Category: मुंबई

Mumbai news

 1600 हून अधिक विद्यार्थी, नागरिकांनी केली खारफुटी परिसर स्वच्छता

 स्वच्छता ही सेवा’ मोहीमेत   नवी मुंबई : स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 2 ऑक्टोबरपर्यंत दररोज विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये आज 21 सप्टेंबर या जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांमध्ये खारफुटी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 1600 हून अधिक एनसीसी व स्काऊटचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, नागरिक यांच्या एकत्रित सहयोगातून महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी सर्वच ठिकाणी खाडीकिना-यांवरील खारफुटी भागातील कचरा साफ केला. बेलापूर विभागात डोलया समुद्रेश्वर मंदीर पाणथळ भाग, नेरूळ विभागात सारसोळे जेट्टी 1 व 2 भाग, वाशी येथील सागर विहार किनारा, कोपरखैरणे येथील धारण तलाव सेक्टर 19 परिसर, घणसोली येथे सेक्टर 12 पामबीच रोड नजिकचा खाडीकिनारा परिसर, ऐरोली सेक्टर 10 येथील जैवविविधता केंद्र कांदळवन परिसर याठिकाणी सागरीकिनारी खारफुटी स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. यामध्ये सहभागी विद्यार्थी, नागरिकांनी समुद्राच्या पाण्यातून वाहत आलेला प्लास्टिक, कापड, थर्माकोल, कागद यांचा कचरा संकलित केला. यामध्ये चपलांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आले. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी मोहीमेच्या विविध ठिकाणी भेट देत मोहीमेत सहभाग घेतला. त्यांच्यासमवेत त्या त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी स्वच्छता व प्लास्टिकबंदीची सामुहिक शपथ ग्रहण केली. परिमंडळ 1 उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे व डॉ.संतोष वारूळे यांनीही विविध ठिकाणी मोहीमेत सहभाग घेतला. यामध्ये वाशी येथे सागरविहार सेक्टर 8 परिसरात राबविण्यात आलेल्या खारफुटी व परिसर स्वच्छता मोहीमेत 450 हून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत साधारणत: 2 मेट्रिक टन कचरा संकलित केला. याप्रसंगी माजी आमदार संदीप नाईक यांनी सहभागी होत नागरिक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. वाशी विभागाचे सहा. आयुक्त सागर मोरे, मुख्य स्वच्छता अधिकारी सतीश सनदी, स्वच्छता अधिकारी सूर्यकांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या या खारफुटी स्वच्छता मोहीमेत सागरी सीमा मंच, कर्मवीर ॲकेडमी, मॅनग्रुव्हज मार्शल या संस्थांच्या सदस्यांप्रमाणेच आयसीएल झुनझुनवाला कॉलेज सेक्टर 9, टिळक कॉलेज सेक्टर 28, वेस्टर्न कॉलेज सानपाडा, कर्मवीर भाऊराव पाटील मॉडर्न महाविद्यालय सेक्टर 15 येथील एनएसएसचे विद्यार्थी सहभागी होते.

बीओबी बॅडमिन्टन स्पर्धेत स्वाती विजेती    

मुंबई : बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय बॅडमिन्टन निवड चाचणी स्पर्धेमध्ये स्वाती एस. हिने महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले. दादर-पश्चिम येथील बीएसएनएल बॅडमिन्टन कोर्टवरील महिलांच्या अंतिम सामन्यात स्वातीने १२-१२ अशा बरोबरी नंतर निर्णायक क्षणी अचूक फटके साधले आणि पूजा मोरेचे जोशपूर्ण आव्हान १५-१२ असे संपुष्टात आणून स्वातीने अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केला. परिणामी प्रारंभी आघाडी घेणाऱ्या पूजाला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बँक ऑफ बडोदा क्रीडा विभागाचे प्रदीप सुरवसे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी विजेत्या-उपविजेत्यांचे अभिनंदन केले. बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने झालेल्या महिला बॅडमिन्टन स्पर्धेची उपांत्य लढत देखील अटीतटीमध्ये रंगली. पहिल्या सलग ४ गुणासह डावाच्या मध्यापर्यंत ९-८ अशी आघाडी घेणाऱ्या गरिमा श्रीवास्तवला स्वाती एस. हिने अखेर २१-१३ असे चकवून अंतिम फेरी गाठली. दुसरी उपांत्य लढत जिंकताना पूजा मोरे हिने प्रियांका उपाध्यायचा २२-२० असा निसटता पराभव केला. स्पर्धेमधून महिला विभागात स्वाती एस., पूजा मोरे, गरिमा श्रीवास्तव, प्रियांका उपाध्याय आणि पुरुष विभागात ऋषिकेश शिंदे, हनमंत सुद्रिक, प्रमोद जयस्वाल, ऋग्वेद फराडे यांची मुंबई विभागीय संघात निवड करण्यात आली असून  १७ व १८ ऑक्टोबर रोजी राजकोट येथे होणाऱ्या अखिल भारतीय बीओबी बॅडमिन्टन स्पर्धेमध्ये मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. प्रशिक्षक सचिन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पंचाचे कामकाज सिध्देश राऊत, आदित्य कीर, साहिल, चंद्रकांत करंगुटकर, ओमकार चव्हाण, अर्जुन कालेकर, श्रीधर नार्वेकर, अविनाश महाडिक आदींनी पाहिले.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे अध्यात्मरंग महोत्सवाचे आयोजन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने अध्यात्मरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २७ ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत दररोज सायंकाळी ५.३० वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ या दिवशी डॉ. सुचेता परांजपे यांचे ऋग्वेदाचा परिचय या विषयावरील व्याख्यान होईल. शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २०२४ या दिवशी त्यांचेच उपनिषदे-कथांमधून तत्वज्ञान या विषयावरील व्याख्यान होईल. महोत्सवाचा समारोप कै. विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान निर्मित संगीत नाटकातील भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीगीत गंगा हा रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ या दिवशी होईल. याची संकल्पना आणि मार्गदर्शन शुभदा दादरकर यांची असून धवल भागवत, श्रीया सोंडूर, संगीता चितळे यांचा यात सहभाग असेल. त्यांना केदार भागवत आणि सुहास चितळे यांची साथसंगत असून निवेदन प्रज्ञा लेले यांचे असेल. अधिकाधिक रसिकांनी या अध्यात्मरंग महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

वीजबिल सवलतीपोटी महावितरणला ४२ कोटी

मुंबई, ता. २१ : महावितरणकडून राज्यभरातील कृषीपंपधारकांना वीजपुरवठा केला जातो. अनुसूचित जाती घटकांना या दरात दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या रकमेच्या प्रतिपूर्तीसाठी महावितरणला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून ४२ कोटींचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे वीजबिल थकबाकीचा सामना करणाऱ्या महावितरणला दिलासा मिळणार आहे. कृषीपंप ग्राहकांना वीजबिलात सवलत योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता चालू आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने ११५ रुपयांची तरतूद केली आहे. त्यानुसार महावितरणही सातत्याने अनुसूचित जाती घटकातील कृषीपंपधारक ग्राहकांना सवलतीच्या दराने वीज पुरवते. त्यामुळेच सरकारने या बिलाची रक्कम महावितरणला देण्याबाबत निर्णय घेतला आहे. दरम्यान, महावितरण इतर गटांतील वीज ग्राहकांनाही सवलतीच्या दराने वीजपुरवठा करते; मात्र सवलतीची रक्कम वेळेत मिळत नसल्याची माहिती महावितरणच्या एका अधिकाऱ्याने दिली.

बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी समितीला ८ दिवसांची मुदत

 धारावी मशीद प्रकरण मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील धारावीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बीएमसी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे मशीद पाडल्याच्या आरोपावरून येथे वाद निर्माण झाला. या विरोधात शेकडो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या बीएमसीची टीम तेथून रवाना झाली आहे. याप्रकरणी पालिकेने बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी मशीद समितीला आठ दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत बीएमसी मशिदीवर कोणतीही कारवाई करणार नाही. मात्र त्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मशिदीवर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी मुस्लीम समुदाय न्यायालयात धाव घेणार आहे. त्याचवेळी स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. धारावीचे रहिवासी समरुद्दीन शेख म्हणाले, “मी धारावीत जन्मलो आणि लहानाचा मोठा झालो, ज्या इमारतीला बीएमसी आणि इतर अधिकारी बेकायदेशीर म्हणत आहेत, ती एका दिवसात बांधली गेली नव्हती. बांधायला अनेक दिवस आणि महिने लागले, मग अधिकारी कुठे होते? आज ते संरचनेला मशिदीचे स्वरूप आले आहे, त्यामुळे आता ते मशीद पाडणार असल्याचे सांगत आहेत. मुंबईतील धारावी येथील मेहबूब सुभानी मशिदीचा काही भाग बेकायदेशीर असल्याचे सांगत बीएमसी पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. ही मशीद खूप जुनी असल्याचे येथील लोक सांगतात. अशा स्थितीत मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी बीएमसीचे अधिकारी पोहोचले तेव्हा आंदोलकांनी त्यांच्या वाहनांचीही तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ००००  

दिवाळीपूर्वी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार ग्रॅच्युइटीच्या थकबाकीचे पैसे

 आयुक्त विकास ढाकणे यांचे आश्वासन उल्हासनगर – मृत्यूपूर्वी ग्रॅच्युइटी, रजा रोखिकरन आणि 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाची एकत्रित रकम आमच्या पदरात पडणार काय?अशी हाक देण्यासाठी शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दोन दिवस आंदोलन केल्यावर उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी दिवाळीपूर्वी ग्रॅच्युइटीच्या थकीत रकमेपैकी दरमहा 50 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सेवनिवृत्तांनी कायद्याने वागा लोकचळवळचे राज असरोंडकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. स्वप्निल पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलेले मृत्यूपूर्वीच्या आंदोलनाच्या लढ्याला यश आले आहे. तसेच आयुक्त विकास ढाकणे यांनी सोमवारी 23 तारखेला 7व्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेबाबत बैठक बोलावली असून त्यात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशी मिळायला हवी असलेली ग्रॅच्युइटी, सातव्या वेतन आयोगाचा फरक आणि इतर लाभांची देणी पाच-दहा वर्षांपासून थकलेली होती. प्रशासनाकडून केवळ दरमहा दोन हजार रुपये देऊन या थकबाकीची तुटपुंजी भरपाई केली जात होती. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणारे सेवानिवृत्त कर्मचारी ‘कायद्याने वागा’ लोकचळवळीचे राज असरोंडकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. स्वप्निल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हक्क मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. कर्मचाऱ्यांनी संतप्त होऊन, ‘जर उपोषणा दरम्यान आमचा मृत्यू झाला तर आमच्या कुटुंबाला एकरकमी थकबाकी मिळावी,’ अशी मागणी केली होती. यामुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण होण्याची शक्यता होती. भाजपा आमदार कुमार आयलानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भारत (गंगोत्री) राजवानी, राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी आणि इतर नेत्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी आंदोलकांसोबत आयुक्त विकास ढाकणे यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांना एकरकमी रक्कम मिळावी अशी मागणी केली.

देशामधील सर्वच मंदिरांतील प्रसादासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करा

 ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फेडरेशनची मागणी मुंबई : देशभरातील सर्वच मंदिरामध्ये वितरित करण्यात येणाऱ्या प्रसादाची उच्चस्तरीय तपासणी करावी, तसेच प्रसादाला विशेष दर्जा देऊन तो बनविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी, अशी मागणी ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फेडरेशनने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला (एफएसएसएआय) पत्र पाठवून केली आहे. तिरुपतीस्थित श्री वेंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटप केल्या जाणाऱ्या लाडवांच्या नमुन्यांमध्ये प्राण्याची चरबी आढळल्याचे तिरुमला तिरुपती देवस्थानमने स्पष्ट केले. देवस्थानमने भाविकांच्या भावना व विश्वास याच्याशी खेळ केला आहे. या प्रकरणाने देशभरातील भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तिरुपतीप्रमाणे देशातील विविध मंदिरांमध्ये प्रशासनाकडून लाडूच्या प्रसादाचे वाटप केले जाते. तिरुपती येथील प्रकरणानंतर या सर्व मंदिरांमधील प्रसादाची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे देशभरातील सर्वच मंदिरांमधील लाडूच्या प्रसादाची उच्चस्तरीय समितीमार्फत तपासणी करावी. तसेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण त्यांच्या नियमांमध्ये सुधारणा करून प्रसादाला विशेष दर्जा द्यावा, तसेच प्रसाद बनविण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावी. मुख्यत्वे प्रसादामध्ये कोणत्या घटकांचा वापर करू नये याची यादी जाहीर करावी. ही मार्गदर्शक तत्त्वे सात दिवसांमध्ये जाहीर करावी. या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फेडरेशनने ‘एफएसएसएआय’ला पाठवलेल्या पत्रात केली आहे. तसेच यासंदर्भात तातडीने कार्यवाही न केल्यास या मुद्द्यावर न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशाराही ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फेडरेशनचे अध्यक्ष अभय पाण्डेय यांनी दिला आहे. मंदिरात पुरवठा करण्यात येणारे तूप, दूध व अन्य पदार्थांमधील भेसळ ओळखण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नसते. तसेच त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून बाहेरील सुविधेचा वापरही केला जात नाही. मंदिराला साहित्य पुरवठा करणारे पुरवठादार त्याचाच फायदा घेत असल्याचे तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या प्रकरणातून उघडकीस आले आहे. त्यामुळे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने स्थानिक अन्न व औषध प्रशासनाला त्यांच्या राज्यातील मंदिरांमध्ये अशा प्रकारे बनविण्यात येणाऱ्या प्रसादाची अधूनमधून तपसाणी करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही अभय पाण्डेय यांनी केली.

मुंबईत स्वच्छतेचा जागर

Photo-6    मानवी साखळी, जनजागृतीपर पथनाट्यांचे आयोजन मुंबई : महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागात ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२४’ अंतर्गत शनिवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. राडारोडा, घनकचरा संकलनाबरोबरच स्वच्छता प्रतिज्ञा, स्वच्छता संवाद, स्वच्छता फेरी, मानवी साखळी, जनजागृतीपर पथनाट्य आयोजित करून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच, स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, विविध पर्यटनस्थळांवर शून्य कचरा मोहीम राबविण्यात आली. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार, महानगरपालिकेने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याचे आयोजन केले आहे. यावर्षी स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता ही संकल्पना राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांत शनिवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत रस्ते – पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच दुभाजकांची स्वच्छता, सार्वजनिक भिंती – कचराकुंड्यांची स्वच्छता, बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, फेरीवाला विरहित क्षेत्र, राडारोडामुक्त परिसर आदी कार्यवाही करण्यात आली. डी विभागात श्रीमद् राजचंद्रजी मार्ग (ऑपेरा हाऊस), बाळाराम मार्ग, एफ उत्तर विभागात वडाळा येथील बरकत अली नाका, शांतीनगर, जी दक्षिण विभागात लालबाग येथील गणेश गल्ली, एच पूर्व विभागात वांद्रे – कुर्ला संकुल, के – पूर्व विभागात मुळगाव डोंगरी येथील मेस्त्री औद्योगिक वसाहत, एल विभागात सम्राट अशोक मार्ग, बंटर भवन, एम पूर्व विभागात देवनार वसाहत, संविधान चौक, एम पश्चिम विभागात माहुल गाव, एन विभागात घाटकोपर पश्चिम येथील माता रमाबाई आंबेडकर नगर, पी दक्षिण विभागात मुख्य जोड रस्ता, अंतर्गत रस्ते, पी उत्तर विभागात मंडपेश्वर लेणी, आर दक्षिण विभागात काडसिद्धेश्वर मार्ग, एस विभागात कन्नमवार नगर, टी विभागातील मुलुंड पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १०७ आदी ठिकाणी शनिवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मुंबई स्वच्छ व सुंदर करण्याबरोबरच मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मुंबईला देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर शहर बनवण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना मुंबईकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छता ही प्राथमिक गरज असून ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे. यासाठी मुंबईकर नागरिकांची साथ आणि सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले. मुंबईतील चौपाट्यांवर विशेष स्वच्छता मोहीम आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनानिमित्त महानगरपालिकेतर्फे जुहू, स्वराज्य भूमी, दादर, चिंबई, वेसावे, मढ व गोराई चौपाटीवर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याबरोबरच बधवार पार्क, गेट वे ऑफ इंडिया, जमशेद बंदर, मार्वे किनारा, कार्टर मार्ग किनारा, माहीम रेतीबंदर, बँड स्टँड आदी ठिकाणीही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

शिंदे सरकारची नुसतीच घोषणा, अंमलबजावणी नाही

 अंगणवाडी सेविका पुन्हा आझाद मैदानावर मुंबई : वेतनवाढीची अंमलबजावणी रखडल्याने अंगणवाडी सेविकांनी उद्यापासून बेमुदत उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. २५ सप्टेंबर रोजी जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. उद्या सकाळी १० वाजता आझाद मैदानावर समितीमधील ७ घटक संघटनांचे २५ नेते बेमुदत उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी रोज १५० अंगणवाडी कर्मचारी २४ तासांच्या साखळी उपोषणाला बसणार आहेत. २५ सप्टेंबरला राज्यातील अंगणवाड्या बंद ठेवून आझाद मैदान येथे कर्मचारी जेल भरो आंदोलनात सहभागी होणार आहेत. राज्यभरातील अंगणवाडीसेविकांना ३ हजार, मदतनिसांना २ हजार वेतनवाढ देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विकास विभागाने घेतला होता. या निर्णयाला वित्तविभागाने वेतनवाढीच्या प्रस्तावाला मान्यताही दिली होती. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती उपोषणाला बसणार आहेत. गिरणी कामगार देखील आंदोलन करणार गिरणी कामगार घरांसाठी २६ सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. २६ सप्टेंबरपासून गिरणी कामगार संघर्ष समितीकडून भारतमाता, लालबाग येथे धरणे व निदर्शने केली जाणार आहेत, तर २ ऑक्टोबर रोजी गिरणगावात लाँग मार्च काढण्यात येणार आहे. मफतलाल मिलसमोर खटाव मिलची जमीन मिळावी, मफतलाल गिरणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुरू करावी, घरासाठी जमीन मिळावी म्हणून मॅरेथॉन टॉवरसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाची टिंगल करणारे फलक लावणाऱ्यांविरुध्द गुन्हा

Photo-3   डोंबिवली : डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुक्रवारच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या बदनामीचे आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे फलक काही समाजकंटकांनी गुरूवारी मध्यरात्री डोंबिवली शहराच्या विविध भागात लावले होते. हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री उघड होताच, वरिष्ठ पोलीस अधिकारी शहरात दाखल झाले. हे फलक छपाई करणाऱ्या उल्हासनगरच्या जॉली प्रिंटर्सच्या मालकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस असल्याने भाजपसह सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या शुभेच्छांचे फलक डोंबिवलीत लावले होते. रंगशाळा पब्लिसिटीचे संचालक आणि भाजप कार्यकर्ते विनय पालव यांनीही शहरातील मुख्य रस्ते, कमानी, चौक भागात शुभेच्छा फलक लावले होते. काही समाजकंटकांनी मंत्री चव्हाण यांना डिवचण्यासाठी ‘२० सप्टेंबर, हॅप्पी खड्डे-डोंबिवलीकर’ असा मजकूर असलेले फलक गुरुवारी मध्यरात्री घाईघाईने लावून मंत्री चव्हाण यांची, डोंंबिवलीकर सामाजिक संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती संचालक विनय पालव यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे फलक लावणाऱ्यांविरुध्द कारवाईची मागणी केली. हे फलक सामाजिक तेढ निर्माण करणारे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांची बदनामी करणारे असल्याने पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी डोंबिवलीत दाखल झाले. हे फलक उल्हासनगर येथील जॉली प्रिंटर्सच्या कामगारांनी लावले असल्याचे रंगशाळा पब्लिसिटीमधील कर्मचारी अजय डावरे यांनी पाहिले होते. पालव, डावरे यांनी ही माहिती पोलिसांना दिली. तातडीने विष्णुनगर पोलिसांचे एक पथक उल्हासनगरला गेले. रात्रीच जॉली प्रिंटर्सच्या मालकाला डोंबिवलीत आणले. तोपर्यंत रंगशाळाचे संचालक पालव आणि कामगारांनी समाजकंटकांनी शहरात लावलेले बदनामीकारक फलक काढले. हे फलक कोणाच्या सांगण्यावरून छापले याची माहिती जॉली प्रिंटर्सचे चालक पोलिसांना देण्यास टाळाटाळ करत होते. अखेर मंत्री चव्हाण यांची बदनामी करणे, समाजात तेढ निर्माण करणारे फलक लावणे आणि शहराचे विद्रुपीकरण केल्याने जॉली प्रिंटर्सच्या चालक, मालका विरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात रंगशाळेचे विनय पालव यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. या फलकांवरून डोंबिवलीत गुरुवारी मध्यरात्री दोन ते सकाळी सहा वाजेपर्यंत तणावाचे वातावरण होते. एका हुन्नरी युवा नेत्याच्या इशाऱ्यावरून हे फलक लावण्यात आले असल्याची जोरदार चर्चा डोंबिवलीत सुरू आहे. डोंबिवलीत तणावपूर्ण वातावरण निर्माण करून हा नेता तीर्थाटनासाठी शहराबाहेर निघून गेल्याची चर्चा आहे. या युवा नेत्यामागे एका वजनदार लोकप्रतिनिधीचा हात असल्याची शहरात चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांपासून काही राजकीय मंडळी मंत्री रवींद्र चव्हाण यांना आव्हानात्मक राजकीय परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामधुनच हा प्रकार घडला असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. भाजप, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी याविषयी गप्प आहेत.