Category: मुंबई

Mumbai news

बेघर लाडक्या बहिणींचा आझाद मैदानात मोर्चा

बेघर लाडक्या बहिणींचा आझाद मैदानात मोर्चा रमेश औताडे मुंबई : गरिबांची झोपडी तोडायची अन् त्या ठिकाणी गगनचुंबी इमारत उभी करायची. असा डाव आखलेल्या बिल्डर साठी सरकार पण सहकार्य करत आहे. मात्र सरकारने या झोपडीत राहणाऱ्या लाडक्या गरीब बहिणीचा विचार करत तिला पण निवारा द्यावा. गगनचुंबी इमारती आम्ही घर मागत नाही. आमच्या परिस्थिती प्रमाणे आर्थिक गणिक जुळवत निवारा द्यावा. अशी मागणी आझाद मैदानात युवा भिम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास अर्जुन माने यांनी जयभीमनगर पवई व संभाजी नगर येथील पंतप्रधान गृह निर्माण विकास ठिकाणी असणाऱ्या पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या बेघर झालेल्या कुटुंबातील महिलांना घेऊन आझाद मैदानात मोर्चा काढला आहे. स्थानिक पोलिस नगरसेवक आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी हिरानंदानी बिल्डर साठी आम्हाला बेघर केले आहे. त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

महापौर, उपमहापौर यांच्याकडून डॉ अग्रवाल हॉस्पिटलचा सन्मान

महापौर, उपमहापौर यांच्याकडून डॉ अग्रवाल हॉस्पिटलचा सन्मान रमेश औताडे मुंबई : डोळ्यांच्या हॉस्पिटल मध्ये आता मोतीबिंदू ऑपरेशनसाठी अत्याधुनिक रोबोटिक लेझर मशीन आले असून या नवीन तंत्रज्ञानामुळे ऑपरेशन आता ब्लेड शिवाय अधिक सुरक्षित, अचूक आणि कमी त्रासदायक होणार आहे. या सुविधेचे उद्घाटन नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते डोळ्यांसाठी जगप्रसिद्ध असणारे डॉ.अग्रवाल हॉस्पीटल येथे झाले. या मशीनच्या माध्यमातून विना ब्लेड शस्त्रक्रिया होणार असल्याने  महापौर सुजाता पाटील यांनी हॉस्पिटलचे अभिनंदन केले. उपमहापौर दशरथ भगत यांनी गरीबांना सवलत देण्याची मागणी केली असता हॉस्पिटलच्या डॉ. वंदना जैन यांनी सवलत देण्याचे भगत यांना आश्वासन दिले. मर्यादित कालावधीसाठी मोतिबिंदू तपासणीवर ५० टक्के सूट आणि रोबोटिक शस्त्रक्रियेवर विशेष सवलत दिली जात आहे. हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू, नंबरचा चष्मा, रेटिना आणि मुलांच्या डोळ्यांचे आजार यावरही उपचार केले जातात. नवी मुंबईतच कमी त्रासात आणि सुरक्षित पद्धतीने डोळ्यांचे ऑपरेशन होणार असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकार आमच्या घराचे स्वप्न कधी पूर्ण करणार !

सरकार आमच्या घराचे स्वप्न कधी पूर्ण करणार ! अन्यायग्रस्तांचा न्यायासाठी आंदोलनाचा इशारा मुंबई  / रमेश औताडे मुंबईतील रेल्वे मार्गालगत अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो झोपडीधारकांना पुनर्वसनाचे गोड स्वप्न दाखवण्यात आले. पण आजही अनेक कुटुंबे न्यायाच्या प्रतीक्षेतच आहेत. आयुष्यभर कष्ट करून, मुलाबाळांसह छोट्या झोपडीत आयुष्य काढणाऱ्या या नागरिकांना आजही स्वतःच्या घराची आस लागलेली आहे. “आम्ही वर्षानुवर्षे आशा धरून बसलो आहोत. सरकारने आम्हाला घर देण्याचे आश्वासन दिले होते. पण आता आमच्याच हक्काची घरे दुसऱ्यांना विकली जात असल्याचे ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली,” असे दुःखी शब्द अनेक बाधित नागरिक व्यक्त करत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व सर्वेक्षण कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि खऱ्या बाधित झोपडीधारकांना तातडीने न्याय देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष युवक जिल्हाध्यक्ष सचिन लोंढे यांनी केली आहे. रेल्वे विभाग, MRVC आणि MMRDA यांच्या माध्यमातून बाधित नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात अनेक पात्र नागरिकांना घरे न देता, त्यांच्या नावावर असलेली घरे परस्पर इतर व्यक्तींना विकल्याचा गंभीर आरोप सचिन लोंढे यांनी केला आहे. त्यामुळे गरीब आणि कष्टकरी कुटुंबांमध्ये प्रचंड नाराजी आणि असंतोष निर्माण झाला आहे.

आकाश शिंदे, समरीन बुरोंडकर यांच्या कडे महाराष्ट्राचे नेतृत्व.

५वी वरिष्ठ पुरुष व महिला गट फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा-मध्य प्रदेश-२०२६ मुंबई :- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने “५व्या वरिष्ठ गट कबड्डी” स्पर्धेकरिता आपले दोन्ही संघ जाहीर केले. संता, मध्य प्रदेश येथे  १९ ते २२ मार्च या कालावधित ही स्पर्धा खेळविण्यात येईल. नाशिकच्या आकाश शिंदे कडे पुरुष संघाचे, तर रत्नागिरीच्या सिमरन बुरोंडकर कडे महिला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. या दोन्ही संघाना स्पर्धेकरिता शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम सोमवार १६ मार्च रोजी डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला होता. निवडण्यात आलेला हा संघ १७ मार्चला दुपारी ०१-३० वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथून स्पर्धेकरिता रवाना झाला. अशी माहिती व संघाची घोषणा राज्य कबड्डी संघटनेचे सचिव माधव गायकवाड यांनी सर्व प्रसार माध्यमाकरिता केली. निवडण्यात आलेला संघ खालील प्रमाणे. पुरुष संघ :- १) आकाश शिंदे-संघनायक, नाशिक, २)सुरज दूंदले – ठाणे, ३)आकाश अरसूल – मुं. उपनगर, ४) सौरभ राऊत – अ. नगर, ५) संकेत सावंत – मुंबई शहर, ६) सुरेश जाधव – पुणे, ७)साईप्रसाद पाटील – कोल्हापूर, ८)अजित चौहान – पुणे, ९) आदित्य शशिकांत शिंदे – रत्नागिरी, १०)आदित्य पोवार – कोल्हापूर, ११)अनुज गावडे – पुणे, १२)सौरभ फागरे – कोल्हापूर, १३) साहिल राणे – मुंबई शहर, १४) अभिषेक गुंगे – सांगली. प्रशिक्षक :- निलेश शिंदे, मुंबई उपनगर                व्यवस्थापक :- भगीरथ पाटील, ठाणे. महिला संघ :- १) समरीन बुरोंडकर, संघनायिका – रत्नागिरी, २) माधुरी गवंडी – ठाणे, ३) कोमल देवकर – मुंबई उपनगर, ४)तसनिम बुरोंडकर – रत्नागिरी, ५) शुभदा खोत – मुंबई उपनगर, ६) आम्रपाली गलांडे – पुणे, ७) प्रतिक्षा तांडेल – मुंबई शहर, ८) हर्षा शेट्टी – पुणे, ९) याशिका पुजारी – मुंबई उपनगर, १०) समृद्धी मोहिते – मुंबई उपनगर, ११) निकिता पडवळ – पुणे, १२) प्रणाली नागदेवता – मुंबई उपनगर, १३) संजना भोईर – पालघर, १४) साक्षी सावंत – मुंबई शहर. प्रशिक्षिका :- मेघाली म्हसकर         व्यवस्थापिका :- अश्विनी ईश्वलकर.

नूतन विद्यामंदिर शाळेचा वार्षिक क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

नूतन विद्यामंदिर शाळेचा वार्षिक क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न मुंबई: महाराष्ट्र मंडळ (भाभा अणुसंशोधन केंद्र) शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यामंदिर शाळेत वार्षिक क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास राज्य क्रीडा मार्गदर्शक  प्रवीणजी सावंत, राष्ट्रपती पुरस्कार विजेते पोलीस निरीक्षक इंद्रजीत मोरे, कबड्डी प्रशिक्षक  नितीनजी पवार उपस्थित होते. यावेळी लेझीम आणि ढोल पथकाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका सुचिता पवार व ज्येष्ठ शिक्षिका संध्या चंदनशिवे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स-साहित्य व्यायाम प्रकार आणि मनोऱ्यांचे चित्तथरारक सादरीकरण केले.  प्रवीणजी सावंत यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहून मैदानी खेळांची आवड निर्माण करण्याचे आवाहन केले. तर इंद्रजीत मोरे यांनी खेळाडू घडवण्यासाठी बालपणापासूनच व्यायामाची गोडी हवी, असे सांगितले.  नितीन पवार यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत बक्षीस नेहमीच प्रेरणादायी असते, असे नमूद केले.  हर्ष कदम आणि समृद्धी वाक्षे या विद्यार्थ्यांना आदर्श खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले.

१५ वर्षाखालील मुलींच्या शालेय कबड्डी स्पर्धेत एस आय ई एस शाळा विजेती

१५ वर्षाखालील मुलींच्या शालेय कबड्डी स्पर्धेत एस आय ई एस शाळा विजेती मुंबई : गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या १५ वर्षाखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एस आय ई एस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एस आय ई एस शाळेने ज्ञानविकास विद्यालय, कोपरखैरणेचा ३२-१९गुणांनी पराभव केला. एस आय ई एस‌कडून वैदेही गवळी तर ज्ञान विकास हायस्कूल कडून वैभवी सिंग यांनी उत्कृष्ट खेळ केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात ज्ञान विकास हायस्कूलने सेंट जॉन हायस्कूलचा आरामात पराभव केला. सेंट जॉन हायस्कूल ची कृतिका कदम तर ज्ञान विकास विद्यालयाची उन्नती रावडे ह्या छान खेळल्या. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एस आय ई एस हायस्कूल व कुमुद विद्यालय हा सामना ३२-३२ गुणांनी बरोबरीत सुटला होता मग ५-५ चढायांच्या जादा डावात एस आय ई एसने बाजी मारली.  ह्या वेळी कबड्डी खेळातील नामांकित राष्ट्रीय खेळाडू पुष्पा डावरे, उषा सावंत, श्रध्दा म्हात्रे, सुवर्णा लोखंडे, स्वाती पार्थ, यांचा  शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला तसेच  पारितोषिक वितरण समारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे असलेल्या पुष्पा डावरे NIS सेंट्रल रेल्वे महिला कबड्डी कोच यांनी वरील चार हि संघांना रोख रक्कम देऊन प्रोत्साहन दिले. दिपक कांदळगावकर, विकास लाड, संतोष देवरुखकर, राष्ट्रीय खेळाडू भारत संघाणे, शशी चव्हाण, नितीन घाग, राजा हुमणे, सुभाष चव्हाण, प्रतिक गाढवे, मनिष मोरे, अतुल चव्हाण, निलेश झंजे, अमित कांबळे, अॅड. विश्वास कांबळे यांनी स्पर्धेला उपस्थिती लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. राष्ट्रीय प्रशिक्षक, खेळाडू बंडू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. अविनाश महाडिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत

इच्छाशक्ती, अंकूर, एसएसजी, पार्ले स्पोर्ट्सची थरारक सलामी

राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी इच्छाशक्ती, अंकूर, एसएसजी, पार्ले स्पोर्ट्सची थरारक सलामी मुंबई, दि. १० (क्रीडा प्रतिनिधी)-प्रभादेवीतील चवन्नी गल्लीतील बळीराम सावंत क्रीडानगरीत कबड्डीचा रणसंग्राम रंगला आणि पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना अक्षरशः थराराचा झंझावात अनुभवायला मिळाला. स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी स्पर्धेची सुरुवातच अशी झाली की मैदानात प्रत्येक चढाईसोबत श्वास रोखले जात होते. आघाडीवरून पिछाडी, पिछाडीवरून आघाडी, एका गुणाने निसटलेला विजय, तर कधी शेवटच्या क्षणी साधलेली बरोबरी,  अशा नाट्यमय घडामोडींनी कबड्डीप्रेमींना अक्षरशः खुर्चीला खिळवून ठेवले. पहिल्या दिवशी रंगलेल्या थरारात इच्छाशक्ती क्रीडा मंडळ, एसएसजी फाउंडेशन, पार्ले स्पोर्ट्स क्लब आणि अंकुश स्पोर्ट्स क्लब यांनी दमदार विजयांसह स्पर्धेत विजयी सलामी दिली. टी-२० विश्वचषकाच्या गदारोळानंतर प्रभादेवीत सुरू झालेल्या चढाई-पकडीच्या युद्धाने कबड्डीप्रेमींना अस्सल ग्रामीण थराराची मेजवानी दिली. शेवटच्या क्षणी स्पर्धेत उतरलेल्या पालघरच्या इच्छाशक्ती क्रीडा मंडळाने आपल्या झंझावाती खेळाने प्रेक्षकांचा उत्साह अक्षरशः द्विगुणित केला. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उपनगर कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर, स्पर्धा संयोजक आणि आमदार महेश सावंत, मुंबई शहर कबड्डी संघटनेचे विश्वास मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. एलआयसी, मुथुट फायनान्स, इंडियन ऑइल यांच्या पुरस्काराने सुरू झालेल्या या स्पर्धेत लायन्स स्पोर्ट्स क्लबविरुद्धच्या सामन्यात यश निंबाळकर आणि योगेश राठोड यांच्या वेगवान चढायांनी इच्छाशक्तीला ३६-२० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली होती. मात्र दुसर्‍या डावात लायन्सच्या राज आचार्य आणि विशाल कटकटे यांनी झुंजार खेळ करत सामना रंगतदार केला. एका क्षणी २०-३६ पिछाडीवर असलेल्या लायन्सने इच्छाशक्तीवर लोन चढवत धावसंख्या ४१-३९ पर्यंत नेली आणि सामना अक्षरशः नखशिखांत थरारला. अखेर इच्छाशक्तीने ४२-४० अशी निसटती बाजी मारत विजय खेचून आणला. प्रो कबड्डीतील सुपरस्टार खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढली. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत भारतीय रेल्वेला अजिंक्यपद मिळवून देणार्‍या पंकज मोहितेने एसएसजी फाउंडेशनसाठी अक्षरशः वादळी खेळ केला. त्याच्या ११ गुणांच्या झंझावाती चढायांच्या जोरावर एसएसजीने प्रतिस्पर्ध्यावर ५३-३१ असा एकतर्फी विजय मिळवला. सूरज जाधव, तेजस टक्के आणि आशिष चौधरी यांनीही दमदार साथ दिली. सुशांत साहिल याच्या तुफानी पकडींनी अंकुश स्पोर्ट्स क्लबला सिद्धीप्रभा फाउंडेशनविरुद्ध ३४-२७ असा शानदार विजय मिळवून दिला. सिद्धीप्रभाकडून रुपेश साळुंखे याने अष्टपैलू खेळ करत १६ गुणांची कमाई केली, मात्र त्याचा झुंजार प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पार्ले स्पोर्ट्स क्लब आणि गोल्फादेवी सेवा मंडळ यांच्यातील लढतही तितकीच रंगतदार ठरली. अक्षय तावडे आणि प्रशांत पवार यांच्या खेळाने पार्लेला जोर मिळाला, तर धनंजय सरोज आणि शार्दुल हरचेकर यांच्या चढायांनी गोल्फादेवीने पहिल्या डावात १८-१८ अशी बरोबरी साधली. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी आघाडीसाठी जीव तोडून संघर्ष केला. शेवटच्या चढाईपर्यंत रंगलेल्या या लढतीत पार्ले स्पोर्ट्स क्लबने ३५-३४ असा निसटता विजय मिळवला. पार्लेने आपल्या दुसर्‍या सामन्यात अमर क्रीडा मंडळाचा ४५-२८ असा पराभव करून दुसरा विजयही नोंदवला. इच्छाशक्तीच्या दुसर्‍या सामन्यातही थराराचा कळस गाठला. यश निंबाळकरच्या वेगवान चढायांनी गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबविरुद्ध इच्छाशक्तीला २४-१६ अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र दुसर्‍या डावात गुड मॉर्निंगच्या शार्दुल पाटीलने तुफानी चढायांनी इच्छाशक्तीच्या बचावफळीची अक्षरशः झोप उडवली. त्याने १६ गुणांची कमाई करत सामना शेवटच्या मिनिटाला ४१-४० असा आपल्या संघाच्या बाजूने झुकवला होता, मात्र निर्णायक क्षणी यश निंबाळकरने शेवटच्या चढाईत दोन गुण मिळवत इच्छाशक्तीला पुन्हा आघाडी मिळवून दिली. त्यानंतर शार्दुल पाटीलने अखेरच्या चढाईत एक गुण मिळवत सामना ४२-४२ असा बरोबरीत सोडवला आणि मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी या थराराला जोरदार दाद दिली.

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारावा

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारावा आमदार मिलिंद नार्वेकर यांची विधान परिषदेत मागणी केतन खेडेकर मुंबईच्या ऐतिहासिक विक्टोरिया टर्मिनस (VT) रेल्वे स्थानकाचे सर्वप्रथम सन १९९६ मध्ये नाव बदलून ‘छत्रपति शिवाजी टर्मिनस’ (CST) करण्यात आले होते. तद्नंतर जून २०१७ मध्ये या नावात ‘महाराज’ शब्द अधिकृतरित्या जोडण्यात आला आणि  या स्थानकाचे नाव ‘छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस’ (CSMT) करण्यात आले. हे मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि यूनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. खेदाची बाब हि आहे की, या स्थानकाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देवून सुमारे २० वर्षाचा कालावधी लोटला तरीदेखील या स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आजतागायत बसविण्यात आलेला नाही. या स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसविण्याची मागणी सातत्याने लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांनी राज्य आणि केंद्र शासनाकडे केली आहे. या स्थानकाच्या नवीन पुनर्विकास आराखड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या कामाचा केंद्र सरकारने समावेश केला असल्याची ग्वाही राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी माहे डिसेंबर २०२५ मध्ये दिली आहे. त्यानुसार शिवरायांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी या स्थानकाच्या दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या कामाचा तातडीने शुभारंभ करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी औचित्याच्या मुद्दयाद्वारे श्री मिलिंद नार्वेकर यांनी विधानपरिषदेत केली.

मुंबई, पालघर, ठाणेला उष्णतेचा ऑरेंज अर्लट

मुंबई : मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुढील दोन दिवस महाराष्ट्रातल्या अंतर्गत भागात कमाल तापमानात प्रचंड वाढ होणार असल्याचे सांगितलं जात आहे. उद्याही पालघर, ठाणे आणि…

मुंबई, पालघर, ठाणेला उष्णतेचा ऑरेंज अर्लट

मुंबई : मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुढील दोन दिवस महाराष्ट्रातल्या अंतर्गत भागात कमाल तापमानात प्रचंड वाढ होणार असल्याचे सांगितलं जात आहे. उद्याही पालघर, ठाणे आणि…