Category: होम

धाराशिवमध्ये मविआची युवाब्रिगेड प्रचारात

धाराशिव : उध्दव ठाकरे शिवसेना गटाच्या ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिमध्ये आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या शक्तीप्रदर्शनात महाराष्ट्र विकास आघाडीची युवा ब्रिगेड प्रचारता उतरली होती. यात ठाकरे सेनेचे आदित्य ठाकरे,…

सांगलीच्या रक्तातच बंड, आता माघार नाही – विशाल पाटील

सांगली : सांगलीच्या रक्तातच बंड आहे, ते यशस्वी करण्याची जबाबदारी तुम्हा सर्वाची आहे असे सांगत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष इशारा दिला. त्यांनी मंगळवारी सांगलीत जोरदार शयतीप्रदर्शन करत कार्यकर्त्यांशी संवाद…

राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय

मुंबई : तुटपूंजा निधी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या यामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ढासळत आहे. हे कमी ठरावे म्हणून राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेली ग्रामीण रुग्णालयातील केवळ ४० टक्केच खाटांचा रुग्णोपचरासाठी वापर होत…

धारावी सर्वेक्षणाचा वेग वाढवण्यासाठी आणखी १५ टीम होणार तैनात

मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत डीआरपीपएलकडून गेल्या पंधरा दिवसांपासून घरोघर सर्वेक्षण सुरू आहे. मात्र सर्वेक्षणाचा वेग मंद असल्याने आतापर्यंत केवळ ६०० झोपड्यांचे सर्वेक्षण झाले आहे. त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून सर्वेक्षणाचा वेग वाढवण्यासाठी पंधरा टीम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १५ सर्व्हेयर आणि ७ नायब तहसीलदार नव्याने घेतले जाणार आहेत. धारावीत एक लाखाहून अधिक झोपड्या असून त्यांचे नंबरिंग आणि सखोल माहिती पुढील सहा-आठ महिन्यात जमा करण्याचे उद्दिष्ट धारावी पुनर्विकास प्राधिकरण लिमिटेडने ठेवले आहे. त्यानुसार १८ मार्चपासून नंबरिंगचे काम माटुंगा येथील कमला रमण येथून सुरू झाली आहे. तसेच १ एप्रिल पासून घरोघर सर्व्हे सुरू झाले. सुरुवातीला पाच टीम होत्या, मात्र एका घराचा सर्व्हे पूर्ण करण्यासाठी पाऊण तासाहून अधिक वेळ लागत आहे, तसेच सर्व्हे मशीनला रेंज नसल्याने ओटीपी मिळत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने सर्व्हेच्या टीम वाढवल्या आहेत. तरीही सर्व्हेला विलंब लागत असल्याने डीआरपीपीएलने आणखी पंधरा टीम वाढवल्या जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून पंधरा सर्व्हेयर आणि सात नायब तहसिलदार देण्याबाबत मागणी केली असून लवकरच ते मिळतील अशी माहिती डीआरपीपीएलच्या अधिकाऱ्यांने दिली. एका सर्व्हेयरकडे दोन टीमची जबाबदारी धरणार धारावीत घरोघर सर्व्हेचा वेग वाढवण्याच्या हलचली सुरू आहेत. त्यासाठी सर्व्हरच्या टीममध्ये भविष्यात वाढ करावी लागल्यास एका सर्व्हेयरकडे दोन टीमची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व्हेच्या कामाला वेग मिळू शकणार आहे. पावसाळ्यात सर्व्हे मंदावणार धारावीचा बहुतांश सखल भाग आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी भरते, झोपड्यांमध्ये पाणी जात असल्याने पावसाळ्यात सर्व्हेचा वेग मंदावणार आहे. त्यामुळे १५ जून पर्यंत जास्तीतजास्त झोपड्यांचा सर्व्हे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

पोलिसांनी 50 नागरिकांना मोबाईल फोन केले परत 

नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांनी आपल्या हद्दीतील चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या नागरिकांच्या 50 मोबाईल फोनचा शोध घेऊन त्यापैकी 28 नागरिकांना परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या हस्ते परत केले. यावेळी हरवलेले व चोरीला गेलेले आपले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले. परिमंडळ-1चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींचा आढावा घेऊन त्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकाने कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींची दखल घेऊन तांत्रिक तपास करुन भारतातील विविध राज्यातून एकुण 50 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. त्यापैकी सोमवारी पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या हस्ते 28 नागरिकांना त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात आले. उर्वरीत मोबाईल फोनच्या तक्रारदारांचा शोध घेऊन त्यांना देखील त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात येत आहेत.

 रामनवमीला खबरदारी घ्या!

 उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश मुंबई : रामनवमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या यात्रांमुळे मुंबईत विशेषत: मालाड-मालवणी येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकार आणि पोलिसांना दिले. रामनवमीनिमित्त मालवणी येथील मुस्लीमबहुल परिसरातून काढण्यात येणाऱ्या यात्रेदरम्यान हेतुत: मशिदीसमोर नमाज सुरू असताना मोठ्या आवाजात ढोल-ताशे वाजवले जात असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश दिले. आम्ही कोणालाही सार्वजनिक यात्रा काढण्यापासून किंवा सभा घेण्यापासून रोखू शकत नाही. परंतु, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोणीही नियमांचा भंग केल्यास पोलिसांनी कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचवेळी, नियमांचा भंग होणार नाही, या आश्वासनाच्या आधारे आमदार टी. राजा. सिंह यांना मिरा-भाईंदर येथे सभा आयोजित करण्यास आपण परवानगी दिल्याचे न्यायमूर्ती डेरे यांनी नमूद केले. रामनवमीला काढण्यात येणाऱ्या यात्रांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे का ते पाहा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यावर, रामनवमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या यात्रांदरम्यान अनुचित घटना घडणार नाहीत याबाबत पोलीस अधिक सावध राहतील, असे आश्वासन महाधिवक्ता बिरेद्र सराफ यांनी खंडपीठाला दिले.

 डायघर कचरा प्रश्न पेटणार

मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी ठाणे : ठाणे महापालिकेचा कचरा डायघर येथे आणला जात असल्याने येथील ग्रामस्थांनी आणि गृहसंकुलांतील रहिवाशांनी बैठका घेऊन लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी सुरू केली आहे. भांडार्ली येथील प्रकल्प बंद झाल्यानंतर मागील नऊ महिन्यांपासून डायघर येथे ठाणे महापालिकेने कचरा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाविरोधात विविध आंदोलने, निवेदन देऊनही निर्णय होत नसल्याने नाइलाजाने हा निर्णय घेतला जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. या प्रकल्पामुळे येथील नागरिकांच्या आरोग्य, शेतीवर परिणाम होत असल्याची तक्रार येथील रहिवासी करत आहेत. दुर्गंधीमुळे येथील रहिवाशांना लाखो रुपयांची घरे विक्रीला काढण्यास सुरूवात केली आहे. ठाणे महापालिकेने हद्दीबाहेरील भंडार्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारला होता. हा कचरा प्रकल्प बंद केल्यानंतर ठाणे महापालिकेने नऊ महिन्यांपूर्वी डायघर येथे कचरा प्रकल्प सुरू केला आहे. सुमारे पाच एकर जागेत हा प्रकल्प उभारण्यात आला असून प्रकल्पालगत शीळ, डायघर, खिडकाळी, पडले, देसाई, उत्तरशीव, सांगार्ली, अभयनगर यासह काही गावे आहेत. याच परिसरात शिवमंदिर, शाळा, मैदान आहेत. गेल्याकाही वर्षांपासून येथे मोठ्याप्रमाणात उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे गृहसंकुलातील रहिवाशांचे प्रमाण वाढले आहे. ठाणे शहरापासून जवळ परंतु नैसर्गिक सानिध्यात राहता यावे म्हणून अनेकांनी लाखो रुपये खर्च करून येथे गृह खरेदी केली. आता या गृहसंकुल आणि गावांपासून काही अंतरावर कचरा प्रकल्प उभा राहिल्याने येथील रहिवासी हैराण झाले आहेत. दररोज दुर्गंधीचा सामना रहिवाशांना सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने गावातील रहिवाशांनी डायघर पंचक्रोशी संघर्ष समितीच्या माध्यमातून या प्रकल्पा विरोध करण्यास सुरूवात केली. येथील गृहसंकुलातील नागरिकांनी या संघटनेला पाठिंबा दिला आहे. ठाणे महापालिका प्रशासनाला निवेदन दिले. परंतु ठोस उपाययोजना होत नाही. दररोज ५० ते ६० डम्पर भरून कचरा परिसरात आणला जातो. मध्यरात्री हा कचरा जमिनीत पुरला जातो. दिवस-रात्र येथे दुर्गंधी निर्माण होत असल्याने विविध गंभीर आजार होत आहे. दुर्गंधीमुळे काहीजण त्यांची घरे विक्रीला काढत आहे. आमच्या शेतीवर देखील याचा परिणाम झाला असून शेतीमध्ये कचरा प्रकल्पातील पाणी शिरत असल्याचा आरोप ग्रामस्थ कर आहेत. आमच्या मागण्यांकडे ठाणे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे स्थानिकांनी सांगितले. या संदर्भाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. येथे सुमारे एक लाखाहून अधिक रहिवाशी वास्तव्य करतात. त्यामुळे त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून डायघर प्रकल्पाविरोधात आंदोलने सुरू आहेत. महापालिका आयुक्त प्रकल्पाला भेट देऊन ग्रामस्थांसोबत चर्चेचे आश्वासन देतात. परंतु पुढे काही होत नाही. जोपर्यंत हा प्रकल्प बंद होत नाही. तोपर्यंत प्रत्येक निवडणुकीत बहिष्कार घातला जाईल असा निर्णय आम्ही घेतला आहे. गृहसंकुलातील रहिवाशांचा देखील आम्हाला पाठिंबा मिळत आहे. – मंगेश खुटारकर, सदस्य, डायघर पंचक्रोशी संघर्ष समिती.

डोंबिवलीत कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी

डोंबिवली : खारफुटीचे घनदाट जंगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात स्थानिकांनी कल्याण डोंबिवली पालिकेचे अधिकारी, नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन कोणत्याही बांधकाम परवानग्या न घेता हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी केली आहे. मध्य रेल्वेच्या डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूला दिवा बाजूने हरितपट्ट्यावर मातीचे भराव टाकून, या भागातील झाडे, हरितपट्टा नष्ट करून या बेकायदा बांधकामांची भूमाफियांनी उभारणी केली आहे. मागील ३० वर्षात कोणीही भूमाफियाने कोपर भागात बेकायदा चाळी, इमारती उभारणीचे धाडस केले नव्हते. पण आता डोंबिवली खाडी किनारची बहुतांशी जागा भूमाफियांनी चाळी, बेकायदा इमारती बांधून हडप केली आहे. आरक्षित भूखंडावर इमले बांधून सज्ज झाले आहेत. आता डोंबिवलीत मोकळ्या जमिनी शिल्लक राहिल्या नसल्याने भूमाफियांनी कोपर पश्चिम रेल्वे स्थानक भागातील मोकळ्या सुमारे ५० ते ६० एकर जमिनीकडे आपल्या नजरा वळविल्या आहेत. या हरितपट्ट्यात शिरकाव करण्यासाठी कोपर पश्चिम रेल्वे स्थानक भागातून रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावरून भूमाफिया हरितपट्टयातील झाडे तोडण्यासाठी, तेथील खुरटी झाडे नष्ट करण्यासाठी जेसीबी, पोकलेन या रस्त्यावरून नेत आहेत. पालिका अधिकारी निवडणूक कामात व्यस्त आहे. त्याचा गैरफायदा भूाफियांनी घेतल्याची चर्चा आहे. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पर्यावरण संवर्धनासाठी कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये हरितपट्टे विकसित करण्याचे आणि अस्तित्वातील हरितपट्टे संरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्त डॉ. जाखड यांच्या आदेशाला आव्हान देत कोपर भागात भूमाफियांनी हरितपट्ट्यात बेकायदा बांधकाम केले आहे. त्यामुळे आयुक्त याविषयी काय भूमिका घेतात याकडे पर्यावरणप्रेमी नागरिकांचे लक्ष आहे. हरितपट्ट्यात बांधकामे सुरू झाल्याने निसर्ग छायाचित्रकार, पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. आयुक्त डॉ. जाखड यांनी हे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त कऱण्याची मागणी नागरिक करत आहेत. रेल्वेच्या अधिकाऱ्याने हे बांधकाम आमच्या हद्दीत नाही. या बांधकामाशी आमचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. कोपर रेल्वे स्थानक भागात हरितपट्ट्यात बेकायदा बांधकाम कोणी केले असेल तर त्या बांधकामाची पाहणी करतो. ते बांधकाम बेकायदा असल्याचे दिसून आले तर ते तात्काळ जमीनदोस्त केले जाईल. -राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली.

 ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार

राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती ठाणे : लोकसभा निवडणूक प्रचारात महायुतीच्या नेत्यांकडून श्री राम मंदिर उभारणीचा उल्लेख केला जात असतानाच, आता ठाकरे गटाचे ठाण्यातील उमेदवार राजन विचारे यांनी चैत्र नवरात्रोत्सवात रामाची प्रतिकृतीसह मंदिराचा मोठा देखावा उभारला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात साजरा होणाऱ्या उत्सवाच्या माध्यमातून ठाकरे गटाने निवडणूक प्रचारात राम मंदिराचा मुद्दा घेऊन भाजपला शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने चैत्र नवरात्रोत्सव साजरा होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे यांच्याकडून या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. उत्सवाचे २९ वे वर्ष असून यापूर्वी चरई भागात १२ वर्षे हा उत्सव साजरा होत होता. गेल्या १७ वर्षांपासून मैदानात हा उत्सव साजरा होत आहे. याठिकाणी देवीच्या दर्शनाला भावीक मोठ्या संख्येने येतात. या उत्सवात ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनीही राम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. या मंदिराची उंची ७० फूट आहे. देवीचा सभा मंडप २४×२४ फुटाचा आहे. त्यामध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा गाभारा १६×१६ फुटाचा आहे. ४०X४०`नऊ’ हवनकुंड असलेला मंडप आणि त्या भोवतालचा प्रदक्षिणा मार्ग आहे. याठिकाणी रामाची मोठी प्रतिकृती उभारण्यात आली आहे. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यावरून राजकारण तापले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदिर उभारण्यात आल्याचा मुद्दा भाजपच्या नेत्यांसह महायुतीचे नेते उपस्थित करत आहे. लोकसभा निवडणूक प्रचार मेळाव्यातही महायुतीच्या नेत्यांकडून राम मंदिर उभारणीचा उल्लेख केला जात आहे. भाजपला शह देण्यासाठी ठाण्यात ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी नवरात्रोत्सवात राम मंदिर प्रतिकृती उभारल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर यानिमित्ताने राम मंदिराबद्दल आस्था असल्याचे ठाकरे गटाने दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागा अंतर्गत गीता दुबे व एस.आर. दुबे,शॉप नं 8,9,10, भूखंड क्र 85 सेक्टर-03, कोपरखैरणे, नवी मुंबई , हार्दिक सुनिल गोखरू व  प्रेमप्रकाश भवंरलाल शर्मा, शॉप नं 14,15,16, कासा ब्ल्यानका सो,भूखंड क्र 85 सेक्टर-03, कोपरखैरणे, नवी मुंबई यांनी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतरित्या बांधकाम केले होते. त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 53(1)अ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. त्याअनुषंगाने सदर बांधकामावर निस्कासनाची कारवाई करण्यात आली व त्यापोटी रु.10,000/- एवढी वसूली  करण्यात आली. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, न.मुं.म.पा पोलीस बंदोबस्त तसेच, 08 मजूर, 1 पिकअप व्हॅन, 02 इलेक्ट्रॉनिक हॅमर, 01 गॅस कटर इत्यादी चा वापर करण्यात आला. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.