Category: ठाणे

Thane news

लिम्पिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी ठाणे हॉकी अकादमीचा पुढाकार

ठाणे : ठाणे हॉकी अकादमीच्या उन्हाळी शिबिराची सुरुवात मोठ्या उत्साहात आणि उत्साहाने झाली, भारतीय हॉकीचे माजी प्रशिक्षक क्लेरेन्स लोबो आणि भारताच्या आशिया चषक प्रतिनिधी वैशाली पवार आणि मध्य रेल्वेचे ॲथलेटिक प्रशिक्षक नागेश शेट्टी यांच्या यांच्या उपस्थित उद्घाटन संपन्न झाले. या शिबिरात एकूण ४७ खेळडु  सहभागी झाले होते, ते सर्वजण आपली कौशल्ये सुधारण्यासाठी आणि क्षेत्रातील सर्वोत्तम व्यक्तींकडून शिकण्यास उत्सुक होते. शिबिराची सुरुवात व्यावसायिक खेळाडूंच्या प्रदर्शनीय सामन्याने झाली, ज्यामध्ये प्रतिभा आणि खेळाबद्दलची आवड दिसून आली. या सामन्याने केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले नाही तर नवीन खेळाडूंना त्यांच्या खेळात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याची प्रेरणाही दिली. मुकेश ठोंमरे यांनी डेकॅथलॉनचे आभार व्यक्त केले. त्यांनी शिबिरासाठी त्यांचे मैदान उदारपणे देऊ केले, खेळाडूंना सराव आणि सुधारण्यासाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिली. या व्यतिरिक्त, इनसोलार, एक सोलर पॉवर ईपीसी कंपनी, सर्व सहभागींसाठी हॉकी स्टिक्स, बॉल आणि टी-शॉर्ट्स प्रायोजित केले, ज्यामुळे कार्यक्रमात एकतेचा आणि सांघिक भावनेचा स्पर्श झाला. या उन्हाळी शिबिरात या प्रतिभावान तरुण खेळाडूंना प्रशिक्षण देणे आणि त्यांची कौशल्ये विकसित करणे सुरू ठेवत त्यांना पाठिंबा दर्शवावा. हॉकीच्या जगात यश मिळवण्याचे त्यांचे ध्येय असल्याने त्यांचा जयजयकार करूया. प्रशिक्षक पीटर मिनेझेस आणि सहाय्यक प्रशिक्षक जेफ्री मार्सेडो त्यांच्या उत्कृष्ट कोचिंग शैलीसाठी आणि भविष्यातील प्रतिभा निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.असे मुकेश ठोमरे यांनी सांगितले.. ठाणे हॉकी अकादमीचे गजानन गंधे, ॲड मुकेश ठोमरे आणि नागेश शेट्टी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेले दोन महिने अथक परिश्रम घेतले.

कांगा क्रिकेट स्पर्धा

डोंबिवली  क्रिकेट क्लब उपांत्यपूर्व फेरीत ठाणे : डोंम्बिवली क्रिकेट क्लबने पाटण क्रिकेट क्लबचा १२४ धावांनी  दणदणीत पराभव करत मुंबई क्रिकेट संघटना आयोजित डॉ. एच. डी. कांगा बाद पद्धत क्रिकेट स्पर्धेच्या ब गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. प्रथम फलंदाजी करताना २४३ धावांचे आव्हान उभे केल्यावर सागर मिरमॉटने पाच आणि शित रंभीयाने तीन बळी मिळवत  पाटण क्रिकेट क्लबला ११९ धावांवर गुंडाळून विजयावर शिक्कामोर्तब  केले . पाटण क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले. प्रणव यादवने  ९७  चेंडूत ११३ धावांची खेळी करत डोंबिवली क्रिकेट क्लबला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. अंकित नाईकसाटमने   ४४ धावांचे योगदान दिले.  इशानने तीन  आणि चेतनने दोन बळी मिळवले. या आव्हानाचा बचाव करताना सागर  मिरमॉटने  १९ धावांत ५ बळी मिळवत पाटण क्रिकेट क्लबला धक्का दिला.  शित रंभीयाने तीन आणि सोहंम सावंतने दोन बळी मिळवत  संघाच्या विजयात योगदान दिले. पराभूत संघाकडून सौरभने २६ आणि जिगरने २५ धावा केल्या. संक्षिप्त धावफलक : डोंबिवली क्रिकेट क्लब  : ४५ षटकात सर्वबाद २४३ ( प्रणव यादव ११३, अंकित नाईकसाटम ४४ इशान ८-३३-३, चेतन ९-३९-२,) विजयी विरुद्ध  पाटण क्रिकेट क्लब : ३० षटकात सर्वबाद ११९ ( जिगर २५, सौरभ २५  सागर मिरमॉट ७-३-१९-५, शित रंभीया ६-२३-३, सोहम सावंत ४-१९-२).

उल्हासनगर मतदार संघाची यंत्रणा मतदानासाठी सज्ज

उल्हासनगर – कल्याण लोकसभा मतदार संघा अंतर्गत येणाऱ्या उल्हासनगर विधानसभा मतदार संघाची यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली आहे.त्याकरिता 251 मतदान केंद्र,120 कंट्रोल व बॅलेट युनिट आणि 130 VVPAT यंत्र तयार करण्याची प्रक्रिया सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप-विभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडल्याची माहिती महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान 20 मे रोजी होणार असून यासाठी संपूर्ण प्रशासकीय तसेच निवडणूक यंत्रणा सक्रिय झाली आहे.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी दोन टप्यात कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण दिले आहे. उल्हासनगर विधानसभा मतदार संघात मतदारांची संख्या ही 2 लाख 48 हजार 904 आहे.मागच्या 2019 मधील लोकसभा निवडणुकीत 49.6 टक्के मतदान झाले होते.यावेळेसच्या निवडणुकीत आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती केली असून त्यास किती प्रमाणात प्रतिसाद मिळतो हे 20 मे रोजी होणाऱ्या मतदाना नंतर स्पष्ट होणार आहे.

शिवप्रदक्षिणेच्या माध्यमातून छत्रपती शंभूराजांना मानवंदना

ठाणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  ठाण्यातील तलावपाळी परिसरात ओबीसी प्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रदक्षिणेच्या माध्यमातून छत्रपती शंभूराजांना मानवंदना देण्यात आली. स्वराज्याचे धाकले धनी अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ओबीसी प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ आणि विविध संघटनांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली.  ठाणे शहरातील मासुंदा तलाव, रंगो बापूजी गुप्ते चौक, चिंतामणी ज्वेलर्सच्या समोर उभारलेल्या मंडपात स्थापन केलेल्या  छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवप्रदक्षिणेला प्रारंभ करण्यात आला. रणविजय ढोल पथक, सारजी लेझीम पथक यांच्या सहभागासह निघालेल्या या प्रदक्षिणेत शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते. यावेळेस आयोजक प्रफुल वाघोले यांनी, ठाणे शहरात प्रथमच शंभूराजांच्या जयंतील उत्सव साजरा करण्यात आला आहे. काही प्रस्थापित इतिहासकारांनी संभाजी राजांचा इतिहास कलंकित करण्याचा प्रयत्न केला होता. तो हाणून पाडण्याचा आमचा प्रयत्न असून खरा इतिहास पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचाच एक भाग म्हणून हा उत्सव साजरा करण्यात आला असल्याचे सांगितले. या सोहळ्याच्या आयोजनात मंगेश आवळे, नितीन लांडगे, रविंद्र कोळी, विजय त्रिपाठी, जितेंद्र यादव, रामानंद यादव, संतोष राणे, निलेश हातणकर, महेश मोरे संतोष मोरे, गजानन चौधरी, अनिल नलावडे चेतन शिंदे, शिवाय एगडे, प्रतिभा शिर्के, सुभाष देवरे आदींनी मोलाची भूमिका बजावली होती.

मोदींच्या सभेसाठी व्यासपीठावर स्थान नाही

कल्याणमधील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांचा राजीनामा कल्याण : कल्याण मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारच्या सभेसाठी व्यासपीठावर स्थान न मिळाल्याने नाराज झालेले शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण-मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी आपल्या पदाचा बुधवारी तडकाफडकी राजीनामा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी राजीनामा पाठविला आहे. सुरुवातीला ठाकरे गटाकडे असलेले मोरे शिंदे गटात यापूर्वीच दाखल झाले होते. मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. अलीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण, डोंबिवलीतील प्रत्येक कार्यक्रमात ते आघाडीवर होते. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोरे यांनी राजीनामा दिल्याने शिंदे गटात खळबळ उडाली आहे. कल्याण-मुरबाडचे आपण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहोत. यजमान जिल्हाप्रमुख म्हणून आपणास मोदींच्या सभेच्या व्यासपीठावर स्थान पाहिजे होते. शिवसेनेच्या पक्षांतर्गत धोरणाप्रमाणे अनेक पदाधिकारी आपल्या अंतर्गत काम करत असतात. पक्ष पदाधिकाऱ्यांची एवढी मोठी फळी आपल्या अधिकारांतर्गत काम करत असताना आपणास मोदी यांच्या सभेसाठी व्यासपीठावर डावलणे योग्य नाही, अशी नाराजी अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा पत्रातून व्यक्त केली आहे. यजमान जिल्हाप्रमुख म्हणून आपणास डावलण्यात आल्याने आपण शिंदे गटाचा कल्याण-मुरबाड जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहोत, असे मोरे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.अधिक माहितीसाठी अरविंद मोरे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला, पण त्यांचा मोबाईल बंद असल्याचा संदेश येत होता.

मोदींच्या सभेसाठी रणरणत्या उन्हात कार्यकर्ते हजर

भिवंडी, कल्याण ग्रामीण भागातून सर्वाधिक गर्दी कल्याण : रणरणते ऊन, घामाच्या धारांनी हैराण झालेले असताना भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे कार्यकर्ते कल्याण मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी उपस्थित झाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये महिला, पुरूषांचा सर्वाधिक सहभाग आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे गर्दी असुनही कोठेही गोंधळ होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. मोदी यांच्या सभेसाठी सुमारे एक लाख खुर्च्या सभा मंडपात लावण्यात आल्या आहेत. या सर्व खुर्च्या केवळ महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे भरणार नसल्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण भागातील सामान्य महिला, पुरूष नागरिकांना ‘बांधिव’ कार्यकर्ते म्हणून विशेष बस उपलब्ध करून सभास्थळी आणले आहे. या नागरिकांच्या गळ्यात भाजप, शिवसेनेचे झेंडे, गमछे दिसून येत आहेत. मोदी यांची सभा दुपारी दोन वाजता असल्याचा निरोप असल्याने सकाळी १० वाजल्यापासून शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण, शहरी भागात कार्यकर्त्यांनी गावच्या नाक्यावर जमा होण्यास सांगितले होते. ही सभा संध्याकाळी पाच वाजता असल्याचे समजल्यावर मात्र कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. रणरणत्या उन्हात प्रवास करून आलेल्या कार्यकर्त्यांना आच्छादित सभा मंडपामुळे दिलासा मिळत आहे. मंडपात सर्वत्र पंखे, वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची कमतरता पडणार नाही अशा पध्दतीने पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या जात आहेत. उत्साही कार्यकर्ते सभा मंडपात मोदी, भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपील पाटील, कल्याणचे लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देत आहेत. काही कार्यकर्ते वाजतगाजत सभास्थळी येत आहेत. भगव्या झेंडे, फलकांमुळे सभा स्थळ परिसर भगवा झाला आहे. सभा मंडपात जाण्यासाठी अतिअति महत्वाच्या व्यक्ति, अति महत्वाच्या व्यक्ति, कार्यकर्ते यांच्यासाठी तीन प्रवेशव्दारे आहेत. कल्याण शहर परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. जागोजागी पोलीस जथ्थ्याने उभे आहेत. संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. सुरक्षेचा त्रास नको म्हणून कल्याणमधील बहुतांशी रिक्षा चालकांनी घरी जाणे पसंत केले आहे. पंतप्रधान मोदी येणाऱ्या मार्गाच्या दुतर्फा रस्तारोधक आणि या भागातील सर्व दुकाने सकाळपासून बंद ठेवण्यात आली आहेत. पक्की दुकाने, बांधकामे यांच्यावर हिरव्या जाळ्या लावून ती बंदिस्त करण्यात आली आहेत. मोदींच्या मार्गाच्या दुतर्फा एकही माणूस फिरकणार नाही असे नियोजन करण्यात आले आहे. विशेष सुरक्षा पथकाचा सभा मंंडपाच्या बाहेर चार ते पाच स्तरीय वेढा आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयेाने वितरित केलेल्या प्रवेश पासाशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तिला अति महत्वाच्या बैठक व्यवस्थेत प्रवेश दिला जात नाही. सभा मंडपाचा परिसराचा ५०० मीटरचा परिसर, रस्ते बांबूचे अडथळे, रस्ता रोधक लावून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सभा स्थळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अर्ध्या वाटेत रिक्षा, वाहन सोडून मग घरी पायी यावे लागत आहे. भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकूण १२ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी सभास्थळी दाखल झाले आहेत. गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत महायुतीच्या खासदारांनी विकास कामे, नागरिकांच्या मनातील कामे करून दाखवली असती तर अशाप्रकारे मोदींच्या सभेच्या आयोजनासाठी धडपड करावी लागली नसती, असाही सूर सभा ठिकाणी आलेल्या काही कार्यकर्त्यांकडून काढला जात आहे. सेल्फी पॉईंट गर्दी सभा मंडपाच्या बाजूला राम मंदिराची प्रतिकृती, तसेच पंतप्रधान मोदी यांची उभी प्रतिमा लावण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी जाऊन कार्यकर्ते राम मंदिराच्या प्रतिकृती सोबत, आणि मोदी यांच्या प्रतिमेसोबत स्वतःचे मोबाईल मधून छायाचित्र काढून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

गृहमतदानास 85 वर्षावरील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : ठाणे जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात 20 मे 2024 रोजी  लोकसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतदानापासून एकही मतदार वंचित राहणार नाही याची खबरदारी देखील प्रशासनाने घेतली आहे. 85 वरील जे नागरिक व दिव्यांग व्यक्ती मतदान केंद्रापर्यत पोहचू शकत नाही अशांसाठी आज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या गृहमतदानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 105 मतदारांपैकी 96 मतदारांनी मतदानाचा आज गृहमतदान केले. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या  सहाय्यक निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमतदानासाठी विविध भागातील नागरिकांकडे जाण्यासाठी एकूण 11 पथके तयार करण्यात आली होती. एका पथकात मतदान अधिकाऱी, मदतनीस कर्मचारी, पोलीस कर्मचारी व शिपाई  व राजकीय उमेदवारांचे प्रतिनिधीं यांचा समावेश करण्यात आला होता. 11 पथके 148 विधानसभा मतदारसंघातील विविध भागातून गृहमतदानासाठी नोंदणी केलेल्या मतदारांच्या घरी रवाना करण्यात आली असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांनी नमूद केले. 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील विविध भागातील 85 वर्षावरील एकूण 103 तर 2 दिव्यांग अशा एकूण 105 मतदारांनी  गृहमतदानासाठी  निवडणूक विभागाकडे अर्ज भरुन दिले होते. या सर्व मतदारांच्या घरी आज प्रशासनाच्या वतीने पथके पाठविण्यात आली होती. नागरिकांनीही गृहमतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आम्ही मतदान केले, तुम्हीही मतदान करा असा संदेश नागरिकांना दिला. नोंदणी केलेल्या 105  मतदारांपैकी एकूण 96 जणांनी गृहमतदानाचा अधिकार बजावला. तसेच निवडणूक आयोगाने गृहमतदानाची सोय उपलब्ध करुन दिल्याबद्दल सर्व ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

ब्रेल लिपीतील मतदार चिठ्ठीचे अंध मतदारांना घरोघरी वाटप

ठाणे : लोकसभा निवडणुकीत सर्वच घटकातील नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 148 विधानसभा मतदारसंघातील अंध मतदारांना ब्रेल लिपीतील मतदार माहिती  चिठ्ठीचे वाटप प्रत्यक्ष अंध मतदारांच्या निवासस्थानी जावून करण्यात आले. २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रेल लिपीमध्ये मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप करण्यात आले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता जास्तीत जास्त मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.या अंतर्गत ठाणे शहरातील जास्तीत जास्त अंध मतदारांना त्यांचा हक्क बजावण्यात सुलभता व्हावी, यासाठी ब्रेल लिपीमध्ये माहिती दस्तऐवज तसेच चिठ्ठी अंध मतदारांना देण्यात आली. अंध मतदारांना मतदान केंद्रावर मतदान करता यावे यासाठी सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. सुलभ मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती यावेळी मतदारांना देण्यात आली. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन अंध मतदारांना करण्यात आले. अंध मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी  मतदारांना प्रत्यक्ष घरी उपलब्ध करुन दिल्याबद्दल  सर्व अंध मतदारांनी भारतीय निवडणूक प्रशासनाचे आभार मानले आहेत.

अत्यावश्यक सेवेतील 691 कर्मचाऱ्यांनी ठाण्यात केले टपाली मतदान

ठाणे : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली. 25 ठाणे लोकसभा क्षेत्रातील अत्यावश्यक क्षेत्रात काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना ‍20 मे 2024 या ‍दिवशी मतदानादिवशी कर्तव्यावर असल्याकारणाने मतदान केंद्रावर जाणे शक्य होणार नाही अशा अत्यावश्यक सेवेतील एकूण 691 अधिकारी कर्मचारी यांनी आज (14 मे) टपाली मतदानाद्वारे मतदानाचा अधिकार बजावला असल्याची माहिती  25 – ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक  निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील  “प्रशिक्षण केंद्र,जिल्हा विकास उद्योजक केंद्र, कोर्ट नाका, ठाणे प 400601 येथे  सकाळी 9 ते सायं. 5  या वेळेत आज टपाली मतदान पार पडले. नोंदणीकृत मतदार- पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी,अग्निशमन दल, वैदयकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी ज्यांनी विहित मुदतीत टपाली मतपत्रिकेसाठी नमुना 12 ड भरुन दिले होते. अत्यावश्यक सेवेतील जे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत, त्यांना त्यांच्या परिक्षेत्रात मतदानासाठी जाणे शक्य नाही अशा अधिकारी कर्मचारी यांनी आज टपाली मतदान केले. टपाली मतदानासाठी एकूण 2949 कर्मचाऱ्यांनी नमुना 12 ड भरुन टपाली मतदानासाठी नोंदणी केली होती. आज सायंकाळी 5.00 वाजेपर्यत एकूण 691  कर्मचाऱ्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. दि.14/05/2024, व दि. 16/05/2024  असे दोन दिवस टपाली मतदान सुरू  राहणार असल्याची माहिती 25 – ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक  निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली.

ठाण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचारांचा धडाका

ठाणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्यात आला असून त्यानुसार पुढील तीन दिवस ठाणेलोकसभा मतदारसंघात विविध नेत्यांच्या प्रचार सभा, रॅली ठाण्यात होणार आहे. त्यातही महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्त सभा शुक्रवारी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ठाण्यात प्रथमच या दोनही नेत्यांच्या सभा होणार आहेत. तर महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शनिवारी रोड शो घेण्यात येणार असून त्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. ठाणे लोकसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे हे मागील काही दिवसापासून ठाण्यात तळ ठोकून आहेत. त्यात आता गुरुवारी ठाण्यात सांयकाळी गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या रस्त्यावर महाविकास आघाडीची सभा घेण्यात येणार आहे. या सभेला उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय तेजस्वी यादव, सुप्रिया सुळे आदींची देखील हजेरी लागणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच ठाण्यात सभा घेणार आहेत. त्यामुळे ते काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे गुरुवारी दुपारी २ वाजता भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक विनोद तावडे घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजप पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी तावडे हे ठाण्यात येत असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. दुसरीकडे शनिवारी सांयकाळी पाच वाजेपर्यंतही ठाण्यात प्रचाराचा धुराळा उडणार असल्याचे चित्र आहे. यादिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो किंवा सभा घेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील दुपारी ३ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे.