Category: मुंबई

Mumbai news

विविध प्राधिकरणांनी पावसाळा कालावधीत समन्वयाने काम करा – आयुक्त डॉ. कैलास शिंदे

अशोक गायकवाड नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणे कार्यरत असून या सर्वांनी परस्पर समन्वय राखून पावसाळा कालावधीत काम करावे व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे सूचित करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महानगरपालिकेसह इतर सर्व प्राधिकरणांनी पावसाळ्यात सतर्क रहावे असे निर्देशित केले. शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून आयुक्तांनी समितीच्या विशेष बैठकीत सर्व प्राधिकरणांच्या उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांनी केलेल्या पावसाळा पूर्वतयारीचा आढावा घेतला तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगाही काढला. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा समितीचे सदस्य सचिव सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड, शहर अभियंता संजय देसाई, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त चंद्रकांत तायडे तसेच विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता हे प्रत्यक्ष विशेष समिती सभागृहात तसेच सिडको, एमआयडीसी, एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, नवी मुंबई पोलीस व वाहतुक पोलीस, एपीएमसी, रेल्वे, महावितरण, एमटीएनएल, मोबाईल प्रोव्हायडर, एपीएमसी, आरएएफ, नागरी संरक्षण दल, महानगर गॅस लिमी., टीबीआयए, मच्छीमार संघटना आदी विविध प्राधिकरणांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीव्दारे ऑनलाईन उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र समुद्रसपाटीपासून खाली वसलेले असल्याने अतिवृष्टी आणि मोठ्या उधाण भरतीची वेळ जुळून आल्यास काही सखल भागात पाणी साचते. अशा साधारणत: १४ ठिकाणांची माहिती असून त्याठिकाणी पाणी उपसा पंपांची आवश्यक त्या प्रमाणात आत्ताच तजवीज करून ठेवण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. यावर्षी साधारणत: १० जून पासून पावसाला सुरूवात होईल असा हवामान खात्याचा अंदाज असून अंतिम टप्प्यात असलेली नालेसफाईची कामे त्वरित पूर्ण करून घ्यावीत असे निर्देश देण्यात आले. विशेषत्वाने एमीएमसी मार्केटमधील नाले व गटारे सफाईची कामे तत्परतेने पूर्ण करून घ्यावीत अशा सूचना करण्यात आल्या. पावसाळा कालावधीत भाजीपाला, फळे यांच्या कच-याची योग्य रितीने विल्हेवाट लागेल याची विशेष काळजी घ्यावी व पदपथावर विक्रीस परवानगी देऊ नये असे निर्देशित करण्यात आले. रेल्वे प्लॅटफॉर्म, रूळ तसेच रूळांच्या बाजूला असलेले नाले यांची सफाई लगेचच पूर्ण करावी त्याचप्रमाणे रेल्वेचे अंडरपास व सबवेही स्वच्छ करून घ्यावेत तसेच रेल्वेची उद्घोषणा प्रणाली तपासून घ्यावी अशा सूचना सिडको आणि रेल्वे प्रशासनास करण्यात आल्या. रेल्वे हद्दीत लागलेल्या होर्डींगचे संरचनात्मक लेखापरीक्षण तातडीने करून घ्यावे असे सूचित करतानाच होर्डींगला स्थानिक नियोजन प्राधिकरणाची परवानगी घ्यायला हवी अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.एमआयडीसी क्षेत्रातील नालेसफाईवर संबंधित विभाग अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लक्ष द्यावे व ती पूर्ण करून घ्यावी असे निर्देशित करण्यासोबतच आयुक्तांनी एमआयडीसी क्षेत्रात रस्त्याच्या कडेला पडलेले डेब्रीज ड्रेनेजमध्ये येऊन पाणी तुंबण्याची घटना घडणार नाही याकडे प्राधिकरणाने लक्ष द्यावे असे सूचित केले. नवी मुंबईतील डेब्रीज पडण्याच्या संभाव्य स्थळांवर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करावे अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या. यावेळी पोलीस विभाग तसेच वाहतुक पोलीस विभाग यांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने वाहतुक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने आवश्यक काळजी घेणेबाबत आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागास सूचना केल्या. कालच दिघा व ऐरोली विभागातील नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर दिलेल्या सूचनांची सर्वच विभाग अधिकारी यांनी अंमलबजावणी करावी व तातडीने नालेसफाई पूर्ण करून घ्यावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी देत प्रत्येक ठिकाणी विभाग अधिकारी यांनी स्वत: भेट देत प्रत्यक्ष पाहणी करावी व काम झाल्याची खातरजमा करून घ्यावी असे निर्देश दिले. या सर्व कामांवर त्रयस्थ परीक्षण असावे यादृष्टीने आठही विभागांसाठी नोडल अधिकारी म्हणून नेमलेल्या विभागप्रमुख दर्जाच्या अधिका-यांसोबत ३ अधिकारी, कर्मचारी देऊन या पथकाने नेमून दिलेल्या विभागातील नाले व गटार सफाई, स्वच्छता, रस्त्यांची स्थिती अशा बाबींची काटेकोर तपासणी करून कामे व्यवस्थित झाल्याची खात्री करून घ्यावी आणि तशा प्रकारचा अहवाल द्यावा असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणे असून त्यांनी परस्पर समन्वय राखून पावसाळा कालावधीत काम करावे व महानगरपालिका मुख्यालयातील तात्काळ कृती केंद्राशी संपर्कात राहून काम करावे अशा सूचना नमुंमपा आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.कैलास शिंदे यांनी देत नागरिकांनी अडचणीच्या प्रसंगी २७५६७०६० / २७५६७०६१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

त्यांची नार्को टेस्ट करून कॉल डिटेल्स चेक करा – उमेश पाटील

अंजली दमानिया यांचा ‘बोलविता धनी’ कोण आहे हे समजण्यासाठी मुंबई : अंजली दमानिया या सुपारी घेऊन आमचे नेते अजितदादा पवार यांच्यामागे लागल्या असून त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे समजण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करून कॉल डिटेल्स चेक करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सरकारकडे पत्रकार परिषदेत केली. पुणे कल्याणीनगर येथे घडलेल्या अपघात प्रकरणी अंजली दमानिया यांनी अजितदादा पवार यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती यावर बोलताना उमेश पाटील यांनी अंजली दमानिया यांच्यावर जोरदार टीका केली. पुण्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे यात वादच नाही. या घटनेने सर्वांचे मन हेलावून सोडले आहे. या घटनेची योग्य पध्दतीने कारवाई होताना आपण पहात आहोत. या घटनेतील अपराध्यांना मदत करणार्‍या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. दोन डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे. संपूर्ण प्रकरणात मुलाला, वडिलांना आणि आजोबांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र याप्रकरणात जाणीवपूर्वक आमच्या नेत्यांना सुपारी घेऊन टार्गेट करण्याचा उद्योग काही लोकांनी चालवला आहे अशी जोरदार टीका उमेश पाटील यांनी केली. राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने अजितदादा पवार मंत्रालयात बैठक घेत होते तर काही लोक जम्मू – काश्मीरमध्ये श्रमपरिहार करण्यासाठी गेले आहेत. मतदान संपताच दुसर्‍या दिवशी अजितदादा पवार मंत्रालयात येऊन काम करत होते. मात्र अंजली दमानिया अजितदादा कामाचा आव आणतात असे बोलत आहेत. अहो, तुमच्यासारखा समाजसेवेचा आव आणत नाहीत. ३५ वर्षे झाली हा महाराष्ट्र पहातोय अजितदादा पवार सकाळी सहा वाजता उठून लोकांच्या कामांसाठी उपलब्ध असतात म्हणूनच लाखो मतांनी लोक त्यांना निवडून देतात. तुम्हाला कुणी निवडून दिले आहे का? तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये कधी निवडून आला आहात का? एखादी निवडणूक लढवून लोक किती तुमच्या पाठीशी आहेत हे तपासून का घेत नाही असे अनेक सवाल उमेश पाटील यांनी अंजली दमानिया यांना केले. अजितदादा पवार यांच्यावर आरोप करणार्‍या अंजली दमानिया यांच्याकडे पुरावे आहेत का? पुण्याच्या कमिशनरला पालकमंत्री म्हणून त्यांनी विचारणा करायची नाही का? की अजितदादांनी अंजली दमानिया यांना विचारुन कॉल करायचा होता? तुमच्यासारख्या मिडियासॅव्ही असलेल्या व्यक्तीला ती गरज आहे. काम करणाऱ्या व्यक्तीला मिडिया आहे की नाही याच्याशी घेणेदेणे नसते असेही उमेश पाटील यांनी ठणकावून सांगितले. अंजली दमानिया राज्यात ज्या अनेक घटना घडल्या त्या घटनांबद्दल खरंच संवेदनशील आहेत का? की फक्त पुणे घटनेवर त्यांनी कुणाची सुपारी घेतली आहे हे जाहीर करावे असे स्पष्ट आव्हान उमेश पाटील यांनी दिले. मनुस्मृती ही प्रतिगामी असलेली विचारधारा आम्हाला मान्य नाही. परंतु ज्या पद्धतीची नौटंकी जितेंद्र आव्हाड करत आहेत. त्यांचा मनाचे श्लोक, भगवद्गीता यापैकी नेमका कशाला विरोध आहे. मनुस्मृतीला की, भगवद्गीतेला विरोध आहे की, समर्थ रामदासांना विरोध आहे. जितेंद्र आव्हाड यांचा समर्थ रामदासांना विरोध आहे असा थेट हल्लाबोल उमेश पाटील यांनी केला. शालेय शिक्षणात मुल्यशिक्षणाला महत्व आहे. मुल्यशिक्षणाचे गांभीर्य पुण्यातील दुर्घटनेवरुन लक्षात येते.भगवद्गीतेचा समावेश शालेय शिक्षणात आला तर जितेंद्र आव्हाड यांना काय आक्षेप आहे. मनाच्या श्लोकातून मुलांवर संस्कार होणार असतील तर त्यावर जितेंद्र आव्हाड यांचा आक्षेप आहे का? चातुर्वर्ण्य व्यवस्था जी आहे ती मनुस्मृतीमध्ये स्वीकारली गेली त्याला विरोध असणे समजू शकतो त्याला आमचाही विरोध आहे. आमचे सरकार असेपर्यंत ते कुठल्याही अभ्यासक्रमात समाविष्ट करु दिले जाणार नाही असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले. सरकारकडून सूचना आणि हरकती मागविल्या गेल्या आहेत. एखादा निर्णय थेट होत नाही. याबाबत जितेंद्र आव्हाड आपण सरकारला पत्र लिहिले आहे का? की फक्त स्टंटबाजी करण्यासाठी मनुस्मृती जाळण्याचा उद्योग तुम्ही करत आहात. मनुस्मृती जाळली म्हणून तुम्ही पुरोगामी होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हा  मनापासून आत्मसात आहे त्याला प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही असा टोलाही उमेश पाटील यांनी लगावला.

मुख्यमंत्री शिंदेंची राऊतांना नोटीस

मुंबई :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून अवमानप्रकरणी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी सामना दैनिकात रोखठोक या सदरात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…

पुणे अपघात चौकशी अहवाल ; डॉ. तावरे, डॉ. हाळनोर निलंबित

ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना सक्तीची रजा मुंबई : पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी महाराष्ट्र शासनाने ससून रुग्णालयातील गैरप्रकाराबाबत नेमलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालानुसार…

यंदा सरासरीपेक्षा 106 टक्के अधिक पाऊस

मुंबई : दिल्लीत शंभर वर्षातील विक्रमी तापमानाची नोंद होत असताना इकडे मुंबईकराना खुषखबर आहे. येत्या १० किंवा ११ जूनला मुंबईत पावसाची सुरुवात होणार असून १५ जूनपासून मान्सून महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला…

मध्य रेल्वेचा प्रवास टाळा!

ठाणे स्थानकावर ६२ तासांचा ब्लॉक मुंबई : येत्या विकएण्डला मध्ये रेल्वेने प्रवास करण्याचा प्लान असेल तर तो टाळा. मध्ये रेल्वेच्या ठाणे स्थानकावर शुक्रवारी ३० मे च्या मध्य रात्रीपासून तब्बल ६२ तासांचा ब्लॉक घेण्यात…

दोन महिन्यांतच कोस्टल रोडची दुरावस्था कशी झाली? प्रा. वर्षा गायकवाड

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे महाभ्रष्ट युती सरकारची पोलखोल, सरकारला फक्त इव्हेंटबाजीतच रस. मुंबई : मुंबईच्या विकासात महत्वाचा असलेल्या कोस्टल रोडच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे पहिल्याच पावसाळ्यात उघड झाले आहे. करोडो रुपयांच्या कोस्टल रोडचे दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झाले असून इतक्या लवकर दुरावस्था कशी काय झाली? हे कसले दर्जेदार काम याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला द्यावेच लागेल, असा प्रश्न विचारून बोगद्यात लागलेल्या गळतीची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. कोस्टल रोड प्रश्नी शिंदे-भाजपा सरकारवर हल्लाबोल करत वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की,  पावसाळा अजून सुरू ही झाला नाही आणि कोस्टल रोडच्या बोगद्यात गळती लागली असून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपू लागले आहे. पावसाळ्यात काय होईल कोणास ठाऊक? आधी अतिशय मंद गतीनं काम करायचे, कामाचा खर्च वाढवायचा आणि नंतर निवडणुका तोंडावर आल्या की कामांचे श्रेय लाटण्यासाठी घाईगडबडीने अर्धवट झालेल्या प्रकल्पाचे उद्घाटन करायचे, जनतेशी केलेल्या या चेष्टेचे उत्तर शिंदे सरकारला द्यावेच लागेल. महायुती सरकारने या प्रकल्पाच्या कामात दिरंगाई केली, त्यामुळे प्रकल्पाचा खर्चही वाढला. जनतेचा एवढा पैसा अक्षरशः पाण्यात वाहून गेल्यासारखा आहे. याची जबाबदारी मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली पाहिजे. गळतीबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्न विचारला असता त्यांनी तांत्रिक कारणे पुढे केले पण ही सारवासारव व सबब खपवून घेतली जाणार नाही. जनतेच्या पैशाने उभारलेल्या प्रकल्पाचे सुरक्षेच्या अनुषंगाने सर्वच बाबींची खबरदारी घेऊन दर्जेदार काम झाले पाहिजे. अशा पद्धतीच्या हलगर्जीपणामुळे जनतेचे जीव धोक्यात येऊ शकतात. काँग्रेसच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या कोस्टल रोडचे श्रेय लाटण्यासाठी अर्धवट अवस्थेतील रस्त्याचे उद्घाटन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आले. जर प्रकल्पांचे श्रेय लाटण्याची हौस आहे तर त्या प्रकल्पांतील त्रुटींची जबाबदारी देखील घ्यायला शिकले पाहिजे. पण महायुती सरकार फक्त इव्हेंटबाजी करण्यातच माहिर आहे. कोस्टल रोडलाही भ्रष्टाचाराची कीड लागलेली असून निकृष्ट कामामुळे या महाभ्रष्ट युती सरकारची पोलखोल केली आहे असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

मेट्रोमधुन सहा महिन्यामध्ये १९ लाख ६२ हजार प्रवाशांनी केला प्रवास

नवी मुंबई  : नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांत मेट्रोतून १९ लाख ६२ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रवास केला आहे. नवी मुंबई मेट्रोच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.…

घणसोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवीमुंबई: नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय ‌घणसोली कार्यक्षेत्रात से.15 येथील पामबीच रोड लगत साईबाबा मंदिर, जवळील मोकळया जागेवर विनापरवानगी अनधिकृतपणे साधारणत: 25 पत्र्याच्या झोपडया उभारण्यात आल्या होत्या. या  ठिकाणी अवैधरित्या उभारण्यात आलेल्या सर्व झोपडयांवर अतिक्रमण विभाग, घणसोली विभाग कार्यालय यांचेकडून  मोहीमे राबवत सर्व झोपडया निष्कासित करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार आयोजित या मोहिमेमध्ये 01 जे.सी.बी., 04 कामगार  यांचा समावेश होता. ही धडक मोहिम अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली, घणसोली विभागाचे सहा. आयुक्त श्री. संजय तायडे व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहयोगाने राबविण्यात आली. यापुढील काळातही अशा प्रकारची तीव्र कारवाई करण्यात येणार आहे.

…तर पत्रकार सन्मान योजनेपासून  वंचित पत्रकरांची आघाडी होईल

योगेश वसंत त्रिवेदी यांची टीका मुंबई : देवेंद्र फडणवीस हे  शिवसेना भाजप युती सरकारचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी १ ऑगस्ट २०१९ साली राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरु केली. ही योजना अतीशय चांगली आहे. परंतु पत्रकारिता आणि प्रशासन यातील झारीतल्या शुक्राचार्यांमुळे या योजनेचा असंख्य पत्रकारांना अद्यापही लाभ मिळू शकलेला नाही. ज्येष्ठ पत्रकारांनी सरकारी जाचक अटींच्या तिरडीवरुनच सरणावर जायचे काय ? राज्य अधिस्वीकृती समितीने २०१६ साली ५८ वर्षे वय आणि २५ वर्षांचा अनुभव असा ठराव मंजूर केला परंतु त्याचा शासन निर्णय (जीआर) आठ वर्षे होऊनही निघालेला नाही. ९ मे २०२३ ला मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यक्रमात आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेची रक्कम मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री. प्रमोद डोईफोडे यांच्या मागणीवरून अकरा हजारावरुन वीस हजार रुपये करण्याची घोषणा केली. या घोषणेला एक वर्ष पूर्ण झाले. पत्रकारांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मार्च २०२४ रोजी शासन निर्णय जारी केला परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. ज्येष्ठ पत्रकारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अनेक पत्रकार चरितार्थ चालवू शकत नाहीत. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या पत्रकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. असेच जर सुरु राहिले तर सन्मान योजना न मिळणाऱ्या पत्रकारांची वंचित आघाडी निघायला वेळ लागणार नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी ठणकावले. मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांच्या मेळाव्यात योगेश त्रिवेदी यांनी ज्येष्ठ पत्रकारांची व्यथा कळकळीने मांडतांना सांगितले की, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेबाबत सविस्तर पत्र दिले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ ही ऐंशी वर्षे जुनी नोंदणीकृत संस्था असून अध्यक्षांनी लोकसभेच्या निकालानंतर तातडीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेपासून वंचित राहिलेल्या पत्रकार संघ सदस्यांची अधिस्वीकृती पत्रिका, आधार कार्ड च्या प्रती घेऊन अध्यक्षांच्या पत्रासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना साकडे घालावे आणि वंचित राहिलेल्या पत्रकारांना आयुष्याच्या संध्याकाळी सन्मानपूर्वक सन्मान योजनेचा लाभ मिळवून द्यावा. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, सरचिटणीस संदीप चव्हाण, सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण शिदोरे, मधुकर भावे, नीला उपाध्ये, डॉ. सुकृत खांडेकर, राही भिडे, देवदास मटाले, विलास मुकादम, प्रदीप वर्मा, प्रभाकर राणे, अनंत मोरे, विजयकुमार बांदल, अनिकेत जोशी, उदय तानपाठक, दिनेश गुणे, सदानंद खोपकर, किरीट मनोहर गोरे, प्रा. हेमंत सामंत, विष्णु सोनावणे, मिलिंद कोकजे, घनःश्याम भडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.