकादंबरीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री प्रताप सरनाईक, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, लेखक-कवी प्रा. अशोक बागवे, प्रा. प्रवीण दवणे, किशोर कदम (सौमित्र), कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष नमिता कीर, शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, शारदा प्रकाशनाचे प्रा. संतोष राणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘संन्यस्त ज्वालामुखी’चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘वाचाल तर वाचाल’ असे ट्रकच्या मागे लिहून बिंबवण्याची वेळ आपल्यावर आली आहे. ही परिस्थिती सुधारायची असेल तर प्रत्येक जिल्ह्यात चांगले लेखक आणि वक्ते तयार व्हायला हवेत. हिंदुत्व काय आहे हे जगाला ठासून सांगणारे स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या पिढीला सांगायला हवेत. ‘संन्यस्त ज्वालामुखी’ ही कादंबरी त्यादृष्टीने राज्यातील सर्व ग्रंथालयांमध्ये पोहोचायला हवी, अशी भावना मंत्री उदय सामंत यांनी याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, महाराष्ट्राने स्वामी विवेकानंदांवर नेहमीच प्रेम केले आहे. लोकमान्य टिळकांपासून वि. रा. करंदीकरांपर्यंत अनेकांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची ओळख मराठी समाजाला करून दिली आहे. त्या परंपरेतील स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे महाराष्ट्रातील आजचे पाईक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ हे आहेत, अशा शब्दांत डॉ. सदानंद मोरे यांनी चरित्रलेखक प्रा. डॉ. ढवळ यांचा गौरव केला. तर विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, धर्म आणि राजसत्ता यांचे द्वंद्व भारतीय समाजात पूर्वापार आहे. हिंदू धर्म नेमका काय आहे, हे सांगणे अतिशय गुंतागुंतीचे आहे. मात्र हिंदू धर्माच्या शोधात स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान भारतातील डाव्या-उजव्या अशा सर्वच विचारसरणींना स्वीकारार्ह वाटते, यातच त्यांचे मोठेपण आहे. त्यामुळे आजच्या पिढीला विवेकानंदांचे विचारच तारू शकतात, अशी भावना डॉ. शोभणे यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी कवी-गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांनीदेखील स्वामी विवेकानंदांच्या विचाराची आजच्या पिढीला ओळख करून देण्याची गरज व्यक्त केली. याबाबत बोलताना प्रा. दवणे म्हणाले की, आज समाजाच्या सर्वच क्षेत्रांत भेसळ झाली आहे. विचार, संस्कार, संस्कृती, नीती यांचा विसर पडत चालल्याची परिस्थिती आहे. अशा काळात स्वामी विवेकानंद यांचे विचार ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या कादंबरीच्या माध्यमातून आजच्या पिढीपुढे आणण्याचे काम झाले आहे, असे प्रतिपादन प्रा. दवणे यांनी केले. तर कवी-गीतकार व अभिनेते किशोर कदम (सौमित्र) याप्रसंगी म्हणाले की, भारतीय समाजातील अनेक महनीय व्यक्तींच्या जीवनविचाराला आध्यात्मिकतेची किनार आहे. याचे कारण त्यांनी संपूर्ण देश पिंजून काqढला, आपला संपूर्ण समाज जाणून घेतला. त्यातूनच त्यांनी आध्यात्मिक विचारांचा संदेश आपल्याला दिला आहे. स्वामी विवेकानंद यांनी देखील आपापला धर्म, स्व-धर्म शोधण्याची प्रेरणा जगाला दिली आहे, असे प्रतिपादन किशोर कदम यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, कवी प्रा. अशोक बागवे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनीदेखील मनोगत व्यक्त करून ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या चरित्रकादंबरीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रकाशनसोहळ्याचे प्रास्ताविक शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे यांनी केले, तर प्रा. संतोष राणे यांनी प्रकाशक म्हणून भूमिका मांडली. कार्यक्रमाचा समारोप गायिका फाल्गुनी नातु यांच्या भैरवी गायनाने झाली, तर प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. अरुंधती भालेराव यांनी केले.

संविधान अमृत महोत्सव साजरा 

 कल्याणमध्ये वकील संघटनांच्या वतीने कल्याण :  बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा गजानन चव्हाण यांच्या प्रयत्नातून कल्याण येथे दिवाणी वकील संघटना, कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना कल्याण, उल्हासनगर वकील संघटना, मुरबाड…

कल्याण, डोंबिवलीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या सहा दुकानदारांवर कारवाई

कल्याण : मकरसंक्रातीनिमित्त बाजारात पतंग आणि मांजा विक्रीची झुंबड आहे. शासनाने हा आनंद घेत असताना नायलॉन मांजा, चिनी, प्लास्टिक कृत्रिम मांजा यांचा वापर पतंग उडविण्यासाठी करू नये असे आदेश दिले…

नांदुरी-सप्तश्रृंगी गड रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत

हरिभाऊ लाखे नाशिक : सप्तशृंगी गड विकास आराखडा योजनेतून चार महिन्यांपासून सुरू असलेले सप्तशृंगी गड- नांदुरी घाट मार्गातील कड्याकडील बाजूस दरड प्रतिबंधक जाळी लावण्याचे काम पूर्ण झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे. सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी नांदुरीपासून १० किलोमीटर घाटरस्ता आहे. या घाट रस्त्यावर दरड कोसळणे, मोठे दगड पडून रस्ता बंद होण्याचे प्रकार बरेचदा झाले आहेत. काही भाविकांच्या वाहनांचे नुकसानही त्यामुळे झाले आहे. गडावर दररोज भाविकांची संख्या वाढतच असल्याने सावधगिरी म्हणून सप्तशृंगी देवी विश्वस्त मंडळ आणि ग्रामपंचायतीने घाट रस्त्याच्या कडेला दरड प्रतिबंधक जाळी (रॉकफॉल प्रोटेक्शन) लावून रस्ता सुरक्षित करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने शासनाने सप्तशृंगी गड विकास आराखडा योजनेत या कामासाठी ३३ कोटी रुपये मंजूर केले होते. या कामाला २३ सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली सुरूवात झाली होती. यानंतर नवरात्रौत्सव, दिवाळी, नाताळ, नविन वर्ष दरम्यान काम बंद ठेवण्यात आले होते. सकाळी सहा ते ११.३० या वेळेत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येत होता. यामुळे सप्तशृंगी गडावर भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. आता काम पूर्ण झाल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. संपूर्ण घाट रस्त्याची पाहणी करण्यात आल्यानंतर डोंगरावरील सैल दगड काढून टाकण्यात आले. डोंगराच्या मध्यापासून रस्त्याच्या काठापर्यंत दरड प्रतिबंधक लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या. जेणेकरून पावसाळ्यात, उन्हाळ्यात सैल झालेले दगड खाली आल्यास ते जाळीमध्ये अडकतील किंवा रस्त्याच्या कडेला पडतील. कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही. यामुळे भाविकांचा प्रवास सुरक्षित होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे.

लकी व्यायामशाळेच्या नूतनीकरणाचा शुभारंभ

ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार व याँनच्या विशेष निधितून खासदार नरेश म्हस्के, आमदार  रविन्द्र फाटक यांच्या मार्गदर्शनाने कोपरीतील प्रभाग क्रमांक २० मधील लकी व्यायामशाळेच्या नूतनीकरणाच्या कामाचा नुकताच…

ठाणे महानगरपालिकेतर्फे साजरा होणार मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

डॉ. निर्मोही फडके यांच्या व्याख्यानाने होणार उद्घाटन ठाणे  : राज्यभरात १४ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२५ हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने ठाणे महानगरपालिकेतही विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवार, १४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे होणार आहे. त्यानंतर, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी डॉ. निर्मोही फडके यांचे ‘जगू मराठीचे रंगी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. पंधरवड्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी सोमवारी, कै. नरेंद्र बल्लाळ हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी उपस्थित होते. ग्रंथदिंडी व पुस्तक प्रदर्शन या पंधरवड्यात, सोमवार, २० जानेवारी रोजी स. १०.३० ते स. ११.३० या वेळेत महापालिका भवन ते परमार्थ निकेतन ते ज्ञानराज सभागृह ते महापालिका भवन अशी ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर, प्राच्य विद्या संस्थेच्या सहकार्याने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे जुन्या आणि नवीन पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्याचवेळी, सभागृहात सुलेखनकार अच्युत पालव यांचे सुलेखन पाहण्याची संधी मिळेल. पुस्तक प्रदर्शनात जुन्या पुस्तकांसह कोश, रामायण, महाभारत यांचे खंड पाहता येतील. तसेच, पुस्तक विक्रीचे स्टॉलही यावेळी ठेवण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी सोमवार, २० आणि मंगळवार २१ रोजी स. १० ते सायं. ६ वाजेपर्यंत खुले राहील. महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या स्पर्धा बुधवार, २२ जानेवारी रोजी महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निबंध, सुलेखन (हस्ताक्षर), शुद्धलेखन आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या पंधरवड्याच्या काळात, शिक्षण विभागातर्फेही शालेय स्तरावर विविध स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात येणार आहे प्रा. प्रवीण दवणे यांचे व्याख्यान आणि समारोप मंगळवार, २८ जानेवारी रोजी पंधरवड्याचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ केै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात होईल. त्यात, महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शालेय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिेके देण्यात येतील. त्यानंतर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांचे मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान होईल. हे व्याख्यान सर्व नागरिकांसाठीही खुले आहे.

 माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त

 दोन कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ कल्याण : ऑल इंडिया केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष, माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त २ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कल्याण पूर्व विजयनगर परिसरात करण्यात आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेले तीन वर्षे प्रशासकीय राजवट सुरू असून नगरसेवकांना जनतेच्या कामाची पूर्तता करण्यासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याने, शिवसेना नगरसेविका माधुरी प्रशांत, शिवसेना संपर्कप्रमुख, निरीक्षक कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र प्रमुख  प्रशांत काळे  यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनात परिस्थिती आणून जनतेच्या विकास कामासाठी 2 कोटी  निधी उपलब्ध करून आणला.  त्यातील बहुतांशी कामे पूर्ण होऊन त्याचे रविवारी स्थानिक कार्यकर्ते यांच्या हस्ते प्रशांत काळे आणि माधुरी काळे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. पोहच रस्ता, पेव्हर ब्लॉक, सिमेंट काँक्रीट रस्ते, पाणी योजना अश्या अनेक केलेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. याबाबत प्रशांत काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानून, आपल्या पाठीशी उभे राहणारे नागरिक यांच्यासाठी आपण सदैव विकास कामांसाठी बांधील असल्याचे सांगितले. यावेळेस शिवसेनेचे विभाग प्रमुख सत्यवान खेडेकर, संतोष साळवी, अनंत आंब्रे, विभाग संघटक प्रशांत मांजरेकर, दिलीप कोल्हे, विशाल विरा, विभाग समन्वयक महेंद एटमे, उपविभाग प्रमुख संभाजी माने, भगवान सोंडकर, शाखाप्रमुख विशाल वाघमारे, प्रदीप तांबे, उपशाखाप्रमुख विकास गुरव, अतुल वाघमारे, सुरेंद्र मोरे, प्रमोद लाड, अमर मलाह, नंदकिशोर सुरकुतवार, राजाराम पठारे, साहेबराव आहिरे आणि मोठ्या संख्येने महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. 00000

 ठाणे व डोंबिवली परिक्षेत्रामध्ये 22 ठिकाणी भक्तीपर्व समागम संपन्न

परमात्म्याशी एकरुपता हाच खऱ्या भक्तीचा आधार – निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज कल्याण : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत निरंकारी मिशनच्या वतीने देशभरात रविवारी भक्ती पर्वाचे आयोजन करण्यात आले. भक्ती पर्व संत समागमाचा मुख्य कार्यक्रम सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे संपन्न झाला. भक्तीपर्वाच्या निमित्ताने ठाणे शहर आणि कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, बदलापुर परिसरामध्ये एकंदर 22 ठिकाणी विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये हजारोंच्या संख्येने स्थानिक भक्तगणांनी भाग घेतला. समालखा येथील भक्तीपर्व संत समागमामध्ये सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित विशाल जनसमुदायाला संबोधित करताना प्रतिपादन केले, की “भक्ती अशी अवस्था आहे जी जीवनाला दिव्यत्व आणि आनंदाने ओतप्रोत करते. हा इच्छापुर्तीचा सौदा नाही किंवा स्वार्थाचे माध्यमही नाही. खऱ्या भक्तीचा अर्थ आहे परमात्म्याशी गहिरे नाते आणि निःस्वार्थ प्रेम।” याप्रसंगी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात श्रद्धा व भक्तिची अनुपम छटा पहायला मिळाली. दिल्ली, एन.सी.आर.सहित देश-विदेशातील हजारों भाविक-भक्तगणांनी या दिव्य समागमामध्ये भाग घेऊन आध्यात्मिक आनंदाची  दिव्य अनुभूती प्राप्त केली. इस पावन प्रसंगी महान संत सन्तोखसिंहजी यांच्यासह अनेक संतांच्या तप, त्याग आणि ब्रह्मज्ञानाच्या प्रचार-प्रसारामधील त्यांच्या अमूल्य योगदानांचे स्मरण केले गेले आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्यात आली. समागमा दरम्यान अनेक वक्ते, कवी व गीतकारांनी विभिन्न माध्यमातून गुरुचा महिमा आणि भक्तीभावनेचे सारगर्भित वर्ण केले आणि संतांच्या प्रेरणादायी शिकवणूकीतून भाविकांच्या जीवनातील आध्यात्मिक दृष्टीकोन समृद्ध केला. सतगुरु माताजींनी माता सविंदरजी आणि निरंकारी राजमाताजी यांचे जीवन भक्ती आणि समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक असल्याचे सांगून या दिव्य विभूतींचे जीवन हे भक्ती आणि सेवा यांचे श्रेष्ठ उदाहरण असल्याचे सांगितले. निरंकारी मिशनचा मूळ सिद्धांत हाच आहे, की भक्ती ही परमात्म तत्वाला जाणूनच सार्थक रूप घेऊ शकते. निःसंदेह सतगुरु माताजींच्या अमूल्य प्रवचनांनी भाविक भक्तगणांना जीवनात ब्रह्मज्ञानाद्वारे भक्तीचे वास्तविक महत्व समजण्याची आणि अंगीकारण्याची प्रेरणा मिळाली.

महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा कऱण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या नाविन्यपूर्ण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल महावितरण आणि एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड कंपनीला शनिवारी बेळगाव येथे आयपीपीएआय…

 ज्योती म्हापसेकर यांना ‘एकता जीवन गौरव’ पुरस्कार’

डॉ. श्यामल गरुड, जादीश भोवड यांचाही होणार सन्मान मुंबई : मुंबई एकता कल्चर संस्थेतर्फे देण्यात येणारे 2024 –  25 च्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात नाटककार तसेच स्त्री मुक्ती चळवळीच्या सक्षम योगदानाबद्दल ज्योती म्हापसेकर यांना या वर्षीचा एकता जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. लेखिका डॉ. शामल गरुड, कवयित्री डॉ. योगिता राजकर, नंदलाल रेळे, कवी गीतेश शिंदे, पत्रकार जगदीश भोवड तसेच दिनेश राणे, आनंद खरात यांचाही पुरस्कार प्राप्त नामवंतांमध्ये समावेश आहे. ज्येष्ठ कवी अजय कांडर,  स्त्री मुक्ती चळवळीतील कार्यकर्त्या, कवयित्री योगिनी राऊळ आणि पत्रकार – कवी भगवान निळे यांच्या निवड समितीने यावर्षीच्या पुरस्कार विजेत्यांची एकमताने निवड केली आहे. 18 जानेवारी रोजी मुंबई गिरगाव येथील साहित्य संघात होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात सर्व पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती एकता कल्चर अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी दिली. एकता कल्चर पुरस्कार सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे – ‘स्त्री मुक्ती चळवळीतील’ मान्यवर नेत्या ज्योती म्हापसेकर – (एकता जीवन गौरव पुरस्कार), नंदलाल रेळे – ध्वनी संकलन- उज्जय आंबेकर पुरस्कृत मधु आंबेकर स्मरणार्थ नटवर्य (भालचंद्र पेंढारकर स्मृती पुरस्कार), योगिता राजकर – साहित्य- कवी प्रकाश गणपत जाधव पुरस्कृत गणपत गुणाजी जाधव स्मरणार्थ (नारायण सुर्वे स्मृति पुरस्कार कविता संग्रह – बाईपण ),  डॉ. शामल गरुड – साहित्य- (रजनी परुळेकर स्मृती विशेष पुरस्कार), नारायण गिरप – साहित्य – राजेश जाधव पुरस्कृत (काशिनाथ गणपत बेनकर स्मरणार्थ नारायण पेंडणेकर स्मृती पुरस्कार) ॲड. प्रियांका संदीप संगारे – विधि- मनोज संसारे स्मरणार्थ (संत जनाबाई स्मृती पुरस्कार), मनोज मस्के – नृत्य नीलांबरी उज्जय आंबेकर पुरस्कृत सहदेव बाबाजी लोखंडे स्मरणार्थ (सुबल सरकार स्मृती पुरस्कार), अनुजा कासारे -शैक्षणिक – पल्लवी शिंदे माने पुरस्कृत कांचन रघुनाथ शिंदे स्मरणार्थ (सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार), सुधाकर कदम – संगीत (पंडित कुमार गंधर्व स्मृति पुरस्कार), गीतेश शिंदे -प्रकाशक- रजनी संदीप बेनकर पुरस्कृत (यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार), जगदीश भोवड – पत्रकारिता – वैशाली बाळाराम कासारे स्मणार्थ (जयंत पवार स्मृती पुरस्कार), डॉ. रश्मीन केनिया-वैद्यकीय (डॉ. नितू मांडके स्मृती पुरस्कार) आदींना पुरस्कार घोषित करण्यात आले असून समाजसेवेचे पुरस्कार सर्वश्री आनंद खरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, दिनेश राणे -प्रकाश पाटील पुरस्कृत महात्मा (ज्योतिबा फुले स्मृती पुरस्कार), विजय भगते –  रमेश गणपत जाधव स्मरणार्थ (बाबा आमटे स्मृती पुरस्कार), विद्या दयानंद काट्रे – प्रियंका प्रकाश जाधव पुरस्कृत सुनंदा गणपत जाधव स्मरणार्थ (रमाबाई आंबेडकर स्मृती पुरस्कार), प्रकाश सोनावणे-नितीन कांबळे पुरस्कृत चंद्रमणी भिकाजी कांबळे स्मरणार्थ (संत गाडगेबाबा स्मृती पुरस्कार), किसन पेडणेकर – (सिंधुताई सपकाळ स्मृती पुरस्कार), अरुण सबनीस- गंगाधर म्हात्रे पुरस्कृत  जनार्धन म्हात्रे स्मरणार्थ (बिरसा मुंडा स्मृती पुरस्कार), शरद जाधव- (भंन्ते महाथेरो स्मृती पुरस्कार), डॉ. अरुण भगत- (स्वामी विवेकानंद स्मुर्ती पुरस्कार) यांना जाहीर करण्यात आले. ‘एकता महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे, नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’चे सल्लागार व ‘ऑस्कर अकादमीच्या निवड समितीतील ज्युरी उज्वल निरगुडकर यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण शनिवार ,१८ जानेवारी सायंकाळी ४:०० वाजता गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघ नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात एकता महोत्सवाचा सांगता सोहळा आणि पुरस्कार व पारितोषिके वितरण समारंभ संपन्न होणार आहे अशीही माहिती एकताचे उपाध्यक्ष उज्जय आंबेकर, एकताचे सचिव प्रकाश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.