Category: मुंबई

Mumbai news

भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर

राज्यात ठाकरे, पवारांसाठी सहानुभूतीची लाट मुंबई: आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमीच चर्चेत असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज महायुतीलाच घरचा आहेर दिला.आहे. निवडणूक एन टप्यात असतानाच राज्यात उध्दव ठाकरे आणि शरद पवार…

सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त  सत्कार

मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक  कार्यकर्ते मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता खात्यातील इलेक्ट्रिक सेक्शनचे चार्जमन, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे मॅनेजिंग कमिटी मेंबर व धडाडीचे कार्यकर्ते  सतीश शंकर तुपे हे मुंबई पोर्ट ट्रस्टमधून ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० एप्रिल २०२४  पासून सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त वर्कशॉपमधील कामगारांनी  माझगाव येथील वर्कशॉपमध्ये सतीश तुपे  व  पत्नी श्रद्धा तुपे यांचा  २६ एप्रिल २०२४ रोजी शाल, श्रीफळ,  पुष्पगुच्छ  व भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार केला. त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, विविध खात्यातील कामगार, नातेवाईक, माझगाव डॉक, फ्लोटीला वर्कशॉप यांच्यावतीने सतीश तुपे यांचा सत्कार करण्यात आला. सतीश तुपे हे प्रामाणिक, आदर्श व निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते आहेत.  युनियनच्या प्रत्येक आंदोलनात ते नेहमी अग्रभागी होते. त्यांनी कामगारांचे दैनंदिन प्रश्न, हॉस्पिटलला मदत, पेन्शन असे अनेक  प्रश्न पाठपुरावा करून यशस्वीपणे सोडविले. त्यांना उदंड आयुष्य आणि चांगले आरोग्य लाभो,  तसेच त्यांच्याकडून यापुढेही कामगारांची चांगली सेवा घडो. अशी शुभेच्छापर भाषणे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे  पदाधिकारी सुधाकर अपराज, विद्याधर राणे, दत्ता खेसे, विजय रणदिवे, विकास नलावडे, निसार युनूस, मारुती विश्वासराव,  विजय पंदीरकर,  आप्पा सूर्यवंशी, पोर्ट ट्रस्टचे  विद्युत अभियंता राजेश वाधवाणी,  सहाय्यक विद्युत अभियंता इकबाल बामणे, दत्तात्रेय सुगवेकर, संध्या सुगवेकर, स्मिता चंदने आदी मान्यवरांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनियनचे कमिटी मेंबर  श्रीकृष्ण पडेलकर यांनी केले. कार्यक्रमास मुलगी मधुरा तुपे व मुलगा साईराज तुपे उपस्थित होते. सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी विष्णू पोळ, योगेश चौले, विजय बामगुडे,  सुनील गायकर,  नितीन रायकर,  नारायण पालव,  मेलविन डिसोझा,  संजय आरगडे,  रिझवान शेख,  श्रीकृष्ण पास्ते,  राजेश वाडेकर,  जावेद सोलकर,  टी. एलांगोवन, वाघमारे आदी कामगार कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत

आता चौकशी करणार फ्लेमिंगोच्या मृत्यूची मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना नवी मुंबईतील १० फ्लेमिंगोच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. नवी मुंबईतील खाडीत एका आठवड्यात १० फ्लेमिंगोचा मृत्यू झाला होता.  याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पर्यावरण संस्था नॅटकनेक्ट फाऊंडेशनने केली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंढे यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राहिलेले तुकाराम मुंढे हे सध्या महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाचे सचिव आहेत. कडक आणि प्रामाणिक IAS अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची प्रतिमा आहे. त्यांच्या 18 वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत 20 वेळा बदली करण्यात आली आहे, अशा प्रामाणिक अधिकाऱ्याकडे चौकशी दिली याचा आम्हाला आनंद आहे, आम्हाला आनंद आहे, असे नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार यांनी सांगितले. नवी मुंबईतील डीपीएस तलावाभोवती 10 फ्लेमिंगो मरण पावले  व  पाच फ्लेमिंगो जखमी झाले आहेत. फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी नवी मुंबईतील हा एक महत्त्वाचा सरोवर पाणथळ प्रदेश म्हणून ओळखला जातो. नवी मुंबई महापालिकेने स्वतः पाणथळ जागा फ्लेमिंगोचे निवासस्थान आणि पर्यटकांचे आकर्षण म्हणून संरक्षित करण्याची आवश्यकता होती. त्यासाठी पर्यावरण संस्था नॅटकनेक्ट फाऊंडेशन सहकार्य करणार होते. मात्र सिडकोने आतापर्यंत हे काम महापालिकेकडे देण्यास नकार दिला आहे. सिडकोने सुमारे 25 तलाव नागरी संस्थेकडे हस्तांतरित केले आहेत परंतु डीपीएस फ्लेमिंगो तलाव, एनआरआय आणि टीएस चाणक्य पाणथळ जागा राखून ठेवल्या आहेत.या जागा राखीव ठेवल्या आहेत. असे नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार यांनी सांगितले.

पाकिस्तानला जगासमोर उघडे पडणाऱ्या अँड. उज्वल निकम यांची उमेदवारी म्हणजे मुंबईकरांचा सन्मान

रमेश औताडे मुंबई : मुंबईत रेल्वेत बाँम्ब ब्लास्ट करुन मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या याकूब मेमनला फाशी व्हावी म्हणून न्यायालयात युक्तिवाद करणारे, मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबला फाशी व्हावी म्हणून आवश्यक पुरावे व या कटातील पाकिस्तानचा सहभाग उघड करुन जगासमोर पाकिस्तानला उघडे पाडणारे अँड उज्वल निकम यांना लोकसभेची  उमेदवारी म्हणजे मुंबईकरांसाठी लढणाऱ्या सच्चा मुंबईकरांचा हा सन्मान असून उज्वल निकम हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार  अँड आशिष शेलार यांनी व्यक्त केला. उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार ज्येष्ठ विधितज्ञ अँड उज्वल निकम यांचा पक्ष प्रवेश करुन त्यांचे जोरदार स्वागत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केले. अँड उज्वल निकम म्हणजे एक सच्चा मुंबईकर आणि योध्दा निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत, अशी प्रतिक्रिया अँड आशिष शेलार यांनी दिली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अँड उज्वल निकम यांचे उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे विलेपार्ले येथील कार्यालयात ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी अँड पराग अळवणी, शिवसेना नेते डॉ दीपक सावंत, विवेक पवार, माजी आमदार तृप्ती सावंत यांच्यासह युतीचे सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. उज्वल निकम यांनी आपल्या भाषणात ,  संधी देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रीय, प्रदेश अध्यक्ष आणि भाजपा मुंबई अध्यक्षांचे आभार मानले. ज्या पध्दतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाच्या विकासासाठी काम करीत आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा बहुमान त्यांनी वाढवला ते पाहून आपल्याला त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळणे हा माझा बहुमान समजतो, अशी भावना निकम यांनी व्यक्त केली.

काँग्रेस आणि वंचित एकत्र विधानसभा लढू शकतात, आता वंचितला मदत करा – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते, तेव्हा नाराजी काढा आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. आचारसंहिता असतानाही केंद्र शासनाने त्याचे उल्लंघन केले आहे आणि इथेनॉलवरील बंदी हटवली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 20 टक्के इथेनॉल वापरायची परवानगी काही वर्षांपूर्वी देण्यात आली होती. पण साखरेचे उत्पादन कमी होईल या नावाखाली इथेनॉल  तयार करण्याची परवानगी काही जणांना देण्यात आली होती. याचे राजकारण आम्ही इचलकरंजी येथील सभेत मांडल्यानंतर त्याचा परिणाम आता दिसायला लागला असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या प्रमाणे दुसऱ्या टप्प्यात विदर्भात आणि मराठवाड्यात आम्हाला पाठिंबा मिळाला आहे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश या भागात मिळत आहे. मुंबईमध्ये दोन दिवसांत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार आहोत. मी असे म्हणेन की, काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलेली आहे, पण त्यांचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून उमेदवारी दिलेली आहे. वर्षा गायकवाड यांच्यासंदर्भात म्हणावे लागेल की, बळी का बकरा काँग्रेसकडून दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उध्दव ठाकरे शिवसेना असे काही मतदारसंघ आहेत. त्यामध्ये काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करत नाही आणि शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांचे काम करत नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतदार हा आमच्याकडे वळला असल्याची परिस्थिती आहे.असे त्यांनी सांगितले. ॲड. आंबेडकरांनी भाजप आणि मोदी यांच्यावर ही निशाणा साधला ते म्हणाले की, 2014 पासून ते आतापर्यंत 17 लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे, असे सरकार स्वतःच म्हणत आहे. आम्ही असे म्हणतो की, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत, तर गुजरातचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे लोकांनी आता धडा घ्यावा. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका चालू होत्या, त्यावेळी याच चर्चेला सुरुवात झाली होती. नवीन सर्व्हेनुसार भाजप कुठेही 200 पार करत आहे, असे दिसत नाही. अमित शहा यांनी समान नागरी कायदा लागू करणार असे वक्तव्य एका सभेत केले होते यावर ॲड. आंबेडकर यांनी समान नागरी कायदा भाजपने करूनच दाखवावा. भाजप आणि आरएसएस स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेईल असे मला वाटत नाही. तो संसदेचा कायदा आहे. संविधानाने प्रत्येक धर्माला सुरक्षा दिलेली आहे. असे सांगितले.

माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवणार – उद्धव ठाकरे

रमेश औताडे मुंबई : देशात हुकूमशाही येता कामा नये, घटना बदलण्याचे काम सुरू असून त्याचे रक्षण करण्यासाठी ही लढाई आहे. महाविकास आघाडीचे राज्यात व देशात इंडिया आघाडीचे सरकार आले पाहिजे. माजी मंत्री वर्षाताई गायकवाड या मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत त्या कुठूनही लढू शकतात, वर्षा गायकवाड यांना माझे मत मिळणार आहे, पंजाच्या हातात मशाल आहे व त्यानंतर तुतारी वाजवणार असे म्हणत वर्षाताई गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवणार, असा विश्वास माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या मुंबई विभागीय अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, मातोश्री व ठाकरे यांच्याशी पूर्वीपासूनचे चांगले संबंध आहेत, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काम केले असून त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी ही भेट घेतली. मुंबईतील महाविकास आघाडीच्या सहाही जागांवर विजय मिळवू असा विश्वास असून २००४ च्या लोकसभा निकालाची पुनरावृत्ती होईल, असे वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले.

आठ अधिकाऱ्यांना मिळाले पोलिस महासंचालक पदक

नवी मुंबई : महाराष्ट्र पोलिस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल राज्यातील पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक, पोलिस पदक आणि पोलिस शौर्य पदकासह पोलिस महासंचालकांचे बोधचिन्ह, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्राने सन्मानित करण्यात येते. त्याअनुषंगाने २०२३ या वर्षातील उल्लेखनीय सेवेबद्दल महाराष्ट्रातील तब्बल ८०० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे पदक (सन्मानचिन्ह) जाहीर झाले आहे. यामध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील आठ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर झालेल्यांमध्ये नवी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेतील सहायक पोलिस आयुक्त मयूर भुजबळ, सहायक पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल दगडू सापते, पोलिस हवालदार संदीप मनोहर ढवळे, गिरीष रामचंद्र किंद्रे, सतीश दत्तात्रय साळुंखे, गिरीष विनायक चौधरी, कृष्णा जयराम गावित आणि दत्तात्रय किसन भगत यांचा समावेश आहे. या सर्वांनी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन त्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त कळंबोली येथे पोलिस मुख्यालय येथे होणाऱ्या पथसंचालनावेळी या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.

श्री नारायण गुरु कॉलेज कॅरम स्पर्धेत पौरस करगुटकर विजेता

मुंबई : खालसा कॉलेजच्या पौरस करगुटकरने श्री नारायण गुरु कॉलेज ऑफ कॉमर्स-चेंबूर व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आंतर कॉलेज एकेरी कॅरम स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. विविध जिल्ह्यातील राष्ट्रीय ख्यातीच्या ज्युनियर कॅरमपटूनी निर्णायक फेऱ्यांमध्ये चुरशीचा खेळ केल्यामुळे स्पर्धा रंगतदार झाली. अंतिम फेरीत पौरस करगुटकरने मॉडेल कॉलेज-डोंबिवलीच्या समृध्दी घाडीगावकरचे आव्हान २-० असे संपुष्टात आणले आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. श्री नारायण गुरु कॉलेज समितीचे अध्यक्ष एम.आय.दामोदरन व जनरल सेक्रेटरी ओ.के. प्रसाद, उपप्राचार्य डॉ. जयश्री व्यंकटअचलम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी स्पोर्ट्स डायरेक्टर प्रोफेसर पूनम मुजावर, स्पोर्ट्स प्रोफेसर रेश्मा खुदाबक्ष, प्रोफेसर नाहीद शेख, ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक व प्रॉमिस सैतवडेकर, कॅरम मार्गदर्शक सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. निर्णायक फेरीतील पहिल्या सेटमधील पहिलाच बोर्ड ५-० असा घेत समृध्दी घाडीगावकरने पौरसविरुध्द दमदार प्रारंभ केला. परंतु त्यानंतर सावध व अचूक खेळ करून प्रत्येक बोर्ड घेत पौरस करगुटकरने पहिला सेट ८-५ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये राणीवर सतत कब्जा मिळवीत पौरसने सुरुवातीपासून आघाडी घेतली आणि १५-२ असा विजय मिळवीत अंतिम फेरी जिंकली. राष्ट्रीय ख्यातीचे उदयोन्मुख कॅरमपटू अंकित मोहिते व निलांश चिपळूणकर यांना हरवून समृध्दी घाडीगावकरने निर्माण केलेली विजेतेपदाची दावेदारी अखेर फोल ठरली आणि तिला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पौरस करगुटकरने पोद्दार कॉलेजच्या रुची माचीवलेचा ७-१०, १३-०, १३-७ असा तर समृध्दी घाडीगावकरने हिंदुजा कॉलेजच्या निलांश चिपळूणकरचा ८-६, ९-४ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. विविध जिल्ह्यातील कॉलेज कॅरमपटूना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडापटू गोविंदराव मोहिते अमृत महोत्सवी चषक आंतर कॉलेज कॅरम स्पर्धेचे आयोजन २९ जूनला आयडियलतर्फे होणार असल्याची माहिती शिवछत्रपती पुरस्कार विजेते व संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली.

पॉवरलिफ्टिंग खेळाचा प्रशिक्षण वर्ग

मुंबई : येत्या ६ ते २० मे दरम्यान ठाणे (पूर्व) येथील धि युनायटेड स्पोर्ट्स क्लबमध्ये सर्व वयोगटातील मुला-मुलींसाठी पॉवरलिफ्टिंग खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. छत्रपती पुरस्कार प्राप्त नामवंत पॉवरलिफ्टिंग खेळाडू अनंत चाळके यांच्यातर्फे या खेळाचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त युवा खेळाडूंनी या खेळाकडे आकर्षित व्हावे हा या प्रशिक्षण वर्गाचा मूळ हेतू आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ९३२४५०६०६६ अथवा ९७०२१७१००४ यावर संपर्क साधावा.

नवी मुंबईतील स्वच्छताकर्मीही करताहेत मतदान करण्याविषयीचे आवाहन

नवी मुंबई : 25 ठाणे लोकसभा निवडणूक 20 मे रोजी संपन्न होत असून या निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार बजावावा यादृष्टीने व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती मोहिमेमध्ये विविध प्रसार माध्यमांचा वापर करण्यात येत असून त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. नवी मुंबई हे स्वच्छतेत देशामध्ये अग्रमानांकित असणारे शहर असून येथील सेवाभावी वृत्तीने काम करणारे स्वच्छताकर्मी दैनंदिन स्वच्छता कार्याप्रमाणेच विविध लोकोपयोगी उपक्रमातही मनापासून सहभागी होत असतात. या अनुषंगाने स्वच्छताकर्मींच्या गणवेशावर लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याविषयी नागरिकांना आवाहन करणारे बिल्ले (Badges) लावून त्या माध्यमातून मतदान करण्याविषयी संदेश प्रसारण करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील स्वच्छताकर्मींच्या गणवेशावर हे बिल्ले झळकत असून, त्यावर असलेल्या ‘मी मतदान करणारच. तुम्हीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावा. माझे मत माझा अधिकार’ – अशा मजकुरातून अभिनव पद्धतीने मतदान करण्याविषयीचे आवाहन केले जात आहे. याशिवाय महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारीही मतदान करण्याविषयीच्या जनजागृतीपर संदेशांचे प्रसारण करीत आहेत.