Category: मुंबई

Mumbai news

वातानुकूलित लोकलच्या महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी, अनेक प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करू लागले आहेत. यात महिलांची संख्या अधिक आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलच्या महिलांच्या डब्यातून पुरूष प्रवास करू लागले आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांचा प्रवास सुरक्षित आणि लोकल प्रवासातील गैरसोय टाळण्यासाठी महिलांसाठी काही डबे राखीव ठेवले आहेत. तसेच वातानुकूलित लोकलचे काही डबे राखीव ठेवण्यात आले आहेत. वातानुकूलित लोकलचे डबे एकमेकांना जोडले असल्याने, एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येते. महिलांचा डबा जोडून असल्याने त्यात पुरुष प्रवासी ये-जा करीत असतात. महिलांचा डबा हा प्रथम डबा असल्याने अनेक पुरुष प्रवासी त्यातन बसत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सामान्य लोकलच्या महिला डब्यात पुरूष फेरीवाले बिनधास्तपणे घुसखोरी करून सामग्रीची विक्री करतात. अनेक वेळा तीन ते चार पुरुष विक्रेते एकत्र येतात. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण असते. आता वातानुकूलित लोकलच्या डब्यात पुरुष प्रवासी येत असल्याने, यावर अंकुश लावणे आवश्यक आहे. यात रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस, आरपीएफ प्रशासन यांनी लक्ष घालणे आवश्यक असल्याचे मत एका महिलेने व्यक्त केले.

रक्त संकलनाला निवडणूक आचारसंहितेचा फटका

मुंबई : राज्य रक्त संक्रमण परिषदेने उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी फेब्रुवारीपासूनच कंबर कसली आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेने एप्रिल आणि मेमध्ये पुरेसे रक्त उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील रक्तपेढ्यांना रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकारण्यांनी रक्तदान शिबिरांच्या आयोजनातून हात आखडता घेतला आहे. परिणामी, रक्तपेढ्यांसमोर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. महाविद्यालयातील युवा वर्ग रक्तदानासाठी महत्त्वाचा स्राोत आहे. मात्र मार्चमध्ये शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा पार पडल्यानंतर एप्रिल आणि मेमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतात. अनेक नागरिक गावाला किंवा फिरण्यासाठी बाहेर गावी जातात. यामध्ये युवकांचे प्रमाण अधिक असते. तसेच अनेक रक्तदातेही बाहेरगावी जातात. रक्तदात्यांच्या अभावामुळे रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे प्रमाण कमी होते. परिणामी, दरवर्षी एप्रिल – मे या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवतो. या पार्श्वभूमीवर राज्य रक्त संक्रमण परिषदेने फेब्रुवारीपासून नियोजन सुरू केले होते. स्थानक, गृहसंकुलांत संकलन शासकीय रक्तपेढ्यांनी रेल्वे स्थानकांवर रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. तसेच गृहनिर्माण संस्थांमध्ये रक्त संकलन वाहन पाठवून रक्त संकलन करण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असला तरी राज्यभरामध्ये दररोज साधारण पाच हजार युनिट रक्ताची आवश्यकता भासते. त्याच वेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी सामाजिक, धार्मिक संस्थांना साद घालण्याची वेळ राज्य रक्त संक्रमण परिषदेवर आली आहे. या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरातून रक्त संकलन केले जाईल. राजकीय पुढारी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे घेतात. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय नेते मंडळींनी रक्तदान शिबिरांच्या आयोजनात आखडता हात घेतला आहे.

महाराष्ट्रात उलथापालथ होणार !

महायुतीची तीसवर दमछाक  माविआची १८ जागांवर घोडदौड मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय पडजडीनंतर आता निवडणूकीआधीच्या शेवटच्या मतदानपुर्व चाचणीत जबरदस्त उलथापालथ होणार आहे. भाजपाप्रणीत महायुतीला ११ जांगाचा फटका बसणार असून महायुतीची १८ जागांवर विजयी…

सांगलीसाठी काँग्रेस अजूनही आशावादी ?

मुंबई : सांगलीत विशाल पाटीलांनी अपक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या चंद्रहार पाटील या उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरही या जागेसाठी काँग्रेस अजून आशावादी आहे.  सांगलीत शिवसेनेच्या उमेदवाराचा कुठेही बेस नाही, त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी आता तरी याची जाणीव करून घ्यावी. परिणामी, शिवसेनेने…

मी व्हेंटिलेटरवर असताना उद्धव ठाकरेंनी ढुंकूनही बघितलं नाही-विजय शिवतारे

मुंबई: 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्याच्या महिनाभरानंतरच माझ्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली, माझी ओपन हार्ट सर्जरी झाली होती. पण त्यावेळी शिवसेनेतील एकाही नेत्याने माझ्याकडे ढुंकून पाहिले नव्हते, पक्षप्रमुखांचा साधा फोनही आला नव्हता, अशी खंत पुरंदरचे…

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना सोडणार नाही- शिंदे

मुंबई: बॉलिवूड स्टार अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना सोडणार नाही असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता सलमान खानला दिले. शिंदे यांनी सलमानची त्याच्या राहत्या घरी भेट घेतली. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या युवा…

राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय

मुंबई : तुटपूंजा निधी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या यामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ढासळत आहे. हे कमी ठरावे म्हणून राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेली ग्रामीण रुग्णालयातील केवळ ४० टक्केच खाटांचा रुग्णोपचरासाठी वापर होत…

धारावी सर्वेक्षणाचा वेग वाढवण्यासाठी आणखी १५ टीम होणार तैनात

मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत डीआरपीपएलकडून गेल्या पंधरा दिवसांपासून घरोघर सर्वेक्षण सुरू आहे. मात्र सर्वेक्षणाचा वेग मंद असल्याने आतापर्यंत केवळ ६०० झोपड्यांचे सर्वेक्षण झाले आहे. त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून सर्वेक्षणाचा वेग वाढवण्यासाठी पंधरा टीम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १५ सर्व्हेयर आणि ७ नायब तहसीलदार नव्याने घेतले जाणार आहेत. धारावीत एक लाखाहून अधिक झोपड्या असून त्यांचे नंबरिंग आणि सखोल माहिती पुढील सहा-आठ महिन्यात जमा करण्याचे उद्दिष्ट धारावी पुनर्विकास प्राधिकरण लिमिटेडने ठेवले आहे. त्यानुसार १८ मार्चपासून नंबरिंगचे काम माटुंगा येथील कमला रमण येथून सुरू झाली आहे. तसेच १ एप्रिल पासून घरोघर सर्व्हे सुरू झाले. सुरुवातीला पाच टीम होत्या, मात्र एका घराचा सर्व्हे पूर्ण करण्यासाठी पाऊण तासाहून अधिक वेळ लागत आहे, तसेच सर्व्हे मशीनला रेंज नसल्याने ओटीपी मिळत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने सर्व्हेच्या टीम वाढवल्या आहेत. तरीही सर्व्हेला विलंब लागत असल्याने डीआरपीपीएलने आणखी पंधरा टीम वाढवल्या जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून पंधरा सर्व्हेयर आणि सात नायब तहसिलदार देण्याबाबत मागणी केली असून लवकरच ते मिळतील अशी माहिती डीआरपीपीएलच्या अधिकाऱ्यांने दिली. एका सर्व्हेयरकडे दोन टीमची जबाबदारी धरणार धारावीत घरोघर सर्व्हेचा वेग वाढवण्याच्या हलचली सुरू आहेत. त्यासाठी सर्व्हरच्या टीममध्ये भविष्यात वाढ करावी लागल्यास एका सर्व्हेयरकडे दोन टीमची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व्हेच्या कामाला वेग मिळू शकणार आहे. पावसाळ्यात सर्व्हे मंदावणार धारावीचा बहुतांश सखल भाग आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी भरते, झोपड्यांमध्ये पाणी जात असल्याने पावसाळ्यात सर्व्हेचा वेग मंदावणार आहे. त्यामुळे १५ जून पर्यंत जास्तीतजास्त झोपड्यांचा सर्व्हे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

पोलिसांनी 50 नागरिकांना मोबाईल फोन केले परत 

नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांनी आपल्या हद्दीतील चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या नागरिकांच्या 50 मोबाईल फोनचा शोध घेऊन त्यापैकी 28 नागरिकांना परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या हस्ते परत केले. यावेळी हरवलेले व चोरीला गेलेले आपले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले. परिमंडळ-1चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींचा आढावा घेऊन त्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकाने कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींची दखल घेऊन तांत्रिक तपास करुन भारतातील विविध राज्यातून एकुण 50 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. त्यापैकी सोमवारी पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या हस्ते 28 नागरिकांना त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात आले. उर्वरीत मोबाईल फोनच्या तक्रारदारांचा शोध घेऊन त्यांना देखील त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात येत आहेत.

 रामनवमीला खबरदारी घ्या!

 उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश मुंबई : रामनवमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या यात्रांमुळे मुंबईत विशेषत: मालाड-मालवणी येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकार आणि पोलिसांना दिले. रामनवमीनिमित्त मालवणी येथील मुस्लीमबहुल परिसरातून काढण्यात येणाऱ्या यात्रेदरम्यान हेतुत: मशिदीसमोर नमाज सुरू असताना मोठ्या आवाजात ढोल-ताशे वाजवले जात असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश दिले. आम्ही कोणालाही सार्वजनिक यात्रा काढण्यापासून किंवा सभा घेण्यापासून रोखू शकत नाही. परंतु, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोणीही नियमांचा भंग केल्यास पोलिसांनी कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचवेळी, नियमांचा भंग होणार नाही, या आश्वासनाच्या आधारे आमदार टी. राजा. सिंह यांना मिरा-भाईंदर येथे सभा आयोजित करण्यास आपण परवानगी दिल्याचे न्यायमूर्ती डेरे यांनी नमूद केले. रामनवमीला काढण्यात येणाऱ्या यात्रांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे का ते पाहा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यावर, रामनवमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या यात्रांदरम्यान अनुचित घटना घडणार नाहीत याबाबत पोलीस अधिक सावध राहतील, असे आश्वासन महाधिवक्ता बिरेद्र सराफ यांनी खंडपीठाला दिले.