Category: ठाणे

Thane news

उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव

कल्याण : उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच कल्याण पू्र्व, पश्चिम भागात मंगळवार पासून विजेचा लपंडाव सुरू आहे. बुधवारी पहाटे तीन वाजता कल्याण पूर्व भागाचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला होता. विजेच्या सततच्या लपंडावामुळे कल्याण मधील नागरिक दोन दिवस हैराण आहेत. कल्याण परिसरातील तापमानाचा पारा मागील तीन दिवसांपासून ४२ अंशच्या पुढे गेला आहे. घरात पंख्याखाली असूनही नागरिक उन्हाच्या झळांनी हैराण आहेत. अशा परिस्थितीत कल्याण पश्चिमेत मंगळवारी दुपारपासून चिकणघर, रामबाग, खडकपाडा भागात विजेचा लपंडाव सुरू होता. रात्रीच्या वेळेत दुर्गाडी किल्ला भाग, खडकपाडा भागात वीज पुरवठा बंद झाला होता. बुधवारी कल्याण पूर्व भागाचा वीज पुरवठा पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान बंद झाला होता. अगोदरच अंगाची काहिली होत असताना त्यात वीज गेल्याने नागरिक हैराण झाले होते. अनेक नागरिक पहाटे, रात्री घराबाहेरील मोकळ्या जागेत उकाड्याची काहिली शमविण्यासाठी बसले होते. घरातील लहान मुले, बालके वीज पुरवठा बंद झाल्याने अस्वस्थ होती. घरात बिछान्याला खिळून असलेले, उपचार घेत असलेले विविध प्रकारचे रुग्ण उकाड्याने हैराण झाले होते. वीज पुरवठा बंद असल्याने घराचे दरवाजे, खिडक्या मोकळ्या हवेसाठी उघड्या ठेवल्या तर घरात डासांचा उपद्रव होईल या भीतीने कोणीही नागरिक दरवाजे, खिडक्यांची फडताळे उघडण्यास तयार नव्हता. कडक उन्हाळा सुरू होताच विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत होते. वीज पुरवठा बंद झाल्याने नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात सतत संपर्क करणे चालू ठेवल्याने महावितरणचा सेवा संपर्क क्रमांक दोन ते तीन तास व्यस्त येत होता. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी विचारात घेऊन महावितरणचे कर्मचारी रात्रीतून खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी रात्रीच बाहेर पडले होते. या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे टप्प्याने कल्याण पूर्व, पश्चिमेचा वीज पुरवठा टप्प्याने पूर्ववत झाला. त्यानंतर नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडला. प्रमाणापेक्षा विजेची मागणी वाढल्याने असे प्रकार घडतात. किंवा तांत्रिक अडचणीमुळे वीज पुरवठा बंद होतो, असे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले.

उच्च न्यायालयाच्या नोटीस नंतरही शहरात वृक्षांवर विद्युत रोषणाई

ठाणे, कल्याण- डोंबिवली, मिरा भाईंदरमध्ये वृक्षांचा गळा घोटण्याचे कार्य सुरूच ठाणे : वृक्षांवरील विद्युत रोषणाईबाबत मुंबई उच्च् न्यायालयाने फटकारले असतानाही ठाणे, मिरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवली भागात वृक्षांवर विद्युत रोषणाई सुरूच असल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिकेकडून प्रकाश प्रदूषक रोषणाई हटविली जात असताना ठाणे जिल्ह्यामध्ये याकडे डोळे झाक होत असल्याची टीका पर्यावरणवादी कार्यकर्ते करत आहेत. मुंबई, ठाणे आणि महानगर क्षेत्रात सण- उत्सव, सामाजिक, खासगी कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. परिसर आकर्षित दिसावा म्हणून रस्त्यालगत असलेल्या वृक्षांच्या खोडांवर आणि फाद्यांवरही रोषणाई केली जात आहे. हा प्रकार मागील काही वर्षांपासून वाढू लागला आहे. या रोषणाईमुळे वृक्षांच्या वाढीवर परिणाम होतो. अनेकदा तारांमध्ये बिघाड होऊन वृक्षांना आगी लागतात. वृक्षांवर सूक्ष्म, मोठ्या आकाराचे किटक असतात. त्यांच्या प्रजनन संस्थेवर परिणाम होतो. ठाणे जिल्ह्यात स्थलांतरीत पक्षी येत असतात. या पक्ष्यांना रोषणाईमुळे दिवस आणि रात्रीचा फरक कळत नाही. असे असतानाही ठाणे, नवी मुंबई, मुंबई, मिरा भाईंदर भागात वृक्षांवर विद्युत रोषणाई सुरू होती. याबाबत काही महिन्यांपूर्वी ठाणे स्थित पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहीत जोशी यांनी वकील रोनिता भट्टाचार्य यांच्या मार्फत जनहीत याचिका दाखल केली होती. ही बाब जनहित याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेत महापालिकांना फटकारले होते. तसेच राज्य सरकारसह मुंबई, ठाणे, आणि मिरा भाईंदर महापालिकेला नोटीस बजावली होती. उच्च न्यायालयाने नोटीस बजावूनही ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मिरा भाईंदर महापालिका ढिम्म असल्याचे समोर आले आहे. ठाण्यातील तलावपाली भागात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी तलावपाली परिसरात वृक्षांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ठाण्यात दिवाळी, दसरा किंवा सण-उत्सवांच्या कालावधीत तलावपाली, उपवन भागात वृक्षांवर रोषणाईचे प्रकार सुरूच असतो. मिरा भाईंदर येथेही चैत्र नवरात्रौत्सवा निमित्ताने वृक्षांवर रोषणाई करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात काही उपाहारगृह, ढाबे परिसरात व्यवसायिकांनी वृक्षांना प्रकाश रोषणाई करून विद्रुपीकरण केले आहे.

महाराष्ट्रत आणि सर्वत्र उष्णतेचा पारा चढत आहे हवामान खात्याने पुढील दिवसात पारा अजून चढणार असल्याचे वर्तवले आहे. ठाणे शहरात देखील सूर्य आग ओकताना दिसतोय त्यामुळे नागरिक हैराण झाले असून तहानेने जीव व्याकूळ होत आहे म्हणून लोक उन्हातून चालताना डोक्यावर ओढणी कपडा आणि पाणी पिताना दिसत आहे.. फोटो प्रफुल गांगुर्डे

मी मतदान करणारच… इतरांनाही सांगणार

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाणे जिल्हा वकील संघटने कडून जनजागृती ठाणे : लोकसभेच्या ठाणे मतदारसंघात मतदारसंघात ७५ टक्केपेक्षा जास्त मतदान व्हावे, यासाठी 25 ठाणे-लोकसभा मतदार संघाअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्यात येत आहे. याच उद्देश्याने ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या माध्यमातून ठाणे जिल्हा कोर्ट येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. ठाणे जिल्हा कोर्ट परिसरात मतदान जनजागृती होर्डिंग्ज लावण्यात आले होते. ‘चुनाव का पर्व, देश का गौरव’ या टॅग लाईनखाली मी मतदान करणारच… इतरांनाही सांगणार, ‘आपणही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा’ असा संदेश स्वीप टीमने सर्व वकिलांना दिला. वकिलांनी आपल्या संपर्कामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला व येणाऱ्या अशिलाना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन उपस्थित वकिलांना स्वीप पथकाच्या वतीने करण्यात आले. मतदान जनजागृती कार्यक्रम १४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या नियोजनाखाली आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

मतदानासाठी जनजागृती करण्याचा गृहनिर्माण सोसायट्याच्या अध्यक्ष, सचिवांचा निर्धार

ठाणे : लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही सर्व अध्यक्ष व सचिव मतदारदूत’ म्हणून आमची भूमिका बजवणार असून प्रत्येक सोसायटीत १०० टक्के मतदान कसे होईल यासाठी प्रयत्नशिल राहून मतदान जनजागृती मध्ये सहभागी होऊ, असा निर्धार ठाण्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांनी केला. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 25 ठाणे-लोकसभा मतदार संघाअंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघातर्फे स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्यात येत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा अशा सूचना मतदार नोंदणी अधिकारी तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांनी दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार व अतिरिक्त सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.आसावरी संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिव यांच्या कार्यशाळेचे आयोजन नियोजन भवन येथे केले होते. कार्यशाळेच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० कलम ७९ अन्वये सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांना केंद्रस्तरीय स्वयंसेवक घोषित केले असल्याची माहिती अतिरिक्त सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संसारे यांनी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिव यांना दिली. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे असून सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांच्या माध्यमातून जास्तीतजास्त मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अध्यक्ष व सचिव यांचे सक्रिय सहकार्य घेऊन मतदानाचा टक्का वाढविणे हे आपले ध्येय आहे. विशेष म्हणजे मतदान टक्केवारी वाढविण्याचे काम करणाऱ्या सोसायटीच्या वार्षिक लेखा अहवालामध्ये या कामाची नोंद करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा उपनिबंधकांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. या कामामध्ये अध्यक्ष व सचिवांनी चांगले सहकार्य करून मतदार टक्का कसा वाढेल यासाठी विशेष प्रयत्न करावेत. मतदान जनजागृती संबंधित वेगवेगळे उपक्रम राबवून नवीन मतदारांची नोंदणी कशी वाढवता येईल हे पहावे. मागील निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीपेक्षा यावेळच्या मतदानामध्ये मतांची टक्केवारी वाढवावे, असे आवाहन अतिरिक्त सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संसारे यांनी केले. या कार्यशाळेत सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांनी विचारलेल्या प्रश्न व शंकाचे त्वरित निरासन करण्यात आले. या कार्यशाळेत स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक व स्वीप पथकामधील सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेला सोसायटी पॅनलचे अध्यक्ष सीताराम राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

महाराष्ट्रात उलथापालथ होणार !

महायुतीची तीसवर दमछाक  माविआची १८ जागांवर घोडदौड मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय पडजडीनंतर आता निवडणूकीआधीच्या शेवटच्या मतदानपुर्व चाचणीत जबरदस्त उलथापालथ होणार आहे. भाजपाप्रणीत महायुतीला ११ जांगाचा फटका बसणार असून महायुतीची १८ जागांवर विजयी…

आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नीचा शिंदेंविरोधात प्रचार

ठाणे : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे गोळीबाज वादग्रस्त भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी जाहीरपणे प्रचारात उतरल्याचे मंगळवारी दिसून आले. श्रीकांत…

 डायघर कचरा प्रश्न पेटणार

मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी ठाणे : ठाणे महापालिकेचा कचरा डायघर येथे आणला जात असल्याने येथील ग्रामस्थांनी आणि गृहसंकुलांतील रहिवाशांनी बैठका घेऊन लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी सुरू केली आहे. भांडार्ली येथील प्रकल्प बंद झाल्यानंतर मागील नऊ महिन्यांपासून डायघर येथे ठाणे महापालिकेने कचरा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाविरोधात विविध आंदोलने, निवेदन देऊनही निर्णय होत नसल्याने नाइलाजाने हा निर्णय घेतला जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. या प्रकल्पामुळे येथील नागरिकांच्या आरोग्य, शेतीवर परिणाम होत असल्याची तक्रार येथील रहिवासी करत आहेत. दुर्गंधीमुळे येथील रहिवाशांना लाखो रुपयांची घरे विक्रीला काढण्यास सुरूवात केली आहे. ठाणे महापालिकेने हद्दीबाहेरील भंडार्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारला होता. हा कचरा प्रकल्प बंद केल्यानंतर ठाणे महापालिकेने नऊ महिन्यांपूर्वी डायघर येथे कचरा प्रकल्प सुरू केला आहे. सुमारे पाच एकर जागेत हा प्रकल्प उभारण्यात आला असून प्रकल्पालगत शीळ, डायघर, खिडकाळी, पडले, देसाई, उत्तरशीव, सांगार्ली, अभयनगर यासह काही गावे आहेत. याच परिसरात शिवमंदिर, शाळा, मैदान आहेत. गेल्याकाही वर्षांपासून येथे मोठ्याप्रमाणात उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे गृहसंकुलातील रहिवाशांचे प्रमाण वाढले आहे. ठाणे शहरापासून जवळ परंतु नैसर्गिक सानिध्यात राहता यावे म्हणून अनेकांनी लाखो रुपये खर्च करून येथे गृह खरेदी केली. आता या गृहसंकुल आणि गावांपासून काही अंतरावर कचरा प्रकल्प उभा राहिल्याने येथील रहिवासी हैराण झाले आहेत. दररोज दुर्गंधीचा सामना रहिवाशांना सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने गावातील रहिवाशांनी डायघर पंचक्रोशी संघर्ष समितीच्या माध्यमातून या प्रकल्पा विरोध करण्यास सुरूवात केली. येथील गृहसंकुलातील नागरिकांनी या संघटनेला पाठिंबा दिला आहे. ठाणे महापालिका प्रशासनाला निवेदन दिले. परंतु ठोस उपाययोजना होत नाही. दररोज ५० ते ६० डम्पर भरून कचरा परिसरात आणला जातो. मध्यरात्री हा कचरा जमिनीत पुरला जातो. दिवस-रात्र येथे दुर्गंधी निर्माण होत असल्याने विविध गंभीर आजार होत आहे. दुर्गंधीमुळे काहीजण त्यांची घरे विक्रीला काढत आहे. आमच्या शेतीवर देखील याचा परिणाम झाला असून शेतीमध्ये कचरा प्रकल्पातील पाणी शिरत असल्याचा आरोप ग्रामस्थ कर आहेत. आमच्या मागण्यांकडे ठाणे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे स्थानिकांनी सांगितले. या संदर्भाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. येथे सुमारे एक लाखाहून अधिक रहिवाशी वास्तव्य करतात. त्यामुळे त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून डायघर प्रकल्पाविरोधात आंदोलने सुरू आहेत. महापालिका आयुक्त प्रकल्पाला भेट देऊन ग्रामस्थांसोबत चर्चेचे आश्वासन देतात. परंतु पुढे काही होत नाही. जोपर्यंत हा प्रकल्प बंद होत नाही. तोपर्यंत प्रत्येक निवडणुकीत बहिष्कार घातला जाईल असा निर्णय आम्ही घेतला आहे. गृहसंकुलातील रहिवाशांचा देखील आम्हाला पाठिंबा मिळत आहे. – मंगेश खुटारकर, सदस्य, डायघर पंचक्रोशी संघर्ष समिती.

डोंबिवलीत कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी

डोंबिवली : खारफुटीचे घनदाट जंगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात स्थानिकांनी कल्याण डोंबिवली पालिकेचे अधिकारी, नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन कोणत्याही बांधकाम परवानग्या न घेता हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी केली आहे. मध्य रेल्वेच्या डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूला दिवा बाजूने हरितपट्ट्यावर मातीचे भराव टाकून, या भागातील झाडे, हरितपट्टा नष्ट करून या बेकायदा बांधकामांची भूमाफियांनी उभारणी केली आहे. मागील ३० वर्षात कोणीही भूमाफियाने कोपर भागात बेकायदा चाळी, इमारती उभारणीचे धाडस केले नव्हते. पण आता डोंबिवली खाडी किनारची बहुतांशी जागा भूमाफियांनी चाळी, बेकायदा इमारती बांधून हडप केली आहे. आरक्षित भूखंडावर इमले बांधून सज्ज झाले आहेत. आता डोंबिवलीत मोकळ्या जमिनी शिल्लक राहिल्या नसल्याने भूमाफियांनी कोपर पश्चिम रेल्वे स्थानक भागातील मोकळ्या सुमारे ५० ते ६० एकर जमिनीकडे आपल्या नजरा वळविल्या आहेत. या हरितपट्ट्यात शिरकाव करण्यासाठी कोपर पश्चिम रेल्वे स्थानक भागातून रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावरून भूमाफिया हरितपट्टयातील झाडे तोडण्यासाठी, तेथील खुरटी झाडे नष्ट करण्यासाठी जेसीबी, पोकलेन या रस्त्यावरून नेत आहेत. पालिका अधिकारी निवडणूक कामात व्यस्त आहे. त्याचा गैरफायदा भूाफियांनी घेतल्याची चर्चा आहे. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पर्यावरण संवर्धनासाठी कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये हरितपट्टे विकसित करण्याचे आणि अस्तित्वातील हरितपट्टे संरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्त डॉ. जाखड यांच्या आदेशाला आव्हान देत कोपर भागात भूमाफियांनी हरितपट्ट्यात बेकायदा बांधकाम केले आहे. त्यामुळे आयुक्त याविषयी काय भूमिका घेतात याकडे पर्यावरणप्रेमी नागरिकांचे लक्ष आहे. हरितपट्ट्यात बांधकामे सुरू झाल्याने निसर्ग छायाचित्रकार, पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. आयुक्त डॉ. जाखड यांनी हे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त कऱण्याची मागणी नागरिक करत आहेत. रेल्वेच्या अधिकाऱ्याने हे बांधकाम आमच्या हद्दीत नाही. या बांधकामाशी आमचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. कोपर रेल्वे स्थानक भागात हरितपट्ट्यात बेकायदा बांधकाम कोणी केले असेल तर त्या बांधकामाची पाहणी करतो. ते बांधकाम बेकायदा असल्याचे दिसून आले तर ते तात्काळ जमीनदोस्त केले जाईल. -राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली.

 ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार

राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती ठाणे : लोकसभा निवडणूक प्रचारात महायुतीच्या नेत्यांकडून श्री राम मंदिर उभारणीचा उल्लेख केला जात असतानाच, आता ठाकरे गटाचे ठाण्यातील उमेदवार राजन विचारे यांनी चैत्र नवरात्रोत्सवात रामाची प्रतिकृतीसह मंदिराचा मोठा देखावा उभारला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात साजरा होणाऱ्या उत्सवाच्या माध्यमातून ठाकरे गटाने निवडणूक प्रचारात राम मंदिराचा मुद्दा घेऊन भाजपला शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने चैत्र नवरात्रोत्सव साजरा होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे यांच्याकडून या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. उत्सवाचे २९ वे वर्ष असून यापूर्वी चरई भागात १२ वर्षे हा उत्सव साजरा होत होता. गेल्या १७ वर्षांपासून मैदानात हा उत्सव साजरा होत आहे. याठिकाणी देवीच्या दर्शनाला भावीक मोठ्या संख्येने येतात. या उत्सवात ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनीही राम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. या मंदिराची उंची ७० फूट आहे. देवीचा सभा मंडप २४×२४ फुटाचा आहे. त्यामध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा गाभारा १६×१६ फुटाचा आहे. ४०X४०`नऊ’ हवनकुंड असलेला मंडप आणि त्या भोवतालचा प्रदक्षिणा मार्ग आहे. याठिकाणी रामाची मोठी प्रतिकृती उभारण्यात आली आहे. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यावरून राजकारण तापले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदिर उभारण्यात आल्याचा मुद्दा भाजपच्या नेत्यांसह महायुतीचे नेते उपस्थित करत आहे. लोकसभा निवडणूक प्रचार मेळाव्यातही महायुतीच्या नेत्यांकडून राम मंदिर उभारणीचा उल्लेख केला जात आहे. भाजपला शह देण्यासाठी ठाण्यात ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी नवरात्रोत्सवात राम मंदिर प्रतिकृती उभारल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर यानिमित्ताने राम मंदिराबद्दल आस्था असल्याचे ठाकरे गटाने दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.