Category: ठाणे

Thane news

मोदींच्या सभेमुळे प्लास्टिक कचरा वेचकांची चांदी

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण मधील सभेसाठी ठाणे, पालघर जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिक आले होते. कडक उन्हामुळे सतत तहान लागत असल्याने प्रत्येक नागरिक, महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या हातात पाण्याची बाटली होती. पण ही पाण्याची बाटली सुरक्षेच्या कारणास्तव सभा मंडपात नेण्यास नागरिकांना पोलिसांकडून मज्जाव केला जात होता. अशा सर्व बाटल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कोपऱ्यावर फेकून देण्यात येत होत्या. सभा संपल्यानंतर या पाण्याने भरलेल्या, रिकाम्या बाटल्यांचा खच वेचण्यासाठी कचरा वेचकांची झुंबड उडाली होती. शहरात फिरून दिवसभरात एक पोते प्लास्टिकच्या बाटल्यांनी भरत असताना मोदींच्या बुधवारच्या सभेने कचरा वेचकांना सभा स्थळी एकाच जागी तीन ते चार पोती (गोणी) प्लास्टिकच्या बाटल्या मिळाल्या. या बाटल्या गोणीत भरताना कचरा वेचक पती, पत्नी, त्यांची मुले आनंदित होती. मुख्य प्रवेशद्वारावर पडलेला पाण्याच्या बाटल्यांचा खच कसा काढायचा असा प्रश्न सुरक्षा व्यवस्थेवर होता. परंतु, त्यांचे हे काम कचरा वेचकांनी तात्काळ पार पडले. मोदींच्या सभेसाठी पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, भिवंडी, वाडा परिसर, ठाणे जिल्ह्यातून शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण भागातून नागरिक बस, टेम्पो, इतर खासगी वाहनांनी आले होते. कडक ऊन, अंगाच्या काहिलीने नागरिक सततच्या तहानेने व्याकुळ होत होते. शरीरात पाण्याची कमतरता नको म्हणून आयोजकांनी प्रत्येक नागरिक, कायकर्त्याच्या हातात एक पिण्याची प्लास्टिकची बाटली दिली होती. या बाटल्या हातात घेऊन नागरिक, कार्यकर्ते सभा स्थानी दाखल होत होते. अशा दाखल होणाऱ्या नागरिक, कार्यकर्त्यांना मुख्य प्रवेशव्दारावर सुरक्षेच्या कारणास्तव तपासून मग सभा मंडपात सोडले जात होते. यावेळी नागरिकांच्या हातामधील पाण्याची बाटली मुख्य प्रवेशव्दाराच्या कोपऱ्यावर सुरक्षा तपासणीच्या वेळी काढून टाकण्यास सांगण्यात येत होती. नागरिकांनी अशाप्रकारे शेकडो बाटल्या सभा प्रवेशद्वाराच्या कोपऱ्यावर फेकल्या होत्या. बाटल्या बाहेर टाकल्या शिवाय कोणालाही सभा मंडपात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे नागरिक हातामधील पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर फेकून मंडपात प्रवेश करत होते. सभा मंडपात जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. सभा संपल्यानंतर नागरिकांची पायावर पाय देत सभा मंडपाबाहेर पडण्याची घाई सुरू असताना, सभा मंडपाच्या मुख्य प्रवेशव्दारावर मात्र कचरा वेचकांची गोणी घेऊन प्लास्टिक बाटल्यांचा पडलेला खच वेचण्यासाठी झुंबड उडाली होती. निवडणूक आहे की नाही याचे भान आपल्या उपजीविकेच्या काळजीने नसलेल्या कचरा वेचकांना कल्याणमध्ये नरेंद्र मोदी कशासाठी आले होते, हे समजले नसले तरी मात्र एक दिवसात मोदींच्या सभेमुळे आपणास एकाच जागी तीन ते चार गोणी प्लास्टिकच्या बाटल्या मात्र मिळाल्या, याचा आनंद कचरा वेचक कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर होता. लोकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे तेथे प्लास्टिकचे कप, बाटल्या मिळतील हे माहिती होते. त्यामुळे आम्ही मुख्य रस्त्यावर आम्हाला मुख्य प्रवेशद्वारापर्यंत बाटल्या वेचण्यासाठी कधी प्रवेश मिळतो याची वाट पाहत होतो. सभा संपल्यानंतर ती संधी मिळाली, असे कचरा वेचक दिव्या रमण्णा या महिलेने सांगितले.

अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा!

कल्याण : कल्याणमधील अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. कल्याण येथे आयोजित मेळाव्यामध्ये हा पाठिंबा जाहीर करण्यात आला. याबद्दल खासदार शिंदे यांनी क्षत्रिय समाजाचे आभार व्यक्त केले आहेत. कल्याण शहर आणि आसपासच्या परिसरात उत्तर भारतीय क्षत्रिय समाज मोठ्या संख्येने वास्तव्याला आहे. या समाजासाठी कल्याणमध्ये हिंदी भाषी भवनाची निर्मिती केली जात असून त्याचे काम सध्या प्रगतीपथावर असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली. या भावनात उत्तर भारताच्या संस्कृतीचे दर्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील १० वर्षात आपणा सर्वांच्या पाठबळाने कल्याण लोकसभेत रस्ते, उड्डाणपूल, रेल्वेसंबंधी कामे, आरोग्य सेवांचे बळकटीकरण यासह अनेक विकासकामे केली असून आता तर कल्याण डोंबिवलीत मेट्रोचे काम देखील सुरू झाल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. भविष्यात कल्याण लोकसभेचा चेहरामोहरा बदलणार असून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुविधा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठबळाने कल्याण लोकसभेची ही विकासाची घोडदौड सुरू असून त्यामुळे येत्या २० मे रोजी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून महायुतीला मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले. याप्रसंगी भाजपाचे माजी नगरसेवक कमलेश राय, शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, युवासेनेचे विनीत पांडे, उपनेत्या विजया पोटे यांच्यासह संदीप सिंह, सुनील सिंह, पी.पी. सिंह, बी.पी. सिंग, राजेंद्र सिंह, कमलेश सिंह, राणाप्रताप सिंह, सुभाष सिंह, ए.जी. सिंह आणि उत्तर भारतीय क्षत्रिय समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील स्थिर सर्व्हेक्षण पथकाकडून ७ लाखांची रोख रक्कम जप्त

ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघातील १४२ कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या स्थिर सर्व्हेक्षण पथक (एसएसटी) पथकाने काल रुपये ७ लाख इतकी संशयास्पद रोख रक्कम जप्त केली. कल्याण (पूर्व) रेल्वे स्थानक येथून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची तपासणी करुन त्यांच्याकडे आढळलेल्या बेकायदेशीर वस्तू जप्त करुन पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी या पथकाची नेमणूक करण्यात आली होती. कल्याण (पूर्व) रेल्वे स्थानक येथे काल दि. १४ मे २०२४ रोजी एसएसटी पथकातील कर्मचारी प्रवासी पुलावरील टिकीट खिडकीजवळ प्रवाशांच्या सामानाची तपासणी करीत असताना जयेश पोटे (रा.पुना लिंक रोड कोळसेवाडी, कल्याण (पूर्व)) यांच्याकडे असलेल्या बॅगेबाबत विचारणा केली. त्यावेळी बॅगेमध्ये रोख रक्कम असल्याचे संबंधितानी सांगितले. परंतू, सदर रोख रक्कमेबाबत संबंधितांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच रक्कमेच्या पुराव्याबाबत काहीही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे सदरची रक्कम रुपये ७ लाख पंचनामा करून जप्त करण्यात आली. जप्त केलेली रक्कम कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात सीलबंद करून जमा करण्यात आले असल्याची माहिती 142 कल्याण (पूर्व) विधानसभा मतदार संघाचे स्थिर सर्व्हेक्षण पथकाचे पथकप्रमुख दिपेश राठोड यांनी दिली आहे.

24-कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज-सुषमा सातपुते

ठाणे :  येत्या  20 मे 2024 रोजी संपन्न होणा-या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 24-कल्याण लोकसभा मतदार संघाची मतदान प्रक्रियेची यंत्रणा सज्ज असून, जास्तीत जास्त लोकांनी मतदान करुन मतदाराचा आपला हक्क बजवावा, असे आवाहन 24-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले. 24-कल्याण लोकसभा मतदार संघातील एकूण 6 विधानसभा मतदार संघात 1960 मतदान केंद्रे असून 10 पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी तसेच जास्त घनता असलेल्या ठिकाणी म्हणजे एकूण 1012 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही व वेब कास्टींगची सुविधा पुरविण्यात आली आहे.  सद्यास्थितीतील तीव्र उन्हाळा लक्षात घेता प्रत्येक मतदान केंद्रावर 1 मेडिकल कीट तसेच किमान आवश्यक सुविधांची (पिण्याचे पाणी, रॅम्प, शौचालय इ.) व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मतदानाचे ठिकाणी आरोग्य सेविका/आशा सेविकांची नेमणूक करण्यात येत आहे. मतदारांना मतदार यादीतील नोंदीबाबतच्या तपशिलाच्या मतदार स्लिप वाटण्याचे काम पूर्ण झाले आहे. निवडणूकीकामी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचा-यांचे द्वितीय प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. अंध दिव्यांग मतदारांना सर्व मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली असून, “सक्षम प्रणालीद्वारे” विनंती करण्यात आलेल्या दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिव्यांगाना रांगेत उभे न राहता मतदान करता येणार आहे.  तसेच अंध दिव्यांग मतदारांना ब्रेल लिपीतील मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सर्व मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र तळ मजल्यावर घेण्यात आले असल्याचे  निवडणुक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी नमूद केले. सद्यास्थितीपर्यंत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी संदर्भात 5 FIR नोंदविण्यात आले आहेत. 149 कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातील 216 मतदान केंद्रात पर्दानशीन महिला मतदार असल्यामुळे या प्रत्येक केंद्रात महिला मतदार कर्मचा-याची नेमणूक करण्यात आली आहे. आता पर्यंत C Vigil ॲपवर 318 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, सदर तक्रारींचे निवारण या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदार संघांनी विहीत वेळेत केलेले आहे. 24-कल्याण लेाकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय 1 दिव्यांग मतदार कर्मचा-यांचे मतदान केंद्र , महिला मतदार कर्मचा-यांचे मतदान केंद्र आणि युवा मतदार कर्मचारी उपलब्ध झाल्यास प्रत्येक मतदार संघनिहाय 1 युवा मतदार कर्मचारी केंद्र मतदानासाठी उपलब्ध राहणार आहे. 24-कल्याण लोकसभा मतदार संघाची मतमोजणी ही सुरेंद्र बाजपेयी बंदीस्त सभागृह, वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे. त्याचप्रमाणे स्ट्राँगरुमची व्यवस्था सावित्रीबाई फुले कला मंदिरातील तळघरात (Basement) करण्यात आली असून, तेथे राज्य पोलीस, राज्य राखीव दल व केंद्रीय पोलीस सुरक्षा दल अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते  यांनी दिली.

कोरम मॉलमध्ये ठाणे महापालिकेचा मतदार जागृती उपक्रम

फ्लॅशमॉबमधून युवकांनी केले मतदानाचे आवाहन ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात सोमवार, २० मे मतदान होणार आहे. त्यासाठी मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी बुधवारी कोरम मॉल येथे पीडीसी इव्हेंट्स या ग्रुपने फ्लॅशमॉबद्वारे जागृती केली आणि मतदान करण्याबद्दल आवाहन केले. याआधी असा फ्लॅशमॉब गेल्या आठवड्यात विवियाना मॉलमध्ये करण्यात आला होता. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे मतदार जागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात आहेत. त्याच मालिकेत, सुटीच्या काळात नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या कोरम मॉलमध्ये मतदार जागृती करण्याची जबाबदारी युवावर्गाने घेतली होती. आम्ही मतदान करणार आहोत, आपणही न विसरता हे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन या युवांनी नागरिकांना केले. तसेच, फ्लॅशमॉबद्वारे नृत्यातून रसिकांची मनेही जिंकली. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया, आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे. त्याचबरोबर, मिनी मॅरेथॉनच्या माध्यमातूनही मतदानविषयी जागृती करण्यात आली.

‘मतदारांना बाहेर काढा, अन्यथा तुम्हाला तिकीट देण्यासाठी विचार करावा लागेल’

विनोद तावडे यांचा इशारा ठाणे : मतदारांना जास्तीत जास्त संख्येने बाहेर काढून मतदानाचा टक्का वाढवा अन्यथा तुम्हाला तिकीट द्यायचे की नाही? याचा विचार करावा लागेल असा इशारा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील नगरसेवकांना दिला होता. त्यानंतर आता भाजपचे नेते विनोद तावडे यांनी देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हाच इशारा आपल्या पक्षातील माजी नगरसेवकांना दिला आहे. प्रत्येक नगरसेवकाने किती मतदारांना बाहेर काढले, त्यांच्या प्रभागातून उमेदरावाला किती मतदान झाले, याचा अभ्यास केला जाणार असून त्यानंतरच आगामी निवडणुकीत तिकीट द्यायचे की नाही? याचा विचार केला जाईल असा इशारा दिला आहे. ठाणे लोकसभेचे शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय पातळीवरील नेते देखील येऊन गेले होते. त्यानंतर गुरुवारी दुपारी विनोद तावडे यांनी भाजपच्या ठाणे पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची आणि माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करा, मतदारांना बाहेर काढा, महायुतीच्या उमेदवाराला अधिकाअधिक मताधिक्य कसे देता येईल यासाठी प्रयत्न करा अशा महत्वाच्या सुचना दिल्या असल्याची माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली. दुसरीकडे काही पदाधिकाऱ्यांनी पुन्हा ठाणे लोकसभेबाबत नाराजी व्यक्त केल्याचेही दिसून आले. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी ठाणे लोकसभा आपणच लढवायला हवी होती, ठाण्यात आपली ताकद वाढली असतांना पुन्हा धनुष्यबाणासाठी आपण का काम करायचे असा सुरही काही जणांनी लावला. मात्र, आपण महायुतीत आहोत, महायुतीसाठी आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लढायचे असल्याचे सांगत तावडे यांनी या नाराजांची देखील नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे. तसेच प्रत्येक माजी नगरसेवकाने, पदाधिकाऱ्याने आप-आपल्या भागातून मतदारांना मतदानासाठी बाहेर काढायचे असून मतदानाचा टक्का वाढवायचा आहे, कमी मतदान झाले तर पुढील निवडणुकीत तिकीट द्यायचे की नाही? या बाबत विचार करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिल्याचे भाजपच्या सुत्रांनी सांगितले.

शहरातील नाल्याची ६८ % सफाईचा पालिकेचा दावा

वसई-विरार महापालिकेडून नालेसफाईसाठी ड्रेन मास्टर यंत्राचा वापर विरार : वसई विरार मधील नाले सफाईचा विषय पावसाळ्यात शहरात पाणी भरल्यावर दरवर्षी चर्चिला जात असतो . त्यामुळे यावेळी पालिकेने शहरातील नाल्यांच्या सफाईसाठी अत्याधुनिक यंत्र सामग्री मागवूनत्या द्वारे नाले सफाईल सुरुवात केली आहे. वसई विरार महापालिकेने शहरातील नाल्यांची सफाई करण्यासाठी ड्रेन मास्टर ही अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणली असून त्याद्वारे नाल्यांची साफसफाई करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पोकलेन मशीन किंवा जेसीबी पोहचू शकत नाही, अशा ठिकाणच्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी या यंत्राचा वापर केला जात आहे. अशा प्रकारची यंत्रसामुग्री वापरणारी दिल्ली नंतरची वसई विरार ही दुसरी महानगरपालिका ठरली आहे.पालिकेने आता पर्यंत ६८ % नाले सफाई झाल्याचा दावा केला आहे. सध्या वसई विरार महापालिकेकडून शहरातील नाल्याची साफसफाई करण्यात येत आहे. त्यासाठी ९ प्रभागात नालेसफाईचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. आजपर्यंत एकूण ६८% नालेसफाईचे काम पूर्ण झाले आहे. नालेसफाई करताना ज्या ठिकाणी पोकलेन यंत्र किंवा जेसीबी पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी पाण्यातून किंवा दलदलीच्या भागातून गाळ काढण्यासाठी पालिकेने ड्रेन मास्टर या आधुनिक यंत्राचा वापर सुरू केला आहे. ड्रेन मास्टर यंत्रांला उभयचर प्रकारचे यंत्र असे म्हणतात. हे यंत्र पाण्यावर तरंगून तसेच जमिनीवरून किंवा ड्राय नाल्यांमधून गाळ काढण्याचे काम करते. या ड्रेन मास्टर नावाच्या एका यंत्राची किंमत १ लाख ७४ हजार असून पालिकेने १५ व्या वित्त आयोगातून ३ लाख ४८ हजारांची दोन ड्रेन मास्टर यंत्रे विकत घेतली आहे. याबाबत माहिती देताना पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले की, नाल्यांमधील गाळ यांत्रिक पद्धतीने काढण्यासाठी आम्ही ड्रेन मास्टर या यंत्राचा वापर करत आहोत. हे यंत्र कॉम्पॅक्ट स्वरूपाचे असून त्यामुळे नाल्यातील गाळ पूर्णपणे काढून टाकला जात आहे. दलदलीच्या भागात व जास्त पाण्याचा ठिकाणी हे यंत्र चेन स्प्रॉकेटने सहज काम करत आहे. या यंत्रामध्ये गाळ गोळा करण्यासाठी विशेष प्रकारची बीन्स यंत्रावरच उपलब्ध करून दिलेली आहेत, यामुळे ज्या नाल्यांच्या धक्क्यावर इमारती आणि घरे आहेत अशा ठिकाणी नाले साफ करणे खूप शक्य झाले आहे. या यंत्रामुळे हायड्रॉलिक लेग आणि काही गाळ वाहत्या पाण्यात अडकल्यामुळे, यंत्र पाण्यात स्थिर करून ते काढले जात आहे. शहरात सघ्या नालेसफाईचे काम जोरात सुरू असून या यंत्रांच्या माध्यमातून नालेसफाई अधिक परिणामकारक होत आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (घनकचरा) नानासाहेब कामठे यांनी दिली. दिल्ली महापालिकेत या ड्रेन मास्टर यंत्राचा वापर करून नालेसफाई केली जात आहे. दिल्ली नंतर अशा यंत्राचा वापर करणारी वसई विरार ही दुसरी महापालिका ठरली आहे.

शंभर क्षयरुग्ण 6 महिन्यांसाठी दत्तक

उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीकडून उल्हासनगर : शहरातील क्षयरोग रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी किंबहूना त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरिता निक्षय मित्राची भूमिका निभावणाऱ्या उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीने तब्बल 100 क्षयरुग्ण 6 महिन्यांसाठी दत्तक घेतले आहेत. या सर्व रुग्णांना पोषक आहाराचा पुरवठा व्हावा या सकारात्मक उद्देशाने कंपनीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त अजीज शेख यांच्याकडे उल्हासनगर मेडिकल असोसिएशन यांच्या नावाने 3 लाख 90 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. सेंच्युरी कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी हा धनादेश आयुक्त अजीज शेख यांना सोपवला असून यावेळी उपायुक्त डॉ.सुभाष जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.मोहिनी धर्मा,जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे,क्षयरोग अधिकारी सत्यम गुप्ता,हानगरपालिका आरोग्य विभागाच्या पब्लिक प्रायव्हेट समनव्यक संगीता मगर,क्षयरोग विभागाच्या ममता कामरानी आदी उपस्थित होते. महानगरपालिका कडून दरवर्षी क्षयरोग रुग्णांची शोधमोहिम राबिवली जाते.वर्षाला सरासरी दिड हजार क्षयरुग्ण आढळतात.त्यापैकी 86 टक्के रुग्ण औषधोपचार केल्यावर बरे होतात.तसेच क्षयरुग्णांना उपचार कालावधीमध्ये पुरेसा पोषक आहार मिळाल्यास रोग बरे होण्याचे प्रमाण वाढते व रोगामुळे होणारी अनुषंगिक गुंतागुंत टाळता येते. राष्ट्रपतींनी ०९ सप्टेंबर २०२२  रोजी प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त अभियानाची सुरुवात केलेली आहे.त्यात निक्षयमित्राच्या माध्यमातून क्षयरुग्णांना प्रति व्यक्ती,प्रति महिना आवश्यक धान्य,कडधान्य,डाळी,तेल इत्यादी पोषक आहार देण्याचे प्रयोजन आहे.सहा महिन्याच्या पोषक आहारामुळे क्षयरुग्णांच्या आजारात व तब्येतीत झपाटयाने सुधारणा होत आहे. सेंच्युरी रेयॉन कंपनीने निक्षय मित्र बनून आणि 100 क्षयरुग्ण 6 महिन्यांसाठी दत्तक घेऊन स्तुत्य काम केले आहे.या सर्व रुग्णांना 6 महिन्याचे पोषक आहाराचे किट देण्यात येणार आहे. अशाचप्रकारे शहरातील क्षयरुग्णांना पोषक आहाराचा फायदा होण्याकरिता जास्तीत जास्त निक्षय मित्रांनी तयार व्हावे व अशा प्रकारच्या सामाजिक कार्यात मोलाचा सहभाग घ्यावा असे आहावन आयुक्त तथा प्रशासक अजीज शेख,उपायुक्त डॉ.सुभाष जाधव यांनी उल्हासनगरकरांना केले आहे.विशेष म्हणजे मागच्या वर्षी अजीज शेख यांनी सुद्धा निक्षय मित्र बनून 10 क्षयरुग्ण दत्तक घेतले होते.

आदिवासींना मानसन्मान देणाऱ्या उमेदवारालाच मत द्या, अन्यथा बहिष्कार घाला- अनिल भांगले

आदिवासी क्रांती सेनेचे आवाहन ठाणे : पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे रोजी होत आहे. या मतदानामध्ये मुरबाड,  शहापूर, भिवंडी, वाडा, कल्याण पूर्व आणि पश्चिम तसेच डोंबिवलीच्या ग्रामीण भागात आदिवासींची मतसंख्या मोठी आहे. मात्र, अनेक उमेदवारांकडून आदिवासी समाजाला विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांनी मानसन्मान देणाऱ्या उमेदवारालाच मत द्यावे; अन्यथा, बहिष्कार घालावा, असे आवाहन आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांनी केले आहे. अनिल भांगले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, मुरबाड,  शहापूर, भिवंडी, वाडा, कल्याण पूर्व आणि पश्चिम तसेच डोंबिवलीच्या ग्रामीण पट्ट्यात आदिवासींची मोठी संख्या आहे. या भागातील आदिवासींच्या जमिनींवर धनदांडग्यांनी कब्जा केला आहे. कल्याण, मुरबाड, मलंगगड परिसर, शहापूर, भिवंडी भागातील अनेक वाड्या वस्त्यांवर मूलभूत सुविधा पोहचविण्यात शासनाला यश आलेले नाही. पाणी, आरोग्य,  शिक्षण आदी सुविधा आदिवासींना मिळत नाहीत. याबाबत अनेक उमेदवारांनी आपल्या  जाहीरनाम्यात उल्लेखही केलेला नाही. आदिवासी वाड्या वस्त्यांवर उमेदवार जाण्यास तयार नाहीत. म्हणजेच, आदिवासींचा विकास करण्याबाबत कोणतेही धोरण आखले जात नाही. एकूणच अनेकांनी आदिवासींना गृहीत धरले आहे. त्यामुळेच आता जे उमेदवार आदिवासी समाजाला मानसन्मान देतील, अशाच उमेदवारांना मत द्यावे. अन्यथा, बहिष्कार घालावा, असे आवाहन अनिल भांगले यांनी केले.

डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्प पत्राचे अनावरण

कल्याण : सलग १० वर्ष यशस्वी खासदार असलेले महायुतीचे कल्याण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढील पाच वर्षाचे व्हीजन आज पत्रकार परिषदेत सादर केले. यात मतदार संघातील रेल्वे स्टेशनलगत ट्रॉमा सेंटर, रेतीबंदर ते कल्याणपर्यंत कोस्टल रोड, अँक्सेस कंट्रोल फ्रिवे, इंटर्नल मेट्रोने शहरे जोडणे आणि पाणी पुरवण्यासाठी स्वतंत्र धरण बांधण्याचे वचन ड़ॉ. श्रीकांत शिंदे यांनी संकल्प पत्रात दिले आहे.ते पुढे म्हणाले की, २०१९ च्या जाहीरनाम्यातील ९० टक्के आश्वासने पूर्ण केली. कल्याण यार्ड रिमॉडलिंगचा ८०० कोटींचा प्रकल्प होत आहे. यामुळे मेल एक्सप्रेस, लोकल सेवा यांना क्रॉसिंग बंद होऊन स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होईल. खारेगाव, दिवा, ठाकुर्ली आणि कल्याण पश्चिम येथील रेल्वे फाटक बंद झाले आहेत. त्यामुळे पुढील एक वर्षात पाचवी आणि सहावी लाईन कार्यान्वित होऊन कल्याण ते कुर्लापर्यंत शटल सेवा सुरु करणे शक्य होईल, असे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. कल्याण-कर्जत, कल्याण-कसारा शटल सेवा, दिवा वसई मार्गावर लोकल सेवा, कल्याण ते पनवेल लोकल सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. भविष्यातील तिसरी मुंबई कल्याण परिसरात होणार असून पुढील पाच वर्षात येथे पायाभूत सुविधांचा नियोजनबद्धपध्दतीने विकास केला जाईल, अशी ग्वाही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली. कल्याणमध्ये मेट्रो १२ चे काम सुरु झाले आहे. त्याचबरोबर बदलापूरपर्यंत मेट्रो १४ ला मंजुरी मिळाली असून त्याचे काम लवकरच सुरु होईल, असे ड़ॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. विठ्ठलवाडी ते शहाड हा ब्रीज करण्यात येणार आहे. कल्याणमध्ये यूटाईप रोड, इतर शहरात पार्किंग प्लाझा सुरु केले जातील, असे आश्वासन डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे. उल्हासनगरातील २०० बेड्सचे नो कॅश काउंटर हॉस्पिटल प्रत्येक शहरात सुरु करणे, स्पोर्ट्स स्टेडियम, महिलांसाठी, दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्र भवन उभारण्याचा मानस डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. कॅन्सर हॉस्पिटल, ईएसआयसी हॉस्पिटल लवकरच सुरु होणार आहेत. कल्याणमध्ये एम्सच्या धर्तीवर हॉस्पिटलची मागणी करण्यात आली असे ते म्हणाले. अंबरनाथमधील यूपीएससी एमपीएससी प्रशिक्षण केंद्र इतर शहरादेखील सुरु करण्यात येतील. मतदार संघातील सर्व शाळा स्मार्ट करण्यात येणार आहेत. अंबरनाथमध्ये आयटीआयचे आधुनिकीकरण करणे, स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांसाठी अंतरलीमध्ये महा हब मंजूर करण्यात आले असून ते लवकरच सुरु करण्यात येईल, असे ड़ॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले. अंबरनाथ आणि डोंबिवलीमध्ये टाटा इन्स्टीट्युकडून २०० कोटींचा निधी मिळाला असून तेथे सेंटर फॉर एक्सलन्स सुरु केले जाणार आहे. २०१४ मध्ये अडीच लाख आणि २०१९ मध्ये साडे तीन लाखांच्या मताधिक्याने मतदारांनी निवडून दिले. सलग दोन वेळा माझ्यावर विश्वास ठेवून मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिल्याबद्दल डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले. महायुतीतील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एक दिलाने काम केल्याबद्दल डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आभार मानले. डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, कल्याणमध्ये मागील १० वर्षांत झालेल्या विकास कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवून कौतुक केले आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांच्या कौतुकाची थाप मिळाल्याने आणखी आत्मविश्वास वाढला असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.