Category: ठाणे

Thane news

भाजपा निष्ठावंतांच्या ठाण्यात जोरबैठका

ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघावर एकनाथ शिंदेच्या शिवसेना एवेजी भाजपाने आपला दावा सांगितल्याने पेच कायम आहे. त्यातच ठाण्यातून जर भाजपाला तिकीट मिळालीच तर ती आयारामांना न देता पक्षातील निष्ठावंताना मिळावी यासाठी…

सांडपाणी वाहिन्या फुटल्याने सगळीकडे दुर्गंधी

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर डोंबिवली : एमआयडीसी निवासी मधील सांडपाणी वाहिन्या आणि त्यावरील चेंबर्स जागोजागी फुटल्याने त्यातील लाखो लिटर सांडपाणी रोज उघड्या नाल्यात आणि पावसाळी गटारात जात असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अस्वच्छता, रोगराई, डासांचे वाढते प्रमाण हे या सांडपाणी उघड्यावर वाहण्याचे दुष्परिणाम होत असून एमआयडीसी आणि केडीएमसी यातून काहीच बोध घेतला नसल्याची टीका रहिवासी करत आहेत. एमआयडीसी निवासी मधील या सांडपाणी वाहिन्या चाळीस वर्षांपेक्षा अधिक जुन्या झाल्याने त्या बदलण्याचे काम एमआयडीसी कडून आता काँक्रिट रस्ते झाल्यावर उशिरा सुरू झाले आहे. परंतु हेही काम अत्यंत कूर्मगतीने सुरू असल्याचे दिसत आहे. सदर या जुन्या वाहिन्या फुटल्यावर सद्या एमआयडीसी कडून कोणतीही दुरुस्ती केली जात नाही. कारण सांगितले जात आहे की आता नवीन सांडपाणी वाहिन्यांचे काम चालू असल्याने त्या जुन्या वाहिन्या काही दिवसातच बाद होणार आहेत. पण हे काम पूर्ण होण्यास कमीतकमी अजून एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत येथील नागरिकांनी या उघड्यावर बाहेर पडणाऱ्या सांडपाणी वाहिन्यांचे दुष्परिणाम भोगायचे का ? असा सवाल दक्ष नागरिक, रहिवासी संघटनेचे सचिव राजू नलावडे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, मनपाकडून कीटकनाशक फवारणी आणि धूरिकरण हेही कित्येक दिवसात केले गेले नाही. निवासी मधील सोमेश्वर पार्क सोसायटी जवळ ( आरएक्स १/१), कावेरी चौक परिसर आणि मिलापनगर तलाव रोडवर इत्यादी अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिन्या फुटून ते सांडपाणी उघड्या गटारात वाहत असल्याच्या तक्रारी एमआयडीसी कडे करूनही त्याची दखल घेतली जात नाही आहे. त्यात सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी हे सद्या लोकसभा निवडणुकीत प्रचारात मश्गूल असल्याने त्यांना हा महत्त्वाचा प्रश्न दिसत नाही आहे असे वाटते. मतदार जनताही चुपचाप हे सहन करीत आहे. येथील जनतेकडून करोडो रुपयांचा मालमत्ता कर घेणाऱ्या केडीएमसीने तरी यात लक्ष घालून ह्या गंभीर प्रश्नाची दखल घ्यावी अशी मागणी नलावडे यांनी केली.

ताबा सुटून ट्रक झाडाला धडकून उलटला

मुंबईकडे जाणारी वाहतूक तासभर विस्कळीत ठाणे- औषधे घेऊन मुंबईला निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक झाडाला धडकला आणि त्या अपघातात तो ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉपसमोर घडली. औषधे घेऊन मुंबईला निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक झाडाला धडकला आणि त्या अपघातात तो ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉपसमोर घडली. याचदरम्यान पाठी मागून येणारी कार त्या ट्रक धडकली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी, मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर चांगला परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळाले. या मार्गावर सुमारे एक तास वाहतुक धीम्या गतीने सुरू होती. तसेच ही धडक इतकी जोरात होती की त्यामध्ये ते झाड पडले. या अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून तेथून पलायन केल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. नागपूर येथून मुंबई घाटकोपर येथे दहा टन औषध घेऊन ट्रक चालक जगदीश गौतम (40) हा निघाला होता. सकाळी साडेसहाच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉप समोर आल्यावर ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला. आणि तो ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावरती जाऊन जोरात आदळला. तसेच तो तेथील रस्त्यावरती उलटला. या धडकेत ते झाड ही पडले होते. तसेच त्या अपघातग्रस्त ट्रकच्या मागून येणारे कार ट्रकच्या मागील बाजूस जाऊन धडकली. सुदैवाने या अपघातात कारमधील चालकासह 5 जणांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस, नौपाडा पोलीस हे ०१-हायड्रा मशीनसह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक सुमारे ०१-तासापर्यंत रस्त्याच्या एका बाजूने धीम्या गतीने सुरू होती. तर अपघातामुळे रस्त्यावरती पडलेले झाड आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी कापून बाजूला केले. तसेच अपघात ग्रस्त दोन्ही वाहने पोलीस कर्मचाऱ्यांनी ०१-हायड्रो मशीनच्या सहाय्याने रस्त्याच्या एका बाजूला करून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात यश आल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.

अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम १५ एप्रिलपासून पुन्हा सुरू

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश ठाणे : धोकादायक इमारती रिक्त करण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या व्यवस्थेसाठी प्रमाणित कार्य पद्धती तयार करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी दिले.  तसेच, नैसर्गिक आपत्ती निवारण आणि नागरिकांची जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीकोनातून १५ एप्रिलपासून अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्याच्या सूचनाही श्री. राव यांनी दिल्या आहेत. महापालिका आयुक्त सौरभ राव हे प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाला भेट देवून तेथील कार्यपद्धती जाणून घेत आहेत. या उपक्रमात, शुक्रवारी आयुक्त राव यांनी मुंब्रा आणि दिवा या दोन प्रभाग समितीची माहिती घेतली. मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयात झालेल्या या बैठकीस, अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, परिमंडळ एकचे उपायुक्त मनीष जोशी, सहायक आयुक्त (मुंब्रा) बाळू पिचड, सहायक आयुक्त (दिवा) अक्षय गुडदे, तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते. गेल्या १५ महिन्यात, मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामाची संख्या ४० होती. त्यापैकी ०८ इमारती पाडण्यात आल्या. १४ इमारती पाडण्याची कार्यवाही सुरू आहे. तर, १८ इमारतीमध्ये कुटुंबे राहत आहेत. मुंब्रा येथील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची संख्या मोठी आहे. त्यात, अती धोकादायक ०६ इमारती आहेत. त्यापैकी, ०४ इमारती रिकाम्या असून ०२ अजूनही व्याप्त आहेत. १०० धोकादायक इमारती असून त्यातील ०८ इमारतींची दुरुस्ती झाली आहे. २३ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल आले असून त्या दुरुस्त करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. ५७ इमारतींचे दुरुस्ती काम संथ गतीने सुरू आहे. तर, ०९ ठिकाणी काम सुरू झालेले नाही. ०३ इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत. तसेच, ३५० इमारतींची त्या व्याप्त असतानाच दुरुस्ती करायची आहे. तर, ८८४ इमारतींची किरकोळ दुरुस्ती आवश्यक आहे. मुंब्रा येथील एकूण ६६ धोकादायक इमारतीबाबत तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. या इमारतींची सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांच्या टीमने तातडीने पाहणी करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी बैठकीत दिले. ज्या इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल परस्पर विरोधी आले आहेत. त्या इमारतींची पाहणी ते दोन्ही स्ट्रक्चर ऑडिटर आणि महापालिकेने नियुक्त केलेले त्रयस्थ ऑडिटर यांनी संयुक्तपणे करून अहवाल द्यावा. येत्या काही दिवसात ही कार्यवाही पूर्ण करावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. जे स्ट्रक्चर ऑडिटर दिशाभुल करणारा अहवाल देतील, त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येता पावसाळा हा नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीचा असण्याची शक्यता आहे. कमी काळात मोठा पाऊस असे त्याचे स्वरूप असू शकेल. त्यांची वारंवारताही अधिक असेल. हे लक्षात घेऊन आपत्कालीन व्यवस्थापन करावे लागणार आहे. त्यामुळे, विशेष करून मुंब्रा भागात पर्यायी निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, वाहतूक व्यवस्था यांचे तपशीलवार नियोजन करावे. त्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करावा, स्वयंसेवी संस्थांचे नेटवर्क, खाजगी बांधकाम व्यवसायिकांची यंत्र सामुग्री यांची माहिती घ्यावी. काळजी घेणे आणि तत्काळ प्रतिसाद देणे हे आपल्या हाती आहे. ते आपण काटेकोरपणे करावे, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. गेल्या १५ महिन्यात, दिवा येथील २७३ अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. त्यात, १८७ इमारती अजूनही व्याप्त आहेत. ३२ इमारती पाडण्यात आल्या आहेत. तर, ५४ अव्याप्त इमारती निष्कासन करण्याची कार्यवाही सुरू आहे. अती धोकादायक किंवा धोकादायक स्थितीत एकही इमारत दिवा येथे नाही. ६७ इमारतींना मोठ्या तर ५८५ इमारतींना किरकोळ दुरुस्तीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती यांची प्रस्तावित नवीन कार्यालये, देसाई खाडी पूल, त्यांचे पोहचमार्ग, दिवा रेल्वे उड्डाणपूल, दिवा येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालय, नाल्याची कामे, जलकुंभ आदी कामाची आयुक्त राव यांनी विस्तृत माहिती घेतली. बैठकीनंतर, आयुक्त राव यांनी कौसा येथील स्वातंत्र्य सेनानी हकीम अजमल खान रुग्णालयाची पाहणी केली. तेथे सध्या सुरू असलेल्या ओपीडी सेवांची पाहणी केली. तसेच, नियोजनबद्ध काम करून हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या सूचना आयुक्त राव यांनी दिल्या.

ठाणे येणाऱ्या १४ एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने कोर्ट नाका येथे बाजारात बाबासाहेबांच्या फोटो,मेसेज, सहीचे टीशर्ट आणि पेन आले असून अनुयायां मध्ये आकर्षण आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे. (फोटो-प्रफुल गांगुर्डे)

भाजपा राज्यस्तरीय पक्षांना मगरीसारखा गिळून खातो- जितेंद्र आव्हाड

ठाणे: भाजप हा राज्यस्तरीय पक्ष टिकून देत नाही. त्यांनी ज्या ज्या पक्षांबरोबर युती केली, ते पक्ष मगरी सारखे गिळून टाकल्याची टिका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. भाजपचे चाल आणि चरीत्र फार वेगळे आहे. ते दाखवतात एक आणि करतात एक अशी त्यांची निती असल्याची टिकाही त्यांनी केली. ठाण्यात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही टिका केली. ठाणे आणि कल्याणच्या जागेवरुन आव्हाड यांना छेडले असता त्यांनी ही टिका केली. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या रक्ताच्या आहेत, आणि त्यांना जर राजकीय फायदा घ्यायचाच असता तर त्यांनी सुप्रिया सुळे पवार असे नाव लावले असते. त्यात अशा निवडणुका या कर्तुत्वावर लढवाव्या लागतात. तुमचा लोकसभेमधील परफॉर्मस काय यावर लढविल्या जातात असेही ते म्हणाले. निवडणुकीचे काहीच मुद्दे राहिलेले नसल्याने आणि तुम्हाला आता कॉनीफडेन्स आलेला असून आता आपले काहीच चालू शकत नाही, हे कळून चुकले असल्यानेच असे मुद्दे काढत असल्याची टिकाही त्यांनी अजित पवार यांच्यावर केली. विकासाच्या मुद्यावरुन भाजपला निवडणुका लढवायच्याच नाहीत, दोन कोटी नोकऱ्या देणार होते, काय झाले? आज ८३ टक्के युवक बेरोजगार आहेत, याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी केला. हिंदु, मुस्लिम सोडून भाजप कोणताच प्रचार करीत नसल्याचेही ते म्हणाले. विविध नोकºयांसाठी परप्रातींय राज्यात आलेले आहेत. मराठी माणसाला आता कुठेच स्थान राहिलेले नसल्याचे सांगत, ज्या दिवशी मराठी माणसाला ५० खोक्यांना विकले त्या दिवसापासून मराठी माणसाचे स्थानही गमावले गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भाजपवाल्यांना हे लक्षात आले आहे की हे पैशांसाठी हापहापले असून त्यांना पैसे टाका आणि विकत घ्या असे सुत्र आजमावले जात असल्याचेही ते म्हणाले. निवडणुकीत खुले आम अमिषे दाखविले जात असल्याबाबत त्यांना छेडले असता, बेशीस्तपणाने भाजपवाले वागत असून निवडणुक विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. निवडणुक विभाग हे भाजपवाल्यांच्या हातचे बाहुले झाले असल्याची टिकाही त्यांनी केली. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की ही जागा आपल्यालाच मिळावी, त्यातून रुसवे फुगवे होत असतात. परंतु वरीष्ठ नेते त्यांची मनधरणी करतील असेही ते म्हणाले. तुमच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत, म्हणून शरद पवार हे संकोचित आहेत असे म्हणावे लागत असल्याचे सांगत आव्हाड यांनी प्रफुल पटेल यांच्यावर टिका केली. आजही पटेल यांना शरद पवार यांचे नाव घेऊन चर्चेत राहावे लागत असल्याचेही ते म्हणाले.

भिवंडीत तिरंगी लढत; निलेश सांबरे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार

बदलापूर: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासमोर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी घोषित केली होती. या जागेवर जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे काँग्रेसतर्फे इच्छुक होते. मात्र ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने निलेश सांबरे यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी मिळवली. वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक खात्यावरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कपिल पाटील यांच्यासमोर आता सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले निलेश सांबरे यांचेही आव्हान उभे टाकले आहे. ठाणे जिल्ह्यात ठाणे कल्याण आणि भिवंडी या तीनही लोकसभा मतदारसंघांमध्ये कशी लढत होईल याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वैशाली दरेकर…

कल्याण-डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा

आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचे आदेश कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ३६० कोटींची २४ कॉँक्रीट   रस्त्यांची आणि पालिकेतर्फे सात काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामधील सुरू असलेली आणि प्रस्तावित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा आणि प्रवाशांना पावसाळ्यात वाहतूक कोंडीचा कोणताही त्रास होणार नाही असे नियोजन करा, असे आदेश आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पालिका, एमएमआरडीए अधिकाऱ्यांंना पालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत दिले. विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. एमएमआरडीएची सर्वाधिक कामे पालिका हद्दीत सुरू आहेत. ही कामे करताना अनेक वेळा प्रवाशांना वाहन कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. नोकरदार वर्ग, शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या बसना कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता सुरू असलेली काँँक्रीट रस्ते कामे, इतर रुंदीकरणाची कामे लवकर पूर्ण करा, असे आदेश आयुक्त डॉ.जाखड यांनी अधिकाऱ्यांना दिले. टिटवाळा ते हेदुटणे बाह्य वळण रस्ते मार्गातील दुर्गाडी किल्ला, गोविंदीवाडी ते मोठागाव या तिसऱ्या टप्याच्या कामातील भूसंपादन आणि अतिक्रमणे, इतर अडथळे दूर करून हे काम गतीने सुरू करा. पालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने हे काम पूर्ण करावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. महानगर गॅसला सूचना महानगर गॅसकडून डोंबिवलीत विविध भागात वाहिनीव्दारे गॅस पुरवठा करण्यासाठी सोसायट्यांमध्ये वाहिका टाकण्याची कामे केली जात आहेत. ही कामे करताना महानगर गॅसचा ठेकेदार मनमानेल तशी खोदाई करतो. सोसायटी आवारात वाहिका टाकण्यासाठी केलेले खोदकाम, तोडकाम सुस्थितीत न करता निघून जात असल्याच्या अनेक तक्रारी पालिकेत दाखल झाल्या आहेत. महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी आपल्या ठेकेदाराला ही कामे येत्या आठ दिवसात पूर्ण करण्याची सूचना करावी, असे आयुक्तांनी सूचित केले. रोहित्र स्थलांतर, मल, जल निस्सारणाची शहराच्या विविध भागात सुरू असलेली कामे लवकर पूर्ण करा. पावसाळा सुरू झाल्यानंतर कोणतेही काम सुरू राहणार नाही याची काळजी घ्या, असे आयुक्त जाखड यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या बैठकीला पालिका शहर अभियंता अनिता परदेशी, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंंता अर्जुन कोरगावकर, कार्यकारी अभियंता अरविंद ढाबे, भगवान चव्हाण, लोकेश चौसष्ठे, पालिकेचे कार्यकारी अभियंता मंगेश सांगळे, जगदिश कोरे, शैलेश मळेकर, शैलेश कुलकर्णी, उपायुक्त प्रसाद बोरकर, रमेश मिसाळ, साहाय्यक आयुक्त, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार उपस्थित होते. पालिका हद्दीत सुरू असलेली, प्रस्तावित असलेली सर्व काँक्रीट रस्ते कामे आणि इतर विभागांची कामे पाऊस सुरू होण्यापूर्वी पूर्वी पूर्ण करा. पावसाळ्यात प्रवाशांना या कामांंमुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. – डॉ. इंदुराणी जाखड, आयुक्त.

 ग्रामस्थांना पाणीपुरवठा वेळेत व्हावा – छायादेवी शिसोदे

जल जीवन मिशन अंतर्गत ठाणे : जल जीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा वेळेत व्हावा. येथील कामकाज भौतिकदृष्ट्या पुर्ण झाले असून मुंबई महानगर महापालिका यांच्या मार्फत जल जोडणी झाल्यावर येत्या १० दिवसांत अनगावात पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल अशाप्रकारे कामकाज करावे, अशा सूचना ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिल्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी भिवंडी पंचायत समिती येथे भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. माझी वसुंधरा अंतर्गत दिलेल्या कामाविषयी माहिती घेत वेळेत काम पूर्ण करण्याबाबत उचित कार्यवाही करण्याच्या सुचना यावेळी दिल्या. अनगाव येथील जल जीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा वेळेत व्हावा. येथील कामकाज भौतिक दृष्ट्या पुर्ण झाले असून मुंबई महानगर महापालिका यांच्या मार्फत जलजोडणी झाल्यावर येत्या १० दिवसांत अनगावात पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल अशाप्रकारे कामकाज करावे यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी डॉ. प्रदीप घोरपडे व उप अभियंता पापू सासे यांना सुचना दिल्या. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना अंतर्गत अकलोली ग्रामपंचायत अंतर्गत सुरु असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम पाहणी करण्यात आली. कामकाज तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना उपस्थितींना दिल्या. प्रादेशिक पाणीपुरवठा संदर्भातील जल जीवन मिशन अंतर्गत विहिरींची कामे पहाणी करून पाणी शुद्धीकरण केंद्र येथे फिल्टर प्लान्टला भेट देऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तपासण्यात आली. तसेच वज्रेश्वरी ग्रामपंचायतीला भेट देण्यात आली. पुढील महिन्यातील वज्रेश्वरी देवीच्या यात्रेसंदर्भात पूर्व नियोजन करण्यासाठी सुचना देण्यात आल्या. यात्रेत स्वच्छ्ता, पिण्याचे पाणी, रस्ता व इतर सोयीसुविधा बाबत पोलिस निरीक्षक गणेशपुरी धर्मराज सोनके, सरपंच, ग्रामसेवक व कमिटी सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी येथे भेट देऊन रुग्णालयात सर्व सोयीसुविधाची प्रत्यक्ष पाहणी करून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन कामकाज करावे असे मार्गदर्शन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र अनगाव येथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची पहाणी देखील करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी डॉ. प्रदीप घोरपडे, उप अभियंता पापू सासे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलीनी ठोंबरे, विस्तार अधिकारी सुधाकर सोनावणे, पंचायत समिती भिवंडी येथील अधिकारी व कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी येथे उपस्थित होते.

मातीच्या मडक्यांना अच्छे दिन

वाढत्या गरमीमुळे माठाला अधिक पसंती वडखळ : मागील दोन आठवड्यांपासून वातावरणात वाढत असलेल्या गरमीमुळे अनेकांनी बचावात्मक पवित्रा घेत अनेक वेगवेगळे उपाय करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणजे फ्रीजऐवजी…