Category: मुंबई

Mumbai news

नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार-एकनाथ शिंदे 

मुंबई : नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार आहे. नाशिक ही शिवसेनेची पारंपारिक जागा आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेचा निर्णय महायुतीत समन्वयाने होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे हेमंत गोडसे सलग दोन वेळा नाशिकमधून निवडून आले आहेत.…

उद्धव ठाकरेंचा वचननामा जाहीर

मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा लोकसभेसाठीचा वचननामा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. उद्योगाला आम्ही चांगले दिवस आणू. पर्यावरण पूरक प्रकल्प आणू, जीएसटीवरील त्रासदायक अटी आम्ही काढून टाकू अशी…

वर्षा गायकवाड निवडणूक लढवणार

मुंबई उत्तर मध्यमधून मविआच्या उमेदवार  मुंबई : विद्यमान आमदार आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडीतर्फे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून त्या ही निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने त्यांची आज उमेदवारी…

जुन्या मोटरीत दोन चिमुरड्यांचा मृतदेह सापडला, गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय

मुंबई : ॲन्टॉप हिल येथे एका जुन्या मोटरगाडीत दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत्यू झालेले दोघे भाऊ-बहीण असून ते बेपत्ता झाल्याची तक्रार बुधवारी ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मोटरगाडीत गुदमरून मुलांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. चिमुकल्यांच्या मृत्युमुळे परिसरात शोकाकुल वातावरण आहे. साजीद शेख (७) व मुस्कान (५) अशी या मुलांची नावे आहेत. वडील मोहाब्बत शेख व आई मुस्कान यांच्यासोबत ते ॲन्टॉप हिल परिसरात वास्तव्यास होते. ते दोघे बुधवारी दुपारी एकत्र खेळण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र बराच वेळ झाला तरी ते घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला. मुले कुठेच न सापडल्याने अखेर त्यांच्या आई – वडिलांनी ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मुले बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मुले बेपत्ता झाल्याची तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ त्यांचा शोध सुरू केला. मुले राहात असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासून आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यात आला. मात्र मुले कोठेच सापडली नाहीत. अखेर सायंकाळी ७.४५ च्या सुमारास एका महिला पोलिसाने मोबाइलमधील टॉर्चच्या साह्याने जुन्या मोटरगाडीत पाहिले असता आत मुले असल्याचे आढळले. मोटरगाडीचा दरवाजा उघडला असता मुले बेशुद्धावस्थेत आढळली. त्यांना तातडीने शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पोलीस मुलांच्या शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार दोन्ही मुलांचा मृत्यू गुदमरून झाल्याची शक्यता असल्याचे उपायुक्त (परिमंडळ-४) प्रशांत कदम यांनी सांगितले. चौकशीनुसार दोन्ही मुले दुपारी २ च्या सुमारास खेळायला घराबाहेर पडली. तेव्हापासून ती बेपत्ता होती. ती जुनी मोटरगाडी मुलांच्या घरापासून ५० फुटांच्या अंतरावर आहे. ती मुले नेहमी त्याच परिसरात खेळायची. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तपासणीतही त्या काळात तेथे कोणी तिसरा व्यक्ती आलेला दिसत नाही. तरी पोलीस सर्व शक्यता पडताळणून पाहत आहेत. याप्रकरणी ॲन्टॉप हिल पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

नवीन परीक्षा भवनात छायांकित प्रत केंद्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील परीक्षा भवनाच्या नवीन इमारतीत (छत्रपती शिवाजी महाराज भवन) छायांकित प्रत केंद्र (झेरॉक्स सेंटर) नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना तत्काळ कागदपत्रांची छायांकित प्रत हवी असल्यास परीक्षा भवनापासून दूरवर असलेल्या छायांकित प्रत केंद्रांजवळ रिक्षाने जावे लागत आहे. कलिना संकुल तब्बल २४३ एकर जागेवर उभे आहे. या संकुलात ५० हून अधिक विविध शैक्षणिक विभाग आहेत. परंतु एवढ्या मोठ्या संकुलात आरोग्य केंद्र, दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्र (पूर्वीचे आयडॉल), जवाहरलाल नेहरू ज्ञान स्त्रोत केंद्र म्हणजेच ग्रंथालय या तीनच ठिकाणी छायांकित प्रत केंद्रे आहेत. ही तीनही छायांकित प्रत केंद्रे जवळपासच आहेत. परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या कलिना संकुलातील परीक्षा भवनाच्या नव्या इमारतीत छायांकित प्रत केंद्र नाही. परीक्षाविषयक विविध कामांसाठी मुंबईसह ठाणे, कल्याण – डोंबिवली, नवी मुंबई, तसेच कोकणासारख्या ग्रामीण भागातूनही बहुसंख्य विद्यार्थी परीक्षा भवनात येत असतात. विद्यार्थ्यांना तत्काळ कागदपत्रांची छायांकित प्रत हवी असल्यास संकुलातील व संकुलाबाहेरील छायांकित प्रत केंद्रांमध्ये रिक्षानेच जावे लागते. १ रुपयाच्या छायांकित प्रतीसाठी विद्यार्थ्यांना येऊन – जाऊन रिक्षाचे ४६ रुपये भाडे मोजावे लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांना संकुलातील छायांकित प्रत केंद्राची माहिती नसल्यामुळे त्यांचा गोंधळ उडतो. विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा भवनात छायांकित प्रत केंद्र सुरू करावे. तसेच कागदपत्रांच्या छायांकित प्रतींची आवश्यकता भासणार नाही, अशी ऑनलाइन प्रणाली विकसित करावी. – संजय वैराळ, माजी अधिसभा सदस्य

खाद्यपदार्थांची तपासणी करणाऱ्या संस्थांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांचा अविश्वास

सर्वेक्षणातून माहिती उघडकीस मुंबई : मसाल्यांमध्ये कर्करोग होणारे घटक असल्याचा दावा करीत सिंगापूर आणि हाँगकाँगने भारतीय कंपन्यांच्या काही मसाल्याच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. यावरून देशातील भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणात देशातील अन्न सुरक्षा संस्थांच्या कार्यप्रणालीबाबत नागरिकांनी अविश्वास दर्शविल्याचे उघडकीस आले आहे. भारतीय कंपन्यांच्या मसाल्यामध्ये इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण जास्त आढळून आले असून, त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका असल्याचा दावा करीत हाँगकाँग आणि सिंगापूरने या मसाल्यांवर बंदी घातली आहे. खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत आणि अन्न नियामक संस्थांच्या कार्यप्रणालीबाबत सर्वसामान्य नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी एका खासगी संस्थेने महाराष्ट्रासह देशभरात ऑनलाईन सर्व्हेक्षण केले. या सर्वेक्षणात देशातील २४ हजार नागरिक सहभागी झाले होते. त्यात महाराष्ट्रातील ३ हजार ६४४ नागरिकांचा समावेश होता. एकूण सहभागी नागरिकांपैकी ३६ टक्के ग्राहकांनी त्यांचा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर विश्वास नसल्याचे म्हटले. तर ३७ टक्के नागरिकांनी फारच कमी विश्वास असल्याचे, तर २४ टक्के नागरिकांनी या संस्थांच्या कार्यप्रणालीवर ५० टक्के विश्वास असल्याचे सांगितले. मात्र तीन टक्के नागरिकांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि अन्न व औषध प्रशासनावर पूर्णपणे विश्वास दर्शविला. हाँगकाँग आणि सिंगापूरमधील घटनेबाबत नागरिकांना प्रश्न विचारला असता महाराष्ट्रातील १ हजार ८२९, तर देशातील १२ हजार ३६१ नागरिकांनी चिंता व्यक्त केली. १८ टक्के नागरिकांनी ही घटना माहीत आहे, परंतु त्याबाबत चिंता व्यक्त केली नाही. १० टक्के नागरिकांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या कंपनीचे मसाले आपण वापरत नाही असे स्पष्ट करीत १० टक्के नागरिकांनी या प्रकराबाबत चिंता व्यक्त केली.

वेल्फेअर साठी…

मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव रमेश औताडे मुंबई : मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव समिती आयोजित भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा ज्योतिबा फुले आणि  विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पार पडला.प्रमुख पाहुणे म्हणून  न्यायमूर्ती शमकरंद कर्णिक,  न्यायमूर्ती  सारंग कोतवाल , न्यायाधीश श्अभय आहूजा ,  न्यायमूर्ती शशर्मिला देशमुख , उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यामागे या समितीचे अध्यक्ष शरद साळवे,  कार्याध्यक्ष रवी पवार,  सचिव संजय शेलार सल्लागार चंद्रकांत बनकर खजिनदार किरण कांबळे तसेच कार्यकर्ते निलेश तायडे प्रशांत दाभाडे व इतर  कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. अशाप्रकारे जयंतीचे कार्यक्रम दरवर्षी आयोजित झाले पाहिजे असे  न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी  केले. याप्रसंगी न्यायमूर्ती श्रीमती शर्मिला देशमुख  म्हणाल्या ‘आज मी जी  न्यायमूर्ती आहे ती केवळ या महामानवामुळे आहे. तसेच  मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती अभय आहूजा यांनी या तिन्ही महापुरुषाबद्दल गौरवउद्गार काढले आणि  आपल्या सर्वांवर यांचे कसे उपकार आहेत त्याची जाणीव करून दिली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शेलार यांनी तर प्रास्ताविक  शरद साळवे यांनी केले आणि आभार प्रदर्शन  चंद्रकांत बनकर यांनी केले.

परळ येथे राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा

मुंबई : येत्या २९ आणि ३० एप्रिल रोजी परळच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य ज्युनियर, सब ज्युनियर, क्लासिक पुरुष आणि महिला गटाच्या पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि मुंबई शहर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला २९ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता प्रारंभ होईल. तर ३० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता स्पर्धेचा बक्षिस समारंभ होईल. या स्पर्धेतून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ निवडण्यात येतील.  स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सुर्यकांत गद्रे, मोबाईल : ९८६९७३६७११ अथवा प्रशांत सरदेसाई, मोबाईल : ९८२०३७०४९७ यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत २०० पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. स्पर्धेत प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंना पदक आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येईल. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरकार्यवाह संजय सरदेसाई आणि त्यांचे सहकारी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत घेत आहेत.

जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी दिला मतदानाचा संदेश

नवी मुंबई : नाटक हे संदेश प्रसारित करण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम असून पथनाट्याव्दारे मनोरंजनातून प्रबोधन करण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. समाज जागृतीचा संदेश हसत खेळत, दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत लोकांपर्यंत पोहचवणारी पथनाट्ये नेहमीच जनजागृतीचे लोकप्रिय माध्यम राहिलेली आहेत. याचाच उपयोग मतदान विषयक जनजागृती करण्याकरिता करण्यात येत असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई क्षेत्रातील विविध शाळांमध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत जागरूकता वाढविणारी पथनाट्ये बसविली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांप्रमाणेच अनेक खाजगी शाळांमधूनही शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येत नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन करणारी पथनाट्ये आपापल्या शाळा परिसरात सादर केली. विशेष म्हणजे ही पथनाट्ये शिक्षक व विद्यार्थी यांनी मिळूनच लिहिलेली होती व शिक्षकांनी पथनाट्य स्वरुपात बसवून घेतली होती. ही पथनाट्ये शाळेच्या परिसरात सादर होत असताना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याचे चित्र पहायला मिळाले. या पथनाट्यांच्या माध्यमातून भारतीय संविधान, लोकशाहीच्या सबलीकरणात मतदानाचे महत्व, संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार, कर्तव्य म्हणून मतदान करण्याची नागरिकांची जबाबदारी अशा आशयास अनुसरुन मतदान करण्याचे संदेश प्रसारण पथनाट्यांतून करण्यात आले. 25 ठाणे लोकसभा निवडणूक 20 मे रोजी होणार असून मतदानाची टक्केवारी वाढावी यादृष्टीने मतदार जनजागृतीकरिता नवी मुंबई महापलिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानेही या कामी पुढाकार घेतला असून स्वीप कार्यक्रमांतर्गत 150 ऐरोली व 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या सूचनांनुसार रांगोळी, चित्रकला, प्रभातफे-या, निबंध, पोस्टकार्ड लेखन असे अभिनव उपक्रम शाळांतून राबविलेले आहेत. शिक्षण विभागाचे उपायुक्त श्री.योगेश कडुसकर, शिक्षणाधिकारी श्रीम.अरुणा यादव, क्रीडा अधिकारी श्रीम. अभिलाषा म्हात्रे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम.सुलभा बारघरे व श्रीम. कल्पना गोसावी यांच्या नियंत्रणाखाली केंद्र समन्वयक यांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळांसह खाजगी शाळांनाही मतदान विषयक जनजागृतीपर स्वीप कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात आले आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांमार्फत पालकांकडे मतदान करण्याचा संदेश प्रभावी रितीने पोहचविला जात आहे. शाळांनी आपापल्या क्षेत्रात सादर केलेली पथनाट्ये ही मतदान विषयक जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरली.