Category: ठाणे

Thane news

  खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड टेनिस क्रिकेट फेडरेशनच्या माध्यमातून मुलांचे क्रिकेटर होण्याचं स्वप्न साकार होणार – डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे…

बल्याणी येथे उर्स निमित्त लावलेले ठाकरे गटाचे बॅनर फाडले

बल्याणी येथे उर्स निमित्त लावलेले ठाकरे गटाचे बॅनर फाडले कल्याण: बल्याणी विभागात पीर वली शाह दर्गा ऊर्स २०२६ निमित्त प्रभाग क्र. 4 मध्ये लावण्यात आलेले शिवसेना ठाकरे गटाचे केडीएमसीचे नवनिर्वाचित नगरसेवक राहुल कोट आणि तेजश्री गायकवाड यांचे अधिकृत बॅनर काही समाजकंटकांकडून फाडण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांनी जाणूनबुजून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सदर कृत्य अत्यंत निंदनीय असून लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या भावना दुखावणारे आहे. या घटनेमागील दोषींवर पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. जर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत असून पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

 ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ पुस्तकाचे ठाण्यात प्रकाशन

मराठीतून विज्ञान प्रसाराचा उपक्रम ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ पुस्तकाचे ठाण्यात प्रकाशन  सिद्धेश शिगवण ठाणे :मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग आणि मराठा मंडळ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हेमंत साने लिखित व लोकवाङ्मय गृह प्रकाशित ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी मराठा मंडळ हॉल, पाचपाखाडी, ठाणे (प.) येथे होणार आहे. या कार्यक्रमाला ‘जिज्ञासा’ संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे, ज्येष्ठ विज्ञान प्रसारक व लेखिका डॉ. मानसी राज्याध्यक्ष आणि मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाचे कार्यवाह प्रा. नामदेव मांडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मराठा मंडळ, ठाणेचे अध्यक्ष सुरेश सुर्वे व सरचिटणीस राजेंद्र साळवी यांचीही उपस्थिती राहणार आहे. ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ या पुस्तकात ११८ मूलद्रव्यांची माहिती मराठीत देण्यात आली असून विविध वैज्ञानिक व अभियांत्रिकी संकल्पना सोप्या भाषेत उलगडून सांगितल्या आहेत. अशा स्वरूपाचे हे मराठीतील पहिलेच पुस्तक असल्याचे आयोजकांनी नमूद केले. विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच विज्ञानप्रेमी नागरिकांनी या मराठीतून विज्ञान प्रसाराच्या उपक्रमाला उपस्थित राहून पाठबळ द्यावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभागाचे अध्यक्ष व ज्येष्ठ खगोल अभ्यासक सोमण यांनी केले आहे.

१८ फेब्रुवारी पर्यंत उन्नती मैदान ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम

१८ फेब्रुवारी पर्यंत उन्नती मैदान ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम अनिल ठाणेकर ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना अनुभवयास मिळणार आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे कालपासून सुरू झालेल्या “मालवणी महोत्सव- २०२६” चे आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नं. १, शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानातील स्व. अजित पवार महोत्सव नगरीमध्ये करण्यात आले आहे. १८ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव असणार आहे. महोत्सवाचे यंदा २७ वे वर्ष असुन मालवणी मेजवानीसह वेंगुर्लेकरांचे दशावतारी नाटक, डबलबारी,गणपतीचे अथर्वशीर्ष, राज्यस्तरीय स्तोत्रपठण स्पर्धा आणि दररोज पवित्र अग्निहोत्र आदी महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे अविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी समुह नृत्यस्पर्धा तसेच दोन दिवसीय साहित्य संमेलन, काव्यलेखन स्पर्धा स्वर्गीय कवीवर्य मंगेश पाडगावकर दालनात होणार असुन रिल स्पर्धाही आयोजित केली आहे. तर, महिलावर्गासाठी “खेळ पैठणीचा”मध्ये महाराणी पैठणी जिंकण्याची संधी महोत्सवात मिळणार आहे. अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्रामविकास मंडळ व ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष, भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.कोकणातील शेतकरी, व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, मालवणी कला – संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा, या हेतुने नगरसेवक सीताराम राणे गेली २७ वर्षे ठाण्यात मालवणी महोत्सवाचे भव्य आयोजन करतात. सलग ११ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार,वनमंत्री गणेश नाईक, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री रविंद्र चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते आ. प्रविण दरेकर, आ. निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देणार आहेत. चौकट – रामती येथे नुकतेच अपघाती दुःखद निधन झालेले राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणुन कोकण ग्रामविकास मंडळाच्या ठाण्यातील उन्नती गार्डन मैदानातील मालवणी महोत्सवासाठी स्व. अजितदादा पवार महोत्सव नगरी उभारण्यात आली आहे. या मालवणी महोत्सवात एकुण ७५ च्या आसपास व्यावासायिकांचे स्टॉल्स आहेत. प्रवेशद्वारावर कोकणस्थ रेखीव मंदिरामध्ये गणपती बाप्पाचे दर्शन भाविक आणि खवय्यांना घेता येणार असुन या मंदिरात दररोज भजन आणि मालवणी पद्धतीतील आरती केली जाणार आहे.तसेच, श्री स्वामी समर्थाची महती विषद करणारे विशेष भजन कणकवली वाघेरी येथील भजनी मंडळ सादर करणार आहे. चौकट – मालवणी महोत्सवात ११ दिवस दररोज अग्निहोत्र विधी होणार असुन विविध लोककलांचा जागर आणि कथा – कविता आदी साहित्यरूची वाढवणारे रंगतदार कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. महिलावर्गासाठी खेळ पैठणीचा, डबलबारी भजनाची जुगलबंदी आणि वेंगुर्ला येथील दशावतारी नाट्यप्रयोग आदी कलाकृती सादर केल्या जाणार आहेत. याशिवाय, मालवणी महोत्सवात दररोज स्थानिक बालगोपाळांचे कार्यक्रम व स्पर्धा सादर होणार असुन राज्यस्तरीय स्त्रोत्र पठण स्पर्धा व काव्यलेखन स्पर्धा होणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी महोत्सवाची सांगता होईल. तरी, खेळ पैठणीचा व विविध स्पर्धामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे नोंदवावीत.असे आवाहन मालवणी महोत्सवाचे आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांनी केले आहे.

योगदान फाउंडेशन ट्रस्टकडून ‘माझा रुपया निसर्गासाठी’ उपक्रमाची सुरुवात

योगदान फाउंडेशन ट्रस्टकडून ‘माझा रुपया निसर्गासाठी’ उपक्रमाची सुरुवात कल्याण: उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाई, वाढते तापमान आणि त्यामुळे पक्षी व इतर व जीवसृष्टीसमोर निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता, योगदान फाउंडेशन ट्रस्टतर्फे माझा रूपया  निसर्गासाठी’ या लोकसहभाग उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक व्यक्तीने फक्त एक रुपया योगदान देऊन निसर्ग संवर्धनासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्याच्या काळात निसर्ग संरक्षणासाठी मोठ्या देणग्यांपेक्षा सामूहिक सहभाग अधिक प्रभावी ठरतो या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येकासाठी सहज शक्य असलेले एक रुपये  योगदान हे या मोहिमेचे वैशिष्ट्य असून, कोणताही आर्थिक बोजा न पडता प्रत्येक नागरिकाला निसर्गासाठी आपली जबाबदारी पार पाडण्याची संधी या माध्यमातून मिळत आहे. या उपक्रमांतर्गत जमा होणाऱ्या योगदानातून पक्ष्यांसाठी पाणपोई उभारणे, वृक्षरोपण करणे, पक्ष्यांसाठी प्राथमिक उपचार केंद्र सुरू करणे, तसेच निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृती करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात पाण्याअभावी होणारे पक्ष्यांचे हाल कमी करण्यावर या मोहिमेचा भर राहणार आहे. योगदान फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष मदनमोहन चव्हाण यांनी सांगितले की, “₹1 ही केवळ रक्कम नसून निसर्गासाठी दिलेला सहभाग आहे. मोठ्या योगदानाची अपेक्षा न ठेवता, सामान्य माणसालाच या चळवळीच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.” या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन ही केवळ संस्था किंवा शासनाची जबाबदारी नसून, समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांनी या लोकसहभाग उपक्रमात सहभागी होऊन *‘माझा ₹1 निसर्गासाठी’* या संकल्पनेला पाठबळ द्यावे, असे आवाहन योगदान फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

 ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलचे कल्याणमध्ये उद्घाटन

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलचे कल्याणमध्ये उद्घाटन केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल आणि डॉ. पौर्णिमा सातोस्कर यांच्या हस्ते वैष्णवी मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन कल्याण : कल्याण शहराच्या आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर घालत ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन कल्याणात करण्यात आले.  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल आणि जी.एस. मेडिकल कॉलेजच्या डॉ. पौर्णिमा सातोस्कर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या अत्याधुनिक वैष्णवी रुग्णालयाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. कल्याणातील सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ञ डॉ. अश्विन कक्कर यांच्या पुढाकारातून हे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले आहे. तळ मजला अधिक सात मजले अशा भव्य इमारतीमध्ये तब्बल ४८ बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून हे रुग्णालय ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलपैकी एक ठरले आहे. सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेला शस्त्रक्रिया कक्ष, लेबर कक्षासह नवजात अर्भकांना बाहेरून येणाऱ्या लोकांकडून कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी या रुग्णालयात घेण्यात आली आहे.  डॉ. अश्विन कक्कर यांना २३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्या जुन्या रुग्णालयात ४३ हजारांहून अधिक महिलांची प्रसूती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापैकी सुमारे ७० टक्के प्रसूती नैसर्गिक पद्धतीने झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी बोलताना डॉ. कक्कर म्हणाले की, या नव्या रुग्णालयासाठी आपल्याला कोविड काळात केडीएमसीचे माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रेरणा दिली. तर तत्कालीन आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी जागेच्या अडचणी दूर केल्या आणि विद्यमान आयुक्त अभिनव गोयल यांनी आवश्यक त्या शासकीय परवानग्या वेळेत उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे विक्रमी २६ महिन्यांत ही भव्य इमारत उभी राहू शकल्याचेही ते म्हणाले. या नव्या रुग्णालयामुळे परिसरातील महिलांना आधुनिक आणि आणखी सुरक्षित प्रसूती सेवा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

 दिवा शहरात महापालिकेचा गलथान कारभार; नगरसेवक ऍड. आदेश भगत यांचे आयुक्तांना निवेदन.

दिवा शहरात महापालिकेचा गलथान कारभार; नगरसेवक ऍड. आदेश भगत यांचे आयुक्तांना निवेदन. दिवा : दिवा शहरातील वाढती अस्वच्छता आणि रस्त्यांवर ठिकठिकाणी साचलेला कचरा यासाठी केवळ ठाणे महानगर पालिका जबाबदार असून यापुढे पालिका प्रशासनाचा असला गलथान कारभार सहन केला जाणार नाही असा इशारा देत प्रभाग क्रमांक २७ चे नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी पालिका आयुक्तांना लेखी पत्र दिले आहे. दिवा शहरात मागील काही वर्षात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी व शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या पाठपुराव्यामुळे सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची विक्रमी कामे झाली आहेत. दिवा शहरातील विशेषतः प्रभाग क्रमांक २७ मधील बहुतांशी प्रमुख रस्ते तसेच अनेक अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. परंतु पालिकेतर्फे सदर रस्त्यांची एक दिवसा आड, दोन दिवसा आड, कळस म्हणजे काही रस्त्यांवर तर तीन ते चार दिवसा आड साफसफाई केली जाते. परिणामी सर्व ठिकाणी प्रचंड अस्वच्छता असते, ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसतो. यासंदर्भात नागरिकांनी तक्रार करून सुद्धा त्याकडे महानगर पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी आल्याचे नगरसेवक ऍड.आदेश भगत यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. करदात्या दिवेकरांवर हा एक प्रकारचा अन्याय आहे, यापुढे पालिकेचा असला गलथान कारभार सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.  लवकरच शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांची भेट घेतली जाणार असल्याचे नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी सांगितले आहे.

  पाणी बिल थकबाकी वसुलीसाठी ठाणे महापालिकेची मोहीम तीव्र

पाणी बिल थकबाकी वसुलीसाठी ठाणे महापालिकेची मोहीम तीव्र १५ दिवसांत ९.८८ कोटींची वसुली ठाणे: ठाणे महानगरपालिका हद्दीत पाणी बिल थकबाकीदारांवर महापालिकेने कडक कारवाई सुरू केली असून गेल्या १५ दिवसांत (२० जानेवारी ते ५ फेब्रुवारी) प्रभाग समितीनिहाय मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान तब्बल ९ कोटी ८८ लाख १४ हजार ३४५ रुपयांची वसुली करण्यात आली आहे.  या कारवाईत पाणीपुरवठा विभागाने थकबाकीदारांवर नळसंयोजन खंडीत करणे, नोटिसा देणे, पंप जप्त करणे आणि पंप रूम सील करणे अशा कठोर उपाययोजना राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही मोहिम राबविण्यात येत असून ती सुरूच राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने नमूद केले. या कारवाईत दिवा येथे ३१३ नळसंयोजन खंडीत करण्यात आली, २१ पंप जप्त तर ३४ पंप रुम सील करण्यात आले असून ३२४ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कळवा प्रभागसमितीत ७० नळसंयोजने खंडीत करण्यात आली. लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती १३४ नळसंयोजने खंडीत करुन एकूण ६०० जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मुंब्रा प्रभाग समितीत २३६ नळसंयोजने खंडीत, १८१ पंप जप्त करुन ४१ पंप सील करण्यात आले असून ३७३६ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नौपाडा कोपरी प्रभाग समिती हद्दीत २४५ नळसंयोजने खंडीत करुन ३७० जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. उथळसर प्रभाग समिती हद्दीत ७१ नळसंयोजने खंडीत करण्यात आली. वर्तकनगर प्रभागसमितीत ४ नळसंयोजने खंडीत करुन २६ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर वागळे प्रभाग समितीमध्ये १ नळसंयोजन खंडीत करण्यात आले आहे.  एकूण १०७४ नळसंयोजन खंडीत करण्यात आली. तर २०२ पंप जप्त, ७५ पंप रुम सील करण्यात आले असून एकूण ५०५६ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. प्रभाग समितीनिहाय करण्यात आलेली  वसुली माजिवडा मानपाडा  प्रभाग समिती : रु. २,१६,३२,८४२ नौपाडा कोपरी प्रभाग समिती :  रु. १,५७,५१,०१२ कळवा प्रभाग  समिती : रु १,२२,२७,२९२ वर्तकनगर प्रभाग  समिती रु.: १, १४,०७,८९३ उथळसर प्रभाग समिती रु. १,०९,८९,४९८ दिवा प्रभाग समिती : रु ७५,५४,३७५ लोकमान्य/सावरकर नगर प्रभाग समिती : रु ६९,७७,७३५ मुंब्रा प्रभाग समिती :  रु. ४८,६०,५७५ वागळे प्रभाग समिती :  रु. ५६,२३,५६४ याशिवाय नागरी सुविधा केंद्र व इतर माध्यमांतून रु. १७,८९,५५९ इतकी वसुली करण्यात आली. थकबाकीदारांविरुद्ध ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

  महापौर हर्षाली चौधरी यांच्या प्रयत्नाने अटाळी येथे रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात

महापौर हर्षाली चौधरी यांच्या प्रयत्नाने अटाळी येथे रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात पदभार स्वीकारून दोनच दिवसातच रस्त्याचे काम झाले सुरू कल्याण : महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधीतून (मूलभूत सोयी-सुविधा अंतर्गत) कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पॅनल क्रमांक ३ मध्ये वाल्मीकी शाळा ते अटाळी गावापर्यंत नवीन डांबरीकरण रस्ता तयार करण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुकर होणार आहे. दीर्घकाळापासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडी, खड्डे आणि पावसाळ्यात चिखल यांचा त्रास सहन करावा लागत होता. नव्याने करण्यात येणाऱ्या डांबरीकरणामुळे या सर्व समस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच वडवली येथील उल्हास नदीवरील रस्त्याचे कामही पूर्णत्वाकडे जात असल्याने परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे. महापौर पद मिळताच अ प्रभाक्षेत्रातील सोयी सुविधांना पालिकेतील अधिकाऱ्यांनी सुरुवात केली असून महापौर पदाची ताकद काय असते हे हर्षाली चौधरी यांनी दाखवून दिले आहे. या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा श्रीकांत शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच कल्याण पश्चिममचे आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आणि माजी नगरसेवक शिवसेना उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला गती देण्यात आली आहे. महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल यांच्या अथक प्रयत्नातून व विशेष पाठपुराव्यामुळे निधी मंजूर होऊन हे काम प्रत्यक्षात साकारत आहे. महापौर पद मिळताच अ प्रभाग क्षेत्रातील कामांना चांगली गती मिळाली असल्याने पॅनल क्रमांक ३ मधील नागरिकांना दिलासा मिळणार असून, शिवसेनेने दिलेल्या विकासाच्या वचनपूर्तीचा आणखी एक टप्पा पूर्ण होत असल्याची भावना स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे.

अजित पवार यांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा करणार नाही – एकनाथ शिंदे

अजित पवार यांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा करणार नाही – एकनाथ शिंदे ठाणे, ‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने साऱ्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळेच यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. कार्यकर्ते, पक्षनेते, पदाधिकारी आणि नागरिकांनाही पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ‘अजित पवार यांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र आजही सावरलेला नाही. व्यक्तिश: मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. अजित पवार यांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी आहोत. अशा या दुःखद परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे, सोहळे-समारंभ करणे मला उचित वाटत नाही. त्यामुळेच परिस्थितीचा गांभीर्य आपण जपू या असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्स लावू नयेत, तसेच कोणताही समारंभ, कार्यक्रम आयोजित करू नयेत’, अशी विनंती शिंदे यांनी केली आहे.