Category: ठाणे

Thane news

इनर व्हील क्लब ऑफ कल्याणतर्फे आयोजित “साडी वॉकाथॉन”ला महिलांचा उत्साह 

इनर व्हील क्लब ऑफ कल्याणतर्फे आयोजित “साडी वॉकाथॉन”ला महिलांचा उत्साह कल्याण: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त इनर व्हील क्लब ऑफ कल्याणतर्फे आयोजित करण्यात आलेली “साडी वॉकाथॉन” मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली. महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देत आरोग्य, एकता आणि आपल्या संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या वॉकाथॉनचे उद्घाटन महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित नगरसेवक विजया पोटे, ज्योती पाटील, गणेश जाधव, शालिनी वायले आणि डॉ. तनुजा वायले यांचा सत्कार करण्यात आला. या वॉकाथॉनमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी साडी परिधान करून उत्साहाने सहभाग नोंदवला. विविध गटांमधील सहभागी महिलांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सहभागींचा उत्साह आणि सकारात्मक प्रतिसाद यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इनर व्हील क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्षा दिप्ती दिवडकर, सचिव ॲड. सुषमा पटेल, माजी अध्यक्षा साची कदम, ॲड. नीता कदम, ॲड. अर्चना सबनीस, सविता जरपडे तसेच क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. साडी परिधान करून चालण्याच्या या अनोख्या संकल्पनेतून महिला सशक्तीकरणासोबतच भारतीय संस्कृतीचा अभिमान जपण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.

किल्ले माऊली, नवतरुण, जय भारत महिलांत, तर छत्रपती शिवाजी, स्वामी विवेकानंद पुरुषांत तिसऱ्या फेरीत.

ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी कबड्डी स्पर्धा – २०२६ किल्ले माऊली, नवतरुण, जय भारत महिलांत, तर छत्रपती शिवाजी, स्वामी विवेकानंद पुरुषांत तिसऱ्या फेरीत. ठाणे : ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत किल्ले माऊली, नवतरुण, जय भारत यांनी महिलांत, तर छत्रपती शिवाजी, स्वामी विवेकानंद यांनी पुरुषांत तिसरी फेरी गाठली. कळवा, खारेगाव, ठाणे(प.) येथील  खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कुलच्या समोरील मैदानात आज पासून सुरु झालेल्या महिलांच्या दुसऱ्या फेरीत किल्ले माऊली संघाने राहुल मंडळावर ५५-१८ अशी सहज मात केली. सुरुवातीलाच २ लोण देत किल्ले माऊलीने पूर्वार्धात २९-११ असे वर्चस्व राखले. उत्तरार्धात आणखी २ लोण देत गुणांचे अर्धशतक पार केले. मयुरी जोशी, मयुरी शेलार, संजना विशे यांच्या चढाई पकडीच्या झंझावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. दुसऱ्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात नव तरुण मंडळाने मध्यंतरातील ०८-१३ अशा पीछाडीवरून शिवतेज संघाला २५-२४ असे चकवीत आगेकूच केली. वैभवी कासार, रिबीका गावीत यांनी आक्रमक खेळ करीत शिवतेजला विश्रांतीला आघाडी दिली होती. पण विश्रांतीनंतर नव तरुण संघाच्या संयमी यादव, भाविका यांनी तुफानी खेळ करीत संघाला तिसरी फेरी गाठवून दिली. महिलांच्या शेवटच्या सामन्यात जय भारतने स्व. राकेशदादा म्हात्रे संघाचा ४५-२० असा पराभव करीत तिसरी फेरी गाठली. पुरुषांच्या दुसऱ्या फेरीत छत्रपती शिवाजी महाराज संघाने नवरत्न मंडळाचा ३९-१३ असा पाडाव केला. पूर्वार्धात २५-०३ अशी आघाडी घेणाऱ्या छत्रपती शिवाजीने उत्तरार्धात सावध खेळ करीत आपला विजय साकारला. वेदान्त नायक, ओमकार मोरे, तन्मय परब यांच्या चतुरस्त्र खेळाला याचे श्रेय जाते. नवरत्नचा देवराज बने बरा खेळला. दुसऱ्या सामन्यात स्वामी विवेकानंदने राज मंडळाचा प्रतिकार २८-१२ असा संपविला. पहिल्या डावात १४-०४ अशी विवेकानंद संघाकडे आघाडी होती. यश पाटील, कुणाल पानसरे या विजयात चमकले. या स्पर्धेचे उदघाटन ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

एनबीईई स्पोर्ट्स क्लबने पटकवलं विजेतेपद

एस ४ लीजेंड्स कप २०२६ एनबीईई स्पोर्ट्स क्लबने पटकवलं विजेतेपद ठाणे – ऍडव्होकेट रमाकांत ओवळेकर यांच्या स्मरणार्थ ४५ वर्षांवरील खेळाडूंसाठी क्रिकेटची स्पर्धा ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथे सुर सुदान शौर्या स्वर संस्थेतर्फे आयोजित करण्यात आली होती. एस ४ लीजेंड्स कप २०२६ एनबीईई स्पोर्ट्स क्लबने पटकावला.  स्पर्धेत ठाणे थंडर्स, एनबीईई स्पोर्ट्स क्लब, ठाणे रोटरी टायटन्स, पीडब्लूडी, आम्ही मुलुंडकर, गरवारे क्लब, मिड सिटी सीसी डोंबिवली आणि रारा मास्टर्स असे एकूण आठ संघानी सहभाग घेतला. आयपीएल, रणजी, प्रथम श्रेणीतील खेळाडूंचा संघात समावेश होता. प्रवीण तांबे, संदीप दहाड, अमित दाणी, रॉबिन मॉरिस, अमित पागनीस, अमित वेलस्कर, मनोज जोगळेकर, आशिष महाडेश्वर, श्रेयस खानोलकर, विनोद राघवन व इतर दिग्गज खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला. एनबीईई स्पोर्ट्स क्लबने विजेते पदाचा खिताब पटकाविला. तर ठाणे थंडर्स उपविजेता ठरला. तर दुसरा उपविजेता संघ गरवारे क्लब ठरला. सामनावीर म्हणून ओजस मेहता, उत्कृष्ट फलंदाज देवा मोरे, उत्कृष्ट गोलंदाज योगेश डिचोलकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ओजस मेहता, उत्कृष्ट यष्टीरक्षक सागर जोशी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  विजेतेपदाची ट्रॉफी उषा मधुकर चांदुरकर यांनी मधुकर रामचंद्र चंद्रुकर यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली. उद्योजक व शैक्षणिक क्षेत्रातून महान व्यक्ती अश्विन वसवडा, केंद्रीय मंत्रालय उपसचिव श्री किमबहुने, आदेश चांदुरकर, किरण राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समता ओवळेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.  महिला दिनाचे औचित्य साधून समाजसेविका प्रतिभा चांदूरकर, लीना जाधव, सविता साळुंखे, शुभांगी भोर, शैला सिंह यांचा सत्कार करण्यात आला. सामनाचे आयोजन व सूत्रसंचालन संस्थेच्या सचिव नम्रता ओवळेकर राणे यांनी केले.

महिला सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील- फडणवीस

ठाणे: जागतिक महिला दिन आणि समाजसुधारक डॉ.मुत्थुलक्ष्मी रेड्डी यांच्या विधानमंडळ सदस्यत्वाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेत महिलांना अधिकाधिक संधी दिल्यास सक्षम नेतृत्व घडते, यासाठी…

महिला दिनीच नवजात बालिका वसईच्या रस्त्यावर बेवारस सापडली

    वसई : आंतरराष्ट्रीय महिला दिनी अवघं जग स्त्रिशक्तीचा जयजयकार करीत असताना वसईत आक्रीत घडले. वसई पूर्व परिसरात नवजात बालिकेला रस्त्यावर बेवारस सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांकडून  अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.…

जागतिक महिला दिनानिमित्त दिव्यात ‘नारी शक्ती सन्मान’ कार्यक्रम उत्साहात

जागतिक महिला दिनानिमित्त दिव्यात ‘नारी शक्ती सन्मान’ कार्यक्रम उत्साहात दिवा: जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे आणि ओम साई शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नारी शक्ती सन्मान’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. दिव्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. दिव्यातील महिला वकील, सीए, डॉक्टर, पत्रकार, अंगणवाडी सेविका, समाजसेविका, शाळा व्यवस्थापिका, कीर्तनकार तसेच बँक अधिकारी अशा विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कार करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमाला रोटरी ३१४२ जिल्हा सचिव विनेश नायर आणि नगरसेविका साक्षी मढवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर रोटरीच्या अध्यक्ष, प्रकल्प प्रमुख, सचिव, इतर सदस्यांच्या हस्ते महिला मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात महिलांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून ‘दुसरी मी सावित्री बोलतेय’ हे एकपात्री नाटक सादर करण्यात आले. सुप्रसिद्ध कलावंत साधना चौधरी- भरे यांनी सादर केलेल्या या नाटकाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम दिवा (पूर्व) येथील एस.एम.जी. विद्यामंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणेचे अध्यक्ष किशोर पाटील, प्रकल्प प्रमुख नंदकुमार किणे आणि सचिव स्वप्नील गायकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थीनींचे समुपदेशन

महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थीनींचे समुपदेशन कल्याण : महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे कल्याणमधील अचिव्हर्स महाविद्यालयातील विद्यार्थीनीसाठी समुपदेशन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाध्ये विद्यार्थिनींना, आत्मविश्वास आणि स्व-ओळख, किशोरावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळीबद्दल योग्य माहिती व स्वच्छता, सुरक्षितता व स्वतःचे संरक्षण,चांगला स्पर्श – वाईट स्पर्श, ऑनलाइन सुरक्षितता, ‘नाही’ म्हणण्याचे धाडस, शिक्षणाचे महत्त्व व करिअर स्वप्ने, डिजिटल जगात जबाबदारी, सोशल मीडिया वापराचे फायदे-तोटे, सायबर बुलिंग ओळखणे, ड्रग व त्याचे दुष्परिणाम अशा विविध विषयांवर मानसशास्त्रज्ञ प्रोजेक्ट डायरेक्टर आरती बनसोडे यांनी सुंदर प्रकारे मार्गदर्शन केले . यावेळी समाज विकास विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड, समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर, वूमन्स वेलफेअर फाऊंडेशनच्या संचालिका मिनाक्षी उज्जैनकर, अचिव्हर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.  महेश भिवंडीकर, रेखा भिवंडीकर, सना खान, सिद्धी चव्हाण,वूमन्स वेलफेअर फाऊंडेशन टीम विनिता माने, स्वाती डोलारे, कृतीका मोरे, रुतीका दामले, अमृता गायकवाड, ज्योत्स्ना हांडे, हर्षिला नरवडे, वैष्णवी लोखंडे उपस्थित होते.

रणरागिणी मॅरेथॉन स्पर्धेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रणरागिणी मॅरेथॉन स्पर्धेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण रनर्स ग्रुप आणि वैष्णवी मॅटर्निटी होम आयोजित१०, ५ व ३ किमीच्या “रणरागिणी मॅरेथॉन स्पर्धेस” महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत सुमारे साडेसातशे महिलांनी या रणरागिणी स्पर्धेत सहभाग घेत रणरागिणी हे नाव सार्थ ठरविले. इतकेच नव्हे तर बेस्ट थीम या कॅटेगरीअंतर्गत स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत सहभागी होऊन महिलांनी शिक्षणाचा, समतेचा संदेशही या स्पर्धेमार्फत जनमानसापर्यंत पोहोचविला. या मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. समाजातील महिला या प्रेरणास्त्रोत आहेत तसेच प्रत्येकासाठी मदतीचा स्त्रोतही आहेत, आपल्या जीवनात आपल्या कुटुंबात महिला हाच मोठा आधारस्तंभ आहेत असे संबोधत महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी वैष्णवी मॅटर्निटी होमचे डॉ. अश्विन कक्कर, ट्रायमॅटिक्स संस्थेच्या डॉ .शोभा पाटील, स्पर्धेचे सर्व प्रायोजक ,सर्व सहभागी महिला यांचे अभिनंदन केले. यावेळी अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत )प्रशांत भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली  महापालिकेच्या विद्युत विभागाने उभारलेल्या ऊर्जा संवर्धन जनजागृती कक्षास महापौर हर्षाली चौधरी व आयुक्त अभिनव गोयल यांनी भेट देऊन प्रशंसा केली आणि ऊर्जा संवर्धनाची अशी जनजागृती सुरू ठेवण्याबाबत निर्देश दिले.

बेपत्ता ओला चालकाची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

बेपत्ता ओला चालकाची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक कल्याण : चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या ओला चालकाचा मृत्यूदेह अहिल्यानगर जिल्ह्यातील ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्याची ओला कार कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोवेलीच्या जंगलात आढळून आली. या घटनेचा ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकानं तपास सुरू केला. यावेळी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आदर्श चंद्रकांत भालेराव (राहणार टिटवाळा) असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तर नासिर अहमद असं मृतदेह आढळून आलेल्या कार चालकाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक नासिर अहमद हा नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आहे. गेल्या चार दिवसापासून तो बेपत्ता असल्याची तक्रार रबाळे पोलीस ठाण्यात दाखल होती. याच घटनेचा पोलीस तपास सुरू असताना शनिवारी निसारचा मृतदेह माळशेज घाटावरील ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना आढळून आला. तर त्याची ओला कार कल्याण – मुरबाड मार्गावरील गोवेली गावच्या हद्दीतील जंगलात आढळून आली. या कारमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग दिसले आहेत. या घटनेचा तपास ठाणे ग्रामीण गुन्हे शाखा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांनी पथकासह सुरू केला. यावेळी निसारचा मृतदेह ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून आला. यानंतर तपासाची चक्रं वेगानं फिरवत आरोपी आदर्श भालेराव याला टिटवाळ्यातून गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांचा तपास सुरू असून अद्यापपर्यंत ओला चालक नासिर अहमदची हत्या ही कुठल्या कारणामुळे झाली याचं ठोस कारण उघड झालं नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती डीवायएसपी अनिल लाड यांनी दिली आहे.

 ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ ‘फटका गँग’चा उच्छाद;

ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ ‘फटका गँग’चा उच्छाद; प्रवाशांचे मोबाईल हिसकावणारा सराईत चोरटा जेरबंद कल्याण : ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात धावत्या लोकलमधून प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांचे महागडे मोबाईल चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. सुमित कमलेश सिंग (वय २७) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील नांदिवली-आडिवली भागातील गावदेवी संकुल येथे वास्तव्यास आहे. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ७० हजार रुपये किमतीचा चोरीचा मोबाईल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शैलेश नवले हे कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील निक्की नगर येथे राहतात. गुरुवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ते त्यांचे मित्र स्वप्निल भूषण यांच्यासह कल्याण रेल्वे स्थानकातून पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसच्या सामान्य डब्यातून प्रवास करत होते. गाडीमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्याने ते डब्याच्या दरवाजात उभे राहून प्रवास करत होते. ही एक्सप्रेस जेव्हा ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली, तेव्हा तिचा वेग मंदावला होता. याच संधीचा फायदा घेत रेल्वे मार्गालगत दबा धरून बसलेल्या सुमित सिंग याने हातात असलेल्या काठीने शैलेश नवले यांच्या हातावर जोराचा फटका मारला. या अचानक झालेल्या प्रहारामुळे नवले यांच्या हातातील महागडा मोबाईल रेल्वे रुळांवर पडला. एक्सप्रेसचा वेग संथ असला तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रवाशांना खाली उतरणे शक्य नव्हते. दरम्यान, आरोपीने रेल्वे रुळांवर पडलेला तो मोबाईल उचलला आणि बाजूला उभ्या असलेल्या एका मेल गाडीच्या खालून पळ काढत कचोरे व खंबाळपाडा दिशेने पळ काढला. नवले यांनी तत्काळ आपल्या पत्नीच्या मोबाईलवरून चोरीला गेलेल्या फोनचे लोकेशन तपासले असता, ते कचोरे मंदिर परिसरात असल्याचे दिसून आले. एक्सप्रेस कळवा रेल्वे स्थानकात पोहोचताच त्यांनी घाईघाईने उतरून पुन्हा डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रकाराची रीतसर तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून लोहमार्ग पोलिसांनी तातडीने पथक तयार केले आणि तक्रारदारासह घटनास्थळ गाठले. परिसराची पाहणी करत असताना पोलिसांना एक संशयास्पद तरुण फिरताना आढळला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे चोरीला गेलेला तो मौल्यवान मोबाईल सापडला. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या ‘फटका गँग’ने रेल्वे प्रवाशांना अशाच प्रकारे इतर ठिकाणीही लुटले आहे का, याचा सखोल तपास सुरू केला आहे.