Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

केडीएमसी महापौर पदासाठी शिवसेनेच्या वतीने हर्षाली चौधरी थविल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

केडीएमसी महापौर पदासाठी शिवसेनेच्या वतीने हर्षाली चौधरी थविल यांचा उमेदवारी अर्ज दाखल तर उपमहापौर पदासाठी भाजपाच्या वतीने राहुल दामले यांनी दाखल केला अर्ज कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून महापौर पद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. या महापौर पदासाठी शिवसेनेच्या वतीने नगरसेविका हर्षाली चौधरी थविल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर पदासाठी भाजपाच्या वतीने नगरसेवक राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात पालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे हे दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. कांत शिंदे, आमदार राजेश मोरे, मनसेचे माजी आमदार राजू पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नंदू परब, नरेंद्र सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. मात्र दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराचे अर्ज दाखल झाल्याने, या महत्त्वाच्या पदांवरील निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेतील निवडणूक प्रक्रिया ही केवळ औपचारिकता ठरणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून असून, नव्या महापौर आणि उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास खासदार डॉ कांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान ॲड.हर्षाली चौधरी थविल या प्रभाग क्र. 3 ब मधून निवडून आल्या असून त्या उच्चशिक्षित वकील आहेत. यंदाची त्यांची नगरसेवक पदाची दुसरी टर्म असून मागील नगरसेवक कारकिर्दीचा अनुभव आहे.  मुंबई हायकोर्ट येथे, 1० वर्षांपेक्षा अधिक वकिली अनुभव, नगरसेवक म्हणून स्थायी समिती सदस्यां म्हणून कामकाज केले आहे. तर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेले भाजपाचे जेष्ठ नगरसेवक राहुल दामले हे उच्चशिक्षित असून बांधकाम व्यावसायिक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  सक्रिय सदस्य आहेत. राहुल दामले विधानसभा निवडणूक लढण्यासाठी दावेदार होते. २००५ साली स्विकृत नगरसेवक होते. २०१०, २०१५ आणि २०२६ साली नगरसेवक पदी निवडून आले. २०१३ -१४ साली उपमहापौर पदी होते. २०१८ साली स्थायी समिती सभापती पदी होते. २०१९ साली विरोधी पक्ष नेते पदी होते. आत्ता पुन्हा त्यांच्या गळयात दुसऱ्यांदा उपमहपौर पदाची माळ पडली आहे.…

दहावी-बारावी परीक्षेत कॉपी झाल्यास केंद्राची मान्यता रद्द

दहावी-बारावी परीक्षेत कॉपी झाल्यास केंद्राची मान्यता रद्द बोर्डाचा ‘कडक’ इशारा हरिभाऊ लाखे नाशिक: फेब्रुवारी-/मार्चमध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वी परीक्षांवेळी ज्या केंद्रांवर गैरप्रकार आढळतील, त्यांची मान्यता रद्द करण्याचा इशारा विभागीय शिक्षण मंडळाने दिला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२ वी परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय मंडळ आणि जिल्हा मुख्याध्यापक संघ यांची संयुक्त बैठक झाली. मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाष बोरसे, सचिव मोहन देसले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व केंद्रांवरील खोल्यांमध्ये आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. २०२५ च्या परीक्षेत ज्या केंद्रांवर गैरप्रकार आढळले होते, त्यांची मान्यता रद्द करण्याबाबत कठोर भूमिका मांडण्यात आली. राज्यातील अतिवृष्टी व आपत्तीमुळे बाधित झालेल्या १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच परीक्षक आणि नियामकांची संख्या वाढवून कामाचा ताण कमी करण्यासाठी, एका परीक्षकास जास्तीत जास्त २०० तर नियामकास १००० उत्तरपत्रिका तपासणीसाठी देण्याबाबत चर्चा झाली. सातत्याने परीक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांऐवजी आतापर्यंत हे काम न केलेल्या नवीन शिक्षकांना संधी देण्याबाबत विचार विनिमय झाला. केंद्र संचालक, कर्मचारी आणि पर्यवेक्षक यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. ५३ वर्षांवरील शिक्षकांना तसेच मुख्याध्यापकांना परीक्षक आणि नियामक कामातून सवलत देण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत मुख्याध्यापक संघाचे एस. बी. देशमुख यांनी, परीक्षा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मुख्याध्यापक आणि मंडळ यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. शिक्षकांवर पडणारा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी मांडलेल्या मागण्यांवर मंडळ सकारात्मक विचार करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांची शुल्क माफी आणि मानधन वाढ या विषयांकडे आम्ही प्राधान्याने लक्ष वेधले असल्याचे त्यांनी नमूद केले. विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. बोरसे यांनी, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य असून यासाठी स्थानिक खासदार, आमदार यांच्याकडून निधी उपलब्ध करून घ्यावा, अशी सूचना केली. कंपनी उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून घ्यावेत तसेच वेतनेतर अनुदानात सीसीटीव्हीसाठी तरतूद करण्यात यावी, अशी सूचना डॉ. बोरसे यांनी केली. मुख्याध्यापक संघाकडून मांडलेल्या मागण्यांबाबत मंडळ सकारात्मक असून याविषयी वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठविण्यात येईल, असे डॉ. बोरसे यांनी सांगितले.

सीटीसीच्या शताब्दी समिटला मुंबईत प्रारंभ

सीटीसीच्या शताब्दी समिटला मुंबईत प्रारंभ रमेश औताडे मुंबई : चेंबर ऑफ टॅक्स कन्सल्टंट्स या अग्रगण्य व्यावसायिक संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘द शताब्दी समिट सेंटेनरी कॉन्फरन्स’ या दोन दिवसाच्या भव्य परिषदेला शुक्रवारी प्रारंभ झाला. परिषदेचे प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते इंडसइंड बँकेचे नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन डिझिग्नेट अरिजित बसू यांनी  भारताच्या आर्थिक प्रवासात लवचिक वित्तव्यवस्था व जबाबदार विकास या विषयावर बोलताना त्यांनी नैतिकता, दीर्घकालीन दृष्टिकोन आणि व्यावसायिकांच्या जबाबदारीवर भर दिला. बदलत्या आर्थिक व व्यावसायिक वातावरणात कर, कायदा व लेखा क्षेत्रातील तज्ज्ञांनी तंत्रज्ञान, प्रशासन आणि उत्तरदायित्वाशी सुसंगत राहणे आवश्यक आहे. शताब्दी समिट हे या दृष्टीने मार्गदर्शक ठरेल असे सीटीसीचे अध्यक्ष सीए जयंत गोखले यांनी सांगितले. उपाध्यक्ष सीए नेहा राजेन गडा, संयुक्त मानद सचिव सीए मेहुल शेट्टी व सीए अंकित संघवी तसेच मानद खजिनदार सीए वितांग शाह उपस्थित होते. शताब्दी वर्ष समितीचे अध्यक्ष सीए विपुल चोक्सी यांनी सांगितले की, परिषदेत भांडवली बाजार, स्टार्टअप्स, जीएसटी, संबंधित पक्ष व्यवहार, कर नियोजन तसेच व्यावसायिक सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावावर सखोल चर्चा झाली.

टेंभरे (बु.) ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला उपसरपंचपदी सुनंदाताई गायकवाड विराजमान

टेंभरे (बु.) ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला उपसरपंचपदी सुनंदाताई गायकवाड विराजमान राजीव चंदने मुरबाड: तालुक्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या तंटामुक्ती तथा हागणदारी मुक्त ग्राम सन्मानित टेंभरे (बु.) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनंदाताई कैलास गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला उपसरपंच होण्याचा मान त्यांनी पटकावला आहे. ग्रामपंचायतीच्या ज्येष्ठ सदस्या असलेल्या सुनंदाताई गायकवाड यांच्या निवडीमुळे गावातील अनेक प्रलंबित विकासकामे जलद मार्गी लागतील, असा विश्वास सरपंच सुहास केंबारी यांनी व्यक्त केला. त्यांच्या निवडीबद्दल गावात सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून विशेषतः महिला वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. या निवडीप्रसंगी माजी सरपंच दिलीप केंबारी, शरद केंबारी, माजी उपसरपंच सुरेश जाधव, अभय केंबारी, धनाजी टोहके, ग्रामपंचायत सदस्य संजय केंबारी, नंदा केंबारी, शुभांगी पवार, मंगला खुटारे, तसेच राजेश केंबारी, दामोदर जाधव, भगवान जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेविका ज्योती पवार, अंगणवाडी सेविका मोनिका केंबारी तसेच गावातील महिलांनी सुनंदाताई गायकवाड यांचे विशेष अभिनंदन केले. प्रथमच महिला उपसरपंचपदाचा मान मिळाल्याने गावातील महिलांमध्ये आत्मविश्वास व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्या उपस्थितीत मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली

अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्या उपस्थितीत मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली अशोक गायकवाड रत्नागिरी : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात २ मिनिटे मौन पाळून आज आदरांजली वाहण्यात आली. अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण विश्वजीत गाताडे, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मौन सुरु होण्यापूर्वी सकाळी ठीक १०.५९ ते ११ वाजता इशारा भोंगा वाजविण्यात आला. त्यानंतर ११.०३ वाजता मौन संपल्या संबंधिताचा इशारा भोंगा वाजविण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी रोजी २ मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते.

 दुर्गाडी किल्ल्याच्या पायऱ्यांवर आढळलेल्या कोब्रा नागास सर्पमित्राने दिले जीवनदान

दुर्गाडी किल्ल्याच्या पायऱ्यांवर आढळलेल्या कोब्रा नागास सर्पमित्राने दिले जीवनदान कल्याण : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी माता मंदिराकडे जाणाऱ्या मध्यभागातील पायरी परिसरात आढळलेल्या कोब्रा नागास सर्पमित्राने पकडून जीवदान दिल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. सर्प मित्र दत्ता बोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्गाडी माता मंदिराकडे जाणाऱ्या मध्यभागातील पायरी परिसरात गुरुवारी दुपारी साडेपाच फुटी लांब कोब्रा नागाची आणि मुंगूस यांची झुंज रंगली होती. दरम्यान तिथे किल्ले दुरुस्ती काम करणारे कामगार पोहचले त्यांची चाहूल लागल्याने मंगूस पळून गेले. त्या नागाचा रूद्र अवतार पाहता मंजुराची भितीने त्रेधातिरपीट उडाली. प्रसंगावधान पाहत सुरक्षा कर्मचारी मोरे यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याशी संपर्क साधला असता तातडीने घटनास्थळी पोहचत सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी साडेपाच फुटी लांब विषारी कोब्रा नागास पकडून जीवदान दिल्याचे पाहता उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितले की, गारव्यामुळे साप उन्हाची तिरिपसाठी दगडी पायरी परिसरात उबीसाठी आला असावा. संदर्भीत पकडलेल्या विषारी नागास जीवनदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले. ही घटना पाहता भक्तांनी देखील मंदिर परिसरात जाता येताना लक्ष देत मार्गाक्रमण गरजेचे आहे

 पनवेल-गव्हाण भागात भाजप महायुती उमेदवारांना जनसमर्थन

पनवेल-गव्हाण भागात भाजप महायुती उमेदवारांना जनसमर्थन पनवेल: रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गव्हाण जिल्हा परिषद गट तसेच वहाळ व गव्हाण पंचायत समिती गणामध्ये भाजप महायुतीच्या उमेदवारांना नागरिकांकडून उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारादरम्यान सर्व स्तरातून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या भरघोस विजयाचा आत्मविश्वास अधिक बळकट केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली गव्हाण जिल्हा परिषद गट तसेच वहाळ व गव्हाण पंचायत समिती गणामध्ये भाजप महायुतीचे उमेदवार जोमाने प्रचार करत असून विजयासाठी सज्ज झाले आहेत. अनुभवी आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळे प्रचाराला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत आहे.स्वर्गीय जनार्दन भगत, लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे आणि राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, वाय. टी. देशमुख यांची जन्मभूमी असलेल्या गव्हाण विभागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम या नेतृत्वाने गेल्या अनेक वर्षांत केले आहे. नागरिकांचे प्रश्न सातत्याने सोडविणे, लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि कोणत्याही भेदभावाविना मदतीचा हात देणे ही या नेतृत्वाची ओळख आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कायम लोकाभिमुख कार्यपद्धती अवलंबली आहे. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव राहिला असून यामुळेच त्यांना नेहमीच जनतेचा भरघोस पाठिंबा लाभला आहे. या विश्वासार्ह आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा लाभ भाजप महायुतीच्या उमेदवारांना या निवडणुकीत निश्चितच होणार असून गव्हाण जिल्हा परिषदमध्ये निकिता खारकर, तसेच वहाळ पंचायत समितीमधून वितेश म्हात्रे व गव्हाण पंचायत समितीगणामध्ये जिज्ञासा कोळी या तीनही उमेदवारांचा अर्थात भाजप महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 दादागिरी आणि पैशाची भाषा करणाऱ्या उमेदवारांना आता जनता माफ करणार नाही: विलास फडके

दादागिरी आणि पैशाची भाषा करणाऱ्या उमेदवारांना आता जनता माफ करणार नाही: विलास फडके राज भंडारी पनवेल: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. यातच आदई पंचायत समिती गणातून शेतकरी कामगार पक्षाचे अनुभवी नेते विलास फडके तसेच नेरे जिल्हा परिषद गटातून मारुती बाळू भस्मा हे मैदानात उतरले आहेत. आपल्या आयुष्याची अनेक वर्षे ज्यांनी समाजसेवा करण्यात खर्ची घालविली त्या विलास फडकेंसोबत जनशक्ती आणि विरोधात धनशक्ती अशी निवडणूक रंगत आहे. मागील निवडणुकीत ज्यांनी धनशक्तीच्या जोरावर ही जागा जिंकली ते गेल्या ८ वर्षात मतदार जनतेकडे फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे जनतेने आता ठरवले आहे. धनशक्तीला तालुक्यातील जनता आता जनशक्तीचा अवतार दाखवणार असल्यामुळे आदई पंचायत समिती गणातून जनता विलास नारायण फडके आणि नेरे जिल्हा परिषद गटातून मारुती बाळू भस्मा असे आम्हा दोन्ही उमेदवारांना भरघोस मतदान करून निवडून देणार असल्याचा विश्वास विलास नारायण फडके यांनी प्रचारादरम्यात व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मागील वेळी जनतेने धनशक्तीच्या जोरावर भाजपच्या उमेदवाराला निवडून दिले होते. मात्र पुन्हा निवडणूक लागण्यासाठी ८ वर्षांचा कालावधी लागला. गेल्या ८ वर्षात आम्ही ज्यांना मतदान केलं ते आमच्याकडे फिरकलेच नाहीत, असा सुर मतदार जनतेने लावला आहे. तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या मतदार संघातील जनतेसाठी असणाऱ्या विविध योजना, सवलती या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचे उमेदवार अपयशी ठरले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे भाजपच्या वतीने दादागिरी आणि पैशाची भाषा करून जनतेला गृहीत धरणाऱ्यांना आता जनता माफ करणार नसून महाविकास आघाडीच्या खटारा चिन्हावरील उमेदवारांना जनता मोठ्या संख्येने मतदान करून निवडून देणार असल्याचा विश्वास विलास फडके यांनी व्यक्त केला.

 आरोग्य विभागाचे ‘कोकण स्पंदन’ उत्साहात

आरोग्य विभागाचे ‘कोकण स्पंदन’ उत्साहात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कलाविष्काराने जिंकली रसिकांची मने अशोक गायकवाड रत्नागिरी: रुग्णांची सेवा करताना दिवसरात्र व्यस्त असणाऱ्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कोकण स्पंदन’ या स्नेहसंमेलनाने रत्नागिरीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. भारतीय प्रजासत्ताक दिन आणि ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ यांचे औचित्य साधून येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा सांस्कृतिक कार्यक्रम २६ जानेवारीला पार पडला.जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, क्षयरोग, कुष्ठरोग व हत्तीरोग विभाग, महिला रुग्णालय आणि प्रादेशिक मनोरुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि मुख्याधिकारी वैभव गारवे आदी उपस्थित होते.स्टेथोस्कोप बाजूला ठेवून जोपासली कला आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले वैद्यकीय कर्तव्य बजावत असतानाच जोपासलेली कला यावेळी सादर केली. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात ६० हून अधिक वैविध्यपूर्ण कलाप्रकार सादर करण्यात आले. शास्त्रीय व सुगम संगीताच्या सुरेल मैफिलीने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. लोकनृत्य आणि बॉलीवूड गाण्यांवरील बहारदार सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. उपस्थितांना खळखळून हसवणारी मिमिक्री (नक्कल) आणि सामाजिक संदेश देणाऱ्या एकांकिका व नाटकांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे, आणि पॅथॉलॉजिस्ट डॉ. अर्जुन सुतार यांच्यासह संपूर्ण टीमने अहोरात्र परिश्रम घेतले.रत्नागिरीच्या सांस्कृतिक इतिहासात आरोग्य विभागाने सेवेसोबतच कलेच्या क्षेत्रातही मारलेली ही भरारी कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. प्रेक्षकांच्या तुडुंब प्रतिसादाने सावरकर नाट्यगृह दुमदुमून गेले होते.

V

केडीएमसीच्या एच प्रभागात अनाधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार, उपायुक्त समीर भुमकर व बाळासाहेब चव्हाण यांच्या निर्देशानुसार ह प्रभागाचे सहा.आयुक्त राजेश सावंत यांनी डोंबिवली पश्चिम येथील देवीचा पाडा (स्मशानभूमीच्या मागे) तसेच नवीन देवीचापाडा येथील २५ खोल्या आणि १० चाळीचे जोते संपूर्णत: निष्कासित करण्याची कारवाई केली. हि कारवाई फेरीवाला पथकाचे कर्मचारी, ठेकेदाराचे १० कामगार, १ जे.सी.बी. यांच्या सहाय्याने करण्यात आली.