मुंबई : ४३व्या कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने आणखी एक सुवर्ण विजय मिळवला. या विजयाचे महत्त्व विशद करताना महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे शासकीय परिषद सदस्य संदीप तावडे यांनी संघाच्या जिद्दीचे आणि कौशल्याचे कौतुक केले. मातीचा गुण आणि जिद्द विजयाचा मार्ग दाखवतो “प्रतिकूल परिस्थितीत लढण्याचा जो आपल्या मातीचा गुण आहे, तोच आपल्याला विजयाच्या मार्गावर नेतो. अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या विजयाबद्दल खात्री होती; आम्हाला फक्त तो किती गुणांनी जिंकतो हे महत्त्वाचे वाटत होते,” असे तावडे यांनी नमूद केले. ओडिसाचा आव्हान आणि महाराष्ट्राची जिद्द ओडिसाच्या संघाने या स्पर्धेसाठी विशेष तयारी केली होती. त्यांनी काही नवीन तांत्रिक कौशल्ये विकसित केली होती, परंतु महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ती जिद्दीने पार केली. “ड्रीम रनसारखे नवीन नियम महाराष्ट्राच्या खेळाडूंवर फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत, कारण तीनही फळीतील खेळाडूंनी मजबूत संरक्षण केले. इतर संघांवर मात्र या नियमांचा परिणाम दिसून आला,” असे तावडे म्हणाले. राज जाधवचा उत्कृष्ट खेळ “दुसऱ्या पाळीत संरक्षण करताना तिसऱ्या फळीतील दोन खेळाडू मैदानात उतरल्याने थोडेसे दडपण आले होते. परंतु राज जाधवने आपल्या उत्कृष्ट संरक्षणामुळे 1 मिनिट 40 सेकंद टिकून सामना सोपा केला,” असे त्यांनी सांगितले. संघाचा संपूर्ण विजय आणि भविष्यासाठी मार्गदर्शन तावडे यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या संघातील खेळाडूंनी जिद्द, कौशल्य आणि कठोर परिश्रमाने सुवर्णपदक मिळवले आहे. “महाराष्ट्र खो-खो संघाचे यश भविष्यातही कायम राहील, आणि हे विजय नवोदित खेळाडूंना प्रेरणा देतील,” असे त्यांनी म्हटले. महाराष्ट्राच्या संघाने आपल्या मातीतील जिद्द आणि सांघिक मेहनतीच्या जोरावर सुवर्ण विजय संपादन केला आहे. हा विजय महाराष्ट्राच्या खो-खो परंपरेचा गौरव आहे. महाराष्ट्राच्या संघाच्या यशामागे जिद्द आणि मार्गदर्शनाचा हातभार – प्रशांत इनामदार ४३वी कुमार-मुली राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धा २५ ते २९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत महाराणी अहिल्याबाई होळकर, उत्तर प्रदेश येथे संपन्न झाली. स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या आणि कुमार संघांनी अतिशय उत्तम खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद मिळवले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कार्यालयीन सचिव प्रशांत इनामदार यांनी या स्पर्धेतील अनुभव आणि संघाच्या कामगिरीबाबत सविस्तर माहिती दिली. ग्रास कोर्टमुळे प्रारंभिक आव्हाने “या स्पर्धेतील क्रीडांगण ग्रास कोर्टचे होते, त्यामुळे सुरुवातीला खेळाडूंना या क्रीडांगणाशी जुळवून घेणे अवघड गेले. गवतावरून पाय घसरत असल्यामुळे खेळाडूंची दमछाक होत होती. तरीही त्यांनी आपल्या सर्वोत्तम कामगिरीने या अडचणींवर मात केली,” असे प्रशांत इनामदार म्हणाले. नियोजनाचा अभाव आणि खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक राष्ट्रीय स्पर्धेतील नियोजनाचा अभाव स्पष्ट होत होता. “निवास व्यवस्था सुमार दर्जाची होती, परंतु भोजन व्यवस्था मात्र सर्वोत्तम होती. खेळाडूंसाठी सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले, ज्यामुळे त्यांना विश्रांती मिळाली,” असे त्यांनी सांगितले. प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन संघाच्या यशामागे प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. “डॉ. चंद्रजीत जाधव, सचिन गोडबोले आणि प्रशांत पाटणकर यांनी संरक्षण व आक्रमणासाठी योग्य धोरणांची आखणी करून खेळाडूंना बोनस गुण कसे मिळवावेत याबाबत मार्गदर्शन केले,” असे इनामदार यांनी नमूद केले. मॅटवर अंतिम सामना आणि सरावातील फरक “मॅटचे क्रीडांगण एकच असल्यामुळे संघांना अंतिम सामना थेट मॅटवर खेळावा लागला. मॅटचा पूर्ण अंदाज नसल्यामुळे महाराष्ट्राने जास्त फरकाने विजय मिळवला नाही, पण तरीही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. आपल्या खेळाडूंचा सराव सकाळी व सायंकाळी होतो, परंतु तिथे दिवसभर सामने खेळवले जात होते, त्यामुळे काहीशी आव्हाने निर्माण झाली,” असे त्यांनी सांगितले. खेळाडूंचा जिद्दीने विजय “महाराष्ट्राच्या कुमार संघाने उपउपांत्यपूर्व फेरीतील कोल्हापूर विरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. अंतिम सामन्यांतही दोन्ही संघांनी जिद्दीने खेळत सुवर्णपदक मिळवले,” असे इनामदार यांनी सांगितले. प्रशांत इनामदार यांनी संघाच्या कठोर परिश्रम, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि खेळाडूंच्या जिद्दीचे विशेष कौतुक केले. राज्य निवड समिती आणि राज्य संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ चंद्रजीत जाधव व कार्याध्यक्ष श्री सचिन गोडबोले यांनी सर्वोत्तम संघ निवडला. त्यांचेही विशेष कौतुक. या विजयाने महाराष्ट्राच्या खो-खो परंपरेचा गौरव वाढवला आहे. कठोर परिश्रम हेच महाराष्ट्राच्या मुलींच्या खो-खो संघाच्या विजयाचे रहस्य – प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड ४३व्या कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने अप्रतिम कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकले आहे. या विजयाबद्दल बोलताना संघाचे प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड यांनी यशाचे श्रेय खेळाडूंच्या मेहनतीला, तांत्रिक प्रशिक्षणाला, आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या भक्कम पाठबळाला दिले आहे. राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी आणि उत्कृष्ट संघनिर्मिती…