Category: ठाणे

Thane news

नववधूसारखे सजले मतदान केंद्र

ठाणे : ठाण्यातील सखी मतदान केंद्र हे नववधूसारखे सजविण्यात आले होते. आकर्षक फुग्यांच्या कमानीने तर लाल, हिरवी मॅट अंथरली होती. महिला मतदारांनी सुविधांचा लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच सेल्फी पाईंटवर मतदानाचे फोटो काढले तसेच इतरांना मतदानासाठी समाजमाध्यमांवरून आवाहन केले. एकंदर सखी मतदान केंद्रावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मतदान केंद्रावर ‘सुस्वागतम्’ असे लिहिलेल्या कमानी उभारल्या होत्या. महिलांसाठी बैठक व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. महिला कर्मचारी मतदानासाठी येणाऱ्या महिलांचे स्वागत करत होत्या. सेल्फी पॉईंटची खास सुविधा उभारली होती. त्यावर आम्ही ‘मी मतदान केलं तुम्ही केलं का?’, असे वाक्य ठळकपणे लिहिले गेले होते. सेल्फी काऊंटर फुग्यांनी सजविले होते. मतदानावेळी असुविधा होऊ नये, याची विशेष खबरदारीदेखील घेण्यात आली होती. तर काही केंद्रांवरील असुविधांबद्दल मतदारांनी नाराजी व्यक्त केली. ओवळा माजिवड्यात मतदान केंद्र क्र. ३३२ येथे युवा मतदार केंद्रात सेल्फी स्टॅन्ड उपलब्ध नव्हता. तर ओवळा माजिवड्यात मतदान केंद्र क्र. ४३९ या ठिकाणी मतदारांनी गर्दी केली आहे; मात्र पिण्यासाठी पाणी व पंख्याची सोय नसल्याने गर्मीने काही मतदार वैतागून मत न देता मागे फिरल्याचे चित्र दिसले. गुलाबी वस्त्र परिधान महिलांना निर्भय मतदान करता यावे, यासाठी सखी मतदान केंद्रांची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे होती. मतदान केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंतचे संपूर्ण कामकाज महिलांनी सांभाळले. दिवसभर येथील मतदान केंद्राचे वातावरण उत्साहपूर्ण होते. सखी या केंद्रावरील कर्मचारी महिलांनी खास गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केले होते.

‘मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..’

मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला! डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानास सुरवात झाली. सकाळपासून मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडेल आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मतदारांची मतदान यादीत नावच सापडत नसल्याने गोंधळाचे वातावरण पहायला मिळाले. उन्हाच्या तीव्र झळा, त्यात नाव भेटत नसल्याने नागरिक हैराण होते. मतदान केलं नाही तर पगार कापला जाण्याची भीती, तसेच काहींचे पहिलेच मतदान असून त्यांना ते करता न आल्याने मतदारांचा हिरमोड झाल्याचे पहायला मिळाले. कल्याण मतदारसंघाच्या अंतर्गत कल्याण ग्रामीण, डोंबिवली मतदान केंद्रावर (Dombivli Polling Station) मतदार यादीत नाव नसल्याने गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. मतदार याद्यांचा घोळ पाहता भर उन्हात लोक मतदानासाठी बाहेर पडले. नाव सापडत नसल्याने मतदार गोंधळून गेले आहेत. राजकीय पक्ष, नगरसेवक यांनी मतदारांची नावे शोधण्यासाठी बुथ लावले आहेत. दुपारच्या वेळी मतदारसंघात मतदान केंद्राऐवजी राजकीय पक्षाच्या बुथवर मतदारांची झुंबड उडाली होती. मात्र, नाव न सापडत नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून 5 वर्षे सतत काम केले पाहिजे. तरच हा गोंधळ पुढे होणार नाही, अशी मागणी शिवसेनेचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी केली. पगार कापला जाण्याची भीती विशेष म्हणजे, मतदान न केल्यास तीन दिवसांचा पगार कापला जाणार असल्याची नोटीस कर्मचाऱ्यांना दिलेली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांची यादीत नावेच नसल्याने हे मतदार रडकुंडीला आले आहेत. आम्हाला कोणीतरी मतदार यादीत नाव नाहीये इतकं तरी लिहून द्यावं, अशी याचना ते करत आहेत. आमचा हक्क आहे, आम्हाला आजच मतदान करायचं आहे, अन्यथा आमचा पगार कापला जाईल, त्याची जबाबदारी कोण घेईल? असा प्रश्न नोकरदार करत होते. आमच्या घरात एकूण 9 ते 10 मतदार आहेत. यातील 2 जणांची केवळ नाव मतदार यादीत आली. बाकी सर्वांची नावे नाहीत. आम्हाला के.सी.गांधी येथे जाऊन 17 नंबरचा फॉर्म भरून घेऊन या, मग मतदान करता येईल असं सांगितलं. तिथे गेल्यावर असा कोणता फॉर्म नाही तुम्हाला मतदान करता येणार नाही असं सांगितलं गेलं. माझे वडील 85 वर्षाचे आहेत. दरवेळी ते मतदान करतात. आताच नाव कसे त्यांचे कट झाले. म्हणजे आम्ही मतदान करायचंच नाही का? असा सवाल डोंबिवलीतील राहुल पाटील यांनी उपस्थित केला.

ऐन मतदानाच्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक रविवारच्या वेळापत्रकाने

ठाणे: लोकसभा निवडणुकीचे मतदान असल्याने मतदार मतदानासाठी बाहेर उतरला असतानाच मध्य रेल्वेने मतदानाच्या दिवशी रेल्वेची वाहतूक सुट्टीच्या वेळापत्रकाने सुरू केली आहे. पूर्वी मुंबईत राहणारे अनेक रहिवासी ठाणे किंवा त्यापल्याड राहण्यास गेले आहेत. परंतु त्यांचे मतदान मुंबई तसेच उपनगरात असते. परंतु मध्य रेल्वेचे वेळापत्रक रविवारच्या दिवसाचे असल्याने या मतदारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आजपासून सुरू झाले आहे. मतदानाच्या दिवशी नागरिकांना मतदान करता यावे यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आले आहे. असे असले तरीही काही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामानिमित्त बाहेर पडावे लागत असते. तसेच गेल्या काही वर्षांपासून मुंबई तसेच उपनगरात राहणारा मतदार पुनर्विकास तसेच राहण्यास स्वस्त पर्याय म्हणून ठाणेपल्याड राहण्यासाठी गेला आहे. यातील अनेकांचे मतदान हे त्यांच्या पूर्वीच्या वास्तव्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे हे मतदार देखील मतदानाच्या दिवशी बाहेर पडू लागले आहेत. अत्यावश्यक सवेतील कर्मचाऱ्यांना मतदान केल्यानंतर त्यांच्या कामाच्या ठिकाणी जावे लागते. असे असतानाच मध्य रेल्वेने सोमवारी सुट्टीच्या म्हणजेच रविवारच्या वेळापत्रकानुसार वाहतूक सुरू केली आहे. त्याचा परिणाम मतदारांना सहन करावा लागत आहे. रविवारच्या वेळापत्रकानुसार वाहतूक होत असल्याने रेल्वे गाड्यांच्या प्रतीक्षा करत या मतदारांना स्टेशन परिसरात थांबावे लागत आहे.

भिवंडीत सेवानिवृत्त वृद्ध शिक्षक मतदानापासून वंचित

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या भिवंडी पूर्व पश्चिम ग्रामीण शहापूर मुरबाड व कल्याण पश्चिम या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार याद्यांमध्ये मतदानाच्या दिवशी घोळ दिसला. भिवंडीतील ग्रामीण मतदार संघात येत असलेल्या वडघर येथे ८३ वर्षाचे सेवानिवृत्त वृद्ध शिक्षकांचे नाव मतदार यादीतून गहाळ करण्यात आले आहे. मतदार यादीतून नाव गहाळ झाल्यामुळे सेवानिवृत्त वृद्ध शिक्षकांना लोकसभा निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. मोतीराम जाणू जाधव असे मतदानापासून वंचित राहिलेल्या ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांचे नाव असून मतदार यादीत त्यांचे नाव गहाळ झाल्याने आज ते मतदानापासून वंचित राहिले आहेत. प्रशासकीय यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे आज मला मतदानाचा हक्क बजावता आला नाही, मतदार यादीतून अचानक माझे नाव कसे गायब झाले याची चौकशी होऊन यात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सेवानिवृत्त वृद्ध शिक्षक मोतीराम जाधव यांनी केली आहे.

रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पहायला मिळाला. कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या एका महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री स्वतः  धावून गेले. आज 20 मे निमित्त शहरात सगळीकडे उत्साहात मतदान पार पडत आहे. सकाळी स्वतः कुटूंबासोबत मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते. सकाळी ठाणे आणि त्यानंतर मीरा भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचा ताफा कळव्याकडे निघाला. कळवा पुलावरून जात असताना अचानक त्याना एक रिक्षा रस्त्यावर उलटल्याचे दिसले. या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ त्यांनी आपला ताफा थांबवून ते या महिलेच्या मदतीला धावून गेले. या महिलेने त्याना आपल्या डोक्याला मार बसल्याने गरगरत असल्याचे सांगितले. शिंदे यांनी तत्काळ त्याना आपल्या गाडीतून पाणी आणून दिले. तसेच पुढील उपचारासाठी आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन देऊ करून या महिलेला कळवा रुग्णालयात दाखल करायला सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उतरून आपल्याला मदत केल्याबद्दल या महिलेने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.  तर मतदानाच्या दिवशीही जनतेची काळजी घेणाऱ्या संवेदनशील मनाचा मुख्यमंत्री यानिमित्ताने पुन्हा एकदा ठाणेकरांना अनुभवायला मिळाला.

ठाण्यात बोगस मतदान, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

ठाणे : ठाण्यातील विविध मतदान केंद्रावर बोगस मतदान झाले असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. मुख्यमंत्री ठाण्याचे असल्यानेच या ठिकाणी बोगस मतदान होत असल्याचा दावाही त्यांनी केला. सोमवारी आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी महाराष्ट्र विद्यालय येथे मतदान केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. मी ज्या शाळेत मतदान करायला आलो त्याच ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. दुसरीकडे येथील बाजूला असलेल्या सेंट जॉन शाळेत गेलेल्या एका मतदाराने सुध्दा बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. भरत दामजी बव्वा हे आपल्या पत्नी सोबत मतदान करण्यासाठी आले असता त्यांच्या नावा समोर अधिच मतदान झाले असल्याची टिक दिसून आली. म्हणून त्यांनी याचा जाब विचारला असता तुमचे आधीच मतदान झाले असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. मी त्यांना मतदान ओळखपत्र, आधारकार्ड दाखवले मात्र, तरी सुद्धा तुमचे मतदान झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे माझ्या नावावर कोणी बोगस मतदान केले असा सवाल त्यांनी केला. ठाण्यात बोगस मतदानाचा सुळसुळाट मतदारांनी मतदार केंद्रावर जाऊन टेंडर वोट करण्याचे आवाहन खासदार राजन विचारे यांनी आज ठाण्यात आपल्या सहकुटुंब ठाण्यातील सिद्धिविनायक मंदिर ,धर्मवीर आनंद दिघे व भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन चरई येथील सेंट जॉन शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांच्या असे निदर्शनास आले की ठाण्यातील बहुतेक मतदान केंद्रावर सकाळी लवकर बोगस मतदान झालेले आहे. मतदार राजा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला कळतं की आपल्या नावाचं मतदान दुसऱ्यांनी केलं आहे. यासाठी आपला मतदानाचा हक्क वाया घालवू नका आपले मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने १७ नंबर चा फॉर्म भरून पोस्टल बॅलेट द्वारे टेंडर वोट करून घेण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राजन विचारे यांनी मतदारांना केले आहे. मुख्यमंत्र्याना प्रत्यूत्तर कोणाच्या विकेट पडतील काय पडतील मतदार राजा ज्येष्ठ आहे तो ठरवतो, असं कोणाच्या बोलण्याने विकेट पडत नाही. ते 50 जागा जिंकतील तीन जागा पाकिस्तानातून देखील घेतील त्यांचा काय भरोसा,  असं देखील आव्हाड म्हणाले. बोगस मतदान असल्याचा गंभीर आरोप ठाण्यात बोगस मतदान जोरदार सुरू आहे, शासकीय यंत्रणा हाताशी धरलेल्या आहेत, जिथे त्यांना मतदान कमी होणार आहे तिथे मशीन त्यांनी स्लो केल्या जातं आहेत.

कपिल पाटील यांचे कुटुंबियांसह दिवेअंजुर येथे मतदान

भिवंडी : लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी दिवेअंजुर गावातील प्राथमिक शाळेतील बूथ क्र. ३१८ मध्ये कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन माझ्यावर दाखविलेला विश्वास मतदारांनी सार्थ ठरवावा, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील दिवेअंजुर येथील गावात कपिल पाटील यांनी कुटुंबियांसह सकाळी सव्वासातच्या सुमारास रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी त्यांचे पत्नी सौ. मीनल यांनी औक्षण केले. त्यानंतर त्यांनी श्री शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले. वडील स्व. मोरेश्वर पाटील, भाऊ स्व. पुरुषोत्तम पाटील यांच्या प्रतिमांना वंदन करून आशीर्वाद घेतले. देशहित व राष्ट्रहितासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता मतदारांनी मतदानाचा हक्क बजाावावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले होते.

दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

मतदारांत तीव्र संताप दिवा : दिव्यातील मतदारांचे नेहमीचे मतदान केंद्र बदलल्याने नाराजीचा सूर आहे. दिव्यातील गेल्या 30 ते 40 वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांचे मतदान ते स्वतः रहात असलेल्या ठिकाणापासून नेहमी…

शहापूरमध्ये मतदार महिलांसाठी पाळणाघराची व्यवस्था

खर्डी : शहापूर विधानसभा मतदारसंघातील खर्डी मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या महिलांच्या लहान मुलांसाठी अंगणवाडी सेविकेच्या साहाय्याने पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली होती. मुलांसाठी खेळणी व खाऊची सोय करण्यात आली होती. आजनुप…

वसईत ३१ टक्के तर नालासोपाऱ्यात २० टक्के मतदान

वसई : लोकसभा निवडणुकीसाठी पालघर मतदारसंघात सोमवारी मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली तेव्हापासून मोठ्या संख्येने मतदाना केंद्रावर मतदारांनी हजेरी लावली होती. यामध्ये युवा मतदारांपासून ते वयोवृद्ध नागरिकांनीही…