Category: मुंबई

Mumbai news

दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य वाहन व्यवस्था

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय मोफत प्रवासासाठी समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी या सेवेचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच ८५ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांच्या सोई-सुविधांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच ८५ पेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर सोई-सुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब विचारात घेऊन जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी मतदारसंघनिहाय समन्वय अधिकारी दिव्यांग मतदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राणीबागेत दुर्मिळ झाडांचा बीएनएचएसकडून शोध

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात अनेक दुर्मिळ झाडांच्या प्रजाती आहेत. या प्रजातींची ओळख बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) नुकतीच केली आहे. बीएनएचएस ही संस्था नैसर्गिक वारशाचा अभ्यास, संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या ‘ट्री वॉक’ या उपक्रमामधून अनेक दुर्मिळ प्रजातींची ओळख पटल्याचा आनंद झाल्याचे बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे यांना सांगितले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या भारतातील प्रमुख वन्यजीव संशोधन संवर्धन संस्थेच्या माध्यमातून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात नुकताच ट्री वॉक हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम बीएनएचएस सदस्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने बागेतील समृद्ध फुलांची विविधता पाहण्याची अनोखी संधी सदस्यांना उपलब्ध झाली. बीएनएचएसच्या सदस्यांनी बागेचे निरीक्षण केले असता, तेथे त्यांना विविध प्रकारच्या देशी आणि विदेशी झाडांच्या प्रजाती नजरेस पडल्या. प्रत्येक झाडाची स्वतःची अनोखी कथा आणि महत्त्व आहे. ट्री वॉकचे नेतृत्व सेंट झेवियर कॉलेजमधील सहायक प्राध्यापक डॉ. राजदेव सिंग आणि निवृत्त प्राध्यापक मानेक मिस्त्री यांनी केले. प्रो. सेंट झेवियर कॉलेज, स्वीडल सेरेजो, बीएनएचएस प्रोग्राम्स विभागातील वनस्पतीशास्त्रज्ञ आणि शिक्षक आसिफ खान यांनी सांगितले की, आमच्या राणीबाग येथील ट्री वॉकला मिळालेला प्रतिसाद पाहून आम्हाला आनंद झाला, बीएनएचएस ट्री वॉक मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात आणि आजूबाजूला अशा निसर्गभ्रमणाद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा उद्देश आहे. उपक्रमात १७ सदस्यांचा सहभाग राणी बागेच्या प्रवेशद्वारावरील जुन्या बाओबाब ट्री येथून झाडांचे निरीक्षण करत बीएनएचएसच्या १७ सदस्यांनी ‘ट्री वॉक’ला सुरुवात केली. सदस्यांना मॅजेस्टिक हेवन लोटस ट्री, कॅन्डल ट्री, प्राईड ऑफ इंडिया ट्री, वीपिंग पेपरबर्क, एलिफंट ॲपल आणि अगदी चॉकलेट किंवा कोकाओ ट्रीसारखी अनेक दुर्मिळ झाडे दिसली.

नवमतदारांचा कल नोटाकडे

मुंबई : राज्यात पक्षामधील फाटाफूट, बदलत्या वैचारिक, राजकीय भूमिका यामुळे झालेला वैचारिक गोंधळ हा १८ ते २३ या वयोगटातील नवमतदारांच्या पचनी पडलेला दिसत नाही. केवळ राजकीय स्वार्थासाठी होत असलेले पक्षांतर, काही क्षणात बदलेल्या वैचारिक भूमिका हे राज्यासाठी काही नवीन नाही. मात्र हा राजकीय गोंधळ तरुणाईच्या समजण्याच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे यावेळी मतदान करायचे, पण ते ‘नोटा’ला करू, अशा भावना या नवमतदारांकडून व्यक्त होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यात ३० हजार आणि उपनगर जिल्ह्यात सुमारे ८० हजार नवमतदारांच्या नावांची नोंदणी झाली आहे. पहिल्यांदा मतदान करणारा हा तरुण वर्ग मतदानासाठी उत्साही आहे. तसेच निवडणूक आयोगही नवमतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे म्हणून शाळा-कॉलेज, सोशल मीडियातून आवाहन करत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या या नवख्या मतदारांना राज्यात गेल्या दोन वर्षांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फाटाफूट फारशी भावली नाही. नवमतदारांच्या बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवत आहे. मुंबईत तर एकाच पक्षातील सहकारी असलेले एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षांऐवजी ‘नोटा’ ला मतदान करत आपली नाराजी दाखवण्याची मानसिकता या तरुणांची असल्याचे दिसत आहे. नाराजीचे प्रतिबिंब आपल्या पसंतीचा उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्यास कोणाला मतदान करायचा, असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहायचा. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने ‘नन ऑफ द अबाव्ह’ (नोटा) म्हणजेच वरीलपैकी कोणीही नाही, हा पर्याय दिला होता. त्यामुळे अनेक मतदार हा पर्याय निवडताना दिसतात. दरम्यान, नोटाला मिळालेली मते कुठेही ग्राह्य धरली जात नसली तरी मतदारांना नाराजी व्यक्त करण्याचा एक ठोस पर्याय आहे. यंदा २०१९ च्या तुलनेत नोटाला जास्त मते मिळतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.

‘मतदान हीच आपली ताकद, हीच आपली जबाबदारी !’

कलर्स मराठीच्या लोगोमध्ये बदल .. कलाकारांनी व्हिडिओंद्वारे मतदारांना केले आवाहन मुंबई : कलर्स मराठी वाहिनीने नुकताच आपल्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब लोगोमध्ये बदल केलेला दिसत आहे. बदललेल्या नव्या लोगोमध्ये एका बोटावर शाई लागलेली दिसतेय, ज्यामुळे मत दिल्याचे सूचित होत आहे. मागील काही वर्षात मतदानाचा टक्का फार कमी झाला आहे. या नव्या लोगोच्या बदलामुळे लोकांमध्ये मतदानाचे महत्त्व आणि एक स्थिर देशासाठी त्याची आवश्यकता याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा कलर्स मराठीचा उद्देश आहे. कलर्स मराठीने नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक कार्यात आपले योगदान दिले आहे. नुकतेच कलर्स मराठीच्या कलाकारांनी इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवरून विविध व्हिडिओंद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदान करण्यासाठी बाहेर या , वोटिंग करणे हा तुमचा हक्क आणि जबाबदारी आहे. देशासाठी एक पाऊल उचलून मतदान करा. आपल्या एका मताने देशाचे कल्याण होईल. मतदार हे टीव्ही आणि सोशल मीडियाचा वापर अधिक प्रमाणात करतात, हीच गोष्ट लक्षात घेऊन कलर्स मराठीने हे स्तुत्य पाऊल उचलले आहे. कलर्स मराठीने केलेला हा बदल प्रेक्षकांना मतदान करण्याची प्रेरणा देईल आणि त्यांना मतदान करण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करेल. कारण मतदान हीच आपली ताकद, हीच आपली जबाबदारी!

मुंबईतील सामान्य माणसाचे घर तोडणारे अधिकारी अनधिकृत होर्डींग का तोडत नाहीत

रमेश औताडे मुंबई : भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अधिकाऱ्यांना श्रीमंतांची अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत. मुंबईतील सामान्य माणसाचे घर तोडणारे अधिकारी अनधिकृत होर्डींग का तोडत नाहीत ? असा सवाल मुंबईतील सामान्य नागरिक करत आहे. मुंबईतील घाटकोपर मध्ये एक विशाल बेकायदा होर्डिंग कोसळून 14 जणांना आपल्या जीव गमवावा लागला. तर या घटनेत 88 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.या पार्श्वभूमीवर या घटनेसाठी भावेश भिंडे नावाची व्यक्ती जबाबदार असल्याची माहिती समोर आली आहे. भावेश भिंडे हा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या होर्डिंग कंपनी आणि जाहिरात एजन्सीचा मालक आहे. मुंबई महापालिकेने या कंपनीला नोटीस बजावली आहे. 10 दिवसांच्या आत परिसरातील चार बेकायदेशीर होर्डिंग हटवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मुंबईतील 24 नागरी प्रभागांमधील कोणत्याही होर्डिंगसाठी परवाना रद्द केला जाईल असंही सांगण्यात आलं आहे. जे होर्डिंग कोसळलं ते गृह विभाग आणि महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळाच्या मालकीच्या जमिनीवर मुंबई महानगर पालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आले होते. सोमवारी मुंबईसह उपनगरात वादळी वारा आणि अवकाळी पावसाने घाटकोपरच्या छेडा नगर जिमखाना, रिक्रिएशन सेंटर ३, येथील अंदाजे १२० x १२० फुट होर्डिंग्स जमिनीतून उन्मळून जवळच असणा-या पेट्रोल पंपच्या छतावर  कोसळलं . त्यावेळी जवळपास १५० वाहनं पेट्रोल पंपावर उपस्थित होती, काही पावसापासून आश्रय घेण्यासाठी ते पेट्रोल पंपावर थांबले होते. काही क्षणात हे होर्डिंग्स कोसळले. जवळ असलेली वाहने आणि शंभरहून अधिक नागरिक त्याखाली सापडले. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून 88 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे एकूण पीडितांची संख्या ८८ झाली आहे. मृतांमध्ये पूर्णिश जाधव (वय 50),दिलीप पासवान (वय 34),बशीर अहमद (वय 52), फहिम खलील खान (वय 22),हंसनाथ गुप्ता (वय 71),सतीश सिंह (वय 52),चंद्रमनी प्रजापती (वय 45),महंमद अक्रम (वय 48),भारत राठोड (वय 24),दिनेशकुमार जैस्वार( वय 44),सचिन महेशकुमार यादव (वय 23) अशी या बारा जणांची नावे असून अन्य दोघांची अद्यापही ओळख पटलेली नाही. दुर्घटनास्थळी चार होर्डिंग्स होते. यासाठी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र होर्डिंग्ज उभारण्यापूर्वी बीएमसीची कोणतीही परवानगी रेल्वेकडून घेण्यात आली नव्हती.अशी माहिती समोर आली आहे. बीएमसी जास्तीत जास्त ४० x ४० चौरस फूट होर्डिंग उभारण्याची परवानगी देते मात्र, कोसळलेले होर्डिंग १२० x १२० चौरस फूट आकाराचे होते. सध्या बीएमसी एन वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांनी एजन्सीला बीएमसीची वैध परवानगी नसल्याबद्दल त्यांचे सर्व होर्डिंग तातडीने काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे. तसंच पोलिसांकडून भावेश भिंडेंचा शोध घेतला जात आहे असे परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणांसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

नवी मुंबई : खरीप हंगामात शेतक-यांना बियाणे, खते व किटकनाशके आदींबाबत उदभवणा-या अडचणींचे निराकरण व्हावे, तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने कृषि विभागामार्फत विभाग व प्रत्येक जिल्हास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्ष सुरु झाला आहे. अशी माहिती ठाण्याचे कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी दिली. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे  बियाणे, खते, किटकनाशके व इतर बाबींसंदर्भात काळाबाजार दिसताच थेट नियंत्रण कक्षात तक्रार देता येणार आहे. चालू खरीप हंगामाला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. बियाणे खरेदी करण्यासाठी शेतक-यांची लगबग सुरु झाली आहे. अशावेळी शेतक-यांना खरीप हंगामावेळी येणा-या अडचणींबाबत तक्रारी करता याव्यात, यासाठी विभागास्तरावर तसेच जिल्हास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्ष स्थापन करणेत आले आहेत. सदर नियंत्रण कक्षामध्ये कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच तक्रार निवारण कक्षाचा भ्रमणध्वनी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तक्रार नोंदविल्यानंतर लगेच शेतक-यांच्या समस्येचे निराकरण केले जाणार आहे. कृषि निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिकींगबाबत असलेल्या तक्रारींचे निवारण केले जाईल.  शेतक-यांना कृषि निविष्ठांबाबत काही तक्रार असल्यास पुढे दिलेल्या निविष्ठा तक्रार निवारण कक्षांशी भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेलद्वारे संपर्क साधून तत्काळ तक्रार नोंदविण्यात यावी. जिल्हा संपर्क विभागीय कार्यालय, ठाणे ८६९१०५८०९४, toqethanediv@gmail.com, ठाणे ७०३९९४४६८९. dsaothane.2021@gmail.com,      पालघर ९४२३९८४४४३, dsaopalghar@rediffmail.com, रायगड  ९५०३९७५९३४, dsaoraigad@gmail.com, रत्नागिरी ८६६८५७२५२८ dsaortn@rediffmail.com, सिंधुदुर्ग ९४२३९२२३४६, saosindhu@gmail.com या तक्रार नियत्रंण कक्षाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ठाण्याचे कोकण विभागीय कृषि सह संचालक अंकुश माने  यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

घ्या दोनशे… बोला मनसे ; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल       

मुंबई  : घ्या दोनशे… बोला मनसे अशा शब्दात ठाकरे गटाच्या प्रवकत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे आणि मनसे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ठाण्यातील शिवसेना शिंदे गट उमेदवारांच्या एका प्रचार सभेत…

मोदींचा आज मुंबईत रोड शो

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या बुधवार दिनांक १५ मे रोजी मुंबईत भव्य रोड शो होणार आहे. मुंबईसह ठाणे आणि नाशिकमध्ये येत्या २० मे रोजी राज्यात शेवटच्या आणि पाचव्या टप्प्यासाठी मतदान…

‘नेत्यांसाठी रस्ते बंद करू नका’

मलबार हिलवासियांचा अनोखा जाहीरनामा मुख्यमंत्र्यांवर रहिवासी नाराज मुंबई : नेत्यांच्या वाहनांना जागा करून देण्यासाठी परिसरात रस्ते बंद करून नका, सह्याद्री अतिथी गृह आणि वर्षा बंगल्यावर होणाऱ्या राजकीय बैठका मंत्रायलात घ्या अशा स्वरुपाच्या मागण्या मलबार हिल येथील रहिवाशांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांमुळे परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच शिंदे यांच्याबरोबरच शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्याविरोधातही नागरिकांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांना आता ठाकरे सेनेचा उमेदवार जवळचा वाटू लागला आहे. मुंबईतील सर्वात उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मलबार हिल परिसरात मात्र वाहनतळाच्या विषयावरून नागरिक संतापले आहेत. या परिसरातील नागरिकांनी लोकसभेच्या निवडणूकीच्या तोंडावर आपला जाहीरनामा तयार केला आहे. या जाहीरनाम्यात मलबार परिसरातील विविध प्रश्नांसंबंधी मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पर्यावरण, प्रदूषण हे विषय मुख्यत्वे घेण्यात आले असून त्यानंतर वाहनतळाचा मुद्दा मांडण्यात आला आहे. यामिनी जाधव यांची अनुपस्थिती दक्षिण मुंबईत महायुतीतर्फे शिंदे यांच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे अरविंद सावंत उभे आहेत. त्यामुळे शिवसेनेच्याच दोन उमेदवारांमध्ये ही लढाई होणार आहे. मलबार हिल हा परिसर भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असून त्यांना यावेळी शिवसेनेच्या दोन उमेदवारांमधून एक उमेदवार निवडावा लागणार आहे. मात्र मलबार हिलच्या रहिवाशांनी आपला जाहीरनामा देण्यासाठी यामिनी जाधव आणि सावंत यांना निमंत्रण दिले असता जाधव यांनी प्रतिसाद दिला नाही असे रहिवाशांचे म्हणणे आहे. तर अरविंद सावंत यांनी मात्र रविवारी कमला नेहरू उद्यानात रहिवाशाची भेट घेतली. त्यामुळे भाजपच्या या मतदारांमध्ये उमेदवाराबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. जाहीरनाम्यात मागण्या कोणत्या? चांगले रस्ते, पदपथ, वाहनतळाची सुविधा, मलबार हिलमधील हिरवाई टिकवावी, मलबार हिल जलाशय जतन करावे, हॅगिंग गार्डनला धक्का लावू नये, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना कठोर दंड करावा. लोकप्रतिनिधींच्या निधीचा वापर सोयीसुविधांसाठी करावा, सुशोभिकरणासाठी नको. पाणी, रस्ते, कचऱ्याच्या तक्रारींसाठी ऑनलाईन सुविधा हवी.

छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

नवी मुंबई : शौर्य आणि पराक्रमाचे प्रतिक असलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे संपन्न झालेल्या प्रतिमापूजन प्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, प्रशासकीय अधिकारी श्री. उत्तम खरात आणि इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.