Category: मुंबई

Mumbai news

श्रीविश्वेश्वर सहकारी पतपेढीला आदर्श पतसंस्था पुरस्कार प्राप्त

श्रीविश्वेश्वर सहकारी पतपेढीला आदर्श पतसंस्था पुरस्कार प्राप्त राजेंद्र साळसकर मुंबई : सहकार क्षेत्रातील राज्यस्तरीय विस्तारलेली तसेच तेली सेवा समाज संस्थापित श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई या पतसंस्थेला आदर्श पतसंस्था पुरस्कार -२०२५ ने नुकतेच सन्मानित कण्यात आले.या पतसंस्थेला रूपये २५ ते ५० कोटी आर्थिक उलाढाल असलेल्या गटामधून सन २०२४ -२५ या आर्थिक वर्षासाठी द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य बिगर कृषि सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.,मुंबई यांच्या विद्यमाने आदर्श पतसंस्था पुरस्कार -२०२५ हा पुरस्कार सोहळा  सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथील , पाचगणी रोडवरील “क्लाऊड मिस्ट हॉटेल”, येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये श्री विश्वेश्वर सह. पतपेढीचा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे आयुक्त अनिल कवडे,मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक  तसेच बृहन्मुंबई नागरी सह. पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई चे अध्यक्ष शिवाजीराव नलावडे, महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था ,पुणे दिपक तावरे तसेच महाराष्ट्र राज्य बिगर कृषि सह.पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई या संस्थेचे अध्यक्ष जिजाबा पवार आदि मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. पतसंस्थेच्यावतीने अध्यक्ष दिलीप केळंबेकर, खजिनदार किशोर रसाळ, संचालक सदस्य लऊ सकपाळ, प्रमोद सातार्डेकर, अनिल राऊत,कमलाकर शेलार, मुख्य व्यवस्थापक दर्शन राऊत यांनी हा सन्मान स्विकारला. तसेच या दैदिप्यमान सोहळ्यास विविध पतसंस्थांचे संचालक मंडळ सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. पतसंस्थेचे सभासद, ठेवीदार कर्जदार व हितचिंतक या सर्वांच्या बहुमुल्य सहकार्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे तसेच सदर पुरस्कार म्हणजे आपल्या सर्व सभासदांचा सन्मान आहे,अशी भावना पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप केळंबेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

 हिंदू नव वर्ष शोभायात्रेतून संस्कृती जतन आणि प्रसाराचा प्रामाणिक प्रयत्न

हिंदू नव वर्ष शोभायात्रेतून संस्कृती जतन आणि प्रसाराचा प्रामाणिक प्रयत्न मुंबई :  गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येणारी हिंदु नववर्ष शोभायात्रा ही केवळ मिरवणूक नसून आपल्या संस्कृतीचे जतन आणि प्रसार करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आपल्या परंपरा, वेशभूषा, वाद्ये आणि गुढी उभारण्याची परंपरा समाजासमोर जिवंत ठेवण्याचे हे माध्यम ठरले, अशा शब्दांत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे यांनी वायंगणकर साई स्पोर्ट्स क्लब चे राकेश गजानन वायंगणकर यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या परिश्रमाचा गौरव केला. जेष्ठ पत्रकार कै. विजय वैद्य आणि कर्ममूर्ती श्री महादेव रानडे यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेली ही शोभायात्रा समाजातील एकात्मता आणि बंधुभाव वृद्धिंगत करणारी ठरली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत एकतेचा सुंदर संदेश दिला.  लेझीम, ढोल, लाठीकाठी, बाईक रॅलीमुळे शिस्त व संघभावना वृद्धिंगत झाली. किंबहुना ती तरुण पिढीला योग्य दिशा देणारी ठरली. बोरीवली पूर्व येथील वायंगणकर साई स्पोर्ट्सच्या सौ. पल्लवी राकेश वायंगणकर,  रुचिता व  हर्षिता वायंगणकर यांच्या नियोजनातून ही भव्य दिव्य शोभायात्रा निघाली. या स्पोर्ट्स क्लब तर्फे लाठीकाठीचे मोफत प्रशिक्षण दिले जात असताना मुलांचे मनगट आणि हृदय देव, देश आणि धर्मासाठी प्रखर व्हावे हेच ध्येय समोर ठेवण्यात येते. शंखनाद, ढोल-ताशे आणि भगव्या ध्वजांनी परिसर दुमदुमला. अजय गजानन वायंगणकर व पूजा अजय वायंगणकर यांच्या शंखनादाने संपूर्ण वातावरण भारावून गेले. सुविद्या प्रसारक संघाचे मंगुभाई दत्ताणी हायस्कूल  येथील विद्यार्थी, ढोल-ताशा व लेझीम पथकांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. मुख्याध्यापिका सुनिता कामटे तसेच सर्व शिक्षकवृंद आणि विनोद जाधव यांचे योगदान यासाठी मोलाचे ठरले. स्थानिक महिला, संस्था, मंडळे आणि ओम साई सेवा मंडळ यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक भव्य दिव्य झाला.

विलेपार्ले येथील कामगार मेळाव्याला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विलेपार्ले येथील कामगार मेळाव्याला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती मुंबई प्रतिनिधी: भाजपा कामगार आघाडी, मुंबई यांच्या वतीने आयोजित कामगार मेळावा व नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम विलेपार्ले येथील विश्वकर्मा बाग सभागृहात भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास विलेपार्ले विधानसभेचे आमदार पराग अळवणी तसेच भाजपा मुंबई सचिव आचार्य पवन त्रिपाठी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. यावेळी माजी नगरसेवक योगीराज दाभाडकर यांची मुंबई उपाध्यक्ष, विश्वकर्मा बाग चे अध्यक्ष तसेच सुतार-कारपेंटर समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे तुषार कथ्रेचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेले संजय पराडकर यांची मुंबई सचिव, तसेच फेरीवाल्यांच्या समस्यांसाठी कायम अग्रेसर असलेले प्रकाश वाकाणी यांची मुंबई उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर बीमल बुटा, प्रवीण बोरानिया, निलेश परब आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपा मुंबईच्या नव्या नियुक्तीनंतर कामगार आघाडीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच मेळावा ठरला असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला. आमदार पराग अळवणी म्हणाले, ‘भाजपा कामगार आघाडी ही केवळ संघटना नसून कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी एक मजबूत शक्ती आहे. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक कार्य अधिक बळकट करून कामगारांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचवाव्यात.’ आचार्य पवन त्रिपाठी म्हणाले, “भाजपाचे प्रत्येक कार्यकर्ते हे समाजाशी जोडलेले आहेत. कामगार आघाडीच्या माध्यमातून आपण कामगारांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करणे आवश्यक आहे.’ कामगार नेते अभिजीत राणे म्हणाले, ‘मुंबईतील कामगार वर्गाच्या सशक्तीकरणासाठी भाजपा कामगार आघाडी कटिबद्ध आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या बळावर आपण अधिक व्यापक स्तरावर कामगारांपर्यंत पोहोचणार आहोत आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करू.’ कार्यक्रमास मोठ्या संख्येने कामगार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले आणि आगामी काळात संघटनात्मक बळकटीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

साडी ते स्ट्रक्चर्ड स्टाईल… ‘AFEW’ने रॅम्पवर घडवला नवा ट्रेंड

मुंबई – भारतीय फॅशनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे प्रख्यात डिझायनर राहुल मिश्रा यांनी आपल्या कारकिर्दीची २० वर्षे पूर्ण करत यंदाच्या मार्चमध्ये लॅक्मे फॅशन वीकच्या मंचावर ‘AFEW’ या ‘प्रेट’ (ready-to-wear)…

 मध्य रेल्वे तिकीट चेकिंग परिवाराचा हिंदू नववर्ष स्वागत सोहळा उत्साहात

मध्य रेल्वे तिकीट चेकिंग परिवाराचा हिंदू नववर्ष स्वागत सोहळा उत्साहात मुंबई : मध्य रेल्वेच्या “तिकीट चेकिंग परिवार”तर्फे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला १८ मार्चला माटुंगा (पूर्व) येथील मध्य रेल्वे ऑफिसर्स क्लब हॉलमध्ये हिंदू नववर्ष…

समग्र शिक्षा विभागात २५ वर्षे सेवा करूनही कायम नाही

समग्र शिक्षा विभागात २५ वर्षे सेवा करूनही कायम नाही मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातील समग्र शिक्षांतर्गत गेल्या तब्बल २५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी सेवेसाठीचा लढा आता अधिक तीव्र झाला आहे. राज्यातील ३३७८ कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी ९ मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. शासनाकडून अजूनही ठोस निर्णय न घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. समग्र शिक्षांतर्गत गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून कंत्राटी स्वरूपात सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत समायोजन करून कायम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मागणीसाठी राज्यभर आंदोलने, निवेदने आणि विविध मार्गांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलनाची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी समितीही स्थापन केली होती. सदर अभ्यास समितीने २५ नोव्हेंबर २०२५ रोजी शासनाला सकारात्मक अहवाल सादर केला. या अहवालातील “शिफारस ब” मंजूर करून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, अशी स्पष्ट भूमिका समितीने मांडली होती. मात्र, इतका स्पष्ट अहवाल असूनही शासनाने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान यशवंत स्टेडियमवर ८ ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत सुमारे ३००० कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी आचारसंहिता संपल्यानंतर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रा. मनोहर धोडे व आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्यात आले होते. मात्र आचारसंहिता संपून जवळपास एक महिना उलटूनही शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संघर्षाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे ९ मार्चपासून आझाद मैदानावर पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, २५ वर्षे प्रामाणिक सेवा देऊनही शासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत, प्रत्यक्षात मात्र न्याय दिला जात नाही. त्यामुळे आता न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही संघटनेचे राज्य सरचिटणीस पराग चाटेरेकर, राज्य चिटणीस विवेक राजन, राज्य कार्याध्यक्ष सुनिल दांडे आणि राज्य अध्यक्ष योगिता बलाखे यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

थोरांदळे गावात विश्वासराव कुटुंबाच्या वतीने प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा

थोरांदळे गावात विश्वासराव कुटुंबाच्या वतीने प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा स्व. किसनरावांच्या दशक्रियेला केलेल्या घोषणेची अंमलबजावणी मुंबई, (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तसेच समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या थोरांदळे गावच्या आदर्श कुटुंबातील  पिता कै. किसन शिवराम विश्वासराव यांच्या स्मरणार्थ  मुले सर्वश्री मारुती, रामहरी , नरहरी, डॉ. दत्ता, मुली कमल, सगुणा यांनी दशक्रिया विधीला जाहीर केलेल्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन  देवदत्त निकम, भाजपाचे सानपाडा येथील नगरसेवक भाऊ भापकर, जिल्हा परिषद सदस्या सौ प्रिती थोरात, पंचायत समिती सदस्या प्रियांका वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. थोरांदळे गावातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात नेहमीच अग्रगण्य असणाऱ्या विश्वासराव कुटुंबियांनी समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो,  या भावनेतून दशक्रिया विधीला जाहीर केलेले प्रवेशद्वाराचे काम साडेपाच महिन्याच्या आत पूर्ण करून त्याचा लोकार्पण सोहळा आयोजित केला. साडेपाच महिन्याच्या  निमित्ताने आळंदीचे ह. भ. प. श्री. गौतमनाना बेळगावकर महाराज यांची प्रवचन रुपी चांगली सेवा झाली. त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला गणेश यादव, डॉ.  घाडगे, डॉ. गोरडे, दत्ता हगवणे, शिवशंकर दूध डेअरीचे  चेअरमन आणि   थोरांदळे  गावातील  सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब टेमगिरे,  लोकनियुक्त सरपंच जे. डी.  टेमगिरे, बाळासाहेब विश्वासराव, सोपान घुले, बाळासाहेब सोपान टेमगिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

बहुभाषिक चर्मकारांना संघटित करण्याचा निर्धार!

बहुभाषिक चर्मकारांना संघटित करण्याचा निर्धार!  राष्ट्रीय चर्मकार संघाचा शानदार रौप्य महोत्सव सोहळा धारावीत संपन्न मुंबई : चांभार, ढोर, मोची, जयस्वार, रेगर, होलार, जाट, कक्कया आदी विविध जाती-पोटजातींमध्ये विखुरलेल्या चर्मकार समाजाची एकजूट घडवून आणण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटित…

गुढी पाडव्यानिमित्त भव्य बाईक रॅली तसेच गुढीची उभारणी

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रात गुढी पाडव्यानिमित्त भव्य बाईक रॅली तसेच गुढीची उभारणी (राजेंद्र साळसकर) मुंबई – हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी साजऱ्या होणाऱ्या गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. श्यामनगर तलाव येथे भव्य गुढीही उभारण्यात येणार आहे. यावेळी परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.  गुढी पाडव्याच्या दिवशी इच्छापूर्ती गणेश मंदिर, श्याम नगर तलाव येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य गुढीचे सकाळी १० वाजता खासदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर पारंपारिक वेशभूषेत महिला, पुरुष तसेच तरुण सहभागी होणार असून लेझीमच्या तालावर तसेच ढोल-ताशांच्या गजरात आकर्षक मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीत सहभागी होणाऱ्यांकडून नृत्यही सादर करण्यात येणार असून सर्वोत्तम वेशभूषा करून येणाऱ्यांंना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच अनेक स्पॉट बक्षिसेही देण्यात येणार आहे. गुढी पूजनेनंतर भव्य बाईक रॅली काढण्यात येणार असून यात लोकसभा क्षेत्राअंतर्गत येणार विविध विधानसभा क्षेत्रातील मिळून सुमारे १०० बाईकस्वार रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. ही रॅली महाकाली गुंफा, बिंद्र कॉम्प्लेस, तक्षिला, मॉडेल टाऊन, पीएमजीपी म्हाडा सर्वोदय नगर, मेघवाडी पोलीस स्टेशन, स्वामी विवेकानंद स्कूल, मेघवाडी नाका, प्रेमनगर, समर्थ नगर, ठाकूर नगर, महाराज भुवन, धोबी घाट, जोगेश्वरी स्टेशन, सदभक्ती मंदिर, सुभाष नगर, बांद्रेकर  वाडी, जेव्हीएलआर, प्रतापनगर, रामवाडी, श्यामनगर पेट्रोल पंप, ओबेरॉय स्कूल, दुर्गानगर, मातोश्री कमाल अमरोही स्टुडिओ, एमएमआरडीए कॉलनी, पूनम नगर, नमस्कार, ग्रीनफिल्ड, कल्पतरू करून इच्छापूर्ती गणेश तलाव येथे या रॅलीची समाप्ती होणार आहे. सकाळी १०.३० वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून समाजातील एकोपा व सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संदेश देण्यात येणार असल्याचे, आयोजक मनीषा वायकर व दीप्ती वायकर पोतनीस यांनी सांगितले

 अधिवेशन संपण्यापूर्वीच आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करणार

अधिवेशन संपण्यापूर्वीच आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करणार पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबा-काजू शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची होणार पूर्तता मुंबई :कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीची दखल घेत राज्य शासनाने ठोस भूमिका घेतली असून, शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीपूर्वीच नुकसानभरपाईची अधिकृत घोषणा केली जाईल, असे त्यांनी आढावा बैठकीत सांगितले. मुंबई येथील विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गण आणि कोकणातील आमदार व सचिव स्तरावरील आणि जिल्हास्तरावरील अधिकारी यांची संयुक्तरीत्या आढावा बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,कृषी मंत्री दत्ता भरणे,खासदार नारायण राणे,खासदार सुनील तटकरे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे, दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, भास्कर जाधव, महेंद्र दळवी, किरण सामंत कोकणातील सर्व आमदार आणि संबंधित मंत्री उपस्थित होते. आंबा व काजू पिकांचे प्रत्यक्ष झालेले नुकसान, हवामानातील बदल आणि शेतकऱ्यांची अडचण यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी लोकप्रतिनिधींनी मांडलेली वस्तुस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने ऐकून घेतली. “कोणत्याही परिस्थितीत आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना न्याय मिळेल आणि त्यांच्या नुकसानीची भरपाई समाधानकारक पद्धतीने दिली जाईल,” असा ठोस  विश्वास त्यांनी यावेळी दिला. विशेष म्हणजे, ही नुकसानभरपाई याच आर्थिक वर्षात देण्याचा सरकारचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चात दिलेले आश्वासन प्रत्यक्षात यशस्वी होणार आहे.कोकणातील शेतकऱ्यांमध्ये दिलास्याचे वातावरण निर्माण झाले आहे.